
'बघितलंस ना ?' बाइकला किक मारता मारता सुमेधने प्रश्न केला.
'हो.. 'स्क्वेअर वन' बद्दलच बोलतोयस ना?' मी विचारलं.
शेवटच्या दिवशी असणा-या पुरुषोत्तमच्या फायनल एकांकिकांपैकी 'स्क्वेअर वन' नावाची एकांकिका आमच्या दोघांच्याही मनात घर करून राहिली होती. जीआरई देऊन पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेला जाणाऱ्या मुलांवर भाष्य करणारी ती एकांकिका होतीच तशी. इंजिनियरिंगला असताना होणाऱ्या चर्चांच्या, वादविवादाच्या अनेक टॉपिक्स पैकी 'ब्रेन ड्रेन' हा ऑल टाईम हॉट टॉपिक होता. त्यात सुमेधचा फेव्हरेट! अमेरिकेबद्दल प्रचंड दुस्वास असणाऱ्या लोकांमध्ये कम्युनिस्ट लोकानंतर या सुमेधचा नंबर लागला असता. भारतातून एम एस करायला यु एस ला जाणारे एन्थु लोक हे कॉलेजमधलं त्याचं सॉफ्ट टार्गेट होतं.
'एकांकिकेचा शेवट कसा केला ते सोडून दे पण मी नेहमी सांगत असतो तेच सांगितलंय ना पूर्ण एकांकिकेत?' सुमेध तावातावाने म्हणाला. एकंदरीत मला कल्पना आली होतीच. तसे आम्ही दोघे जिवलग वगैरे मित्र नव्हतो परंतु सुमेधच्या बिनतोड मुद्द्यांवर थोडंफार भाष्य करायची हिम्मत करणाऱ्यांपैकी तरी एकजण होतो. माझे अज्ञानातून आलेले प्रतिप्रश्न कधीकधी त्याला एक वेगळा व्हयू पॉईंट देत असत आणि कदाचित त्याचे आधीचे बिनतोड मुद्दे अजूनच मजबूत बनवण्यासाठी अधिकची माहितीही पुरवत असत. त्या दिवशी तर त्याच्याकडे बाईक आहे आणि दोघांनाही पुरुषोत्तमच्या फायनल्स बघायच्या आहेत एवढी गरज मी त्या चर्चेचा भाग असण्यासाठी पुरेशी होती.
'आपल्यासारख्या लोकांनी, आपण या देशाचं, समाजाचं देणं लागतो असा विचार केला नाही तर कसं होणार ? दर पिढीतली हुशार मुलं अमेरिकेचा रस्ता धरताहेत आणि नंतर इथे राहतोय तो गाळ. हेच लोक पुढे देश चालवणार आणि मग आपण, आपली पुढची पिढी, म्हणत राहणार कि आपण प्रगत कधी होणार?'
संभाषणाला असणारी एकांकिकेची पार्श्वभूमी बघता हे डिस्कशन कुठे जाणार हे मला कळलं होतं त्यामुळे चहाचा घोट घेत मी म्हटलं "हे असलं बोलतोस म्हणून बाकीचंपण पब्लिक भडकतं तुझ्यावर."
"म्हणजे?" सुमेधनं विचारलं.
"म्हणजे हेच कि इथे राहतो तो गाळ वगैरे असं काही नसतं. आता तू आणि मी इथे, या देशात राहिलो, अमेरिकेला गेलो नाही म्हणून गाळ होऊन जातो का? हे आय ए एस, आय पी एस वगैरे सिव्हिल सर्व्हिसेस वाले लोक , डॉक्टर्स, सी ए, इस्रो वाले सायंटिस्ट्स आणि बाकीचे कित्येकजण इथे राहताहेत म्हणून त्यांची व्हॅल्यू कमी नाही ना होत?'
"तू शब्दात पकडू नकोस रे.. मला काय म्हणायचंय तुला चांगलं कळतंय. जितके हुशार लोक देशातच राहतील तेवढं चांगलं नाही का देशासाठी? इथे राहणारे लोक त्यांचं ज्ञान देशासाठी वापरतील, चांगल्या सुविधा मागतील, त्या व्हाव्यात म्हणून प्रयत्न करतील. हे हे आय आय टी, आय आय एम मध्ये लोकांच्या पैशावर शिकून मग ते ज्ञान दुसऱ्या देशाच्या प्रगतीसाठी वापरतात त्याचाच राग येतो. "
लोकांनी कररूपाने भरलेल्या पैशातून सरकार कमी फीमध्ये या संस्थांमध्ये शिक्षण देतं आणि मग तिथे शिकणारे , तिथल्या लॅब्ज , हॉस्टेल आणि इतरही अनेक सुविधा वापरणारे बरेचसे विद्यार्थी एकतर एम एस साठी किंवा मग गुगल मायक्रोसॉफ्ट सारख्या अतिविशाल कंपन्यांमध्ये, कॅम्पस सिलेक्शन मधून-भारतीय रुपयांत कन्व्हर्ट केली तर-कित्येक लाखात मिळणा-या पे पॅकेजेस च्या मोहापायी अमेरिकेला प्रयाण करतात याची सुमेधला मनस्वी चीड होती. मी एकदा त्याला 'पर्चेसिंग पॉवर पॅरिटी' म्हणजे थोडक्यात अमेरिकेत मिळणारे एकलाख डॉलर म्हणजे सरळ सरळ भारतातले पंचावन्न लाख रुपये होत नाहीत कारण तिथले खर्चही तसेच असतात वगैरे ऐकीव आणि 'वाचीव' ज्ञान सांगायचा प्रयत्न केला होता पण सुमेध मात्र हा मुद्दा आला कि काही ऐकण्याच्या पलीकडे जात असे. अगदी गद्दार, देशद्रोही च्या पातळीपर्यंत! कराच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या भ्रष्ट राजकारणी लोकांपेक्षा हि मुलं त्याला काही वेगळी वाटतच नसत.
"शांत वत्स शांत! कितीवेळा हे सांगणार आहेस तेच तेच?" मी विचारलं. "जाताहेत ते ठीकच आहे ना.. इथे राहून सारख्या कम्प्लेंट करत रहाण्यापेक्षा ते बरं...तुझं आणि माझं काय जातंय? उलट ते लोक गेले तर भारतातल्या तेवढ्या नोकऱ्या वाचतील असा हिशोब घालून बघ!" मी चेष्टेच्या सुरात म्हटलं.
"तेच ना! म्हणजे एकंदरीत सिस्टीमचं डिग्रेडेशन होत जाणार ना हळूहळू? काही नाही रे. स्वार्थ आहे हा.. निव्वळ स्वार्थ! फक्त पैशांच्या मोहापायी तिकडे पळतात हे असले लोक." चहा संपवत सुमेध म्हणाला. "जाईनात का तिकडेच सगळे.. माझं काsssही म्हणणं नाही मग तिकडे गेल्यानंतर इथल्या राजकारण्यांवर टीका करायची, देशाला शिव्या घालायच्या, इथे अमुक नव्हतं, तमुक नाही, इथे काही प्रगती होणार नाही म्हणून यु एस ला गेलो; असला दुबळा युक्तिवाद करायचा याला काही अर्थ नाही. 'कोई भी देश परफेक्ट नही होता, उसे परफेक्ट बनाना पडता है" हा डायलॉग आठवतो ना रंग दे बसंती मधला? इथे राहून काहीतरी भरीव केल्याने, नवीन आयडिया आणल्याने, मतदान करून चांगले लोक निवडून दिल्याने हा देश सुधारेल कि बाहेर जाऊन देशाला शिव्या घातल्याने सुधारेल ?' त्याच्या म्हणण्यात तसं थोडं तथ्य होतं. पण मला दोन्ही बाजू पटत असल्यामुळे नेमकं काय बोलावं या विचारात मी अडकून राहत असे.
आमच्याबरोबर कॉलेजात जीआरई टोफेल देणाऱ्या लोकांचा आकडा खूप जास्त होता. म्हणजे ओक अकॅडमी मध्ये जाणारी, कसली तरी कठीण कठीण इंग्रजी शब्दांची कार्ड घेऊन फिरणारी जनता बरीच होती. आता त्यापैकी ती एक्झाम क्रॅक करणारे, केलीच तर चांगली युनिव्हर्सिटी मिळणारे, मिळालीच तर स्कॉलरशिप किंवा/आणि कर्ज वगैरे मार्गाने पैशाची व्यवस्था जुळणारे असं होत होत प्रत्यक्षात अमेरिकेत जाणाऱ्या लोकांचा आकडा सुरुवातीच्या इच्छुकांच्या तुलनेत बराच रोडावलाच असता. परंतु सुमेधने तर - ते नुसते परीक्षा देताहेत म्हणजे अमेरिकेत चाललेच -असं गृहीत धरून सगळ्यांना शिंगावर घेतलं होतं आणि त्यापैकी काही महाभागही -आपण परीक्षा देतोय म्हणजे आता चाललोच - असं गृहीत धरून त्याच्यावर उलट आगपाखड करत असत.
"तुला काय वाटतं आम्ही काय मजा करायला चाललोय काय तिकडे? एज्युकेशनल लोन उचलावं लागणार आहे त्याच काय? इकडे राहिलो तर हे शिक्षण आणि नोकऱ्यांमधलं रिझर्वेशन, नंतरची वशिलेबाजी, राजकारणं , पावलोपावली बोकाळलेला भ्रष्टाचार कशाला सहन करत बसायचं? हे सरकारी बाबू हात गरम केल्याशिवाय आपली कामं करत नाहीत, कॉलेजमधले क्लार्क साध्या आमच्या हक्काच्या स्कॉलरशिपचा -जातीमुळे मिळालेली नव्हे-परीक्षा देऊन मिळालेल्या स्कॉलरशिपचा चेक रिलीज करायला नाटकं करून दाखवतात, साध्या ट्रान्सक्रिप्टच्या कामासाठी खेटे घालायला लावतात. पोलिसाला चिरीमिरी दिली नाही तर तो पासपोर्ट व्हेरिफिकेशन करत नाही.. आमच्या टॅलेंटला मित्रांमध्ये, शिक्षकांमध्ये जो मान मिळतो तो बाहेरच्या जगात कुठेही मिळत नाही.. मग आमची सगळी हुशारी इथल्या या गोष्टी सॉर्ट आऊट करण्यात घालवू का? तू म्हणतो आहेस इथले प्रॉब्लेम्स सोडवा.. कितीही प्रयत्न केला तरी एका पिढीने सुटणारे नाहीयेत बाबा.. मग म्हणून इथे बसून सिस्टीम ला शिव्या घालण्यापेक्षा हे बरं ना? अमेरिकेत निदान टॅलेंट ला किंमत तरी आहे. हुशारीचं, कष्टाचं योग्य फळं मिळण्याचे 'फेअर चान्सेस' इथल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत. इथेच राहून भ्रष्टाचार हाच शिष्टाचार आहे हे मान्य करायचं किंवा डोळ्यादेखत गैरमार्गाने आरक्षण मिळवणारे बघून देशाबद्दल, सिस्टीमबद्दल वाईट बोलून इथलं वातावरण गढूळ करायचं, वाद घालायचे, नालायक लोकांसमोर आपली लायकी काढून घ्यायची यापेक्षा इथून जायचा प्रयत्न करतोय तर जाणं कसं चुकीचं आहे हे सांगणारे तुझ्यासारखे दीडशहाणे भेटतात. चांगली लाईफस्टाईल मिळवणं हि गरज नसू शकते का आमची? कि जळतोस तू आम्ही 'तिकडे' जाणार म्हणून?" एखादा, सुमेधच्या बोलण्याने दुखावलेला, मनातली खळबळ,भडाभडा बाहेर काढत असे.
या आणि अशा चकमकी सुमेधला नवनवे मुद्दे मिळवून देत असत आणि सुमेध बऱ्याचदा तिथल्या तिथे हिशोब चुकता करत असे... अगदीच नाहीतर नंतर त्या व्यक्तीला गाठून त्याचं म्हणणं खोडून काढत असे.
"हे लोक मला म्हणतात कि मी जळतो त्यांच्यावर. मी कशाला जळू ? मला काय कमी आहे इथे? बरं या बाकीच्यांना तरी काय कमी आहे? ३०-४० लाखाची एज्युकेशनल लोन मिळू शकणाऱ्या लोकांची आर्थिक परिस्थिती काय वाईट असते काय रे? फक्त पैशांच्या मागे धावून, चांगल्या लाईफस्टाईल च्या आशेने आई वडलांना एकटं टाकून तिकडे जाणं माझ्या मनाला पटतच नाही." सुमेध म्हणाला.
"अरे बाकीच्यांना काही आईवडिलांची काळजी नसते असं नाही, पण प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात. आता एखाद्या मध्यमवर्गीय पोराला इथे एखादी नोकरी करून मध्यमवर्गीय लाइफ जगत राहण्यापेक्षा तिकडे जाऊन जास्त पैसे मिळवता आले तर बरंच आहे ना? तो ते पैसे भारतात पाठवेल आणि त्याच पैशात त्याचे एकटे आईवडील इकडे म्हातारपणात जास्त सुखात राहू शकतील. त्यामुळे आपली सिस्टीममधला पैसे सुद्धा वाढेल नाही का?" मी माझा काहीही संबंध नसताना उगाचच त्या पोरांचा बचाव करायचा प्रयत्न केला असं मला एक क्षण वाटून गेलं.
"अरे पण पैसाच म्हणजे सगळं असतं का रे? म्हातारपणी मुलगा मुलगी जवळ आहेत हे भावनिक सुख महत्वाचं कि पैसे फेकून मिळणारं भौतिक सुख? एवढं काय आहे तिकडे?" त्याला सांगायला मला तरी कुठे ते माहित होत? माझ्यासारख्या बऱ्याच जणांसाठी अमेरिका म्हणजे हॉलिवूड मुव्हीज मधून फिरवणारी, पेपरमधून दाखवली जाणारी, 'फ्रेंड्स'सारख्या सिरीयल मध्ये दिसणारी होती. पण ही ठिकाणं असणारं, ट्वीन टॉवर्सवालं , न्यायदेवतेच्या पुतळ्यावालं न्यूयॉर्क हा विशाल अमेरिकेचा एक छोट्टासा प्रांत आहे हे कळायला पुढे काही वर्ष जावी लागली! मला वाटायचं कि तिथे शिकायला जाणारे लोक तिथे शिकून परत भारतात आले तर लॉन्ग टर्म मध्ये देशासाठी ते भलंच असेल, त्यांच्या जग बघण्याचा, नॉलेज चा देशाला फायदा ह परंतु सुमेधने स्टॅटिस्टिकल स्टडी करून एकदा अमेरिकेत शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी गेलेले पुन्हा भारतात परतण्याचं प्रमाण कसं एकदम फारच कमी आहे ते दाखवून दिलं होतं.
"बघितलंस ना आजपण एकांकिकेत , तिथे म्हणे बॉण्ड साइन करून घेतात कि पुढे भारत-अमेरिका युद्ध झालं, तर तुमच्या निष्ठा अमेरिकेशी असल्या पाहिजेत, भारताशी नाही. " मला हॉस्टेलला ड्रॉप करून निघता निघता तो म्हणाला.
"अरे त्या एकांकिकेतल्या गोष्टी सगळ्या खऱ्याच असतील असं नाही. शेवटी काल्पनिक कथानक आहे ते! तिथलं नागरिकत्व घेताना कदाचित हा सवाल येत असेलही पण शिकायला किंवा नोकरीला जाताना कशाला निष्ठा गहाण ठेवायला लावतील ते? आणि एकांकिका हाच रेफरन्स धरायचा झाला तर तूही बघतिलंस ना एकांकिकेत शेवटी? तुझ्यासारखा अमेरिकाविरोधी लेक्चर देणारा पोरगा जीआरई देत असतो बाकीच्यांना अंधारात ठेऊन!" मी हसत हसत म्हटलं..
सुमेध गप्प बसला. एकांकिकेच्या सुरुवातीपासून सुमेधसारखी वैचारिक भूमिका घेऊन आलेला अभिनेता, इतरांना ते जीआरई देऊन केवढा मोठा देशविरोधी अपराध करत आहेत हे पटवून देतो मात्र त्यांच्या अपरोक्ष स्वतः ती परीक्षा देतो असा तो शेवट होता. अर्थातच स्वतःच्या विचारधारेशी प्रतारणा करणारा तो शेवट सुमेधला आवडला नव्हता.
----------------------X ------------------O -----------------X ------------------------
....अमेरिकेतल्या उठसुठ येणाऱ्या निरनिराळ्या 'शॉपिंग सिजन्स' पैकी ,शाळा सुरु व्हायच्या आधी असणाऱ्या 'बॅक टू स्कुल' सिझनचा शेवटचा वीकेण्ड असल्यामुळे वॉल-मार्ट मध्ये प्रत्येक काउंटरला बिलींगसाठी भली मोठ्ठी लाईन होती.. माझा नंबर येईपर्यंत विरंगुळा म्हणून मी वेगवेगळ्या रंगाची,वर्णाची, रंगीबेरंगी कपड्यातली माणसं निरखत होतो, अमेरिकेतही मोठ्या संख्येने दिसणाऱ्या आणि उगीचच ओळखीच्या वाटणाऱ्या भारतीय लोकांचं निरीक्षण करत होतो. माझा नम्बर आला. 'डिड यु फाईन्ड एव्हरीथिंग ऑलराईट सर?" खोटं हसून काउंटरवरच्या मुलीने तिचा ठेवणीतला प्रश्न केला..... "सर? " तिने पुन्हा एकवार विचारलं पण..
मी स्तब्ध उभा राहिलो होतो... बाजूच्याच काउंटरवरच्या कॅरीबॅग्ज घेऊन सुमेध वॉल-मार्ट मधून बाहेर पडत होता!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
वाचकहो.. प्रतिक्रियांचं स्वागत आहे.. आपलं कौतुक किंवा टीका नवीन आणि अजून चांगलं लिहायची उमेद देतात..
आणि हो.. प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव लिहायला विसरू नका. अन्यथा ते ‘Anonymous’ असं येईल. धन्यवाद!