मंगळवार, १५ मे, २०१२

एका शोधयात्रेची कहाणी : पूर्वार्ध

लहानपणापासून म्हणजे जेव्हापासून या गोष्टी 'कळायला' लागल्या तेव्हापासून पोरगी पटवण्यासाठी मी प्रचंड प्रयत्न केले पण एकही फळला नाही.

आता मी शाळेत असताना वर्गात जेव्हा मुला-मुलींच्या जोड्या जुळवल्या जायच्या तेव्हा हुशार मुलाला हुशार मुलीच्या नावाने चिडवलं जायचं.. म्हणजे ब-याचदा मुलांमध्ये पहिला नंबर वाला मुलगा आणि मुलींमधली पहिला नंबर वाली मुलगी .. तिची मैत्रीण आणि याचा मित्र यांची जोडी, गोरा मुलगा, गोरी मुलगी यांची जोडी, जवळ जवळ राहणारे आणि शाळेत एकत्र येणारे मुलगा मुलगी, आया आया मैत्रिणी असणा-या किंवा बाबा लोक मित्र असणा-या मुलगा मुलगी ची जोडी आणि अमुक अमुक नंबरच्या ब्यांचवर (याचा उच्चार असाच होता) बसणारा मुलगा आणि त्याच सरळ रेषेत मुलींच्या लायनीतल्या ब्यांचवर बसणारी मुलगी यांची जोडी अशा ढोबळमानाने जोड्या फार क्वचित ठरलेल्या आणि ब-याचदा जबरदस्तीने ठरवलेल्या होत्या..

आता या जोड्या रातोरात ठरल्या कि काय कोण जाणे पण मला कळेपर्यंत त्या ठरल्या होत्या एवढं नक्की.. शेवटची वर्गवारी वगळता इतर कुठेही मी फिट बसत नव्हतो. अभ्यासात सो सो म्हणजे सामान्य, मित्रमंडळी अतिसामान्य, रंगाने सावळा , आई बाबांच्या मित्र मैत्रिणींपैकी ब-याचजणांना सगळेच टोणगे. कोणाला आमच्या वर्गात असेल इतक्या वयाची मुलगी नाही.असलीच तर मोठी मुलगी..त्यामुळे तिला 'ताई' वगैरे म्हणावं लागत असे. असे सगळेच फासे उलटे पडले होते.निदान शेवटच्या वर्गवारीत का बसू नये असा विचार केला तर माझ्या लायनीत (म्हणजे शेवटून दुस-या) तिकडे एकावर्षी अगदीच कुरूप पोरगी होती.. नुसत्या कल्पनेनेच मलाच कसतरी वाटलं. तिच्या नावाने चिडवलं जाऊ नये असा पोरांचा कटाक्ष होता त्यामुळे तोही चान्स गेला.. दहावीच्या वर्षात एक ब-यापैकी मुलगी आली पण ती खूपच उंच होती आणि माझी दहावीपण होती (आणि तिची पण).

आता या चिडवाचिडवीच्या जोड्या सगळ्यांच्याच ठरवलेल्या नव्हत्या पण ज्यांना वाटत होतं त्यांच्यातरी होत्या.. म्हणजे उरलेल्या पोरांपैकी काहीजणांनी 'हि माझी' 'ती तुझी' असं आपलं आपणच ठरवून घेतलं होतं. आणि ज्यांनी ज्यांनी हे ठरवून घेतलं होतं ते इतरांना तसं सांगायचे आणि आपापसात चिडवा चिडवी ला सुरुवात करायचे म्हणजे ती पोरगी आली किवा गेली कि 'ए अमुक तमुक' म्हणून त्या पोरीला मुलाच्या नावाने हाक मारायची मग ती गोष्ट गावभर व्हायची. असा एकंदरीत प्रकार होता. सुरुवातीसुरुवातीला पोरीला कळायचं नाही पण मग सारखं सारखं तसं व्हायला लागलं कि हे आपल्यासाठीच आहे हे त्या पोरीला कळायचं. अगदीच शुंभ असली तर मग तिच्या मैत्रिणी तिला सांगायच्या. जर ती खुदकन हसली तर मग पोरांना चेव यायचा आणि मग विचारायलाच नको.

काही अति आगाऊ मुलांनी दुस-या वर्गात (चिडवलं जाईल याची )सेटिंग केली होती. मग ती दुस-या तुकडी मधली मुलगी असो किंवा खालच्या यत्तेतली. बरं..हि सगळी असली (मोजकी) जन संख्या, या एक्स्ट्रा करिक्युलर activities वगळता, शाळेत असताना वर्गातल्या इतर बहुसंख्य रयतेबरोबर थोडा (किंवा) फार अभ्यास करणे, शिक्षकांकडे लक्ष देणे, मधल्या सुट्टीत आणि पी टी च्या तासाला मनसोक्त खेळणे, मित्रमंडळात गप्पागोष्टी करणे, डबे खाणे वगैरे निरुपद्रवी आणि जनरली शाळेत करावयाच्या उद्योगात गुंग असे. हि जी 'बहुसंख्य रयता' असे त्यांना या गोष्टी म्हणजे (एकतर जमत नसत किंवा) 'लफडी' वाटत असत. त्यामुळे ते जाणीवपूर्वक यापासून दूर राहत असत. माझी मित्रमंडळी याच रयतेचा भाग असल्यमुळे माझी गोची झाली होती. म्हणतात ना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही.

आधीच म्हटल्याप्रमाणे मी अभ्यासात अप्रगत, वरून सर्व प्रकारच्या खेळांमधला अकुशल कामगार. तसं तिसरीत असताना एकदा मला चमचा गोटी स्पर्धेत मला उत्तेजनार्थ मिळालं होतं पण ते कोणाला सांगण्या सारखं नाही. कला वगैरे विषयात काठावर पास.. एकदोनदा तर चित्रकलेच्या सरांनी माझी आणि वर्गातल्या अशाच काही कलाकारांची चित्र वर्गात जाहीरपणे दाखवून आम्हाला कुप्रसिद्ध केलं होतं. वास्तविक पाहता आमच्यासारखी चित्र काढणारे पिकासो , एम एफ हुसेन वगैरे लोक तर आलम दुनियेत फेमस होते. पण आमच्या सरांना आम्ही लीयोनार्डो दा विन्ची, राजा रवी वर्म्या सारखी चित्र काढणं अपेक्षित होतं.

स्टेज वर जाऊन काही करून दाखवावं म्हटलं तर एकदा समूह गीतात एकदम शेवटच्या लायनीत उभ राहून 'आ आ आ' असं करायचं होतं तर माझी तंतरली होती.. 'घाम फुटतो' म्हणजे काय ते चेहरा,मान, हात, पाय ,पंजे, पावलं इत्यादी इत्यादी युनिफॉर्म मधून उघड्या असणा-या झाडून सगळ्या अवयवातून बाहेर पडणारे घर्मबिंदू प्रात्यक्षिकासह समजावून सांगत होते, पाय लटपट कापत होते,घसा कोरडा पडला होता. तोंड तर मी उघडलं होतं पण घशातून आवाज बाहेर पडत नव्हता. पण समूह गीत असल्यामुळे ती गोष्ट खपून गेली. त्यानंतर मी स्टेज चा धसका घेतला तो आजतागायत! त्यामुळे वक्तृत्व, नाटक, रेकॉर्ड डान्स करून किंवा तिथे काही कलाकारी दाखवून मुलींच्या हृदयात जागा निर्माण करण्याची शक्यता सुद्धा संपुष्टात आली होती.तर मुलीच्या बाबतीत शाळेत माझं हे असं होतं. पण मनातून 'एकतरी मैत्रीण असावी' असं वाटत होतं.

कॉलेजात गेल्यावर बरेचसे संदर्भच बदलले. स्कर्ट वाल्या युनिफॉर्म मधून मुली पंजाबी ड्रेस वाला युनिफॉर्म वापरू लागल्या आणि आम्ही फुल प्यांट! एकदम मोठ्ठ झाल्यासारखं वाटायला लागलं मलापण. पण शाळेतून कोणी दुस-या कॉलेजात गेलं, कोणी शिक्षण सोडलं, कोणाची भांडणं झाली वगैरे वगैरे अगदीच काही अपवाद वगळता सगळ्या तथाकथित जोड्या फुटल्या!! पण मला याचा आसुरी आनंद सुद्धा लुटता आला नाही कारण मला आवडणा-या मुलींच्या तोपर्यंत नव्या जोड्या -चिडवाचिडवीच्या का होईना -पण व्हायला लागल्या होत्या. मी कोणात मिसळत नव्हतो म्हणून अनभिज्ञ होतो असं नव्हे पण शाळेत असताना मी जर माझ्या मित्रांपैकी कोणाला त्याला चिडवल्या जाणा-या मुलीबद्दल विचारलं तर मला मिळणारी प्रत्युत्तरं
' नाय रे.. कैपण कै?'
'पोरं काय..कायपण बोलतात. तू काय लक्ष देतो तिकडे..म्हणतात त्यांना म्हणायचं तर म्हणू दे'
' कोण म्हण्ट असं? सांग. मधल्या सुटीत बगतोच त्याच्याकडे'
'बाईंना नाव सांगेन हां असलं कायपण पसरवलंस तर'
अशी सरळसोट किंवा धमक्या च्या स्वरूपातली असत..

कॉलेजात गेल्यावर हीच उत्तरं बदलली!
' हां.. चिडवतात म्हणून काय झालं? पण आमच्यात तसलं काय नाय्ये '
' माझी मैत्रीण आहे ती.. नुसती मैत्रीण.समजलं?'
' कैपण कै बोल्तो? भयीण मानतो आपण तिला. '
' नुसतं बोल्तो म्हणजे कै तरी असायलाच हवं असा नियम आहे का?'

पण एकंदरीत आपल्याला कोणाच्यातरी नावाने चिडवतात याचं त्या पोरांना बरं वाटत होतं खरं.बरं.. पोरीसुद्धा अशा कि विचारायला नको.. काही काही पोरी तर आपल्याला त्या मुलाच्या नावाने चिडवतात म्हटल्यावर 'आपली स्वर्गात ज्याच्याशी गाठ मारली आहे तो जन्मोजन्मीचा साथीदार हाच' असं तेवढ्यापुरतं का होईना, समजून इतर मुली ज्यांना असं काही चिडवलं वगैरे जात नसे त्यांच्यासमोर शायनिंग मारत असत! त्या न चुकता वडाला फे-यापण मारत असतील कि काय अशी मला पुसट शंका येत असे पण मला कोणच कोणाच्या नावाने चिडवत नाही याचं फार वाईट वाटायचं आणि एकदा ते मी आमच्या मित्र मंडळीत बोलून दाखवलं.
'ए झंप्या... साला, कोणतरी पायजे यार.. एकतरी मैत्रीण हवी जिच्याशी निदान बोलता येईल..' झंप्या हा माझा बालमित्र. त्याच्याकडे मी मोकळेपणाने बोलू शकत असे.

दहावीच्या काळात मुलींबरोबर बोलणं सुद्धा एखादं पाप असावं इतकं अवघड झालं होतं. जरा कोणाशी कोण पोरगा बोलला कि लगेच चिडवायला सुरुवात.. 'एखाद्या मुलाची मैत्रीण' नावाची कन्सेप्ट फक्त पुस्तकातच असते कि काय अशी शंका माझ्या मनात निर्माण होत होती.अकरावीत उशिरा हि बंधनं थोडी शिथिल झाली होती. तरीपण सुरुवातीला म्हटलं तसं माझ्या ग्रुप मधली बरीचशी मुलं आपलं क्याराक्टर जपण्याच्या उद्देशाने 'मुलींशी बोलणं' हि भानगडच टाळत असत.
' येडा झाला का तू? कोणाशीपण कैपण कै बोलणार? कै बोलणार सांग तू पोरीशी?' झंप्याचा प्रतिप्रश्न.
' हां रे ते पण है.. तसं काय खास नाय, पण हेच. नोट्स बिट्स मागेन'
'एकदा मागशील.. मग पुढे काय?'
'परत देणार'
'काय? एडपट हायेस का?'
'मंजे कायतरी सुरुवात तर होईल! पुढचं पुढे बघेन'
'कुठली मुलगी आवडते तुला?' त्याला बहुतेक माझं म्हणणं पटलं होतं. तो स्वतः आयुष्यात कुठल्या मुलीशी बोलला होता कि नाही कोणास ठाऊक पण मला मदत करायला तो तत्पर होता.
'कोणपण चालेल.. जरा बरीशी हवी..'
'क्काय? ती काय भाजी आहे बाजारातली? '
'आता मला कै म्हायती? पण आपल्या वर्गातली भिंतीकडच्या लायनीतली,पुढनं चौथ्या ब्यांचवर बसते बघ ती.. लाम केसवाली. वेणी घालते बग. ती चांगली आहे..'
'कोण रे?? हां ती बटीण'
'भटीण? ती ब्राह्मण आहे?'
'नाय रे.. बटीण.. बटीण.. बट असते न तिची नेमी..म्हणून बटीण'
'हां.. हां.. मला वाटलं नॉन वेज बिन वेज खात नाय कि काय..' मी म्हणालो.
'आयला.. अजून बोलण्याचा पत्ता नाय्ये आणि तू खाते काय ते बघायला लागला..'
'च्च.. तसं नाय रे..पण आपलं विचारलं.. ए.. जमेल कै?'
'म काय झालं. तिच्यामागे खूप पोरं होती. पण ती त्यातली नाय'
'त्यातली म्हंजे?'
'म्हंजे त्यातली..ते तसंच असतं..असं म्हण्टात'
मी या क्षेत्रात फारच बाळबोध होतो कि आम्ही दोघे अज्ञानी असल्याने असला संवाद घडत होता कोणास ठाऊक!!

मी असलं विचारायची खोटी.. हि गोष्ट मित्रमंडळात पसरायला वेळ लागला नाही. मला तिच्या नावाने चिडवायला सुरुवात झाली. हे येवढ सोप्प असतं याची कल्पनाच नव्हती मला.. सालं मित्रमंडळ महत्वाची भूमिका बजावतं असल्या प्रकारात, हे गुपित मला उलगडलं.

शाळेत असताना पोरं आपल्या लायनीतल्या 'लायनी'वर लक्ष ठेवून ती इकडे कितीवेळा बघते याचा हिशोब I I I I अशा सांख्यिकी मध्ये शिकवलेल्या 'वारंवारता' च्या पद्धतीने कर्कटकाने ब्यांचवर रेषा मारून लक्षात ठेवत असत. आता कॉलेजात तसा हिशोब ठेवायला गेलं तर अख्खा बेंच २-४ महिन्यातच भरून गेला असता. तरीपण काही गुप्तहेर बिनपगारी हि कामं करत असत.
'आयला हो रे..तीपण तुज्याच कडे बघत असते'
'आपण घरी जायला सायकल stand वर उभे राहतो न तेव्हा ती पण उभी असते बघ..'
'अरे ती अमुक अमुक च्या शेजारी राहते'
'त्या तमुक तमुक ची खास आहे ती. तिच्याशी मैत्री कर आपोआप हि येईल बघ..'
एकापाठोपाठ एक सल्ले मिळत होते. मला माझं पहिलं प्रेम (तयार करून) मिळवून द्यायला कित्ती लोक तत्पर होते हे मला नव्यानेच कळत होतं.मग जो तो आपापल्या पद्धतीने हे पसरवायला लागला..मीपण खुश व्हायचो.
gathering ला तर कहर झाला. अगदी तिला समजेल असं बोलत होतं पब्लिक.

'तो चाललाय ना त्याचं आणि त्या एलेवंथ बी मधल्या टिंब टिंब पोरीचं कायतरी आये' असं मीच माझ्या मागे कोणालातरी बोलताना ऐकतोय अशी स्वप्न मला पडू लागली..

उत्तरार्ध

८ टिप्पण्या:

 1. धन्यवाद केदार. लवकरच पुढचा भाग टाकेन.

  उत्तर द्याहटवा
 2. अखिलदीप, अगदी थेट भूतकाळात जाउन रंगवून सांगितलं आहे सगळ .. मजा आली वाचताना. पुढचा भाग लिहा लवकर.

  उत्तर द्याहटवा
 3. अखिलेश कधी वाटले ही नव्हते, शाळेतल्या या गोष्टी लिखाणाचा विषय बनू शकतील, पूर्वार्ध वाचायला उशीर झाला पण त्यामुळे उत्तरार्ध लगेचच वाचायला मिळतोय याचा आनंद जास्त होतोय. सुरेख !!!!
  -सरिता

  उत्तर द्याहटवा
 4. धन्यवाद सरिता.. लिखाण एकसंध वाचण्यातच मजा असते.. पण ऑनलाईन वाचताना जास्त लेन्ग्दी वाचताना कंटाळा येतो असा माझा अनुभव आहे.. म्हणून हे पूर्वार्ध-उत्तरार्ध असं विभाजन! कौतुकाबद्दल आभार!

  उत्तर द्याहटवा
 5. काय मस्त लिहिलंय राव ! याच्यावरुन वाटत नाही तुम्ही अभ्यासात कच्चे होतात म्हणुन.. काहीही असो, तुम्ही अगदी थेट हिशोब मांडलाय, जस्संच्या तस्सं लिहलंय. शाळेतले बाळबोध दिवस सर्रकन डोळ्यासमोरुन गेले, प्रोजेक्टरमधुन प्रतिसेकंदाला फ़्रेम्स सरकतात तशा. कळत नकळत या गोष्टी शालेय जीवनात घडलेल्याच असतात.
  खुप छान... अप्रतिम..

  उत्तर द्याहटवा
 6. @Vijay Vasve : अशा (लेखापेक्षा सुंदर) प्रतिक्रियांमुळे लिखाणाचा हुरूप नक्कीच वाढतो.. एक गोष्ट कबूल करतो कि हा स्वानुभव तर नक्कीच नाहीये! :P बराचसा कल्पनाविलास, आजूबाजूला ला घडणा-या , ऐकू येणा-या घटनांनाना शब्दरूप दिल्यानंतर हि कथा तयार झाली आहे.

  उत्तर द्याहटवा

वाचकहो.. प्रतिक्रियांचं स्वागत आहे.. आपलं कौतुक किंवा टीका नवीन आणि अजून चांगलं लिहायची उमेद देतात..
आणि हो.. प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव लिहायला विसरू नका. अन्यथा ते ‘Anonymous’ असं येईल. धन्यवाद!