शनिवार, २८ एप्रिल, २०१८

प्रवास - कॉम्प्युटर ते फोन (व्हाया इंटरनेट ) :उत्तरार्ध


पूर्वार्ध:

दोन-एक वर्ष ऑर्कुटचं सगळ्यांवरच गारुड होतं. जवळपास सगळेच इन्टरनेट वापरू शकणारे 'ऑर्कुट'मय झाले होते. जर कुठे तोंडओळख झाली नाही कि लगेच 'फ्रेंड रिक्वेस्ट' पाठवण्याची 'क्रूर प्रथा' ऑर्कुटनेच रुजवली. प्रत्यक्षात बोलायला लागणारा धीर इथे लागत नसल्यामुळे पोरींचे गाडाभर ऑर्कुट फ्रेंडस जमले नसते तर आश्चर्यच म्हणायला हवं होतं! इमेल आय-डीप्रमाणेच प्रोफाईलला काहीतरी तिरकस नावं असणं हे ऑर्कुटसाठी नवीन नव्हतं. त्यामुळे शाळा कॉलेजाचा गाडा कसाबसा रेटत नेणारा शामळू पोराचं  प्रोफाईल 'मिसगायडेड मिसाईल' वगैरे असण्याची शक्यता खूपच जास्त असायची. समशैक्षणिक, समधर्मीय, सजातीय, समवाढदिवशीय, सम'वस्तू'धारक अशा 'तथाकथित' समविचारी लोकांच्या कम्युनिटीज स्थापन झाल्या. काही कम्युनिटीज मधून चांगल्या माहितीची बऱ्यापैकी देवाणघेवाण होत असे, कुठे काय चाललंय त्याचे अपडेट्स मिळत असत,नाहीतर बाकीचा असाच टाईमपास!

या दरम्यान सगळ्या टाईपच्या फ्री मेलबॉक्सेसवर कुरघोडी करत जीमेलचा गवगवा झाला. तोपर्यँत इतर कोणत्याही अकाउंट वर वाटेल ती व्यक्ती वाटेल तेव्हा वाटेल त्या नावाने अकाउंट ओपन करू शकत असे परंतु जीमेलचं तसं नव्हतं. ते फक्त निमंत्रणावरूनच ओपन करता येत असे. त्यामुळे ज्या व्यक्तीला ते निमंत्रण पाठवायचं आहे त्याचं  मुळात कुठे ना कुठे तरी अकाउंट असणं जरुरीचं होतं. सुरुवातीला बहुतेक दहा आणि नंतर बरेच दिवस जास्तीत जास्त पन्नास लोकांना जीमेल वर निमंत्रित करायची सोय होती. आपल्याला निमंत्रितांचा दर्जा देऊन स्पेशल फील करवणाऱ्या या सेवेचा भारतासारख्या देशात विस्तार ना होता तरच नवल! जीमेल लॉगिनच्यावेळी एक काउंटर दाखवीत असे आणि तुमच्याकडे किती जीबी मेलबॉक्स अव्हेलेबल आहे ते त्यात दिसत असे आणि तो आकडा वाढतच जात असे. त्यामुळे सुरुवातीला (म्हणजे एकदम सुरुवातीला) १.२XXX जी बी ने काउंटर सुरु होऊन अगदी २.५XXX जीबी होईपर्यँत तो अव्याहत चालू होता. नंतर फार पुढे कधीतरी तो दिसायचा बंद झाला. तेव्हापासून प्रत्येकासाठी भलीमोठ्ठी जागा (15 जीबी) गुगल ने उपलब्ध करून दिली होती.

त्याच दरम्यान कधीतरी फ्रेश थीम घेऊन आलेल्या जीटॉकने सगळ्या मेसेंजर्स ना अक्षरशः खाऊन टाकलं. कमी मेमरी खाणारं  अप्लिकेशन आणि फास्ट स्पीड यामुळे जीटॉकने याहू मेसेंजरची जागा व्यापून टाकली. पाठोपाठ buzz ची हवा झाली. जीटॉक वापरणारा ऍडव्हान्स युझर, बझची भाषा पण बोलू लागला. तसंच पुढे एकदा 'आय-गुगल' च्या माध्यमातून इंटरनेटवर अव्हेलेबल असणाऱ्या सगळ्या माहितीमधलं केवळ आपल्याला हवं तेवढं एकाच स्क्रीनवर बघण्याची सोय उपलब्ध झाल्यावर खूपजणांचं ऑफिसमधलं होमपेज हे आयगुगल बनलं होतं. 'उगाच सगळं कशाला चाळत बसायचं आणि गुगलचीच सतराशे साठ अप्लिकेशन  उघडत बसायची? आपल्याला हवंय ते होईल कि आपोआप अपडेट' हि सोय त्यामागे असावी पण नंतर गुगललाच ती रुचली नसावी!

याचवेळी कधीतरी एंट्री झाली फेसबुकची! पण बिचकत बिचकत.. त्यावेळी मुख्यतः अमेरिकेत वापरलं जाणारं हे ऍप्लिकेशन भारतात पाय रोवू पाहात होतं.  हिदेखील  'निमंत्रितांसाठी'ची संकल्पना असल्याने ती जीमेल सारखी फोफावणार यात शंका नव्हती पण अजूनही ती -अमेरिकेशी शिक्षण, नोकरी निमित्ताने डायरेक्ट (म्हणजे ऑफशोर रिसोर्स वगैरे) किंवा इनडायरेक्ट (म्हणजे मित्रमंडळ, नातेवाईक वगैरे) संपर्क असलेलं पब्लिक वगळता- इतर बऱ्याच जणांच्या पचनी पडली नव्हती.

तोपर्यंत ऑर्कुटचा दबदबा आणि आवाका दोन्हीही वाढला होता.गुगलसुद्धा खूप म्हणजे खूपच फॉर्मात होतं.  जीमेल मधूनच जीटॉक वापरायचं वगैरे असलं काहीतरी भारी करत होतं. काही काळातच गुगलने ऑर्कुट विकत घेतलं आणि त्यांच्या सर्व्हिसेसची इंटिग्रेशन्स सुरु झाली. फोटो अपलोड करण्याचं लिमिट नऊ वरून सुरुवातीला बारा पर्यन्त आणि नंतरनंतर अनलिमिटेड झालं. स्क्रॅपबुक वर लिहिलेल्या खरडीचे उत्तर तिथेच 'रिप्लाय' वर क्लिक करून खरडता येऊ लागलं. ऑर्कुटवर नवीन अकाउंट उघडण्यासाठी जीमेल आय डी वापरणं गरजेचं झालं. त्यामुळे ऑर्कुटच्या स्क्रीनवरूनच जीटॉक वापरता येऊ लागलं. जुन्या अकाउंटवाल्यांचा जीमेल वगळता दुसरा आयडी असेल तर ऑर्कुटमधून जीटॉक वापरता येत नसे. त्यामुळे त्यांनी नंतर तुमचा प्रायमरी आयडी पण जीमेल अकाउंटशी जोडायची सुविधा दिली. पण ऑर्कुटमधून आता सरळ चॅटिंग करता येऊ लागल्यामुळे स्क्रॅपबुक मधलं खरडणं कमी कमी होत हळूहळू बंद झालं. आपले अपडेट्स इतरांना दिसू लागले. अगदी असंच  बझचं होतं. गूगल च्या कुठल्याही अप्लिकेशन वरून टाकलेलं काहीही बझवर दिसत असे आणि तुमच्या मैत्रीखात्यातलं गुगल अकाउंट वापरणारं पब्लिक त्यावर कमेंट वगैरे करू शकत असे. त्यावेळी कमेंट ला 'कमेंट' म्हणता 'रिप्लाय' असं साधंसरळ नाव होतं. ऑर्कुट आणि गुगलची नाळ जुळल्यानंतर 'बझ'चा वापर मंदावत गेला. तरीदेखील बरेचजण बझफीड नित्यनेमाने अपडेट आणि फॉलो करत असत. हो, बाय द वे, फॉलो करणे हा शब्द (चांगल्या अर्थाने) बझनेच शिकवला.

फेसबुकचा वापर सुरुवातीला अगदी ऑर्कुटसारखाच होत असे. एखाद्याच्या वॉल वर जाऊन काहीतरी खरडण्यापुरताच! पण यातही कोणी कोणाला काय लिहिलं आहे ते दोघांच्याही फ्रेंडलिस्ट मधल्या सगळ्यांना दिसत असे. फेसबुकचं एकंदरीत स्वरूपच निराळं होतं. 'वॉल' या प्रकाराने एक चव्हाटाच फेसबुकने उपलब्ध करून दिला. ऑर्कुट हा 'निरोप' असेल तर फेसबुक हि 'दवंडी' होती! ऑर्कुटमधून सगळ्यांशी कनेक्टेड असलो तरी ज्या व्यक्तीशी कॉन्टॅक्ट करायचा असेल त्या व्यक्तीशीच बोलता येत असे. फेसबुकचं मात्र असं नव्हतं. आपल्याला काय वाटतं ते वॉलवर व्यक्त करायची संकल्पना 'स्वतःची मतं' चारचौघात बोलायची सवय नसणाऱ्यांना पचण कठीणच होतं! बझ वापरणाऱ्याना ती थोडीफार ओळखीची वाटली. पण इतरांना ती सुरुवातीला तितकीशी भावली नसावी. पण जसजसं फेसबुक रुजत गेलं तसतसं ते फैलावत गेलं. म्हणजे नंतर नंतर तर त्याने तेव्हा अस्तित्वात असणाऱ्या सगळ्याच प्रकारच्या सोशल मीडिया वर कुरघोडी केली. अर्थात सोशल मीडिया हा शब्द देखील फेसबुक आल्यानंतर जास्त प्रचलित झाला असावा.

माझ्या माहितीप्रमाणे ऑर्कुटपेक्षा फेसबुक वर बऱ्यचश्या सेलिब्रिटीज ची अकाउंट्स होती. फेसबुक ने ५००० मित्र (?) जोडायची परवानगी दिलेली असल्यामुळे या सेलिब्रिटीज चा 'फॅन' वर्ग त्यांचा 'फ्रेंड' होत असे! अशी अकाउंट बघताना मला तेव्हा प्रचंड कमाल वाटत असे. च्यायला आयुष्यात मी ज्यांना ओळखतो (जे मला ओळखतात असे नव्हे ) ते लोक पण एकंदरीत पाच हजार असतील कि नाही याबद्दल मी साशंक आहे! पुढे पुढे मग जेव्हा अश्या सेलेब्रिटीज ना फ्रेंड ऍडवणे कठीण झाले तेव्हा काळाची 'गरज' ओळखून फेसबुक ने पेज हि संकल्पना आणली.. नाहीतर ग्रुप आणि पेज मध्ये तसाही काही फारसा फरक नाहीच..

त्यांनतर मग असल्या साईट्सचं  पेवच फुटलं! त्यातल्या त्यात गुगल प्लस ने काही काळ आवाज केला पण फेसबुकच्या दणदणाटात तो कुठच्या कुठे विरून गेला. अशाच एका दिवशी बझ ने इंटरनेट चा निरोप घेतला आणि त्या पाठोपाठ अनेक बदल पचवून स्वतःचं  फेसबुक करून घेण्याचा प्रयत्न करत  करत ऑर्कुट पण परतीच्या प्रवासाला लागलं! पण कालौघात फक्त फेसबुकच टिकून राहिल.
 

फोनचीही तीच तऱ्हा. एकेकाळी नुसता मोबाईल असणे (जरी तो कंपासबॉक्स एवढा असला तरी!) हाच स्टेट्स सिम्बॉल असताना आता ती गरज बनेल असं मला वाटलंही नव्हतं. साधा लँडलाईन फोन असणं  हि केवढी कौतुकाची गोष्ट होती लहानपणी! दहा एक वर्षांपूर्वी जेव्हा साध्या मोबाईल वरून स्मार्टफोन वर घेतला तेव्हा मी त्या फोनचं  स्टोरेज ५१२ एमबीचं मेमरी कार्ड घालून वाढवलं होतं आणि नंतर एक गॅजेट सॅव्ही मित्राला -ज्याच्याकडे फक्त १२८ एमबी सपोर्ट करणारा स्मार्टफोन होता - मुद्दाम फोन करून जळवलं  होतं तेही आठवून हसू येतं. स्मार्टफोन आल्यावर wap च्या माध्यमातून ० बटण दाबून ठेवलं कि इन्टरनेट चालू व्हायचं पण त्याच्यावर हळूहळू दिसत जाणारा कन्टेन्ट आणि स्पीड त्यावेळी भारीच वाटायचा. सर्फिंग आणि डाउनलोड चा न कळणारा फरक-माझ्या आणि एअरटेलच्या कस्टमर केअर च्या कित्येक वादांचा उगम होता. एकदा तर एक मांजराच्या चेहऱ्याचं चित्र जे एखाद्या क्लिपआर्ट  एवढं होतं -डाउनलोड केलं म्हणून मला पंधरा रुपये द्यावे लागले होते. हिरोइन्स किंवा क्रिकेटर्स चे फोटो डाउनलोड करण्याच्या वयात मी एखाद्या रँडम मांजराचा चेहरा का डाउनलोड करेन हा युक्तिवाद त्यांच्या गळी  उतरवण्यासाठी केलेले माझे शर्थीचे प्रयत्न वाया गेले होते.

एअरटेल पोस्टपेड कस्टमर्स ना जेव्हा दहा रुपयात एका दिवसाचं अनलिमिटेड इन्टरनेट द्यायचं तेव्हा मी त्यांच्या सुविधेचा लाभ घेणाऱ्या  पहिल्या ग्राहकांपैकी होतो. दर  शनिवारी त्यांना  माझ्या फोनवर इंटरनेट चालू करायला फोन करायचा आणि रविवारी रात्री बंद करायला फोन करायचा असं वेळापत्रक बनून गेलं होतं. एकदा इन्टरनेट चालू झालं कि फोन कम्प्युटरला मोडेम म्हणून जोडायचा आणि कंप्यूटरवर हवं ते डाउनलोड करायचं असा  जवळपास ३ वर्ष असं  केल्यावर एकदा त्यांनी आम्ही तुम्हाला 'नेहमीचे ग्राहक' म्हणून दर महिन्याला 'तब्बल' २ जीबी डेटा फ्री देत आहोत असं जाहीर करून टाकलं. तेव्हापासून ते फ्री २जी इंटरनेट चालू होतं ते आताआतापर्यंत!! रोज २ जीबी डेटा मिळणाऱ्या आताच्या काळात त्याचं काय कौतुक?

फोन वर अव्हेलेबल झालेल्या इंटरनेट ने तर अजून नवीन शक्यता उघडून ठेवल्या. मग ट्विटर,बीबीएम, व्हाट्सऍप चा सुकाळ झाला. सोय काय तर तुमच्या ओळखीच्या पब्लिकच्या सतत संपर्कात राहा! कॉम्प्युटर पण ऍडव्हान्स होत जाताहेत आणि फोन ही. ज्या वेगाने वेगवेगळ्या आकाराचे आणि फीचर्स चे फोन येताहेत ते बघता, पुढे जाऊन फोन,कम्प्युटर, टॅब, लॅपटॉप सगळं वेगळं राहील कि नाही याचीही शंका येतेय. पण इतका बदल इतक्या सहज पचवला तसा हासुद्धा पचवू! त्यात काय! लहानपणीचं  छोट्या आकाराची वस्तू स्वस्त आणि मोठ्या आकाराची महाग वगैरे लॉजिक सुद्धा गंडू लागलंय आता! हातात मावणारा फोन त्यापेक्षा स्वस्तात मिळणाऱ्या मोटरसायकलवरून जाताना घेऊन जाता येतोय.

मागच्या दोन दशकात ज्या वेगाने गोष्टी प्रगत होत गेल्या ते बघता आपणच मागास होतो असं वाटायला लागतं. ६४ एमबी रॅमच्या कम्प्युटरचं, डायल अप नेटवर्कचं  कौतुक असणारा मी आणि आता ४ जीबी रॅम चा मोबाईल आणि ४ जी नेटवर्क वापरणारा आणि तरी सुद्धा डिव्हाईस स्लो आहे म्हणून चिडचिड होणारा किंवा ५० एमबीपीएसचं नेटवर्क असूनही  नेटफ्लिक्स वर एखादा व्हिडियो बघताना क्वचित कधीकधी काही सेकंद बफरिंन्ग होतं म्हणून वैतागणारा मी यातलं कोण खरं तेच कळेनासं होतं.

कालाय तस्मै नमः

अवांतर: हा लेख लिहिला होता तेव्हा (जवळपास ४ वर्षांपूर्वी) तेव्हाच आऊटडेटेड झाल्यासारखा वाटत होता. मग नंतर नवनवीन अपडेट करत लांबी उगीच वाढत जात होती. मग म्हटलं जाऊ दे... ज्या वेगाने टेक्नॉलॉजी वाढत आहे ते बघता कधीही पोस्ट केला तरी असला लेख आऊटडेटेड व्हायचाच. म्हणून करून टाकला पोस्ट.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वाचकहो.. प्रतिक्रियांचं स्वागत आहे.. आपलं कौतुक किंवा टीका नवीन आणि अजून चांगलं लिहायची उमेद देतात..
आणि हो.. प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव लिहायला विसरू नका. अन्यथा ते ‘Anonymous’ असं येईल. धन्यवाद!