शुक्रवार, ७ मार्च, २००८

दाढी....!!

परवाच दाढी करताना चुकून ब्लेडचा अंदाज चुकला!
अन्.. आई गं!! गालावर जखमेचा मोठ्ठा ओरखडाच उठला!!

जखमेच्या व्रणातून हळूहळू रक्त येऊ लागलं होतं!
त्याचवेळी नेमकं माझं आफ्टर शेव संपलं होतं!!

हताशपणे मी येउन आरशासमोर उभा राहिलो..
वाहणारं रक्त पाहण्याचा असफल प्रयत्न करू लागलो..

पण, अहो आश्चर्यम!! रक्तातून चक्क जीन बाहेर आला!
'जो हुकुम मेरे आका' म्हणत कमरेत वाकू लागला!!

मी दचकलो , भानावर आलो आणि त्याला विचारलं..
हे इथून, अन् अचानक येण कसं काय बुवा झालं !?

म्हणे,'तुमच्या प्रार्थनेचं फळ तुम्हाला देवानंच दिलंय!
तुमची एक इच्छा पूर्ण करायला त्यानं मला पाठवलंय!!'

हे मागू की ते मागू असं मला होऊन गेलं!
काय सांगू तुम्हाला?अहो काय काय मनात येऊन गेलं !!

बंगला मागू ऐटदार, की भली मोठ्ठी गाडी?
की मागू सुंदर बायको, नेसून लफ्फेदार साडी?

सगळयांवरती मिरवायाला थोडी जादा मागू का अक्कल?
जीन्स की शूज? नको; त्यापेक्षा पैसाच मागतो बक्कळ !!

पैसा कितीही सांभाळला तरी चुटकीसरशी सरतो..
त्यापेक्षा एका बड्या कंपनीची ओनरशिपच मागतो..

गोष्टींमध्ये ईसापनीतीच्या तर तीन इच्छा पूर्ण करतात..
माझ्याच बाबतीत मग देवा ,चिक्कूपणा का दाखवलात ?

शेवटी 'ऐसा करो' म्हणत मी जीन कड़े वळलो जेव्हा
जीन नव्हता जागेवर; 'छू' झाला होता केव्हाच!

समजेना काहीच, की हा गायब कुठे झाला?
आता होता इथेच, क्षणात नाहीसा कुठे झाला?

कळलं मला लगेच, की 'I missed my chance'
मिळाली होती संधी तेव्हा केला नाही डान्स!!

माझी विचारशृंखला बराच काळ लांबली होती
तोपर्यंत रक्त सुकून जखमेवर खपली धरली होती!!

जीन गेला, सोबत गेल्या माझ्या स्वप्नातल्या जीन्स
I couldn't get him back by any means!!

म्हणून सांगतो तुम्हाला, ठरवून ठेवा एक इच्छा !!
ब्लेड लागून रक्त येवो,यासाठी माझ्या शुभेच्छा !!

:अखिलेश परब

रविवार, २ डिसेंबर, २००७

माझं आवडतं महाराष्ट्र गीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

शुक्रवार, १० ऑगस्ट, २००७

रविवार, २९ जुलै, २००७

मराठी मातीतल्या मर्द मराठी माणसांसाठीचा मंत्रोपदेश!

निश्चयाचा महा-मेरू, बहुत जनांसी आधारू,अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंतयोगी!
यशवंत,कीर्तिवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत,नीतिवंत,जाणता राजा!
आचारशील,विचारशील,दानशील,धर्मशील,
सर्वज्ञपणे सुशील,सकळा ठायी!
धीर,उदार,गंभीर,शूरत्रियेसी तत्पर,
सावधपणे नृपवर तूच केले!
कित्येक दुष्ट संहारिले,कित्येकांस धाक सुटला,
कित्येकांसी आश्रयो झाला,शिव-कल्याण राजा!
शिवराजास आठवावे,जीवित तृणवत मानावे,इहलोकी,परलोकी,राहावे,कीर्तिरूपे!
शिवरायांचे आठवावे रूप,शिवरायाचा आठवावा साक्षेप,शिवरायाचा आठवावा प्रताप,भूमंडळी!
शिवरायांचे कैसे बोलणे,शिवरायांचे कैसे चालणे,शिवरायांची सलगी देणे,कैसी असे!
सकळ सुखाचा केला त्याग,करुनी साधिजे तो याग,राज्य साधनाची लगबग,कैसी केली!
त्याहुनी करावे विशेष,तरीच म्हणवावे पुरुष,याउपरी आता विशेष,काय लिहावे?

-समर्थ रामदास