Thursday, May 24, 2012

एका शोधयात्रेची कहाणी! उत्तरार्ध

पूर्वार्ध
पण प्रत्यक्षात झालं उलटच.
ग्यादरिंगच्या दुस-याच दिवशी एक कोणतरी पोरगा आला. सिनियर. वरच्या वर्गातला होता हे त्याच्या राठ दाढीमिशीवरून कळत होतं. त्याच्याबरोबर त्याची ग्यांग होती.
'काय रे ए. मस्ती आली का?' त्याने विचारलं
'नाही' मी म्हटलं..पण या प्रश्नाच हे उत्तर नसतं.
'ती बटीण.. तुझं माणूस कधीपास्न झालं रे?'
'अं... मं..आं..कोण म्हण्ट? ' मी गडबडलो..
'हां..अस्सं पायजे.. तिच्या फंदात नाय हां पडायचं..आपला आयटमाय तो'
मी गप्प बसलो. हवा गुल झाली होती. मी लगोलग झम्प्याला गाठला.
'तू तर बोल्ला होता ती त्यातली नाय्ये म्हणून'
'हं..ती त्यातली नायचाय. हा पोरगा तिच्या मागेयाय. ती सरळे रे पोरगी. आपण शुव्वरशॉट सांगतो. कोणालापण विचार पायजे तर'' झम्प्याने थोडा विचार केला..
'पोरगा तब्येतीने तगडा होता काय रे?'
'हो. एक नव्हता. तसले ४-५ होते'
झंप्या विचारात पडला.
'तुला दुसरी कोणी आवडते काय रे?' झम्प्याने विचारलं आणि माझी पहिली प्रेम कहाणी तिथल्या तिथे संपुष्टात आली. सुरु होण्याच्या आधीच.

जुनिअर कॉलेजात मुलीच्या बाबतीत माझी डाळ शिजली नाही पण बी कॉम ला एडमिशन घेतल्यानंतर सिनिअर कॉलेजात काहीतरी होईल असं चिन्ह दिसत होतं. कारण पोरं स्पष्टपणे मुलीबाबतच्या गोष्टी करत.. पब्लिक ला आता मैत्रीण नको होती डायरेक्ट 'गल्फ्रेंड'च हवी होती.
कॉलेजचा कट्टा असो किंवा कॅन्टीन ची टेबलं. मुलांचा घोळका जमलेला असला कि ९० टक्केवेळा हेच विषय चालू असत.
'च्याला.. ती आर्ट्सची भावे.. त्या ढेपल्याबरोबर हाय हां कायतरी शुवरशॉट..' इति झंप्या
'कशावरून रे..?' एकाने विचारलं
'अरे काय कशावरून..? डोळ्यांना दिसत नाय? कॉलेजात कितीवेळा बोल्ताना दिसतात. तो अनिरुत साला.. जळते रे' कोणीतरी म्हणालं
'ढेपल्याच नाव अनिरुद्ध आहे ? हे मला म्हायतीच नव्हत'  मी म्हटलं
'हो रे चायला! अनिरुत ढेपले. ठेपले म्हायती होते, ढेपले पयल्यांदाच कळले ' मग हास्याचे फवारे..
मुली ज्या मुलांबरोबर फिरतात त्या मुलांची आम्ही त्यांच्या मागे चेष्टा उडवायचो.. तेवढंच सुख!
'ए.. वयनी आली.. वयनी आली..' कोणीतरी म्हणायचं
'ए अम-या.. तुझी डाव आली बग' दुसरा
'ए अssमssर..' सगळे मोठ्याने ओरडत.
हास्याचे फवारे अजून जोरात उडत.

'काय कठीण नाय रे..पोरगी पटवायला काय लागतं?' झंप्या एकदा म्हणाला.
'मग तू का नाय पटवली?' माझा सरळ सवाल..
'आपल्याला तो नादच नाय. असली फालतुगिरी करायचीच नाय आपल्याला..'
'निदान मलातरी सांगशील?'
'तुला म्हून सांगतो. बॉडी बिल्डींग कर.'
'काय म्हणतोस ..मग पोरगी पटेल?'
'लिवून देतो.. आयशपत... अश्शी फिजीक बनव कि सलमान चाट पडला पायजे. पायजे तर मी पण येतो तुझ्याबरोबर.'  झंप्याशेठ म्हणाले.

आता असलं आपल्याला आयुष्यात जमणार नाही हे माहिती असूनपण मी त्याच्या नादाने व्यायाम करायला लागलो. पण बॉडीच एक लिमिट असतं. मुळातच हाडं असणा-या शरीरावर चढून चढून कितीसं मांस चढणार? आणि जिम मधलं निम्म पब्लिक 'आरशात आपण पूर्ण कसे दिसतो?' हे बघण्यासाठी येत होतं यावर माझा दृढ विश्वास बसला. त्यामुळे बॉडी बिल्डींग करण राहायचं बाजूला आणि भलत्याच गोष्टींवर चर्चा रंगायच्या.

'आयला, एफ वाय ला खूप नव्या पोरी आल्यात रे यंदा!' -झंप्या (बायसेप्स दिसताहेत का बघत)
'कोण आहे काय रे माल?' -मी (झंप्याचे बायसेप्स दिसताहेत का बघत)
'माल? अरे मालगाडी आहे मालगाडी..' -झंप्या (डम्बेल उचलल्याची फक्त एक्शन करत)
'काय सांगतोस काय?' -मी (झंप्याची एक्शन बघून माझे बायसेप्स नुसते बघत)
'मग काय खोटं बोलतो का काय?'  झंप्या म्हणायचा 'चार पाच मुली तरी खूप मस्त आहेत. च्यायला,२-४ म्हयने जाऊदेत मग आपली बॉडी बघ. नाय त्या पोरी वळून वळून बघत राहिल्या ना..'
असलं काहीतरी ऐकलं कि उगीच मला थोड स्फुरण यायचं.

३-४ महिन्यात 'हा आपला विषय नव्हे' हे मला कळून चुकलं. त्यातच 'ज्या संध्याकाळच्या वेळात पोरी बाहेर फिरतात त्यावेळी तू जातोस जिम मध्ये मग काय कप्पाळ पटणार मुली?' असल्या कमेंट्स मिळाल्यामुळे माझा जिमला जाण्याचा उरलासुरला उत्साह देखील मावळला.त्यानंतर मग माझं जिम ला जाणं होत राहिलं पण त्यात तो पूर्वीसारखा उत्साह,जोम, ती सळसळ राहिली नाही. (तो परत आणण्यासाठी काहीतरी गोळ्या असतात अस मला पेपर मधल्या जाहिराती वाचून वाटलं होतं पण तो 'जोश' 'जोम' वेगळा हे वेळीच कळलं म्हणून अनर्थ टळला! असो, विषयांतर झालं.) पण जिम प्रकरणातून एक चांगलं झालं कि अगदीच वाळलेल्या काठीयुक्त अंगावर मुठभर मांस चढलं. अक्षरशः !! प्रोटीन पावडर,सप्लीमेंट च्या मा-याने बॉडीला ब-यापैकी आकार आला. पण त्यामुळे सामाजिक जीवनात काही फरक पडला नाही. मुली वळून वळून मला पाहत आहेत अस जे काही स्वप्न माझ्यापुढे रंगवण्यात आलं होतं ते काही सत्यात उतरताना दिसेना!

मी चाचरत हि शंका जेव्हा जिमच्या ट्रेनर ला विचारली तेव्हा तो म्हणाला
''गाडी पाहिजे रे..'
'कशाला?' माझा बाळबोध प्रश्न.
'बुडाखाली घोडा असला न की पोरी लगेच पटतात.'
'काय म्हणतोस?' मी विचारलं.
"आता मी बघ. कशी आहे बिल्ट?" त्याने डोले शोले दाखवत विचारलं.. चेस्ट वरखाली हलवून दाखवली.
"चांगली आहे" मी त्याला अपेक्षित असणारं उत्तर दिलं पण एकंदरीत मला ते 'छाती हलवून दाखवण' कौशल्यापेक्षा हास्यास्पद वाटलं होतं
"पण सगळ्या पोरी..'" सुस्कारा सोडून तो म्हणाला " सकाळच्या ब्याच ला येतात. माझ्याकडून कार्डीओ म्हणा,वेट ट्रेनिंग म्हणा, एरोबिक्स म्हणा शिकतात आणि नंतर कुणाच्या तरी बाईकवर मागे बसून हिंडताना दिसतात. च्यायला..ती पोरं पण सुकडी बिकडी असतात रे" त्याने त्याचं दुःख मांडलं.
'म्हंजे बाईक घ्यायलाच हवी काय?'
'म्हंजे काय? बाईक असली की पोरगी फसली' तो म्हणाला.

मग आमच्या वडिलांच्या मागे मी टुमणं लावलं. घरापासून कॉलेज कसं लांब पडतं. क्लास ला जायचं झालं तर येण्याजाण्यातच कसा वेळ जातो वगैरे सांगून सांगून त्याचं मन मला वळवावं लागलं. त्यांनी झडती घेऊन का होईना, क्लास असेल तर त्यांची गाडी घेऊन जायला त्यांनी परमिशन दिली. बाबा आदम च्या जमान्यातली ती हिरो होंडा सी डी हंड्रेड कॉलेजात कायच्या कायच हिट झाली. मी गाडी घेऊन गेलो तर पोरं उगीच गोळा व्हायला लागली. मी म्हटलं, आता सगळं जमलंच.
पण महिना गेला ,२ महिने गेले ,३ महिने गेले मागची सीट रिकामीच होती. सुरुवाती सुरुवातीला मी पूर्ण गाडी पुसायचो मग मग काही जमत नाही दिसल्यावर फक्त बसायचा भाग मी साफ करायला लागलो. मागच्या सीटवरची धूळ तशीच राहायला लागली. मग एकदा एका मित्राने विचारलं.
'मित्रा, जरा मदत हवी होती'
'बोल ना दोस्ता'
'अरे जरा पमू ला घरी जायचं होतं.'
'कोण?'
'अरे प्रमिला.. माझी ती हि..'
'हां हां.. ओके. हां. मग ?'
'जरा बाईक देतोस का ? डोन्ट वरी.. आपण पेट्रोल भरणार. फुकट नाय मागत.'
साला आपल्या गल्फ्रेंडला सोडायला माझी गाडी मागत होता.. अशी जळत होती पण काय करणार? पॉकेटमनी तर पेट्रोल मध्ये खर्च होत होता. तेवढाच खर्च वाचेल असा विचार करून मी त्याला दिली शेवटी बाईक.
नंतर तर ती प्रथाच पडली. माझी गाडी लोकांच्या गल्फ्रेंड फिरवू लागली पण मी सुकाच राहिलो. गर्लफ्रेंडसुख म्हंजे काय ते मला मिळालंच नाही. गाडी आहे म्हटल्यावर पोरींशी थोड्या ओळखी झाल्या पण सगळ्या कोणाच्या ना कोणाच्या तरी गल्फ्रेंडस! पुढे पुढे तर असं झालं की मला माझ्या नकळत ड्रायवर च्या भूमिकेत ढकललं गेलं.. हि पोरं बिनधास्त आणि निर्लज्जपणे ' ए,तिला अमुक अमुक ठिकाणावरून तमुक तमुक ठिकाणी सोड ना ' म्हणून सांगू लागली. पेट्रोलचा सगळा खर्च दोस्तीखात्यात जमा होत होता. आता गल्फ्रेंड असणा-या या कुठल्या पोराकडे सल्ला मागितला तर ते -
"अरे बराय ना नाय्ये ते.. काय कमी लफडी असतात? फोन करा, त्यांचपण कार्ड रिचार्ज करा, कुठाय, काय करतोय त्याचे अपडेट देत -हा, आणायला नि पोचवायला जा, त्यांच्या खायचा प्यायचा खर्च करा आणि वरून नाटक सांभाळा. कोणी सांगितलाय तो ताप? सुखी आहेस!"  असं म्हणून मलाच या प्रकारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत. साले स्वतः मजा करत होते आणि मला साधी मदत पण करायला तयार नव्हते! कृतघ्न कुठचे!
जिम मध्ये जाऊन ट्रेनर ला हा झोल सांगितला तर बेटा मला म्हणतो,
"ह्या.. सी डी हंड्रेड घेऊन कोणाला पोरी पटल्यात काय? वयस्कर लोकांची गाडी ती. पोरीसाठी कशी - पल्सर नायतर करिझ्मा पायजे"
मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पोरांना स्कूटी, स्पिरीट अगदी गेलाबाजार झिंग (Santro Xing नव्हे..कायनेटिक झिंग.. ती डबडा गाडी) वगैरे घेऊन आपापल्या गल्फ्रेंडना फिरवताना पाह्यलं होतं. माझ्याकडे तर गाडी नसणा-या  (बॉय)फ्रेंडस ची पण उदाहरणं होती. तेव्हा मला कळलं कि हा स्वतःचे फंडे जगन्मान्य असल्यासारखे सांगत होता. होता होता कॉलेज झालं पण त्या आनंदाला मी पारखाच राहिलो.

बी कॉम झाल्या झाल्या काकांच्या वशिल्याने मी रेवेन्यु डिपार्टमेंट मध्ये चिकटलो आणि तिथले एकंदर (स्त्री) चेहरे बघता माझी गर्लफ्रेंड बनवण्याची इच्छा आपोआपच दाबली गेली.वयस्कर लोकांमध्ये राहून,वावरून  मी माझ तारुण्य हरवून बसलो.तरीपण ऑफिसात इंटरनेट होतं. ऑर्कुट,फेसबुक वरनं 'दिसलं पोरीचं अकौंट कि पाठव फ्रेंड रिक्वेस्ट.. '; ' मुलीचा आय डी दिसला कि, कर याहू chat किंवा जी talk ला add ' असले प्रकार करून मी माझ्या काल्पनिक जगात शेकड्याने मैत्रिणी बनवल्या.आता त्या मैत्रिणींमध्ये ख-या मुली किती होत्या ते देवालाच माहित! कारण माझ्यासारख्या भाबड्या मुलाला उल्लू बनवणा-या पोरांची जनतेत कमी नाय्ये.. याहू आणि जी talk वर माझ्या भावनांशी काही मुलं (खोट्या खोट्या मुली बनून) खेळल्यानंतर मी ते थांबवलं. फेसबुक वर हजार- दीड हजार लोकांचा गोतावळा जमवला. काहीजणी करायच्या फ्रेंड रिक्वेस्ट, एक्सेप्ट तर काहीजणी (खरतर ब-याच जणी! ) रिजेक्ट करायच्या.शेकडो जणींनी मला ब्लॉक सुद्धा केलं. पण माझे प्रयत्न मी सोडले नाहीत!
"एवढ्या मैत्रिणी जमवल्या पण एकपण गल्फ्रेंड नाय रे झाली" मी झम्प्याला  म्हटलं."chat वर मी इतक्यांदा  'हाय' म्हटलं तर साधा एकदा 'हेल्लो' करायचं सौजन्य सुद्धा नाही दाखवत एकपण पोरगी. त्यांच्या फोटोला लाईक केलं,कमेंट टाकली तर thank you म्हणायचा उदारपणा दाखवत नाहीत कोणी..' माझ दुःख मी व्यक्त केलं.
"रिलेशनशिप स्टेटस 'इन अ रिलेशनशिप' ठेव. बघ कशा पोरी chat  करतात ते!" झंप्याने लगेच सुचवलं!
 या झंप्याला सगळ्या क्लृप्त्या कशा काय ठावूक असत कोण जाणे! त्याची कुठलीच युक्ती कमी यायची नाही पण निदान त्याच्याकडे माझ्या प्रश्नावर,तेवढ्यापुरतं तरी उत्तर तयार असायचं!!
'ते कसं काय?'
'अरे मग पोरींना वाटणार हा आधीच एंगेज आहे, काही धोका नाही.. मग त्या पुढे येतील'
'अरे पण मग मला कोण कशी काय पटेल?'
'ते पुढे बघता येईल ना! आता बोलायलातरी सुरुवात होऊंदे!'
झंप्याचा आर्टस ला 'लॉजिक' हा विषय असल्यामुळे (आणि त्याने तो दोनदा दिलेला असल्यामुळे) मी जास्त खोलात शिरलो नाही. पण त्याचं लॉजिक फेल गेलं हे वेगळं सांगायला नकोच.
फेसबुक वर सुद्धा मग 'प्रेम','ती', 'मुलगी', 'प्रेमभंग' इत्यादी विषयाशी संबंधित कविता, कथा, चित्र लाईक करण्याव्यतिरिक्त आणि काही वेळा 'एकतरी मैत्रीण असावी' वगैरे सारख्या कवितांवर सहानुभूतीच्या कमेंट्स देण्याशिवाय इतर काही मला जमू शकलं नाही..

असो!! भूतकाळ फारसा नव्हता आशादायक नव्हता. आता वर्तमानात येतो! (माझ्या वयाच्या तेवीसाव्या आणि) यंदाच्या वर्षीच घरच्यांनी लग्नाचं प्रकरण मांडलंय. मी म्हटलं 'एवढ्यात मला लग्न नाय करायचं' पण घरचे थोडीच ऐकताहेत? आता करणारच आहेत माझं लग्न म्हटल्यावर मला थोडी स्फूर्ती आली होती  पण  इथेही  घरच्यांच्या चाळणीतून मुली पास झाल्या तर त्या माझ्यापर्यंत येणार असा एकंदरीत प्रकार होता. याचा परिणाम म्हणून गेले सहा महिने एकपण मुलगी माझ्यापर्यंत पोचली नाही!

आणि आता सगळे अडथळे पार करून हे स्थळ पुढ्यात येवून पडलं आहे. फोटोही तोच, व्यक्तीही तीच, नाव आणि आडनाव पण तेच.. ही आमच्या शाळेतली बटीण!! आता अजून बरी दिसत्येय.  सालं काय करू कायच समजत नाय्ये..मी आधी 'मला एवढ्यात लग्न नाय करायचं' असं म्हटलेलं असल्यामुळे 'एंगेजमेंट आता करून ठेवू आणि लग्न सवडीने करू' म्हणताहेत. मला वाटतं होऊन जाऊदे असंच.. म्हणजे एंगेजमेंट आणि लग्नामधले सगळे दिवस गल्फ्रेंड म्हणून तिलाच फिरवायला मार्ग मोकळा! कसं?

17 comments:

 1. वर्तुळ पूर्ण झालं म्हणजे :-)

  ReplyDelete
 2. :))) प्रतिक्रिया आवडली! धन्यवाद..

  ReplyDelete
 3. या लेखातून तू 'बहुजणां'च्या दुःखास वाट मोकळी करून दिली आहेस, मित्रा........... आणि लेख नेहमीप्रमाणे छान जमून आला आहे.......... अप्रतिम.
  - अभिषेक पाटील.

  ReplyDelete
 4. धन्यवाद अभिषेक!! :) हेतू सफल झाला म्हणायचा!!

  ReplyDelete
 5. भावा मनाला हात घातला तू. तुझ्या सगळ्या कथा माझ्या ई-मॅगेझिनमध्ये छापायची इच्छा आहे. खाली दिलेल्या लिंक पहा आणि मला फेसबूकवर कॉन्टॅक्ट कर.

  https://www.facebook.com/pages/%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%8B%E0%A4%A4%E0%A5%82/435612136449583

  https://www.facebook.com/kimantu

  ReplyDelete
 6. मस्त मस्त मस्त, लय भारी, खूपच छान.
  शाळा आणि कॉलेजमधला फरक उत्तम जमलाय गड्या...

  ReplyDelete
 7. directly penetrates to heart ........... Pretty good writing with impacting words.......... ......... expecting further more stories in coming days......... prafull shinde

  ReplyDelete
 8. किमान्तु, लिखाण आवडलं हे बघून बर वाटलं. स्प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे आणि अशीच भेट देत राहा अधूनमधून. नेहमीच काही नवीन असेल असे नाही तरीही प्रयत्न करेन.. ई-मॅगेझिनमध्ये छापण्याबद्दल फेसबुक वर माझं मत कळवलेल आहे.

  ReplyDelete
 9. @विनायक: धन्यवाद मित्रा.. ब-याच दिवसांनी तुझी प्रतिक्रिया वाचायला मिळाली.
  @प्रफुल्ल : thanks for the analysis dude.. Hope, I can deliver as per the demand. [This is the language you can easily understand ;) ] Keep visiting!

  ReplyDelete
 10. शाळेत गेलेल्या प्रत्येकासाठी !!

  ReplyDelete
 11. abhikakade : 'शाळा' मधले हे वाक्य इथे जास्त सूट होतंय कि काय? प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद रे मित्रा!

  ReplyDelete
 12. ek number ... life has come a full circle :)
  mast lihilayes mitra

  ReplyDelete
 13. आभारी आहे kedu :)

  ReplyDelete
 14. @NITISH DASTANE :धन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत.. पुन्हा पुन्हा परतून याल अशी अपेक्षा बाळगतो!

  ReplyDelete
 15. खरंच, अगदी मस्त आहे हि कथा अस भाग्य लाभने म्हणजे फार कठीण आहे पण , एक अशा ठेवायला काय जातंय.. शेवटी माणसाच आयुष्य आशा करण्यात जात , कधी पूर्ण तर कधी अपूर्ण ..!!पण मज्जा असते .!

  ReplyDelete
  Replies
  1. सहमत सुयोग.. :) आणि धन्यवाद!

   Delete

वाचकहो.. प्रतिक्रियांचं स्वागत आहे.. आपलं कौतुक किंवा टीका नवीन आणि अजून चांगलं लिहायची उमेद देतात..
आणि हो.. प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव लिहायला विसरू नका. अन्यथा ते ‘Anonymous’ असं येईल. धन्यवाद!