सोमवार, २६ जुलै, २०१०

मुंबई-पुणे-मुंबई... सिनेमास्कोप



मुंबई-पुणे-मुंबई पाहिला.. कालच! पण पहिल्यांदा नाही तर तिस-यांदा.. एकदा "इ-स्क्वेअर" मग "मंगला" आणि नंतर या दोन ठिकाणी पैसे उधळल्यामुळे आलेल्या गरिबीमुळे शेवटी "प्रभात".. आता हा लेख काही त्या पिक्चरचं परीक्षण वगैरे नाही.. पण निरीक्षण जरूर आहे.

मुंबईवरून "मुलगा बघण्या" च्या कार्यक्रमासाठी आलेली 'ती' आणि पुण्यात तिला भेटलेला 'तो'.. यांच्यातला संवाद म्हणजे हा अख्खा मुव्ही! पिक्चर मध्ये विशेष असं काही नाहीये. म्हणजे मारामारी, रोमान्स, सुंदर लोकेशन्स.... (अर्थात पुणे हे ब्याकग्राउंड निवडल्यावर "सुंदर लोकेशन" ला एक मर्यादा येणं स्वाभाविक आहे...) असं काही काही म्हणून नाहीये तरीपण काहीतरी 'खास' आहे खरं.. मनाला भावतो एकदम हा सिनेमा. मुळात भारतीय पिक्चरची गरज असणारी हिरो आणि हिरॉईन यांची सुंदर सुंदर नावं, छान छान आणि वेळोवेळी वाजणारी गाणी आणि कुटुंब कलह , वाद विवाद , व्हिलन, आदळआपट, दंगा आणि तत्सम इतर काही मसाला नसताना सुद्धा हा चित्रपट एक घट्ट पकड घेऊन ठेवतो. "ते कशामुळे?" हे शोधण्याचा मात्र हा प्रयत्न नाही.. कारण मला ते कोडं तसंच राहू देण्यात जास्त मजा वाटतेय.

मुंबईकर "ति"ला पुण्यात आल्यानंतर योगायोगाने "तो" भेटतो आणि नंतर काही "टीपीकल पुणेरी" अनुभव येतात.. ते ती त्याच्याशी शेअर करते.. त्यामुळे त्याचा पुणेरी स्वाभिमान डिवचला जातो आणि तोही तिला उलट उत्तर देतो.. एकमेकांचा पिच्छा सोडवता सोडवता परिस्थिती त्यांना एकत्र थांबायला भाग पाडते. त्याचा पुण्याविषयीचा अभिमान मोडून काढण्यासाठी ती प्रतिवाद करत जाते आणि तो तिच्यावर पर्यायाने मुंबईकरांवर कुरघोडी करायचा प्रयत्न करतो.. आयुष्यात ही व्यक्ती पुन्हा भेटण्याची सुतराम शक्यता वाटत नसल्यानेच कि काय ती त्याला आपली कथाही ऐकवते आणि मग तोही तिला आपल्या जुन्या प्रेमाबद्दल सांगून स्वतःचं मन मोकळं करून घेतो.

पुण्याचा अवास्तव अभिमान बाळगणारा तो आणि त्याला वठणीवर आणणारी ती;जुन्या पद्धतीच्या लग्नसंस्थेवर ताशेरे ओढणारी ती आणि तिला "नात्यांची मजा ती उलगडण्यात असते" असं सांगून समजावणारा तो; सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक रंगत कायम ठेवतात.. जाणूनबुजून एकात एक गुंफत नेलेले प्रसंग आणि अलगद सोडवत नेलेली ती गुंतागुंत कुठेच कृत्रिम वाटत नाही. विशिष्ट वयोगट डोळ्यासमोर ठेवून जरी हा चित्रपट बनवला नसला तरी लग्न न झालेल्या, नुकतंच बेडीत अडकलेल्या आणि लग्नाच्या बंधनात मुरून मुरून पार लोणचं झालेल्या प्रौढ वर्गाला देखील तो तितकाच आवडेल असं मला वाटतं. अर्थात चित्रपटात एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे "हे माझं मत आहे , निर्णय नाही.."

सारसबागेतल्या एका प्रसंगात त्याने तिला भेळ देऊन त्यावर "कशी वाटली आमची भेळ?" अशी प्रतिक्रिया विचारल्यावर "ठीक आहे" अशी शांत प्रतिक्रिया ती देते. त्यावर खवळून तो तिला ही भेळ त्रिभुवनात कशी आदर्श आहे वगैरे गोष्टी सांगू पाहतो, तेव्हा ती त्याला म्हणते की " भेळ, चणे हे समुद्रावर जाऊन खायचे पदार्थ आहेत !! पुण्यात अरसिकता आहे हे बरोबर आहे कारण तिथे समुद्र नाहीये ना.. “ आपली विकेट डाऊन झाल्याच त्याला कळतं पण हेका सोडेल तर तो पुणेकर कसला?? तो लगेच तिला विचारतो.. "तुमच्याकडे सगळं असेल पण तुळशीबाग आहे का?" या वाक्यावर पुण्यातल्या प्रेक्षागृहात दाद न मिळती तरच नवल!!

पुण्यातल्या मुलींचा "हिरवळ" वगैरे असा उल्लेख, तिने त्याला थेट "आर यू अ वर्जिन?" असं विचारल्यावर त्याचा गोरामोरा झालेला चेहरा अशा टाईपची थोडी वाक्यं असली तरी ती त्या त्या ठिकाणी चपखल आहेत.. कुठेही बघणा-याला ऑकवर्ड वाटत नाही. एकमेव असणार गाणं देखील त्याने केलेली कविता म्हणून ऐकवलं गेलंय.. त्यामुळे ते संपूच नये असं वाटत राहतं.. स्वप्नील जोशीने उभा केलेला नायक; नसणा-या "six pack abs" मुळे "खात्या-पित्या घरचा वाटतो.. आणि ब-याच जणांना तो आपल्यातला ही वाटतो! ( साहजिकच आहे ना! त्याच्या पोटाचा शर्टवरून दिसणारा आकार सेम आपल्यातल्या ब-याचजणांसारखा दिसतो हो! खरंच!! अगदी देवा शप्पथ!! )आणि मुक्ता बर्वे.. सुरुवातीपासून शेवटपर्यंत अतिशय गोड आणि लाघवी, पुरोगामी पण मराठमोळी "ती" उभी करण्यात ती कुठेच अवघडली नाहीये..

दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, गायक या गोष्टींकडे सहसा सामान्य प्रेक्षकाचं लक्ष जात नाही. पण या सिनेमा मध्ये ठिकठिकाणी हे लोक "वा! " म्हणायला भाग पाडतात. पुण्यातली कपल्ससाठी ('कु')प्रसिद्ध spots वापरल्यामुळे एकप्रकारची जवळीक वाटते.. पण प्रेक्षक "अरे हा जे एम रोड, हा एफ सी, हे तर वाडेश्वर.. पेठेत आली रे कुठच्यातरी.." असा खेळ खेळतात तेव्हा थोडा वैताग येतो.. अरे, काय ठिकाणं ओळखली म्हणून पिक्चरचे पैसे परत मिळणार आहेत का? मग? जाऊ दे.. विषयांतर झालं!

सिंहगडावर एकदा त्याने तिच्या जुन्या जखमेवरची खपली काढल्यामुळे (हा शब्दप्रयोग लाक्षणिक अर्थाने घ्यावा.) ती दुखावली जाते आणि रडायला लागते ते पाहून त्याची उडणारी त्रेधातिरपीट पाहण्यासारखी आहे.. त्याचवेळी तिथून जाणारा वाटसरू त्या दोघांकडे पाहत जातो आणि पुढे जाऊन मागे वळून पाहतो तेव्हा स्वप्नील जोशी आपण त्या गावचे नाहीतच असं दाखवण्याकरिता मुद्दाम दुस-या बाजूला चालत जातो.. या आणि अशा प्रसंगातून सहजता राखली गेलीय.. मुव्ही मधल्या ब-याचश्या गोष्टी या आपल्या जीवनात घडणा-या असल्यामुळे काही ठिकाणी आपण स्वतःच्या नकळत स्वतःला ठेवू पाहतो..

साहजिकच शुटींग एका दिवसात झालं नसणार.. पण पूर्ण दिवसभराचा वेळ इतक्या व्यवस्थित आणि अशा प्रकारे चित्रित केला आहे कि शंका घ्यायला वावच उरत नाही..वेगवेगळी ठिकाणं फिरून एकमेकांची मनोरंजक बौद्धिकं घेऊन झाल्यावर मुंबई-पुणे-मुंबई गाडी जेव्हा शेवटच्या वळणावर येते तेव्हा आपल्या मनात एक हुरहूर दाटून येते.. या जोडीचा सहवास आता संपणार... सुखद शेवट अपेक्षितच होता आणि तो तसाच झालाय यात वाद नाही पण तिथपर्यंत येण्यासाठीसुद्धा शेवटच्या ५ - १० मिनिटांमध्ये जी वळणावळणाची वाट निवडली आहे तीसुद्धा अप्रतिमच.. बाहेर पडताना आपण काही विशेष घेऊन निघत नाही पण एक मस्त मूड घेऊन निघतो एवढं मात्र खरं!

सोमवार, २१ जून, २०१०

पाऊस.. सोहळा झाला...




या वीकएंड ला कोल्हापूरला जाऊन आलो.. एका जवळच्या मित्राचं लग्न होतं.. पहिल्यांदा ग्रुपने जायचा प्लान होता.. पण नेहमीप्रमाणे तो शेवटच्या क्षणी फिसकटला! मग काय? सुख के सब साथी दुख में सिर्फ ST ! त्यामुळे निघालो ST नेच.. ब-याच दिवसांनी असा दिवसा उजेडी लांबचा प्रवास करायचा योग आला.. नाहीतर शक्यतो रात्रीच निघतो कुठे जायचं असलं तर.. मला तशी बसल्या बसल्या झोपही लागते आणि सकाळी उठल्यावर इच्छित स्थळी पोहोचलेलो असतो त्यामुळे प्रवासाचा शीण जाणवत नाही.. ६.३० च्या ST ने साधारण १०-१५ मिनिटात पुणे सोडलं आणि घाटात पोहोचलो.. हल्ली ST च्या सीट्स पद्धतशीर असतात पूर्वीच्या तुलनेत आणि मला सुदैवाने एकदम पुढची सीट मिळाली होती त्यामुळे समोरच्या रस्त्याचा पूर्ण व्ह्यू दिसत होता आणि विंडो सीट आणि दरवाज्याच्या काचेतून बाहेरचं दृश्यही दिसत होतं.. घाटात ST ने नेहमीच्या सवयीने आरडाओरडा करायला सुरुवात केली.. मीपण त्यावर उपाय म्हणून इअरफोन्स चढवले आणि मस्त मराठी गाण्यांची प्लेलिस्ट चालू केली.. पहाटे उठल्यामुळे डोळ्यांवर झोप आली होती..कानात छान म्युझिक आणि समोरचा रस्ता बघितल्यानंतर झोप कुठच्या कुठे पळून गेली.. अर्ध्या पाउण तासात गाडी हायवे ला आली.. नुकताच पाऊस पडून गेला होता आणि तो कॉंक्रीट चा नेहमी राखाडी दिसणार रस्ता काळाभोर दिसत होता.. पुस्तकात असल्या टाईपचं वर्णन करायचं असतं तर हमखास "नुकत्याच न्हालेल्या स्त्रीसारखं " वगैरे वगैरे टाकता आलं असतं असा एक विचारही मनाला चाटून गेला!

मग मला जाणवलं कि मी खरंच हा रस्ता अशा पद्धतीने पाहिला नाहीये.. जरी पाहिला असेल तर तो कोणत्यातरी (आणि अर्थात कोणाच्यातरी!) कार मधून पाहिलाय.. त्यामुळे ज्या टाईपचा व्ह्यू मला आता दिसत होता तसा याआधी कधी दिसला नव्हता.. एकतर कार जमिनीलगत असल्याने 'रस्ता' असा दिसत नाही.. समोर एक पट्टा दिसत असतो.. जसं जसं पुढे सरकतो तसा तसा त्या पट्ट्याचा पुढचा भाग दिसत जातो.. आपण आपली त्यावर गाडी चालवायची! पण ST मधून याच पट्ट्याचा लांबपर्यंतचा व्ह्यू दिसत होता.. एकदम एक नंबर! हे सालं सुवर्ण चतुश्कोनाचं काम मात्र भारी झालंय.. रुंद सलग रस्ता, डिव्हायडरवर झाडं- बीडं.. रस्त्याच्या मधोमध ते पांढरे पट्टे, वळण्यासाठीच्या खुणा, रस्त्याच्या साईड ला ते रिफ्लेक्टर्स,हिरवे दिशादर्शक बोर्ड्स.. गावांवरून बांधलेले फ्लायओवर्स.. तिथे रस्त्याच्या कडेला बांधलेलं रेलिंग वगैरे.. छानच झालंय सगळं! आणि आता पावसात धुऊन निघाल्यामुळे सगळंच स्वच्छ स्वच्छ वाटत होतं. गाडीचा आवाज (माझ्या कानांपर्यंत) येत नसल्यामुळे गाडी संथ लयीत जात आहे अस वाटत होतं.. कानात मिलिंद इंगळेचा घासून गुळगुळीत झालेला 'गारवा' जाणवत होता..! मधूनच संदीप खरे,सलील कुलकर्णी वगैरे मंडळी आपली अदाकारी पेश करत होती.. त्याचं आटपलं की पुन्हा सौमित्र 'पाऊस म्हणजे हे आणि पाऊस म्हणजे ते...' वगैरे सांगत होता. थोडक्यात चहाचा कप सोडून सगळ्या गोष्टी जुळून येत होत्या..

सातारा आणि कराड सोडलं तेव्हा ९.३०-१० वगैरे वाजले होते तरीपण एक आल्हाददायक वातावरण तयार झाल होतं. मी स्वतः करत काहीच नव्हतो पण राहून राहून उगीचच प्रसन्न वाटत होतं.. प्रत्येकजण आपल्या धुंदीत आहे अस वाटत होतं.. ११ वाजता कोल्हापुरात पोहचलो तेव्हा मळभ दाटून आला होता मात्र पाऊस पडला नव्हता.. ४:३० तासात जवळपास २५० किलोमीटरचं अंतर कापलं होत बसने.. कमाल आहे. हे अंतर कापायला १० वर्षापूर्वी ८ तास लागायचे.. काही मिनिट्स जास्तच पण कमी नाही.. आणि प्रवासाचा कंटाळा येण्याचा तर प्रश्नच नव्हता. सगळ आठवून मग मगाशी अर्धवट राहिलेलं चित्र माझ्या परीने पूर्ण करण्यासाठी मी 'स्थानका'समोरच्या कुठल्याश्या हॉटेल मध्ये वडासांबार आणि चहा घेतला.. मग लग्न कार्यालयात पोचलो.. रिक्षावाल्याने वैश्विक नियमानुसार अख्ख्या गावाला (इथे शहराला) प्रदक्षिणा घालून मला इच्छित स्थळी पोचवलं आणि दीडपट भाडंही घेतलं.. पण मला मूड खराब करायचा नव्हता (खरंतर तिथल्या धट्ट्याकट्ट्या रिक्षावाल्यांशी भांडायला गट्स हवेत ना? )..

लग्नसमारंभ झोकात पार पडला.. मी मस्त कुर्ता वगैरे घालून मिरवलं.. जुने मित्र वगैरे वगळता फारसं कोणी ओळखत नव्हतंच.. त्यामुळे उगीच इकडे तिकडे सूचक फिरत राहिलो.. काही 'प्रेक्षणीय' दिसतंय का पाहत.. पण भ्रमनिरास झाला.. आजकाल सुंदर मुली एकच लग्नसमारंभ अटेंड करतात असं दिसतं! त्यांचं स्वतःचंच!! त्यामुळे थोडी निराशा झाली.. थोडक्यात एवढा पेहराव फुकट गेला.. जेवणाच्या पंगती आटोपल्यावर ओळखीच्या लोकांसोबत गप्पा टप्पा झाल्या. सगळ्यांचे अर्थात परत पुण्यात यायचे प्लान्स चालू होते. आहेरच्या formalities झाल्यावर परतीच्या रस्त्याला लागलो. आलोच आहे तर जाता जाता अम्बाबाईलापण भेटून येऊ म्हणत तिथे एक pit -stop घेतला. मुख-दर्शन घेतलं. हे देखील बरं झालं.. नाहीतर आपण शिस्तीत लाईन मध्ये उभं राहून कसंबसं गाभा-यात पोचणार आणि तिथला हवालदार (की जो कोणी असतो तो) आपण भोज्ज्या केला हे समजताच पिटाळून लावणार.. त्यापेक्षा हे कितीतरी बरं! कितीही वेळ उभं राहा.. मागून छळायला कोणी नाही..! त्यामुळे जरा अजूनच बर वाटलं.. मनात म्हटलं लग्न वगळता ही ट्रीप बरीच सत्कारणी लागली..!!

परत आलो तर कोल्हापूरच्या बस स्थानकावर अलोट जनसमुदाय ! सगळी जनता पुण्याला जाणा-या गाड्यांच्या प्रतीक्षेत.. येताना ठरवलं होत की जाताना मस्त वोल्वोने जाऊ पण कसलं काय आणि फाटक्यात पाय म्हणतात न तसं झालं.. त्याचं बुकिंग सकाळीच झालं होतं आणि पुणे गाडी आली की एकतर आधीच रिझर्व्ड नाहीतर पब्लिक मस्त मुसंड्या मारून जागा अडवत होतं.. एकंदरीत निभाव लागणं मुश्कील दिसू लागलं. कोल्हापूर पुण्यापासून ४.३० तासाच्या अंतरावर आल्यामुळे वीकेंडला येणारं पब्लिक वाढलं असावं! शुक्रवारी ऑफिस सुटलं की रात्री १०:३० वाजता जेवायला कोल्हापुरातल्या घरी हजर! विशेषत: मुलींची संख्या जास्त वाढल्यामुळे वोल्वो वगैरे सारख्या सोफिस्टीकेटेड गाड्यांचं बुकिंग आधीच फुल होत असावं! म्हटलं, 'सारं काही सुरळीत घडत असताना काहीतरी खूप मोठ्ठ विपरीत घडायची तयारी चालू असते..' हा मर्फीचा नियम आता आपल्याला लागू होतो की काय? तेवढ्यात अंबाबाई पावली! एक जादा बस धावून आली.. धावून म्हणजे शब्दश: बस आमच्यावर धावून आली आणि नंतर आम्ही सगळे बसवर धावून गेलो.. आत घुसलो तर पूर्ण बस रिकामी! मागून गर्दीचा लोट येत होता.. रिस्क नको म्हणून मी शेवटून दुसरी सीट पटकावली.. विंडो-सीट.. डाव्या बाजूने उन्हं येत होती आणि मी उजवीकडे! (मला कसल्यापण गोष्टीचं कौतुक वाटतं आजकाल!) पुन्हा कोल्हापुरातून बाहेर येईपर्यंतचा त्रास वगळता सुखद प्रवास सुरु झाला.. मी डोळे मिटून सकाळचं दृश्य आठवत होतो.. साथीला इअरफोन आणि मोबाईल होताच! अर्ध्या एक तासात मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा ५.३०-६.०० लाच पावसाने काळोख केला होता आणि लांबवरच्या डोंगरांमध्ये कोसळणारा पाऊस दिसतही होता.. मात्र आमचा रस्ता कोरडा! कानात साधना सरगम "ढग दाटुनी येतात.." असं आळवत होती.. याला योगायोग म्हणायचं की आणखी काही? थोड्याच वेळात पावसाची रिपरिप चालू झाली... एका मोठ्या सरीतून बस पास झाली.. आणि वाटून गेलं खरंच आता तो वाफाळता चहा घेऊन कुठेतरी घुटके घेत बसलो असतो तर किती मजा आली असती!! पण अंबाबाईच्या दर्शनाने कमावलेलं पुण्य खर्च होत होतं बहुधा! कारण आमची बस एका 'अतीत' नावाच्या ठिकाणी थांबली! थोड्याच वेळात... वरून मध्ये मध्ये पावसाचे थेंब पडत होते आणि मी तसाच उभं राहून चहाचा आस्वाद घेत होतो! सकाळ पासून मनात रंगवलेलं चित्र फायनली पूर्ण झालं!

रात्री दहा-एक वाजता घरी पोहोचलो तेव्हा ५०० किलोमीटर वगैरे पार करून आल्यासारखं अजिबात वाटलं नाही उलट मनातून जरा जास्तच फ्रेश झाल्यासारखा वाटत होतं! आणि मी गुणगुणत होतो.. "पाऊस.. सोहळा झाला... कोसळत्या आठवणींचा.. कधी उधाणता तर केव्हा थेंबांच्या संथ लयींचा... "

सोमवार, ५ एप्रिल, २०१०

विखुरलेल्या आठवणी..



रात्रीचे ११:३०.. मी पीएमटीतून शिवाजीनगरला उतरलो आणि चालायला लागलो.. "साहेब नाशिक का? औरंगाबाद डायरेक्ट गाडी आहे.. चला कुठे परभणी का ? शनी शिंगणापूर...शनी शिंगणापूर..." मी "नाही नाही" म्हणत रस्ता काटत होतो.. अगदीच एखादा "कुठे जायचं ते तरी सांगा.. व्यवस्था करतो.." असा मागे लागला तर "मी इथलाच आहे, घरी चाललोय " अशा बिनधास्त थापा ठोकत मी निघालो होतो.. मनात विचारचक्र सुरु झालं.. अगदीच नाही तर या नरकयातनांतून सुटका होणार तर.. आज माझा शेवटचा पुणे-नाशिक प्रवास! शेवटचा म्हणजे जबरदस्तीने आणि माझ्या इच्छेविरुद्ध करावा लागणारा शेवटचा पुणे-नाशिक प्रवास..

आठ महिन्यांपूर्वी एका शुक्रवारच्या प्रसन्न संध्याकाळी साहेबाने विचारलं नाशिकला जायला तयार आहेस का? मी विचारलं “किती ड्युरेशनसाठी ?” “जास्तीत जास्त ३ महिने! नवीन ब-याच गोष्टी मिळतील शिकायला” वगैरे टीपिकल डिस्कशन झाल्यावर मी तयारी दर्शवली.. मेल आलं "सोमवारी तुला तिकडे जायचंय" या अर्थाचं..! धक्काच बसला.. हे इतकं फास्ट होणार होतं? मला कल्पनाच नव्हती.. शनिवारी मी छोटी मोठी खरेदी केली आणि रविवारी नाशिकला प्रस्थान.. तो पहिला रविवार.. नंतर त्या तीनाचे आठ महिने कसे आणि कधी झाले ते आमच्या कंपनीलाच माहीत!

पहिल्या इम्प्रेशनमधेच मला नाशिक आवडलं नाही! का कोण जाणे.. म्हणजे शहर सुंदर आहे.. रेखीव.. ठिकठिकाणी बागा..सजवलेले चौक वगैरे.. पण मला गेस्ट हाउस मिळालं होतं पार एका टोकाला आणि मला जावं लागायचं MIDC एरिया मध्ये.. थोडक्यात बराच लांब! आठवडाभर जायचे १०० आणि यायचे १०० वगैरे देऊन नाशिकच्या मदमस्त रिक्षावाल्यांवर बरेच उपकार केल्यानंतर मला ते गेस्ट हाउस सोडणं भागच पडलं!

सुदैवाने मला तिथे रघू भेटला.. हा पुण्याचाच! माझ्या पुण्याच्या ऑफिसमध्ये माझ्या ओळखीचा झाला होता.. फार नाही पण ४-५ वेळा बोललो असू आम्ही काहीतरी.. त्यानंतर त्याने कंपनी सोडली होती. पण त्या अगदीच अनोळख्या वातावरणात मला त्याचा प्रचंड आधार वाटला! तो पण २ महिन्यांपूर्वीच आला होता तिथे.. काही काळासाठी.. पण तो काही काळ कधी संपेल हे मात्र त्याच्या कंपनीने त्याला सांगितले नव्हते.. नशीब! कोणीतरी ओळखीचं मिळालं! पण त्याने माझी फार मदत केली.जणू काही आमची फार जुनी ओळख होती.. मला राहायची जागा मिळवून दिली.. मला ऑफिसमध्ये जायला यायला कंपनी दिली.. आणि महत्वाचे म्हणजे पुण्याला परत परत यायचा उत्साह टिकवून ठेवला.. संधी मिळाली की आम्ही पुण्याला निघत असू....

...हॉर्नच्या कर्णकर्कश्श आवाजाने माझी तंद्री भंग पावली. मी भुयारी मार्गात पोहोचलो होतो. तिथे कोणी बारीकसा आवाज काढला तरी घुमतो. लोक कशासाठी तिथे हॉर्न वाजवतात कोण जाणे! तेवढ्यात "अवी" चा फोन आला.

"कुठे आहेस तू? पोचलास का?"
"पोचतोय ५-१० मिनिटात" असं सांगून मी फोन ठेवला..
हा 'अविनाश' .. "हीना travals" चा माझा सिंगल पॉइंट ऑफ़ contact .. फोन केला की सीट ठेवायचा राखून.. अगदी जायच्या रात्री १० ला केला तरी! सहा महिन्यात कधी वाढीव भाडं घेतलं नाही त्यानं.. रघूचीच कृपा हीपण!

... पहिल्या आठवड्यातच एकदा चहा पिताना सिगारेटचा धूर हवेत सोडत त्यानं सांगितलं "आपला बसवाला आहे एक.. स्वस्तात सोडतो!" मी मान हलवत "ठीकेय" म्हटलं.. तोच हा अवी! हळूहळू मी नाशिकच्या वातावरणात मी रुळत होतो पण मन पुण्यातून बाहेर यायला तयार नव्हतं.. मला साधा निरोप सुद्धा घेता आला नव्हता कोणाचा.. त्यात हे ऑफिस.. शहरापासून बरंच दूर.. तिथपर्यंत यायचं म्हणजे तिथपर्यंत येणारं कोणीतरी शोधलं पाहिजे.. नसेल तर शेअर रिक्षाचा जीवघेणा प्रकार!

पुण्यातल्या ऑटोवाल्यांसारखा "नाशिकचे ऑटोवाले" हा सुद्धा स्वतंत्र शोध निबंधाचा विषय होऊ शकतो.. मला त्याचं महत्त्व फारसं वाढवायचं नाहीये म्हणून मी त्यावर काहीच लिहिणार नाही अस ठरवलं होतं तरीपण फुटकळपणे सांगायचं झालं तर ३ सीटर रिक्षामध्ये रिक्षावाल्यासकट ९ जण आणि पिआजिओ आपे सारख्या ६ सीटर रिक्षामध्ये १५ जण "बसवण्याची" करामत नाशिकचे रिक्षावालेच करू जाणे ! शेअर ऑटो हा नाशकाच्या श्रमिक जीवनाचा अविभक्त भाग. कारण जिथे जायचे शेअर ऑटोवाले घेतात १० रुपये तिथेच जायचे "स्पेशल" ऑटो घेणार ६० रुपये! "स्पेशल" ऑटो हा सुद्धा त्यांचाच स्पेशल शब्द. त्याचा अर्थ मागच्या सीट वर ज्याने "स्पेशल" रिक्षा केली आहे त्याच्याव्यतिरिक्त इतर कोणी बसणार नाही.. रिक्षाड्रायव्हर च्या बाजूला बसू शकतात! ते लोक आपण जातो तेव्हढंच अंतर त्याच रिक्षातून जाणार आणि १० रुपये देणार..आपण मात्र स्पेशल रिक्षा केलेली असल्यामुळे ६० रुपये द्यायचे!! यातून होणारा मानसिक त्रास वाचवण्यासाठी एकाच पर्याय.. मी सुद्धा शेअर ऑटोने जायला सुरुवात केली.

सकाळी ह्या कसरती करत ऑफिसला पोहोचायचं. दिवसभर प्रचंड काम आणि रात्री परत याच्या त्याच्या विनवण्या करत एमआयडीसीच्या बाहेर यायचं.. ब-याचदा माझा प्रेमळ बॉस मला अर्ध्या रस्त्यात किंवा सोयीस्कर ठिकाणी सोडायचा पण अन्यथा ससेहोलपट ही होतीच! सकाळी १.५ किमी चालून शेअर रिक्षा जातात त्या ठिकाणी पोहोचायचं; रात्री तसंच एक किमी चालत तसलाच स्पॉट गाठायचा.. हा रस्ता मात्र अंधारा.. कारण तिथे कोणत्या कंपनीचं ऑफिस नव्हतं.. एफ एम वरच्या गाण्यांचीच काय ती सोबत.. अनोळखी ठिकाणी असल्या वातावरणात अजूनच एकटं एकटं वाटायला लागतं..

...मोबाईलच्या रिंगने मी त्या दु:स्वप्नातून बाहेर आलो… 'अवी' च होता. 'येतोय रे बाबा.. मी काय पळून नाही चाललो' मनातल्या मनात पुटपुटत मी फोन उचलला.

"कुठे आहेस रे?"
"अंडरग्राउंड रोड ने बाहेर पडतोय.. पोचेन एक ५ मिनिटात.."
"ठीक आहे लवकर ये, काउंटर ला येणारेस कि डायरेक्ट बसमध्ये?"
"डायरेक्ट बसमध्ये" म्हणून मी फोन ठेवला.. अवीचा हा दरवेळचा प्रश्न मला कधीच कळला नाही.. पण दोन पर्यायांमधला दुसरा पर्याय मला निदान कळायचा तरी म्हणून मी तोच निवडायचो!

हायवे वरून थोडसं अंतर चाललं की "हीना" उभी असलेली दिसू लागायची.. माझी वाट बघत! क्लीनर आतासा काचेवर फडका मारत होता.. ह्या 'अवी'ला ना भलतीच घाई! मी मनातल्या मनात त्याच्यावर चरफडत नकळत वाढवलेला चालण्याचा स्पीड कमी केला.. ११:४५ तर झालेत.. १२ शिवाय हे लोक बस चालू पण करणार नाहीत.. आणि उगीच "पोचला का,पोचला का" चा धोशा.. पुण्यातल्या रिक्षावाल्यांनी दिवसाचा धंदा गुंडाळून मागच्या सीटवर पथारी पसरायची तयारी चालू केली होती.. पुन्हा रिक्षावाले.. चेंज द सब्जेक्ट.. काहीजण विरंगुळा म्हणून पत्ते खेळत होते.. हि काय वेळ आहे? चेंज द सब्जेक्ट.. ओके.. विरंगुळा..

कॉलेज रोड हे आमचं मुख्यत्वे विरंगुळ्याच ठिकाण.. लोक इथे आपापल्या ‘विरंगुळ्या’सोबत अथवा विरंगुळा शोधण्यासाठी येत.. ज्या वीकेंडला पुण्याला जाता येत नसे अथवा आठवड्याच्या मधेच चुकून एखादी सुट्टी आली तर हे आमचं ठरलेलं ठिकाण! रोड वर भटकून दमलो की मी "सिनेम्याक्स" चा आधार घेत असे.. सर्वात जवळच्या अंतरावर असणारं मल्टीप्लेक्स. वीकेंड असला कि त्यांचे भाव डायरेक्ट २०-२५ रुपयांनी वाढत! पण अडला हरी म्हणतात ना.. आणि असे बरेच "अडले हरी" लाईनमध्ये उभे असत.. दरम्यान च्या काळातले अगदी टूकार मूव्हीज सुद्धा मी पाहिले.. नाईलाज म्हणून! नाहीतर आणखी काय करणार?

हॉटेल्स मात्र बरीच फिरलो आम्ही तिथे.. ब-याचदा जेवायला कोणत्या ना कोणत्यातरी हॉटेलात जायचो.. कारण जिथे मेस लावायची ठरवत होतो त्याने काही दिवसातच मला माझा विचार बदलायला भाग पाडलं! पातोळ्या, शेव असल्या निर्जीव पदार्थांना तेलाचा तवंग असणा-या रश्श्यात मिक्स करून जो पदार्थ बनत असे त्यालादेखील तो मूळ पदार्थाची भाजी म्हणत असे! जस कि 'शेवभाजी' इ. इ. मी तोपर्यंत शेव हा प्रकार चहाबरोबर किंवा फावल्या वेळात तोंडात टाकायला वगैरे म्हणून खाल्ला होता.. पण जेवणाबरोबर?? तोसुद्धा आठवड्यातून दोनदा आणि कम्पल्सरी? मग हॉटेल्सचा आसरा घेण्याशिवाय गत्यंतर नव्हतं! इथे तुम्हाला "ताटात काय येणार" याच गेस वर्क तरी नाही करावं लागत! कुसुमाग्रजांच्या घराजवळ एक छान हॉटेल आहे. "वैदेही" नावाचं. खरच सुंदर.. आमच्या नेहमीच्या जाण्यामुळे तिथला कॅप्टन आम्हाला मेनू कार्ड मध्ये नसलेले पदार्थ स्वतःहून सांगत असे.. आणि ते छानही असत.

..बसजवळ पोचताच माझी नजर भिरभिरू लागली.. विनोद आणि इतर नेहमीचे वारकरी दिसले.. मी त्यांच्याजवळ गेलो.. काय केलं दोन दिवस? किती नंबर सीट? वगैरे जुजबी आणि निरर्थक प्रश्नावली संपल्यावर काही वेळाने आम्ही बस मध्ये चढलो.. निरर्थक यासाठी कि ब-याचदा विशेष काही केलेलंच नसे वीकेंडला.. याच बसने शुक्रवारी मध्यरात्री नाशिकहून निघून शनिवारी पहाटे पुण्यात पोचल्यामुळे सकाळी उशिरापर्यंत उठणं होत नसे.. आळसावलेल्या अवस्थेत काय प्लान करणार? त्यामुळे शनिवार वायाच जायचा आणि रविवारी रात्री निघायाचच असल्याकारणाने काही मेजर प्लान करणं शक्यच नसायचं.. उगीच याला भेट, त्याला बोलाव, असल्याच गोष्टी व्हायच्या.. अन्यथा पिक्चरचा प्लान. येऊन जाऊन प्रत्येकजण तेच करायचा.. ज्यांचं घरच पुण्यात होतं ते लोक तर तंगड्या ताणून झोपण्याव्यतिरिक्त इतर काही उद्योग करत नसत. त्यामुळे या "काय केलं ?' वगैरे प्रश्नांना फारसा अर्थ नसायचा. उगीच बोलायला काहीतरी सुरुवात व्हावी म्हणून! आणि झोपणा-या माणसाला सीट नंबर विचारून काय फायदा? तरी पण आम्ही विचारत असू..

…१२ वाजून पण गेले..बघायला गेलं तर सोमवार सुरु झाला! मी सीट मागे ढकलली आणि रेलून खिडकीतून बाहेर बघत राहिलो.. खरंच आपले हाल झाले नाशिकला कि आपणच एन्जॉय नाही करू शकलो? एवढी "सिटी ऑफ पिल्ग्रिम्स" म्हणतात पण आपण त्र्यंबकेश्वर वगळता कुठेच नाही गेलो.. अगदी पंचवटीसुद्धा. मुळात पुण्यातून ज्या पद्धतीने जावं लागलं त्यामुळे असावं कदाचित.. लोक तर गाड्या करून वगैरे जातात नाशिकला वणीच्या देवीकडे, दिंडोरीला आणि आपण? तरीपण काही कमी मजा नाही केली.. ऑफिसच्या मुलांबरोबर गेस्ट हाउस ला केलेली धमाल.. आय-पी-एल च्या निमित्ताने घातलेला धिंगाणा.. सुला विनेयार्ड (कि वाईनयार्ड?) ला झालेलं गेट-टुगेदर.. सीसीडीची बेचव कॉफी.. 'बंजारा' मधला साईट स्क्रीन आणि वेताच्या खुर्च्या.. दादासाहेब फाळके स्टेडीयम मधला रॉक-शो.. लोकांच्या 'मकालू' मधल्या सेंड-ऑफ आणि बर्थ-डे पार्ट्या.. ब-याच चांगल्या आठवणीसुद्धा आहेत की!

.. अवि आला..
"तुझी विंडो सीट आहे.."
"मला नकोय विंडो"
"का?"
"थंडी वाजते रात्री"
"बरं.. बस इथेच. किती आहे नंबर? ७ का? ठीकेय"

स्वत:च प्रश्न विचारून स्वत:च उत्तर देत अवीने तिकीट दिलं.. याला सांगावं का? मी नसणारेय यापुढे म्हणून! पण त्याला काय फरक पडणार आहे? मी ज्या रविवारी नसायचो तेव्हा त्याने कधी नाही विचारलं तर कशाला सांगायचं? जाऊ दे.. सगळ्यांचीच साथ सुटणार आता.. हा नाशिक-पुणे-नाशिक वाला वारकरी संप्रदाय.. नाशिक मधले ऑफिसचे लोक.. कॉलेज रोड, सिटी सेंटर मॉल... बंजारा मधला डी जे.. 'वैदेही'चा कॅप्टन... हॉस्टेलवरचं पब्लिक.. गेस्ट हाउस...अवी आणि हीना सुद्धा!

मध्यरात्रीचे १२:३० …बस चालू झाली आणि एक एक करत पुण्यातली ठिकाणं मागे पडायला लागली.. मी येणारेय परत.. पण यावेळेला परत जाण्यासाठी नाही.. मी मनातल्या मनात म्हणालो.. रात्रीच्या शांततेत इंजिनाचा आवाज घुमत होता.. आणि हीना तटस्थपणे आपल्या मार्गावर मार्गक्रमणा करत होती....

बुधवार, १५ जुलै, २००९

आपली शिक्षणपद्धती!

आपली शिक्षणपद्धती! आहे एकदम सुरेख. म्हणजे जो शैक्षणिक अभ्यासक्रम आहे तो योग्य आहे पण मुल्यमापनाची पद्धत मात्र एकदम चुकीची आहे.
एक एक मार्कासाठी मुलं लढताहेत.. ’बालपणीचा काळ सुखाचा’ हे केवळ कागदावरच राहिलंय.!

नववीचा इतिहास वाचल्यानंतर कधीही असं मनापासून वाटत नाही की भारतानं स्वातंत्र्य मिळवलंय. वाटतं की ते तर असंच मिळालंय.. जणू इंग्रजांनी भीक म्हणून दिलंय.ज्या पद्धतीचं वर्णन अभ्यासक्रमात आहे त्यात काहितरी कमी आहे हे नक्की!
[यावरून ही गोष्ट आठवते.. ]
भारताचा स्वातंत्र्यलढा पुस्तकातून दिसतच नाही.. शालेय अभ्यासक्रमातला इतिहास अडलाय तो स्वातंत्र्यापर्यंतच! जास्तीत जास्त पुढे येतो तो गोव मु्क्तिसंग्रामापर्यंत.. त्यापुढे नाही. (अरे... पूर्वीच्या नेत्यांची आश्वासनं त्यांचे वायदे.. यांची पूर्तता होऊन ते इतिहास जमा होणारेत कि नाही? ) तेच तेच तेच.. पण कितीवेळा? अन त्यावरचे प्रश्न म्हणजे तर मूर्खपणाची हद्द! घटना कालानुक्रमे लिहा, एखाद्या तहाची कलमं लिहा- ४ मार्क्स असतील तर ८ च ६ मार्क्ससाठी मात्र १२! काय हे? या प्रश्नांमुळे इतिहासातली रंजकताच जाते.. पण लक्षात कोण घेतो?

तसाच भूगोल.. सुदान गवताळ प्रदेश कि काय ते.. तैगा , टुंड्रा प्रदेश, निरनिराळे देश यांच्या स्थानांचा ढोबळ अंदाज असावा हे मी समजू शकतो.. पण म्हणून प्रश्नपत्रिकेत एखाद्या प्रदेशाचा अक्षवृत्तीय - रेखावृत्तीय विस्तार अगदी अंश आणि मिनिटांसहित विचारायचा का? तोदेखील ’रिकाम्या जागा भरा ’ असल्या प्रश्नांमध्ये?

त्यामुळे हल्ली मुलं एक्झाम ओरिएंटेड विचार करतात.. नॉलेज बेस्ड नाही.. यामध्ये ज्याचं पाठांतर जास्त तोच जिंकतो.’पुलं’नी त्यांच्या एका लेखात म्हटलंय की ’ आमच्या काळात जास्तीत जास्त निरुपयोगी माहिती असणा-याला ’हुशार’ म्हटले जाई..’ दुर्दैवाने हे विधान आजही तसंच्या तसं लागू होतं!

त्यापेक्षा क्षमताधिष्ठीत चाचण्या ब-या.. व्यक्तिमत्व विकासाच्याही दृष्टीने.शिक्षण असं हवं की ज्याचा सार्वजनिक जीवनात - ज्याला आपण डे-टू-डे लाईफ म्हणतो - उपयोग व्हावा. सर्वांगिण शिक्षण देण्याच्या अट्टाहासापायी निरर्थक शिक्षण देण्याचा फायदा काय? आपल्याकडे किमान दहावी व्हावं अशी समजूत आहे. कित्येक जण दहावीनंतर शिकू शकत नाहीत. पण मुळात अशा लोकांना त्या ज्ञानाचा कितपत फायदा होतो? बेरीज-वजाबाकी तर चौथी शिकलेलाही करू शकतो..पण प्राण्यांचे , वनस्पतींचे वर्गीकरण, कीपचे उपकरण यांचा त्यांना उपयोग काय? गावागावातल्या शाळांमध्ये प्रयोगही फळ्यावरच शिकवले जातात! प्रात्यक्षिक हे जर प्रत्यक्ष नसेल तर त्याला अर्थच काय? तसंच व्यवहारातले उपयोग माहिती नसतील तर कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन्सनी सामान्य विद्यार्थ्याचं डोकं का शिणवायचं? त्यामुळे ही मुलं गणितात नापास होतात आणि दरवर्षी हे प्रमाण वाढतच आहे! केवळ हेच विषय नव्हे तर भाषेबद्दलही तेच!

कादंब-यामधले उतारे आउट ऑफ द कन्टेक्स्ट छापून त्यातल्या एखाद्या वाक्याचं संदर्भासहीत स्पष्टीकरण मागायचं, याला काय म्हणावं? उदाहरणार्थ..
’कोसला’ कादंबरीमधून घेतलेला काही भाग आम्हाला ’आणि बुद्ध हसला’ या नावाने धडा म्हणून होता.. तो वाचून मला ही कादंबरी नेमाड्यांचे प्रवासवर्णन असावं असं वाटत असे!अगदी हल्ली हल्ली ही कादंबरी वाचेपर्यंत!त्या भागातून ना नेमाड्यांचा परिचय झाला होता, ना त्यांच्या कादंबरीचा, ना त्यांच्या लेखनशैलीचा!! असो!

मला तरी असं वाटतं की ज्यांना पुढे शिकायच आहे त्यांना आठवीपासून गणित आणि विज्ञान इंग्लिशमधूनच शिकवावं. कारण या विषयांमधली बरिचशी पुस्तक त्या भाषेतूनच आहेत..मात्र इतर विषय मातृभाषेतच शिकले पाहिजेत तरच ते समजतील. कारण तानाजीची ’आधी लगीन कोंडाण्याचं नि मग माज्या रायबाचं’ ही घोषणा ’फर्स्ट मॅरेज इज ऑफ कोंडाणा ऍण्ड आफ्टर्वर्डज माय रायबाज!’ अशी ऐकायला कशी वाटते? तसाच सुर्याजीचा आवेश ’भ्याडांनो.. तुमचा बाप इथे मरुन पडलाय आणि तुम्ही पळताय काय? मागे फिरा.. परतीचे दोर मी केव्हाच कापून टाकलेत..’ इंग्लिश मध्ये कसा व्यक्त होईल?

हल्ली मात्र मुलांना इंग्लिश शाळात पाठवण्याचं फॅडच आलंय. अगदी गावोगावी सुद्धा.. असो.. कालाय तस्मै नमः!

गुरुवार, २ एप्रिल, २००९

माहित असणारी गोष्ट

ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण या भाषेत नाही..!


एक सुस्थापित राजा होता.खूप श्रीमंत. त्याचं एकच दुःख असतं.त्याच्या प्रचंड श्रीमंत कुटुंबियांमध्ये बेबनाव होता.कारण तेच..परंपरागत! जमिनीची वाटणी. वर्षानुवर्षे हा वाद चालूच होता.एक भांडण मिटलं की दुसरा वाद उफाळून येत असे.राजा हताशपणे पाहण्यापलिकडे काहीच करू शकत नव्हता. त्याचेच कुटुंबीय ते.. कोणाकोणाला आणि काय काय समजावणार?


...अशातच राज्यात एक फेरीवाला आला.विक्रेता.इतरत्र वस्तू खरेदी करुन त्या विविध राज्यांत विकणे हे त्याचे काम.राजाने त्याला राजवाड्याच्या अंगणात जागा दिली. त्याचा व्यापार सुरु झाला. राज्यातलं तमाम पब्लिक त्या फेरीवाल्याकडून वस्तुंची खरेदी-विक्री करत असे. राजानं पण जनतेची अशी काळजी घेतली होती की ती खाउन पिउन सुखी होती.


पण ’फ्यामिली म्याटर’चा तिढा मात्र काही सुटत नव्हता. जो तो आपापला हेका धरुन बसलेला! ही गोष्ट त्या विक्रॆता-जो आता व्यापारी म्हणण्याइतका मोठा झाला होता-त्याच्या नजरेतून काही सुटली नव्हती. राज्यभर आपल्या फ्रॅंचायझी ओपन करुन झाल्यावर तो वाड्याच्या अंगणातून पायरीवर आला. आत डोकावून पाहू लागला. दिसत तर काही नव्हते. पण अंतर्गत कलह जाणवत होत.. हळूहळू पठ्ठ्याने वैयक्तिक व वाड्याची अशा दोन्ही पाय-या ओलांडल्या आणि ओसरीवर प्रवेश केला. तेव्हा त्याला दिसलं की बाहेरून सुस्थापित दिसणा-या या वाड्यात काय चाललंय ते! एकमेकांच्या उरावर बसलेले कुटंब घटक एकमेकांची डोकीपण फोडायला तयार झाले होते! ’तापलेल्या तव्यावर पोळी भाजून नाय घेतली तर कसलं आलंय बिज्नेस माईंड?’ म्हणत या माज आलेल्या व्यापा-याने माजघरात प्रवेश केला.. ’मे आय हेल्प यू?’ चा सूर आळवत त्याने प्रत्येक मेंबरची/ला सहानुभुती मिळवायचा/द्यायचा सपाटा लावला. शेवटी बिझिनेसमनच तो! गोड बोलून काम साधणं हा तर त्याचा हातखंडा!


झालं!कित्येक वर्षांत गोड गोड ऐकायची सवय नसणारे मेंबर्स भुलले.त्याची आश्वासनं ती काय? तुम्हाला तुमचा हक्क मिळवून देण्यात, इतरांविरुद्ध लढण्यास मदत करतो पण तुमच्या प्रांतात व्यापार करायला हरकत नसावी आणि कर कमी करावा. किती क्षुल्लक मागणी! सदस्यांनी त्याची मदत घ्यायची ठरवली...

घरात तर शिरकाव झाला होता..तोदेखील कुटुंबियांच्या संमतीनं. म्हणजे कोणी विरोध करायचा प्रश्नच उरला नाही.पुढचं काम तर अगदीच सोपं होतं.व्यापा-यानं आपलं खरं रूप दाखवायला प्रारंभ केला. गोडी-गुलाबीनं वागून त्यानं राजावरच ताबा मिळवला. घरच्यांच्या इच्छॆपुढॆ त्याचं तरी किती चालणार? तो बिचारा खचत गेला.. हतबल झाला.. गलितगात्र नेत्रांनी राज्याचा -हास पाहात राहिला.. व्यापा-यानं राजाचं धन, सोनं नाणं, संपत्ती आणि जे जे शक्य आहे ते ते पद्धतशीरपणे लुटायला सुरुवात केली.. राजाच्या हे लक्षात आलं आणि तो दुबळा विरोध करु लागला तेव्हा व्यापा-यानं सरळ त्याच्याच मुसक्या बांधून त्याला गुलाम बनवलं! मग काय.. राजरोसपणे लुटमार करून त्यानं स्वतःचं धन केलं... राजाची सगळी मालमत्ता स्वतःच्या खाती जमा केल्यावर त्यानं राजाकडे.. अंह.. गुलामाकडे पाहिलं.. तो शक्तिहीन विरोध करत असला तर त्याला भाकरतुकडा देउन वश करायला बघायचं..नाहीच बधला तर जोर जबरदस्ती करुन त्याचा विरोध दडपून टाकायचा.. हे साधं सरळ धोरण त्यानं अवलंबलं..


... कित्येक वर्ष हेच चालू राहिलं.. एव्हाना दिड-दोनशे वर्ष उलटून गेली होती. राजाच्या घरच्या मंडळींचेही तीन- तेरा वाजले होते.. गोड्बोल्या व्यापा-याने त्यांना हातोहात कफल्लक बनवलं होतं. त्यांच्या कित्येक पिढ्या गुलामगिरीत जन्माला आल्या अन तशाच उलथल्या...

तेवढ्यात राजाला जाणवलं की व्यापारी आता अंगावरच्या वस्त्रांनाही हात घालू लागलाय.. तेव्हा राजानं असहायपणे टाहो फोडायला सुरुवात केली.. त्यानं नविन पिढी जागी झाली.तिनंही आक्रोश करायला सुरुवात केली. आता सगळ्यांनीच रडारड सुरु करुन हातपाय झाडायला सुरुवात केल्याबरोबर व्यापा-यालाही कीव आली.. त्यानं राजाला ’स्वतंत्र’ केलं आणि तो मायदेशी परत गेला..


आता राजा कृश झालाय.. सवय नसल्यानं राज्यकारभार कसा चालवायचा तेच विसरुन गेलाय..त्याच्याकडे त्याचं घर आहे पण मालकी नाहिये..त्या घराच्या भिंतींना कसलाही ठोस आधार नाहिये.. तो जेव्हा अभिमानाने स्वतःच्या घराकडे पाहतो तेव्हा त्याला दिसतं की स्वयंपाकघर आणि धान्याचं कोठार त्या व्यापा-याने परस्पर कुणा दुस-यालाच देउन टाकलंय तेही राजाचंच धन खर्ची घालून.. नव्या बि-हाडाला थोडी आर्थिक मदत नको का द्यायला? राजा ’उदार’ दिसला पाहिजे ना? त्याला अजून दिसतं की हॉलची कॉमन भिंत कोणाची यावर निर्णय होत नाहिये.. तो स्वतःकडे पाहतो तेव्हा त्याला दिसतं ते स्वतःचं अर्धनग्न शरीर, घरत दिसतात उघडी-नागडी फिरणारी मुलं - ’हे घर आता आपलं आहे’ या आनंदात इकडे तिकडे खिदळणारी..कोप-यात दिसते त्याची प्रिय पत्नी, जिच्यावर त्याने जिवापाड प्रेम केलं, जिच्या मदतीने त्याने ही संपत्ती कमावली होती.. अन जिच्या डोळ्यादेखत त्यानं सर्वस्व गमावलं होतं.. ती अब्रूहीन, लाचार, मूक साक्षीदार त्याच्या स्थित्यंतराची; बसलीये दीनवाण्या पण आशाळभूत नजरेने त्याच्याकडे पाहात..! तो काहितरी करेल या एकाच अपेक्षेने!
राजानं ठरवलं- आपण प्रयत्न करायचे. ती भिंत -काही कामाची का नसेना- आपल्या मालकीची करण्यासाठी नाही; पण शेजा-यालाही मिळता नये म्हणून भांडायचं.. या राज्याला पूर्वीचं वैभव प्राप्त करून देण्यासाठी झगडायचं, मुलांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायची.. आणि राजानं निर्धारानं कंबर कसली..

तर अशी ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण...