गुरुवार, २४ मे, २०१२

एका शोधयात्रेची कहाणी! उत्तरार्ध

पूर्वार्ध
पण प्रत्यक्षात झालं उलटच.
ग्यादरिंगच्या दुस-याच दिवशी एक कोणतरी पोरगा आला. सिनियर. वरच्या वर्गातला होता हे त्याच्या राठ दाढीमिशीवरून कळत होतं. त्याच्याबरोबर त्याची ग्यांग होती.
'काय रे ए. मस्ती आली का?' त्याने विचारलं
'नाही' मी म्हटलं..पण या प्रश्नाच हे उत्तर नसतं.
'ती बटीण.. तुझं माणूस कधीपास्न झालं रे?'
'अं... मं..आं..कोण म्हण्ट? ' मी गडबडलो..
'हां..अस्सं पायजे.. तिच्या फंदात नाय हां पडायचं..आपला आयटमाय तो'
मी गप्प बसलो. हवा गुल झाली होती. मी लगोलग झम्प्याला गाठला.
'तू तर बोल्ला होता ती त्यातली नाय्ये म्हणून'
'हं..ती त्यातली नायचाय. हा पोरगा तिच्या मागेयाय. ती सरळे रे पोरगी. आपण शुव्वरशॉट सांगतो. कोणालापण विचार पायजे तर'' झम्प्याने थोडा विचार केला..
'पोरगा तब्येतीने तगडा होता काय रे?'
'हो. एक नव्हता. तसले ४-५ होते'
झंप्या विचारात पडला.
'तुला दुसरी कोणी आवडते काय रे?' झम्प्याने विचारलं आणि माझी पहिली प्रेम कहाणी तिथल्या तिथे संपुष्टात आली. सुरु होण्याच्या आधीच.

जुनिअर कॉलेजात मुलीच्या बाबतीत माझी डाळ शिजली नाही पण बी कॉम ला एडमिशन घेतल्यानंतर सिनिअर कॉलेजात काहीतरी होईल असं चिन्ह दिसत होतं. कारण पोरं स्पष्टपणे मुलीबाबतच्या गोष्टी करत.. पब्लिक ला आता मैत्रीण नको होती डायरेक्ट 'गल्फ्रेंड'च हवी होती.
कॉलेजचा कट्टा असो किंवा कॅन्टीन ची टेबलं. मुलांचा घोळका जमलेला असला कि ९० टक्केवेळा हेच विषय चालू असत.
'च्याला.. ती आर्ट्सची भावे.. त्या ढेपल्याबरोबर हाय हां कायतरी शुवरशॉट..' इति झंप्या
'कशावरून रे..?' एकाने विचारलं
'अरे काय कशावरून..? डोळ्यांना दिसत नाय? कॉलेजात कितीवेळा बोल्ताना दिसतात. तो अनिरुत साला.. जळते रे' कोणीतरी म्हणालं
'ढेपल्याच नाव अनिरुद्ध आहे ? हे मला म्हायतीच नव्हत'  मी म्हटलं
'हो रे चायला! अनिरुत ढेपले. ठेपले म्हायती होते, ढेपले पयल्यांदाच कळले ' मग हास्याचे फवारे..
मुली ज्या मुलांबरोबर फिरतात त्या मुलांची आम्ही त्यांच्या मागे चेष्टा उडवायचो.. तेवढंच सुख!
'ए.. वयनी आली.. वयनी आली..' कोणीतरी म्हणायचं
'ए अम-या.. तुझी डाव आली बग' दुसरा
'ए अssमssर..' सगळे मोठ्याने ओरडत.
हास्याचे फवारे अजून जोरात उडत.

'काय कठीण नाय रे..पोरगी पटवायला काय लागतं?' झंप्या एकदा म्हणाला.
'मग तू का नाय पटवली?' माझा सरळ सवाल..
'आपल्याला तो नादच नाय. असली फालतुगिरी करायचीच नाय आपल्याला..'
'निदान मलातरी सांगशील?'
'तुला म्हून सांगतो. बॉडी बिल्डींग कर.'
'काय म्हणतोस ..मग पोरगी पटेल?'
'लिवून देतो.. आयशपत... अश्शी फिजीक बनव कि सलमान चाट पडला पायजे. पायजे तर मी पण येतो तुझ्याबरोबर.'  झंप्याशेठ म्हणाले.

आता असलं आपल्याला आयुष्यात जमणार नाही हे माहिती असूनपण मी त्याच्या नादाने व्यायाम करायला लागलो. पण बॉडीच एक लिमिट असतं. मुळातच हाडं असणा-या शरीरावर चढून चढून कितीसं मांस चढणार? आणि जिम मधलं निम्म पब्लिक 'आरशात आपण पूर्ण कसे दिसतो?' हे बघण्यासाठी येत होतं यावर माझा दृढ विश्वास बसला. त्यामुळे बॉडी बिल्डींग करण राहायचं बाजूला आणि भलत्याच गोष्टींवर चर्चा रंगायच्या.

'आयला, एफ वाय ला खूप नव्या पोरी आल्यात रे यंदा!' -झंप्या (बायसेप्स दिसताहेत का बघत)
'कोण आहे काय रे माल?' -मी (झंप्याचे बायसेप्स दिसताहेत का बघत)
'माल? अरे मालगाडी आहे मालगाडी..' -झंप्या (डम्बेल उचलल्याची फक्त एक्शन करत)
'काय सांगतोस काय?' -मी (झंप्याची एक्शन बघून माझे बायसेप्स नुसते बघत)
'मग काय खोटं बोलतो का काय?'  झंप्या म्हणायचा 'चार पाच मुली तरी खूप मस्त आहेत. च्यायला,२-४ म्हयने जाऊदेत मग आपली बॉडी बघ. नाय त्या पोरी वळून वळून बघत राहिल्या ना..'
असलं काहीतरी ऐकलं कि उगीच मला थोड स्फुरण यायचं.

३-४ महिन्यात 'हा आपला विषय नव्हे' हे मला कळून चुकलं. त्यातच 'ज्या संध्याकाळच्या वेळात पोरी बाहेर फिरतात त्यावेळी तू जातोस जिम मध्ये मग काय कप्पाळ पटणार मुली?' असल्या कमेंट्स मिळाल्यामुळे माझा जिमला जाण्याचा उरलासुरला उत्साह देखील मावळला.त्यानंतर मग माझं जिम ला जाणं होत राहिलं पण त्यात तो पूर्वीसारखा उत्साह,जोम, ती सळसळ राहिली नाही. (तो परत आणण्यासाठी काहीतरी गोळ्या असतात अस मला पेपर मधल्या जाहिराती वाचून वाटलं होतं पण तो 'जोश' 'जोम' वेगळा हे वेळीच कळलं म्हणून अनर्थ टळला! असो, विषयांतर झालं.) पण जिम प्रकरणातून एक चांगलं झालं कि अगदीच वाळलेल्या काठीयुक्त अंगावर मुठभर मांस चढलं. अक्षरशः !! प्रोटीन पावडर,सप्लीमेंट च्या मा-याने बॉडीला ब-यापैकी आकार आला. पण त्यामुळे सामाजिक जीवनात काही फरक पडला नाही. मुली वळून वळून मला पाहत आहेत अस जे काही स्वप्न माझ्यापुढे रंगवण्यात आलं होतं ते काही सत्यात उतरताना दिसेना!

मी चाचरत हि शंका जेव्हा जिमच्या ट्रेनर ला विचारली तेव्हा तो म्हणाला
''गाडी पाहिजे रे..'
'कशाला?' माझा बाळबोध प्रश्न.
'बुडाखाली घोडा असला न की पोरी लगेच पटतात.'
'काय म्हणतोस?' मी विचारलं.
"आता मी बघ. कशी आहे बिल्ट?" त्याने डोले शोले दाखवत विचारलं.. चेस्ट वरखाली हलवून दाखवली.
"चांगली आहे" मी त्याला अपेक्षित असणारं उत्तर दिलं पण एकंदरीत मला ते 'छाती हलवून दाखवण' कौशल्यापेक्षा हास्यास्पद वाटलं होतं
"पण सगळ्या पोरी..'" सुस्कारा सोडून तो म्हणाला " सकाळच्या ब्याच ला येतात. माझ्याकडून कार्डीओ म्हणा,वेट ट्रेनिंग म्हणा, एरोबिक्स म्हणा शिकतात आणि नंतर कुणाच्या तरी बाईकवर मागे बसून हिंडताना दिसतात. च्यायला..ती पोरं पण सुकडी बिकडी असतात रे" त्याने त्याचं दुःख मांडलं.
'म्हंजे बाईक घ्यायलाच हवी काय?'
'म्हंजे काय? बाईक असली की पोरगी फसली' तो म्हणाला.

मग आमच्या वडिलांच्या मागे मी टुमणं लावलं. घरापासून कॉलेज कसं लांब पडतं. क्लास ला जायचं झालं तर येण्याजाण्यातच कसा वेळ जातो वगैरे सांगून सांगून त्याचं मन मला वळवावं लागलं. त्यांनी झडती घेऊन का होईना, क्लास असेल तर त्यांची गाडी घेऊन जायला त्यांनी परमिशन दिली. बाबा आदम च्या जमान्यातली ती हिरो होंडा सी डी हंड्रेड कॉलेजात कायच्या कायच हिट झाली. मी गाडी घेऊन गेलो तर पोरं उगीच गोळा व्हायला लागली. मी म्हटलं, आता सगळं जमलंच.
पण महिना गेला ,२ महिने गेले ,३ महिने गेले मागची सीट रिकामीच होती. सुरुवाती सुरुवातीला मी पूर्ण गाडी पुसायचो मग मग काही जमत नाही दिसल्यावर फक्त बसायचा भाग मी साफ करायला लागलो. मागच्या सीटवरची धूळ तशीच राहायला लागली. मग एकदा एका मित्राने विचारलं.
'मित्रा, जरा मदत हवी होती'
'बोल ना दोस्ता'
'अरे जरा पमू ला घरी जायचं होतं.'
'कोण?'
'अरे प्रमिला.. माझी ती हि..'
'हां हां.. ओके. हां. मग ?'
'जरा बाईक देतोस का ? डोन्ट वरी.. आपण पेट्रोल भरणार. फुकट नाय मागत.'
साला आपल्या गल्फ्रेंडला सोडायला माझी गाडी मागत होता.. अशी जळत होती पण काय करणार? पॉकेटमनी तर पेट्रोल मध्ये खर्च होत होता. तेवढाच खर्च वाचेल असा विचार करून मी त्याला दिली शेवटी बाईक.
नंतर तर ती प्रथाच पडली. माझी गाडी लोकांच्या गल्फ्रेंड फिरवू लागली पण मी सुकाच राहिलो. गर्लफ्रेंडसुख म्हंजे काय ते मला मिळालंच नाही. गाडी आहे म्हटल्यावर पोरींशी थोड्या ओळखी झाल्या पण सगळ्या कोणाच्या ना कोणाच्या तरी गल्फ्रेंडस! पुढे पुढे तर असं झालं की मला माझ्या नकळत ड्रायवर च्या भूमिकेत ढकललं गेलं.. हि पोरं बिनधास्त आणि निर्लज्जपणे ' ए,तिला अमुक अमुक ठिकाणावरून तमुक तमुक ठिकाणी सोड ना ' म्हणून सांगू लागली. पेट्रोलचा सगळा खर्च दोस्तीखात्यात जमा होत होता. आता गल्फ्रेंड असणा-या या कुठल्या पोराकडे सल्ला मागितला तर ते -
"अरे बराय ना नाय्ये ते.. काय कमी लफडी असतात? फोन करा, त्यांचपण कार्ड रिचार्ज करा, कुठाय, काय करतोय त्याचे अपडेट देत -हा, आणायला नि पोचवायला जा, त्यांच्या खायचा प्यायचा खर्च करा आणि वरून नाटक सांभाळा. कोणी सांगितलाय तो ताप? सुखी आहेस!"  असं म्हणून मलाच या प्रकारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत. साले स्वतः मजा करत होते आणि मला साधी मदत पण करायला तयार नव्हते! कृतघ्न कुठचे!
जिम मध्ये जाऊन ट्रेनर ला हा झोल सांगितला तर बेटा मला म्हणतो,
"ह्या.. सी डी हंड्रेड घेऊन कोणाला पोरी पटल्यात काय? वयस्कर लोकांची गाडी ती. पोरीसाठी कशी - पल्सर नायतर करिझ्मा पायजे"
मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पोरांना स्कूटी, स्पिरीट अगदी गेलाबाजार झिंग (Santro Xing नव्हे..कायनेटिक झिंग.. ती डबडा गाडी) वगैरे घेऊन आपापल्या गल्फ्रेंडना फिरवताना पाह्यलं होतं. माझ्याकडे तर गाडी नसणा-या  (बॉय)फ्रेंडस ची पण उदाहरणं होती. तेव्हा मला कळलं कि हा स्वतःचे फंडे जगन्मान्य असल्यासारखे सांगत होता. होता होता कॉलेज झालं पण त्या आनंदाला मी पारखाच राहिलो.

बी कॉम झाल्या झाल्या काकांच्या वशिल्याने मी रेवेन्यु डिपार्टमेंट मध्ये चिकटलो आणि तिथले एकंदर (स्त्री) चेहरे बघता माझी गर्लफ्रेंड बनवण्याची इच्छा आपोआपच दाबली गेली.वयस्कर लोकांमध्ये राहून,वावरून  मी माझ तारुण्य हरवून बसलो.तरीपण ऑफिसात इंटरनेट होतं. ऑर्कुट,फेसबुक वरनं 'दिसलं पोरीचं अकौंट कि पाठव फ्रेंड रिक्वेस्ट.. '; ' मुलीचा आय डी दिसला कि, कर याहू chat किंवा जी talk ला add ' असले प्रकार करून मी माझ्या काल्पनिक जगात शेकड्याने मैत्रिणी बनवल्या.आता त्या मैत्रिणींमध्ये ख-या मुली किती होत्या ते देवालाच माहित! कारण माझ्यासारख्या भाबड्या मुलाला उल्लू बनवणा-या पोरांची जनतेत कमी नाय्ये.. याहू आणि जी talk वर माझ्या भावनांशी काही मुलं (खोट्या खोट्या मुली बनून) खेळल्यानंतर मी ते थांबवलं. फेसबुक वर हजार- दीड हजार लोकांचा गोतावळा जमवला. काहीजणी करायच्या फ्रेंड रिक्वेस्ट, एक्सेप्ट तर काहीजणी (खरतर ब-याच जणी! ) रिजेक्ट करायच्या.शेकडो जणींनी मला ब्लॉक सुद्धा केलं. पण माझे प्रयत्न मी सोडले नाहीत!
"एवढ्या मैत्रिणी जमवल्या पण एकपण गल्फ्रेंड नाय रे झाली" मी झम्प्याला  म्हटलं."chat वर मी इतक्यांदा  'हाय' म्हटलं तर साधा एकदा 'हेल्लो' करायचं सौजन्य सुद्धा नाही दाखवत एकपण पोरगी. त्यांच्या फोटोला लाईक केलं,कमेंट टाकली तर thank you म्हणायचा उदारपणा दाखवत नाहीत कोणी..' माझ दुःख मी व्यक्त केलं.
"रिलेशनशिप स्टेटस 'इन अ रिलेशनशिप' ठेव. बघ कशा पोरी chat  करतात ते!" झंप्याने लगेच सुचवलं!
 या झंप्याला सगळ्या क्लृप्त्या कशा काय ठावूक असत कोण जाणे! त्याची कुठलीच युक्ती कमी यायची नाही पण निदान त्याच्याकडे माझ्या प्रश्नावर,तेवढ्यापुरतं तरी उत्तर तयार असायचं!!
'ते कसं काय?'
'अरे मग पोरींना वाटणार हा आधीच एंगेज आहे, काही धोका नाही.. मग त्या पुढे येतील'
'अरे पण मग मला कोण कशी काय पटेल?'
'ते पुढे बघता येईल ना! आता बोलायलातरी सुरुवात होऊंदे!'
झंप्याचा आर्टस ला 'लॉजिक' हा विषय असल्यामुळे (आणि त्याने तो दोनदा दिलेला असल्यामुळे) मी जास्त खोलात शिरलो नाही. पण त्याचं लॉजिक फेल गेलं हे वेगळं सांगायला नकोच.
फेसबुक वर सुद्धा मग 'प्रेम','ती', 'मुलगी', 'प्रेमभंग' इत्यादी विषयाशी संबंधित कविता, कथा, चित्र लाईक करण्याव्यतिरिक्त आणि काही वेळा 'एकतरी मैत्रीण असावी' वगैरे सारख्या कवितांवर सहानुभूतीच्या कमेंट्स देण्याशिवाय इतर काही मला जमू शकलं नाही..

असो!! भूतकाळ फारसा नव्हता आशादायक नव्हता. आता वर्तमानात येतो! (माझ्या वयाच्या तेवीसाव्या आणि) यंदाच्या वर्षीच घरच्यांनी लग्नाचं प्रकरण मांडलंय. मी म्हटलं 'एवढ्यात मला लग्न नाय करायचं' पण घरचे थोडीच ऐकताहेत? आता करणारच आहेत माझं लग्न म्हटल्यावर मला थोडी स्फूर्ती आली होती  पण  इथेही  घरच्यांच्या चाळणीतून मुली पास झाल्या तर त्या माझ्यापर्यंत येणार असा एकंदरीत प्रकार होता. याचा परिणाम म्हणून गेले सहा महिने एकपण मुलगी माझ्यापर्यंत पोचली नाही!

आणि आता सगळे अडथळे पार करून हे स्थळ पुढ्यात येवून पडलं आहे. फोटोही तोच, व्यक्तीही तीच, नाव आणि आडनाव पण तेच.. ही आमच्या शाळेतली बटीण!! आता अजून बरी दिसत्येय.  सालं काय करू कायच समजत नाय्ये..मी आधी 'मला एवढ्यात लग्न नाय करायचं' असं म्हटलेलं असल्यामुळे 'एंगेजमेंट आता करून ठेवू आणि लग्न सवडीने करू' म्हणताहेत. मला वाटतं होऊन जाऊदे असंच.. म्हणजे एंगेजमेंट आणि लग्नामधले सगळे दिवस गल्फ्रेंड म्हणून तिलाच फिरवायला मार्ग मोकळा! कसं?

मंगळवार, १५ मे, २०१२

एका शोधयात्रेची कहाणी : पूर्वार्ध

लहानपणापासून म्हणजे जेव्हापासून या गोष्टी 'कळायला' लागल्या तेव्हापासून पोरगी पटवण्यासाठी मी प्रचंड प्रयत्न केले पण एकही फळला नाही.

आता मी शाळेत असताना वर्गात जेव्हा मुला-मुलींच्या जोड्या जुळवल्या जायच्या तेव्हा हुशार मुलाला हुशार मुलीच्या नावाने चिडवलं जायचं.. म्हणजे ब-याचदा मुलांमध्ये पहिला नंबर वाला मुलगा आणि मुलींमधली पहिला नंबर वाली मुलगी .. तिची मैत्रीण आणि याचा मित्र यांची जोडी, गोरा मुलगा, गोरी मुलगी यांची जोडी, जवळ जवळ राहणारे आणि शाळेत एकत्र येणारे मुलगा मुलगी, आया आया मैत्रिणी असणा-या किंवा बाबा लोक मित्र असणा-या मुलगा मुलगी ची जोडी आणि अमुक अमुक नंबरच्या ब्यांचवर (याचा उच्चार असाच होता) बसणारा मुलगा आणि त्याच सरळ रेषेत मुलींच्या लायनीतल्या ब्यांचवर बसणारी मुलगी यांची जोडी अशा ढोबळमानाने जोड्या फार क्वचित ठरलेल्या आणि ब-याचदा जबरदस्तीने ठरवलेल्या होत्या..

आता या जोड्या रातोरात ठरल्या कि काय कोण जाणे पण मला कळेपर्यंत त्या ठरल्या होत्या एवढं नक्की.. शेवटची वर्गवारी वगळता इतर कुठेही मी फिट बसत नव्हतो. अभ्यासात सो सो म्हणजे सामान्य, मित्रमंडळी अतिसामान्य, रंगाने सावळा , आई बाबांच्या मित्र मैत्रिणींपैकी ब-याचजणांना सगळेच टोणगे. कोणाला आमच्या वर्गात असेल इतक्या वयाची मुलगी नाही.असलीच तर मोठी मुलगी..त्यामुळे तिला 'ताई' वगैरे म्हणावं लागत असे. असे सगळेच फासे उलटे पडले होते.निदान शेवटच्या वर्गवारीत का बसू नये असा विचार केला तर माझ्या लायनीत (म्हणजे शेवटून दुस-या) तिकडे एकावर्षी अगदीच कुरूप पोरगी होती.. नुसत्या कल्पनेनेच मलाच कसतरी वाटलं. तिच्या नावाने चिडवलं जाऊ नये असा पोरांचा कटाक्ष होता त्यामुळे तोही चान्स गेला.. दहावीच्या वर्षात एक ब-यापैकी मुलगी आली पण ती खूपच उंच होती आणि माझी दहावीपण होती (आणि तिची पण).

आता या चिडवाचिडवीच्या जोड्या सगळ्यांच्याच ठरवलेल्या नव्हत्या पण ज्यांना वाटत होतं त्यांच्यातरी होत्या.. म्हणजे उरलेल्या पोरांपैकी काहीजणांनी 'हि माझी' 'ती तुझी' असं आपलं आपणच ठरवून घेतलं होतं. आणि ज्यांनी ज्यांनी हे ठरवून घेतलं होतं ते इतरांना तसं सांगायचे आणि आपापसात चिडवा चिडवी ला सुरुवात करायचे म्हणजे ती पोरगी आली किवा गेली कि 'ए अमुक तमुक' म्हणून त्या पोरीला मुलाच्या नावाने हाक मारायची मग ती गोष्ट गावभर व्हायची. असा एकंदरीत प्रकार होता. सुरुवातीसुरुवातीला पोरीला कळायचं नाही पण मग सारखं सारखं तसं व्हायला लागलं कि हे आपल्यासाठीच आहे हे त्या पोरीला कळायचं. अगदीच शुंभ असली तर मग तिच्या मैत्रिणी तिला सांगायच्या. जर ती खुदकन हसली तर मग पोरांना चेव यायचा आणि मग विचारायलाच नको.

काही अति आगाऊ मुलांनी दुस-या वर्गात (चिडवलं जाईल याची )सेटिंग केली होती. मग ती दुस-या तुकडी मधली मुलगी असो किंवा खालच्या यत्तेतली. बरं..हि सगळी असली (मोजकी) जन संख्या, या एक्स्ट्रा करिक्युलर activities वगळता, शाळेत असताना वर्गातल्या इतर बहुसंख्य रयतेबरोबर थोडा (किंवा) फार अभ्यास करणे, शिक्षकांकडे लक्ष देणे, मधल्या सुट्टीत आणि पी टी च्या तासाला मनसोक्त खेळणे, मित्रमंडळात गप्पागोष्टी करणे, डबे खाणे वगैरे निरुपद्रवी आणि जनरली शाळेत करावयाच्या उद्योगात गुंग असे. हि जी 'बहुसंख्य रयता' असे त्यांना या गोष्टी म्हणजे (एकतर जमत नसत किंवा) 'लफडी' वाटत असत. त्यामुळे ते जाणीवपूर्वक यापासून दूर राहत असत. माझी मित्रमंडळी याच रयतेचा भाग असल्यमुळे माझी गोची झाली होती. म्हणतात ना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही.

आधीच म्हटल्याप्रमाणे मी अभ्यासात अप्रगत, वरून सर्व प्रकारच्या खेळांमधला अकुशल कामगार. तसं तिसरीत असताना एकदा मला चमचा गोटी स्पर्धेत मला उत्तेजनार्थ मिळालं होतं पण ते कोणाला सांगण्या सारखं नाही. कला वगैरे विषयात काठावर पास.. एकदोनदा तर चित्रकलेच्या सरांनी माझी आणि वर्गातल्या अशाच काही कलाकारांची चित्र वर्गात जाहीरपणे दाखवून आम्हाला कुप्रसिद्ध केलं होतं. वास्तविक पाहता आमच्यासारखी चित्र काढणारे पिकासो , एम एफ हुसेन वगैरे लोक तर आलम दुनियेत फेमस होते. पण आमच्या सरांना आम्ही लीयोनार्डो दा विन्ची, राजा रवी वर्म्या सारखी चित्र काढणं अपेक्षित होतं.

स्टेज वर जाऊन काही करून दाखवावं म्हटलं तर एकदा समूह गीतात एकदम शेवटच्या लायनीत उभ राहून 'आ आ आ' असं करायचं होतं तर माझी तंतरली होती.. 'घाम फुटतो' म्हणजे काय ते चेहरा,मान, हात, पाय ,पंजे, पावलं इत्यादी इत्यादी युनिफॉर्म मधून उघड्या असणा-या झाडून सगळ्या अवयवातून बाहेर पडणारे घर्मबिंदू प्रात्यक्षिकासह समजावून सांगत होते, पाय लटपट कापत होते,घसा कोरडा पडला होता. तोंड तर मी उघडलं होतं पण घशातून आवाज बाहेर पडत नव्हता. पण समूह गीत असल्यामुळे ती गोष्ट खपून गेली. त्यानंतर मी स्टेज चा धसका घेतला तो आजतागायत! त्यामुळे वक्तृत्व, नाटक, रेकॉर्ड डान्स करून किंवा तिथे काही कलाकारी दाखवून मुलींच्या हृदयात जागा निर्माण करण्याची शक्यता सुद्धा संपुष्टात आली होती.तर मुलीच्या बाबतीत शाळेत माझं हे असं होतं. पण मनातून 'एकतरी मैत्रीण असावी' असं वाटत होतं.

कॉलेजात गेल्यावर बरेचसे संदर्भच बदलले. स्कर्ट वाल्या युनिफॉर्म मधून मुली पंजाबी ड्रेस वाला युनिफॉर्म वापरू लागल्या आणि आम्ही फुल प्यांट! एकदम मोठ्ठ झाल्यासारखं वाटायला लागलं मलापण. पण शाळेतून कोणी दुस-या कॉलेजात गेलं, कोणी शिक्षण सोडलं, कोणाची भांडणं झाली वगैरे वगैरे अगदीच काही अपवाद वगळता सगळ्या तथाकथित जोड्या फुटल्या!! पण मला याचा आसुरी आनंद सुद्धा लुटता आला नाही कारण मला आवडणा-या मुलींच्या तोपर्यंत नव्या जोड्या -चिडवाचिडवीच्या का होईना -पण व्हायला लागल्या होत्या. मी कोणात मिसळत नव्हतो म्हणून अनभिज्ञ होतो असं नव्हे पण शाळेत असताना मी जर माझ्या मित्रांपैकी कोणाला त्याला चिडवल्या जाणा-या मुलीबद्दल विचारलं तर मला मिळणारी प्रत्युत्तरं
' नाय रे.. कैपण कै?'
'पोरं काय..कायपण बोलतात. तू काय लक्ष देतो तिकडे..म्हणतात त्यांना म्हणायचं तर म्हणू दे'
' कोण म्हण्ट असं? सांग. मधल्या सुटीत बगतोच त्याच्याकडे'
'बाईंना नाव सांगेन हां असलं कायपण पसरवलंस तर'
अशी सरळसोट किंवा धमक्या च्या स्वरूपातली असत..

कॉलेजात गेल्यावर हीच उत्तरं बदलली!
' हां.. चिडवतात म्हणून काय झालं? पण आमच्यात तसलं काय नाय्ये '
' माझी मैत्रीण आहे ती.. नुसती मैत्रीण.समजलं?'
' कैपण कै बोल्तो? भयीण मानतो आपण तिला. '
' नुसतं बोल्तो म्हणजे कै तरी असायलाच हवं असा नियम आहे का?'

पण एकंदरीत आपल्याला कोणाच्यातरी नावाने चिडवतात याचं त्या पोरांना बरं वाटत होतं खरं.बरं.. पोरीसुद्धा अशा कि विचारायला नको.. काही काही पोरी तर आपल्याला त्या मुलाच्या नावाने चिडवतात म्हटल्यावर 'आपली स्वर्गात ज्याच्याशी गाठ मारली आहे तो जन्मोजन्मीचा साथीदार हाच' असं तेवढ्यापुरतं का होईना, समजून इतर मुली ज्यांना असं काही चिडवलं वगैरे जात नसे त्यांच्यासमोर शायनिंग मारत असत! त्या न चुकता वडाला फे-यापण मारत असतील कि काय अशी मला पुसट शंका येत असे पण मला कोणच कोणाच्या नावाने चिडवत नाही याचं फार वाईट वाटायचं आणि एकदा ते मी आमच्या मित्र मंडळीत बोलून दाखवलं.
'ए झंप्या... साला, कोणतरी पायजे यार.. एकतरी मैत्रीण हवी जिच्याशी निदान बोलता येईल..' झंप्या हा माझा बालमित्र. त्याच्याकडे मी मोकळेपणाने बोलू शकत असे.

दहावीच्या काळात मुलींबरोबर बोलणं सुद्धा एखादं पाप असावं इतकं अवघड झालं होतं. जरा कोणाशी कोण पोरगा बोलला कि लगेच चिडवायला सुरुवात.. 'एखाद्या मुलाची मैत्रीण' नावाची कन्सेप्ट फक्त पुस्तकातच असते कि काय अशी शंका माझ्या मनात निर्माण होत होती.अकरावीत उशिरा हि बंधनं थोडी शिथिल झाली होती. तरीपण सुरुवातीला म्हटलं तसं माझ्या ग्रुप मधली बरीचशी मुलं आपलं क्याराक्टर जपण्याच्या उद्देशाने 'मुलींशी बोलणं' हि भानगडच टाळत असत.
' येडा झाला का तू? कोणाशीपण कैपण कै बोलणार? कै बोलणार सांग तू पोरीशी?' झंप्याचा प्रतिप्रश्न.
' हां रे ते पण है.. तसं काय खास नाय, पण हेच. नोट्स बिट्स मागेन'
'एकदा मागशील.. मग पुढे काय?'
'परत देणार'
'काय? एडपट हायेस का?'
'मंजे कायतरी सुरुवात तर होईल! पुढचं पुढे बघेन'
'कुठली मुलगी आवडते तुला?' त्याला बहुतेक माझं म्हणणं पटलं होतं. तो स्वतः आयुष्यात कुठल्या मुलीशी बोलला होता कि नाही कोणास ठाऊक पण मला मदत करायला तो तत्पर होता.
'कोणपण चालेल.. जरा बरीशी हवी..'
'क्काय? ती काय भाजी आहे बाजारातली? '
'आता मला कै म्हायती? पण आपल्या वर्गातली भिंतीकडच्या लायनीतली,पुढनं चौथ्या ब्यांचवर बसते बघ ती.. लाम केसवाली. वेणी घालते बग. ती चांगली आहे..'
'कोण रे?? हां ती बटीण'
'भटीण? ती ब्राह्मण आहे?'
'नाय रे.. बटीण.. बटीण.. बट असते न तिची नेमी..म्हणून बटीण'
'हां.. हां.. मला वाटलं नॉन वेज बिन वेज खात नाय कि काय..' मी म्हणालो.
'आयला.. अजून बोलण्याचा पत्ता नाय्ये आणि तू खाते काय ते बघायला लागला..'
'च्च.. तसं नाय रे..पण आपलं विचारलं.. ए.. जमेल कै?'
'म काय झालं. तिच्यामागे खूप पोरं होती. पण ती त्यातली नाय'
'त्यातली म्हंजे?'
'म्हंजे त्यातली..ते तसंच असतं..असं म्हण्टात'
मी या क्षेत्रात फारच बाळबोध होतो कि आम्ही दोघे अज्ञानी असल्याने असला संवाद घडत होता कोणास ठाऊक!!

मी असलं विचारायची खोटी.. हि गोष्ट मित्रमंडळात पसरायला वेळ लागला नाही. मला तिच्या नावाने चिडवायला सुरुवात झाली. हे येवढ सोप्प असतं याची कल्पनाच नव्हती मला.. सालं मित्रमंडळ महत्वाची भूमिका बजावतं असल्या प्रकारात, हे गुपित मला उलगडलं.

शाळेत असताना पोरं आपल्या लायनीतल्या 'लायनी'वर लक्ष ठेवून ती इकडे कितीवेळा बघते याचा हिशोब I I I I अशा सांख्यिकी मध्ये शिकवलेल्या 'वारंवारता' च्या पद्धतीने कर्कटकाने ब्यांचवर रेषा मारून लक्षात ठेवत असत. आता कॉलेजात तसा हिशोब ठेवायला गेलं तर अख्खा बेंच २-४ महिन्यातच भरून गेला असता. तरीपण काही गुप्तहेर बिनपगारी हि कामं करत असत.
'आयला हो रे..तीपण तुज्याच कडे बघत असते'
'आपण घरी जायला सायकल stand वर उभे राहतो न तेव्हा ती पण उभी असते बघ..'
'अरे ती अमुक अमुक च्या शेजारी राहते'
'त्या तमुक तमुक ची खास आहे ती. तिच्याशी मैत्री कर आपोआप हि येईल बघ..'
एकापाठोपाठ एक सल्ले मिळत होते. मला माझं पहिलं प्रेम (तयार करून) मिळवून द्यायला कित्ती लोक तत्पर होते हे मला नव्यानेच कळत होतं.मग जो तो आपापल्या पद्धतीने हे पसरवायला लागला..मीपण खुश व्हायचो.
gathering ला तर कहर झाला. अगदी तिला समजेल असं बोलत होतं पब्लिक.

'तो चाललाय ना त्याचं आणि त्या एलेवंथ बी मधल्या टिंब टिंब पोरीचं कायतरी आये' असं मीच माझ्या मागे कोणालातरी बोलताना ऐकतोय अशी स्वप्न मला पडू लागली..

उत्तरार्ध

सोमवार, ५ मार्च, २०१२

वधू पाहिजे अर्थात आम्ही लग्नेच्छुक...!

(पुरुष वाचक असाल तर) डिस्क्लेमर : या ढोबळमानाने काढलेल्या कॅटेगरीज (मराठीत-क्याटेग-या) आहेत. उगीच स्वतःला यापैकी कुठेतरी फिट करून बघण्याचा अजिबात प्रयत्न करू नये आणि मुळातच सदर मतं फारशी मनाला लावून घेऊ नयेत. कारण वाचणा-याच्या भावना दुखावल्या गेल्या तर मी (हसण्याव्यतिरिक्त इतर) काहीच करू शकत नाही.




आम्ही उपवर -१
आम्ही पहिल्या प्रवर्गात मोडतो.. याला सर्वसामान्य (आणि सर्व) लोक अतिसामान्य असं म्हणतात. आम्हाला याचं कधी कधी वाईट वाटतं पण ब-याचदा काही फरक पडत नाही.. कारण तसंही लहानपणापासून आम्ही काही विशेष केलेलं नसतं.

आमच्या (स्वभावाने गरीब असणा-या) आई बाबांच्या आमच्याकडून काही अपेक्षा होत्या कि नाही ते कळेकळेपर्यंतच आम्ही प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत गेलो.. हुशार बिशार असलोच तरी मोजकेच. म्हणजे कसं आहे कि पहिल्या पाचात नंबर वगैरे आमच्या गोष्टी नव्हेत हे आम्हाला कधी कळलंच नाही. आम्ही आपले अभ्यास कर कर करून थकलो पण आधी मिळवलेल्या मार्कांच्या एक दोन टक्के..कधी मधी पाच सात टक्के प्रगती झाली पण तेवढे टक्के आमच्या आधीच्या नंबरच्या पुढे जायलाही उपयोगी पडले नाहीत!! पहिल्या पाचाचा तर विषयच सोडा.. अगदीच ढ जरी नसलो तरी अभ्यासाचं गणित काही सहजासहजी जमलं नाही हेही खरंच.

गुरुजी अथवा बाईंनी शाळेत कधी आम्हाला उत्तरं द्यायला उभं केलं नाही किंवा छडी मारल्याचंही आठवत नाही.
कदाचित त्यांना त्याचा फारसा फरक पडत नसावा.. कधी कधी ते आमचं नाव घेत असत पण आम्ही त्यांच्या खिजगणतीत आहोत हेच बघून तेव्हा आमची छाती फुलून येत असे.

मैत्रीच्या बाबतीत ही तेच.. त्या त्या क्षणाला आम्ही ज्या ज्या लोकांबरोबर होतो ते लोक मित्र असे आम्ही समजत गेलो. शाळा, कॉलेज, नोकरी यानुसार आमचे मित्र बदलत गेले. 'जानी दोस्त' असा नसेच आणि असला तर प्रत्येक वेळी वेगळा असे!

तर आम्ही चारचौघांसारखं शिकून नोकरीला लागतो. थोडे हातपाय मारल्यावर,थोड्या खस्ता खाल्ल्यावर चांगली नोकरी मिळते. शाळा कॉलेजात असताना देखील 'मुली' हा विषय आम्हाला तसा वर्ज्यच.. बोलणं वगैरे तर लांब. नंतरसुद्धा ती गोष्ट कधी जमली नाही आणि भविष्यात सुद्धा जमेल असं वाटत नाही. आमचा मित्रमंडळींचा गोतावळाही साधारण याच स्वरूपाचा असतो त्यामुळे मुलींबरोबर बोलणारा मुलगा देखील आम्हाला बोल्ड वाटतो! इतर लोक आम्हाला उद्देशून मुलींबद्दल आमच्यासमोर काही बोलले तर आम्ही कावरेबावरे होतो, लाजतो किंवा असंच काहीतरी करतो कारण आम्हाला त्या बोलण्याला कसं react करायचं हेच मुळी माहित नसतं..

अरेंज पद्धतीचं लग्न हे आमच्यासारख्या लोकांसाठी खरंच वरदान आहे.. नशीब असलं काहीतरी आपल्या पूर्वजांनी निर्माण करून ठेवलंय आणि 'वधू-वर सूचक मंडळ' वाल्यांनी हि परंपरा पुढे चालू ठेवलीय!! नाहीतर आमच्यासारख्या मंडळींची लग्न झाली असती की नाही हे देवालाच ठाऊक... अप्पा आणि आक्का (आमच्या आई वडिलांना ब-याचदा आम्ही असंच काहीतरी म्हणतो!!), तुम्हाला मुलगी पसंत तर आम्हालाही पसंत!!

आम्ही उपवर -२

आमचा प्रवर्ग हा सामान्य मध्ये गणला जात असावा.. कारण आमच्यासारखे आम्हाला बरेच सापडतात. दर १० माणसातले ६ जण भेटल्यावर आम्हाला वाटतं कि 'अरे हे ध्यान आपल्यासारखंच आहे. आम्ही शिक्षण क्षेत्रात जरी भरीव कामगिरी केली नसली तरी वाईट तरी केलेली नसते. आमचे पालक चारचौघात आमचे नाव (अभिमानाने जरी नसले तरी) घेऊ शकतात असं आम्हाला तरी वाटत असतं.

शाळांमध्ये आम्ही हुशार, एवरेज, ढ,अति-ढ अशा सर्व प्रकारच्या क्याटेगरीत आढळून येतो.तसंच कॉलेजातपण आमचे मित्र बित्र ठरलेले असतात. पण त्यामध्ये वेगवेगळ्या प्रवर्गातले लोक समाविष्ट असतात. आम्ही आधीच्या गाळीव प्रवर्गाच्या तुलनेत बरेच active असतो. म्हणजे शाळा कॉलेजात असताना शिक्षणा व्यतिरिक्त आम्ही इतर ब-याच activities मध्ये सहभागी होतो जसे कि मुलामुलींच्या जोड्या जुळवणे, कुठल्यातरी पोरीच्या मागे लागणे (आणि तिला नको जीव होईपर्यंत छळणे) , कोणाबद्दलतरी गॉसिप्स करणे आणि पसरवणे वगैरे वगैरे. परंतु दुर्दैवाने त्याला शिक्षणसंस्थांचे पुरेसे पाठबळ न मिळाल्यामुळे या activities - एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये गणल्या गेल्या नाहीत.

कालमानानुसार आम्ही वेगवेगळ्या वयात त्या त्या वयाच्या मुलींच्या प्रेमात पडतो. आणि ही गोष्ट ब-याचदा ती मुलगी वगळता इतर सगळ्यांना माहित असते. काही तोंडफाटक्या मित्र अथवा मैत्रिणींच्या गोतावळ्याला जवळ केल्यामुळे क्वचित मुलीला सुद्धा ते समजतं पण ती मुलगी
१) आम्हाला अजिबात भाव देत नसल्यामुळे किंवा
२) (आमच्यालेखी) एका अतिशय फडतूस आणि अतिप्रचंड फालतू अशा मुलावर प्रेम करत असल्यामुळे किंवा
३) ती 'तसली' (म्हणजे कसली याचं उत्तर आम्हाला मिळालेलं नाही) नसल्यामुळे किंवा
४)आमच्या भावना (आणि विचार) कधीच तिच्यापर्यंत पोहोचू आणि पोहोचवू शकत नसल्यामुळे

आमच्या प्रेमात पडत नाही! असे धक्के पचवून आम्ही शाबूत राहतो. नोक-या करतो,धंदे चालवतो परंतु हातपाय मारायचे काही सोडत नाही. कधी खुलेआम, कधी लपूनछपून. पण शेवटपर्यंत नौका काही किना-याला लागत नाही.

आमचे पालक अगदीच 'वधू-वर सूचक' पर्यंत पोचत नाहीत तरीपण नात्यातली मुलगी शोधायचे सगळे प्रयत्न करतात. आमचे सर्वसामान्य गुण 'युनिक' असल्यासारखं दाखवत मार्केटिंग करतात. उदाहरणार्थ मुलगी पटवण्यात आम्हाला आलेलं अपयश त्यांच्या जमेत नसल्यामुळे ते- हि गोष्ट 'संस्कार आहेत हो आमचे' अशा अर्थाने घेतात. आता सगळ्याच आई बापांना आपलं कार्टं हे 'बाब्या' वाटणं साहजिकच! त्याचा दोष त्यांना का द्यायचा? असो तर त्यांची (आर्थिक) पुण्याई, आमची (कवडीमोलाची) पदवी आणि (त्यामानाने तुटपुंजी) कमाई हे अग्रेसिव्ह मार्केटिंगचं त्याचं प्रमुख अस्त्र. अनोळखी, आर्थिक सुबत्तेच्या आधारावर घरात यायचं कि नाही ते ठरवणारी मुलगी, आणि आमचं तिच्या कुटुंबियांसमोर उभारलं जाणारं तद्दन भंपक चित्र... आम्हाला मनातून वाटत असतं हे सगळं चुकतंय पण आमच्याकडेही हे 'बरोबर' करायचा मार्ग नसतो. त्यातूनही ओळखीतली मुलगी मिळाली नाहीच तर 'मंडळं' आहेतच!

आम्ही उपवर-३

आम्ही असामान्य! म्हणजे काय? आहोतच! लग्नाला उभे राहिलो म्हणून पहिल्या दोन वर्गात गणना केलेली खपायची नाही हो आम्हाला! लहानपणापासून की काय ते माहित नाही पण समजायला लागल्यापासून मुलगी या समस्त वर्गावर प्रेम करणारे! कसे शिकलो कधी शिकलो ते कळत नाही पण जमतं बुवा ते.. आमचा प्रवर्ग त्यामुळे नेहमीच मुलींच्याच नव्हे तर मुलांच्यादेखील कुतूहलाचा विषय ठरतो..

आम्ही एकतर..
१)खूप देखणे,क्युट किंवा असेच काहीतरी...
२)खूप हुशार,स्मार्ट किंवा असेच काहीतरी...
३)कोणत्या न कोणत्यातरी कलेत, खेळात प्राविण्य मिळवलेले किंवा असेच काहीतरी...
४)बोलण्यात लाघवी,गोड किंवा असेच काहीतरी
किंवा वरीलपैकी काही कलागुणांच उपजतच मिश्रण असणारे असतो.

शाळा, कॉलेजात असताना आमच्या मागे (मागावर या अर्थी) काही मुली असतात पण आम्ही मात्र ठराविक मुलीच्या मागे असतो. ती मुलगी आम्हाला कधी मिळते कधी कधी मिळत नाही. मिळाली नाही तर आम्ही प्रयत्न करून, बोलबच्चन देऊन किंवा इतर प्रकारे इम्प्रेस करून ती (किंवा आम्हाला शोभेल अशी) मुलगी मिळवतोच. (इतर लोक त्याला पटवणे किंवा कटवणे असं शब्द वापरतात आणि आमच्याकडे सल्ला मागतात पण हि गोष्ट T-ट्वेंटी म्याच सारखी असते हे आम्ही त्यांना सांगू शकत नाही.तुमचा दिवस असला तर सगळं 'ओके' नाहीतर तुम्हीच 'ओकेबोके'! ) पण मग त्यामुळे आम्हाला प्रेम, नातं वगैरे या गोष्टींचा 'एहसास' कि काय म्हणतात तो झालेला असतो. आम्ही बाकीच्यांमध्ये मिसळणारे असलो तर आम्हाला मित्र लोकांमध्ये भलताच भाव-बिव मिळतो. आणि तसे नसलोच तर आमच्या गर्लफ्रेंडमुळे आम्हाला त्या गोष्टीची चिंता वाटत नाही. आम्ही त्या मुलीवर जीवापाड प्रेम करतो आणि ती सुद्धा तसं करत असते.(असं आम्हाला वाटतं असतं!)

जीवनाच्या ज्या टप्प्यावर आम्हाला आधाराची खरी गरज असते त्या वेळीच आमची सखी आम्हाला डिच देते.. (ब्रेक-अप नंतरच आम्ही हे असं काहीतरी बोलायला शिकतो.. बरं का!) मग स्वतःहून नवीन मुलगी शोधायचं आमचं धैर्य होत नाही किंबहुना आम्ही तसं करूच शकत नाही किंवा मग तिच्या तुलनेत वरचढ अशी कोणी भेटत नाही म्हणून मग पेरेंट्सच्या तोंडाकडे बघून आम्ही बोहल्यावर उभे राहतो.एकेकाळी आवडीची असणारी गोष्ट कधीकधी मनात इतकी घृणा निर्माण करते कि ती गोष्ट पाहिल्यावर तुमच्या मनात तिरस्काराशिवाय इतर कोणतीही भावना येत नाही, (मगाशी म्हटलं न.. असलं अवजड बोलायला आम्हाला फार कष्ट पडत नाहीत!) तसंच काहीसं आमचं 'मुलगी' या बाबतीत झालेलं असतं.

उलटपक्षी काहीवेळा आम्हीही नीच असतो. पटत नाही,विचार जुळत नाही,योग्यतेची नाही किंवा इतर काही अव्यवहार्य कारणांमुळे आम्हीही कल्टी डॉट कॉम चा आधार घेतो. कधी एकदा तर कधी कित्येकदा.. कधी एकीबरोबर तर कधी निरनिराळ्या मुलींबरोबर. इतरांना वाटतं कि आम्ही चीSSS प आहोत. पण मुळातच तो आमचा स्वभाव असतो. मुरड घालायची म्हटली तरी घालता येत नाही. ज्यावेळी खरोखर लग्न करायची वेळ येते तेव्हा आधीच्या अनुभवांवरून आम्हाला स्वतः मुलगी शोधायचं किंवा घरच्यांना सांगायचं डेअरिंग होत नाही.(असतो आम्ही भाकड!) पुर्वेतिहासानुसार पुढे जाऊन उगीच अंदाज चुकला तर काय घ्या? म्हणून आम्ही आई-वडिलांकडे हे काम सोपवतो.

प्रत्यक्षातली मुलगी असो किंवा matrimonial वरची.. या बाबतीत आम्ही पूर्णतः तटस्थ असतो!!

आमच्या पराक्रमामुळे नातेवाईकांचा आणि जवळच्या मित्रमंडळींचा तर पत्ताच कटलेला असतो. तरीपण आमचे mom - dad (अगदीच तर मम्मी पप्पा) साईटस वर आमच्या नावाने रजिस्ट्रेशन करून वधू संशोधन करत असतात ब्वा!! आता काय.. आम्हाला म्हणावच लागतं... यु आर राईट. यु नो मी बेटर than एनीबडी डू.. तुम्ही सांगाल त्या मुलीशी आम्ही लग्न करायला तयार आहोत. long live matrimonials !!

इत्यास्तु!!

बुधवार, ११ जानेवारी, २०१२

आयेम ए रेबेल

ती वेगळी होती. तिच्या सगळ्याच बाबतीत स्वतंत्र संकल्पना होत्या, ध्येयं होती, स्वप्नं होती आणि पुस्तकी भाषेत मांडता येईल असं बरंच काही होतं! पण सगळं सगळं स्वतंत्र आणि वेगळं.. जाणवण्याइतपत वेगळं. एकटी राहायची, मोजका जनसंपर्क, घरात असली तर एका हातात पुस्तक आणि दुस-या हातात कॉफी मग अशा अवतारात. एखाद्या स्त्रीने ज्या पद्धतीने समाजात राहू नये असं म्हणतात त्या पद्धतीनेच ती राहायची. बंडखोर प्रवृत्ती,बक्कळ पैसा..लोकांनी काढलेल्या चित्रांची प्रदर्शनं मांडून आणि ती विकून कमवलेला. पस्तीशी मध्ये देखील एखाद्या तरुणीला लाजवेल अशी फिगर.. मी तिच्याकडे जायला लागलो तेव्हा मला या गोष्टी कळत नव्हत्या असं नव्हतं. पण ते नक्कीच तिकडे जायचं कारण नव्हतं! दरवाजावर तीन नॉक आणि एक थाप मारली तरच दरवाजा उघडला जायचा आणि हे सगळ्यांना माहिती देखील नव्हतं.

ती आधी आमच्या सोसायटीत राहायची. लेटर बॉक्स मधून लाईट बिल्स कलेक्ट करायचं सौजन्य सुद्धा दाखवायची नाही. ३-४ महिन्यांची लाईट बिल्स (तेव्हा आतासारखी एका महिन्यात लाईट कट व्हायचा प्रकार नव्हता, 'एमेसिबी' कधीच महावितरण एवढं कडक नव्हतं ब्वा!), कुठल्या तरी प्रदर्शनं, एग्झिबिशनच्या आमंत्रणांनी तो लेटर बॉक्स ओसंडून वाहायला लागला तेव्हा मीच एकदा तो सगळा कचरा गोळा करून तिच्या दरवाजात गेलो.. जनरल एटीकेट्सनुसार तीनदा नॉक केलं आणि माझ्या हातातून तो पसारा खाली कोसळला! आधार घ्यायला मी दरवाजाला हात लावला आणि अशा पद्धतीने मी पहिल्यांदा ती अलिबाबाची गुहा योगायोगाने उघडण्यात यशस्वी झालो! सगळंच नाटकी!

तिने दरवाजा उघडला तेव्हा मी तो पसारा गोळा करत होतो..
"तुमची पत्रं येतात खाली..एवढी आलीयेत"
"हौ डू यू नो द अक्सेस कोड?"
"व्हॉट अक्सेस कोड? आय डोन्ट नो एनी अक्सेस कोड"
ती विचलित झाली आणि दुस-या क्षणी सावरत मला म्हणाली "कम ऑन इन.."
मग आम्ही बराच वेळ बोललो..गप्पा मारल्या. मस्त होती बोलायला... त्यानंतर मग कधीही एकटं एकटं वाटलं,कंटाळा आला, कोणाशी बडबड करावीशी वाटली, चर्चा करायची खुमखुमी आली, गप्पा माराव्याश्या वाटल्या कि मी बिनधास्त तीन नॉक्स आणि एक थाप मारून माहितीचे दरवाजे उघडू लागलो..

"तुम्ही.."
"मला एकेरी हाक मार"
"मी तुमच्यापेक्षा लहान आहे वयाने" मी म्हटलं.. 'तुमचं वय जास्त आहे' हे स्त्रीला डायरेक्टली सांगायचा हा दुसरा चांगला मार्ग!
"आई सुद्धा मोठी असते न? आणि मावशी ? आत्याला काय म्हणतोस? ताईला?"
"...."
"आपलं यातलं कुठलंच नातं नसलं तरी फक्त वयामुळे तू मला अहो जाहो करावंस हे मला मुळीच पटत नाही, अगं म्हटलंस तरी चालेल मला.."
"बरं... तू इथे देवपूजा करत नाहीस?"
"नाही.."
"कंटाळा आहे कि तू नास्तिक आहेस?"
"माहित नाही"
"म्हणजे?"
"देव आहे कि नाही मला माहित नाही"
"हे सगळं निर्माण करणारा कोणीतरी असेलच ना ? ती शक्ती म्हणजे 'देव' असं मानायला काय हरकत आहे?"
"मी एक विचारू?"
"विचार..पण जास्त कठीण नको.." मी म्हटलं
"चांगलं वागणा-या बरोबर तुझा देव चांगलं वागतो आणि वाईट वागणा-याला अद्दल घडवतो,बरोबर?"
"हो.." मी मान तुकवली
"मग माणसात आणि देवात फरक तो काय? आपली न्यायव्यवस्था तर तेच करत असते!"
"...."
"जर देव असेल तर तो वाईट गोष्टी मुळातच का होऊ देईल? स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायला? हे धर्म , फॉलोअर्स आहेत तोपर्यंत ठीक आहे पण त्यांच्या प्रसारासाठी जिहाद,क्रूसेड्स , धर्मयुद्ध.. हे कुठला देव सांगतो आणि का? जो मला मानत नाही तो काफिर, तो सैतान असं अल्ला कसं काय म्हणत असेल? प्रोटेस्टन्ट, रोमन कथेलिक वगैरे प्रकार कशाला असले असते? हिंदूंमध्ये कोट्यावधी देव कसे काय असले असते? दोन वेगवेगळ्या धर्मातली युद्धं एकवेळ परवडली पण एकाच धर्मात दुजाभाव? मग कसा आणि का विश्वास ठेवायचा देवावर?"
"..." माझं ज्ञान तिची उत्तरं द्यायला फारच तोकडं होतं,किंबहुना मी असा तिरकस विचार केला नव्हता. स्पष्टच सांगायचं झालं तर डेअरिंग झालं नव्हतं देवाबद्दल अशा जाहीर प्रतिक्रिया व्यक्त करायचं!
"धर्म बापा ज्याचा त्यांनी,प्रिय मानावा प्राणाहुनी,परी विधर्म्याच्या ठिकाणी, अलोट प्रेम धरावे! या मताची आहे मी.."
"मस्त आहेस तू!" मी दिलखुलास प्रतिक्रिया देऊन टाकली.

"मी आणि मीच" हे तिचं जीवनसूत्र होतं बहुतेक. ना नातेवाईकांची बंधनं, ना कोणाच्या आणाभाकांचं गुंतलेपण! तिचा flat सुखवस्तू या कॅटेगिरित मोडत होता.. सगळ्या वस्तूंची रेलचेल. पण तिच्या घरातली मला आवडणारी गोष्ट म्हणजे मोठ्ठ्या बिन bags! कुठून आणल्या होत्या कोणास ठाऊक! सगळ्याच गोष्टी ती सांगायची असंही नाही.विचारल्या तरी! पण दोघांनाही असणा-या फावल्या वेळात जेव्हा तिच्याकडे जाणं व्हायचं तेव्हा त्या bags वर आरामात रेलून बसायचं आणि काहीबाही खात,टीव्ही बघत गप्पा कुटायच्या. ऑसम फिलींग!!

"तू अशी का राहतेस? एकटी एकटी? सोसायटीतल्या लोकांत जावं, इथल्या चारचौघात मिसळावं, मिटींग्ज अटेंड कराव्यात, मतं मांडावीत असं नाही वाटत तुला?"
"नाही"
"का?"
"कारण मला सहानुभूतीच्या नजरा नको आहेत.."
"कोण तुला कशाला सहानुभूती दाखवेल?"
"तू लहान आहेस अजून.."
"तुझी देव-धर्माविषयीची मतं ऐकून पचवणा-याला तू लहान म्हणतेस?"
"..."
"कोण दाखवतं तुला सहानुभूती?"
"पुरुष"
"..." मी निःशब्द...
"एक या वयातली स्त्री एकटी राहते म्हटल्यावर एकजात या जमातीच्या नजरा आपोआपच वळतात.. त्या वळणारच. स्वाभाविकच आहे ते. पण आता सवय झालीये.आय इग्नोर इट..बट आय डोन्ट वॉन्ट टू गिव्ह देम अ channel !"
"तुझ्या कोणी प्रेमात नाही पडलं? किंवा तू कोणाच्या?"
ती मंद हसली. पण एव्हाना तिच्या हास्यातून जो अर्थ अपेक्षित असतो तो नसतो हे मला कळून चुकलं होतं. मी तो अर्थ शोधण्याच्या भानगडीत पडलो नाही!
"मी नाही पडले कोणाच्या प्रेमात.. माझ्या प्रेमात कित्येकजण पडले... पण मला काय करायचंय यापेक्षा काय करायचं नाही ते आधीपासूनच माहित होतं.."
"आई-बाबा?नातेवाईक?"
"बाबा एक्स्पायर. माझ्या लहानपणीच. आणि त्यामुळे आई कोलमडलेली, आयुष्यभर देव देव करत होती, कोणाकोणाचं म्हणून वाईट केलं नाही बिचारीने. तरीसुद्धा तिला काय काय भोग भोगावे लागले.. "
"म्हणून तुझा देवावर विश्वास नाही?"
"तेही कारण असेल कदाचित..तू काय माझा इन्टरव्यू घेतोयस का?" ती हसत म्हणाली.."माझ्या आईने आयुष्यभर देवाचं केलं तर तिने नको नको ते भोगलं, मी नाही केलं तरी मी सुखात आहे. राजकारणी लोक, गुंड लोक भ्रष्टाचार करून मोठ्ठाली देवळं उभारतात, संगमरवरी देवघर बांधतात, देवस्थानांना मोठमोठ्या देणग्या देतात! करू शकतोस तू हे सगळं एक्स्प्लेन?"
"मागच्या जन्माची पापं असतील..म्हणजे अशीही एक थियरी आहे..." मी चाचरत म्हणालो
तू पुन्हा हसली."असल्या थियरिज मांडून आपण आपलंच समाधान करून घेत असतो असं नाही वाटत तुला?"
मी-अर्थातच- गप्प बसायचो!!

आर्टीस्ट लोकांच्या आर्टला प्रदर्शनांची दालनं उघडी करून देणं हे तिचं काम! कुठून कशी ती या व्यवसायात शिरली ते देवालाच ठाऊक..नव्हे तिलाच ठाऊक..त्या बिचा-याने सुद्धा एवढं दुर्लक्ष करणारी व्यक्ती पाहून तिच्यात काडीमात्र इन्टरेस्ट ठेवला असेल असं मला वाटत नाही! पण अगदी टांकसाळ असल्यासारखे पैसे अक्षरशः छापत होती.खर्च स्वतःवर होईल तितकाच..काम तिला हवं तेव्हाच आणि हवं तितकंच.. बहुतेक मीटींग्ज बाहेर चांगल्याश्या हॉटेल किंवा लाउंज मधेच होत असत त्यामुळे घरी कोणी येण्याचा आणि घरच्या गोष्टींमध्ये दखल देण्याचा प्रश्नच मिटला होता.

"तुझा उद्देश काय आहे या सगळ्यामागचा?" maggi खाता खाता एकदा ती कसे पैसे कमवते आणि कशी उधळते हे सांगत असताना मी तिला विचारलं.."
"म्हणजे ?"
"म्हणजे सामान्य लोकांचे पैसे कमवण्याचे उद्देश असतात चांगली जीवन-शैली, भविष्यात चांगलं कुटुंब,मुलं, त्यांची शिक्षणं,लग्न वगैरे वगैरे"
"मग बरोबर आहे ना? माझा उद्देश आहे चांगली जीवनशैली..बास! मी वर्तमानात जगतेय, माझ्या स्वतःसाठी, वाटलंच तर इतरांसाठीही.. माझं घर आहे, गाडी आहे, ऐशोराम आहे, ही पुस्तकं आहेत ती माझी मित्र आहेत,प्रदर्शनातून थोरामोठ्यांचा सहवास मिळतो..नेहमी वेगवेगळी माणसं भेटतात, मला वाटतं त्या लोकांना मी भेटू शकते, माझं कामाचं स्वरूप सांगितल्यावर भल्या भल्या कलाकारांना मला टाळणं शक्य होत नाही!! मी मात्र मला नको त्या लोकांना टाळू शकते.. पाहिजे ती गोष्ट,पाहिजे त्या वेळी पाहिजे तिथे मला मिळते..अजून काय हवं? नाहीतर म्हातारपणी हेच म्हणावं लागेल न कि जिवंत होते पण जगायचं राहून गेलं?"
"तरीपण...स्वतःचा संसार वगैरे..." मी चाचरत म्हणालो..
"मला नको आहेत ही बंधनं..मुळात माझा सामान्य समाजाशी संपर्कच कमी आहे..त्यामुळे त्या समाजासाठी असल्या गोष्टींमध्ये गुंतून पडण्यात मला स्वारस्य नाही. आता त्या लॉ कॉलेज रोड वर एक अनाथालय आहे, तिथे मी देते देणगी.. ३ मुलांसाठी.."
ती उठून आत गेली आणि हातात कसलेसे कागद घेऊन बाहेर आली. ती प्रगती पुस्तकं होती. एक एव्हरेज प्रगती दाखवणारं आणि उरलेली दोन बिलो एव्हरेज!!
"लोक इथे देणगी देतात आणि आपण पोसत असलेल्या मुलानं पहिलंच यावं अशी अपेक्षा ठेवतात! बाबांनो तुम्ही कधी एखाद्या इयत्तेत तरी पहिले आलात?" ती छद्मी हसली.."मी या मुलांना पोसते.. कोणतीही अपेक्षा न ठेवता.. 'तुम्ही तुमचं जीवन तुमच्या पद्धतीनं जगा' एवढंच सांगणं असतं माझं त्यांना! "
"पण.."
"कशाला हवेत रे 'पण' आणि 'परंतु'? मी जगतेय तसं मला जगू देण्यात जगाला कसला त्रास आहे ते कळत नाही.. तू माझा सगळ्यात लहान सल्लागार आणि आई सगळ्यात मोठी! "
"सल्ला नाही पण लोक काहीबाही बोलत राहतात..इव्हन आपल्या सोसायटीत..."
"बोलेनात का? अभिरुचीसंपन्न जगात वावरत राहिलं ना तर कदाचित गॉसिप्स,चारित्र्य,लग्न,मुलंबाळं यामधलं - माझ्या भाषेत- या दुय्यम गोष्टीमधलं स्वारस्य कमी होतं आणि माझ्या बाबतीत तेच झालंय. व्हू सेज व्हॉट अबाउट मी--आय जस्ट डोन्ट केअर!"खांदे उडवत ती म्हणाली "तू इथे येतोस तेव्हा तुझ्याबद्दल कोणी काही बोलत नाही आणि माझ्याबद्दल बोलतात यावरून सिद्ध काय होतं? हा लायकी नसणारा समाज नेहमी बाईलाच वाईट चालीचा ठरवतो.. हो कि नाही?" ती पुन्हा हसली..मी गडबडलो.अगदी मुळापासून हललो!

तिने सदाशिवेत एका महागड्या प्रोजेक्टमध्ये रेडी पझेशन flat बुक केला हि न्यूज आमच्या सोसायटीत वा-यासारखी पसरली आणि त्यापेक्षा वेगाने फुटलं तिच्याबद्दलच्या अफवांचं पेव..! इतकं की तिच्या घरात जाणा-या प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाने जणू स्वखुशीने घेतली होती. माझ्यासारख्या 'सामान्य' माणसाने आपलं स्वतःचं चारित्र्य आणि भविष्य जपायचं असेल तर तिच्या घरी न गेलेलं आणि तिच्या स्वच्छ चारित्र्याबद्दल इतरांकडे न बोललेलंच बरं हे माझं मीच ठरवून घेतलं. ती कधी समोर दिसली तर नजर टाळून कसं जाता येईल याकडे माझं लक्ष असायचं..

एकदा तिने मला थांबवलं.. "इतरांचं एक्स्पेक्टेड होतंच..पण माझे सगळे फंडे माहित असताना देखील निदान तुझ्याकडून अशा वागण्याची मला अपेक्षा नव्हती.पण तू सुद्धा..."
"माझं मन मला खात होतं, पण तू म्हणतेस त्या समाजाच्या कक्षा तोडायचे गट्स नाहीयेत गं माझ्यात.. तुझ्यासारखं उच्च अभिरुची असणा-या लोकांत मला वावरायचं नाहीये..मला या सामान्य कुवतीच्या लोकांमध्येच रहायचंय.. तू इथे असताना त्यांना विरोध करून मी राहू शकेनही कदाचित पण पुढे तू इथून गेल्यावर काय?"
"बरोबर आहे.. मी उद्याच निघतेय.."
"तुझा नवीन पत्ता..."
"लिहून घेतोस?"
"अं..नको.. तू इथे पत्र पाठव कधीतरी..." मी माझ्याच नकळत सेफ मार्ग शोधत होतो..एव्हाना वॉचमन पासून लहान मुलांबरोबर असणा-या बायकांपर्यंत सगळ्यांच्याच नजरा मला बोचायला लागल्या होत्या.. ती पुन्हा हसली..मी एक formality म्हणून पत्ता विचारलाय हे तिने ताडलं.. माझ्याबद्दलची कीव तिच्या त्या हास्याच्या लकेरीतून दिसत होती.

ती निघून गेली. अपेक्षेप्रमाणे नंतर तिचं काही पत्र वगैरे आलं नाही. त्यानंतरच्या काही दिवसांत सोसायटीतल्या काहीजणांनी माझ्याकडे पिंका टाकून तिचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. मीही त्यांच्यातलाच असल्याचं भासवलं. भासवलं कशाला? होतोच. मला तरी कुठे काय माहित होतं? आधीच म्हटल्याप्रमाणे काही गोष्टी ती, एनीवेज, विचारल्या तरी नाही सांगायची.आयुष्यातल्या एका अवचित स्त्रीचा अध्याय संपला पण त्यानंतर जाणवलं कि आपल्यालाही असंच जगणं जगायचं होतं; जे स्वैर नसेल पण स्वच्छंद असेल, जे कोणीतरी जुन्या काळात ठरवलेल्या किचकट नियमांनी बांधलेलं नसेल पण स्वतंत्र असेल,जे भविष्याची निष्कारण काळजी करणारं नसेल पण वर्तमानाचा यथेच्छ आनंद लुटणारं असेल.. नाहीतर पुढे जाऊन हेच म्हणावं लागणार आहे की जिवंत तर होतो पण सालं जगायचं राहूनच गेलं!!

सोमवार, ५ डिसेंबर, २०११

गद्धेपंचविशी

पंचविशी!! आतापर्यंत जन्म, बारसं, पहिला वाढदिवस, सोळावं वरीस, टीनेज, चाळीशी, पन्नाशी, साठी, मृत्यू सगळ्या सगळ्यांशी संबधित कच-यासारखं लिखाण झालंय,झालं होतं आणि होत राहील..पण साली पंचविशी हि 'गद्धेपंचविशी' म्हणून ओळखली जाते आणि तमाम लोकांनी तिला जणू वाळीतच टाकलं गेलंय..हो की नाही? शिंगं फुटण्याचं वय हे..यावर काय लिहायचं?आणि कोण वाचणार? असा याच्यामागे विचार असेल बहुतेक! योगायोगाने हल्लीच फेसबुकवर एकाने तेवीस हे वर्ष कसं असतं यावर मत मांडलं होतं,आणखी एका ब्लॉगर मित्राने पंचविशीबद्दल मतं व्यक्त केलीयेत तेव्हा जाणवलं कि हो.. मीही हा विचार कधी काळी केला होता..

कॉलेज संपल्यानंतर याच वयात लागलेल्या नव्या जॉब चे नऊ दिवस ओसरले कि एखादा वीकेंड असा मिळतो कि घरात कोणीच नसतं. आपल्याला झोपून कंटाळा आलेला असतो, टीव्ही कडे पाहवत नाही, पेपर वगळता वाचायला दुसरं काहीच नसतं, मित्रमंडळ कुठलातरी टुकार नाव असलेला (उदाहरणादाखल हल्लीच्या काळात 'टेल मी ओ खुदा'!! ) पिक्चर पाहायला बोलावत असतं पण आपल्याला तर इकडे आंघोळ करायचा सुद्धा वैताग आलेला असतो. कम्प्युटर वरचे सगळ्या भाषांमधले आणि 'सगळ्या पद्धती'चे पिक्चर्स बघून बघून अक्षरशः पाठ झालेले असतात.. (अशी वेळ तुमच्यावर कधीच आलेली नसेल तर तुमच्याइतके लकी तुम्हीच ब्वा!! पुढच्या वीकेंडला पेन ड्राईव्ह घेऊन येतो! ) डॉ. सलील कुलकर्ण्यांच्या भाषेत कंटाळ्याचा देखील कंटाळा आलेला असतो त्यावेळेला विनासायास,विनाखर्च करण्यासारखी जर कोणती गोष्ट असेल तर ती आहे 'विचार'.. हवा तितका वेळ,हवा तिथे,हवा तसा करा! कोण्णाचं काही ऑब्जेक्शन नसतं!

तेविशीपासून पंचविशीपर्यंतचा काळ कसल्या प्रचंड ट्रान्सफॉर्मेशन मध्ये जातो याचा आपल्याला अंदाजच येत नाही..या वयात किती गोष्टी घडतात. कळत नकळत.

शाळेत अभ्यासाचा तिटकारा असणा-या आपल्याला अचानक साक्षात्कार झाल्यासारखा अभ्यास जवळचा वाटू लागतो.. पुढे शिकायची इच्छा असेल किंवा हवी तशी अथवा कसलीच नोकरी न मिळाल्याने असेल, आपल्यातले काहीजण post -graduation चा पर्याय निवडतात आणि तिथे बराच चांगला परफॉरमन्सही दाखवतात. त्या जोरावर चांगल्या नोकरीच्या संध्या चालून येतात वगैरे वगैरे.. शाळेत जर प्रचंड अभ्यास वगैरे केला असाल तर हुशारीच म्हणजे सर्व काही नाही,त्यापलीकडेही जग असतं हे कळायला लागतं. ड्रिंक्स घेणे म्हणजे अट्टल दारूडा असणे असं नव्हे किंवा वीकेंडना मुवीज पाहणे म्हणजे निव्वळ टाईमपास करणे असं नव्हे..असे नवनवीन साक्षात्कार व्हायला लागतात.

नोकरीला असणा-यांना एवढ्यात कळून चुकतं कि कॅम्पस प्लेसमेंट हे केवळ मानचिन्ह आहे. ऑफिसेस लांबून जितकी आकर्षक दिसत असतात, आतून तितकीच क्रूर असतात . आणि खूप काम करायचा तसाच निव्वळ आराम करायचादेखील कधी कधी कंटाळा येतो.. इंटरनेटचं कौतुक नेट कॅफे मध्ये जितकं होतं तितकसं राहत नाही.आपल्या नेटवरच्या ,मेल थ्रू केल्या जाणा-या activities चं इतरांना काय तर आपल्यालाही तितकसं अप्रूप राहत नाही. दर महिन्याला जमा होणारा पगार एवढीच काय ती जमेची बाजू..बाकी सगळा खर्चच!

मैत्री ही केवळ मैत्री नसते - तिला स्वतःच्या काही नियम व अटी असतात. हे आपल्याला कळतं आणि पटतं पण! कॉलेजात असताना अडीनडीच्या वेळी धावून येणारे सगळेच मित्र अथवा मैत्रिणी आता तेवढे क्लोज राहत नाहीत."हर एक फ्रेंड जरुरी होता है" हे वाक्य फक्त ऐकायलाच बरं वाटतं!! काहीजणांना आपण हक्काने कुठेही बोलावू शकत नाही , काहीजणांना हक्काने आपण बोलावू शकतो पण ते येतीलच हे छातीठोकपणे सांगू शकत नाही.. पैसा,पद आणि प्रतिष्ठा हि कितीही नाही म्हटली आणि मनाने कितीही नको म्हटलं तरी मित्र मैत्रिणी आणि नाती ठरवण्याची माध्यमं बनतात! अर्थात आपल्यालाही सगळीच नाती जपणं शक्य होतंच असं नाही.

याच वयात कॉलेजात जुळलेली मनं तुटतात... शेकडो प्रेमभंग होतात... शेकडो वेळा ऐकलेल्या आणि सहस्र वेळा पुटपुटलेल्या 'आय लव्ह यू' या वाक्यामागे भावनादेखील असतात याची जाणीव होते. आपलं कधीकाळचं क्रश आठवलं तरी आपल्याला आपलंच हसू येतं. नुसतं आवडणं,आकर्षण,गोड गोड बोलणं आणि ओढूनताणून केलेलं प्रेम म्हणजे खरं प्रेम नव्हे हेही उमगतं. एकेकाळचं आपल्या जीवापाड आवडीचं माणूस कधी, का आणि कसं 'एक्स' होतं कळतही नाही. ते लग्नाच्या बोहल्यावर चढतं आणि तुम्ही केवळ पहात राहता! तर कधी 'प्रेम' या शब्दाचा अर्थ नव्याने उमगू लागतो. शाळा कॉलेजात न मिळालेली जवळची व्यक्ती ध्यानीमनी नसताना आपल्याला बाहेरच्या जगात मिळते. नोकरी नाही म्हणून सोडून गेलेल्या गर्लफ्रेंड्सपेक्षा किंवा कॉलेज संपल्यावर डच्चू देणा-या बॉयफ्रेंड्सपेक्षा वेगळं कोणीतरी जगात असतं हे सुद्धा आपल्याला समजतं..

या काळातच आपल्याला 'एखाद्याचा हात पकडणं' आणि 'खरोखरीचं प्रेमात पडणं' यातला फरक कळतो.. तर कधी कळतं कि प्रत्येक मिठीचे अर्थही वेगवेगळे असतात.. एखाद्याशी बोलणं प्रत्येकवेळी तोच प्रत्यय देतही नाही.. प्रॉमिस किंवा वचन हि गोष्ट जितक्या फास्ट देता येते तितक्या फास्ट मोडताही येते आणि हेही उमजतं कि काहीवेळा कोणीतरी म्हटलेलं 'बाय' हे कायमस्वरूपी असतं.. पण यातल्या कशालाच आपल्याकडे उपाय नसतो!

आपल्याच कॉलेजच्या नव्हे तर इतर कुठल्याही कॉलेजच्या कॅम्पस मध्ये गेलो तर आपण मोठे झालो आहोत हे आपोआपच कळून येत.. कॉलेज मधल्या मुली आणि मुलं अचानक शाळकरी वाटायला लागतात. सबमिशन च्या फाईल्स घेऊन त्यांची चालणारी लगबग बघितली तर उगाचच हसू फुटतं.त्यांच्या वयात आपण पहात असलेली स्वप्नं ही आपली नव्हती तर आपल्या आईबाबांची होती याची जाणीव होते. पण तोपर्यंत आपण स्वप्न बघणंच विसरून गेलो आहोत हे सत्यही स्वीकारावं लागतं.

मोबाईल मधलं एस एम एस हे एकेकाळी अग्रेसर असणारं संपर्क आणि दळणवळणाचं माध्यम अचानक मागे पडतं. अगदीच एस एम एस करायचा झालाच तर शॉर्टकट करून आपला मेसेज १६० कॅरेक्टर्स मध्ये बसवणारे आपण आता एक्स्ट्रा स्पेस मुळे २ एस एम एस गेले तरी फारशी तमा बाळगत नाही! प्रीपेड सर्विसेसचे या वयातले ग्राहक पोस्टपेडकडे वळतात आणि extra talk-time , फ्री एस एम एस, नवीन नवीन प्लान्स यांची एकमेकात चालणारी चर्चाही खुंटते. एकेकाळी नुसत्या missed call ची भाषा अवगत असणारे आपण बारीकसारीक गोष्टींकरताही फोन कॉल वाया घालवायला मागेपुढे पहात नाही. प्रीपेडचं दीड महिन्याचं असणारं बजेट आता केवळ पोस्टपेडचं मंथली रेंट झालं तरी आपल्याला फारसा फरक पडत नाही.

याच वयात कधी कधी आपल्या आवडीनिवडीही बदलतात. हार्ड मेटल वरून अचानक सुफी संगीत आवडायला लागतं.. कथांपेक्षा कादंब-या जवळच्या वाटायला लागतात. न्यूज मधलं स्वारस्य वाढतं. शेवटच्या पानावरून पेपर वाचायला सुरुवात करणारे आपण आता पहिल्या पानावर नजर फिरवूनच पुढे जातो. राजकारण थोडंफार का होईना लक्ष वेधून घ्यायला लागतं. नेहमीच कोणा ना कोणाबरोबर असण्यापेक्षा कधी कधी स्वतःलाही वेळ द्यावासा वाटायला लागतो. वेगळ्या शब्दात एकटेपणा जवळचा वाटायला लागतो. काहीतरी करावं अशी प्रचंड उर्मी सारखीसारखी दाटून येत राहते. कधीकधी कडू गोड आठवणी मनात गर्दी करतात.आणि तशी गर्दी झाली की हल्ली हल्ली पर्यंत माहीतसुद्धा नसलेली आणि केवळ कोणाकोणाच्या लिखाणातून वाचलेली 'कातरवेळ' म्हणजे संध्याकाळचा नेमका कोणता काळ हे सुद्धा उमगतं!

आपण मोठे झालोत ही जाणीव इतर लोकही आपल्याला करून देतात. 'लहान आहे, त्याला/तिला काय समजतंय/ काय विचारायचं' असं परवापरवा पर्यंत म्हणणारे घरातले आता बारीकसारीक गोष्टी आपल्या कानावर घातल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत... 'चिंता करितो विश्वाची' म्हणजे काय असतं त्याचा आपल्याला प्रत्यय येवू लागतो आणि जबाबदारीची जाणीव होते. घरच्यांसाठी भिन्नलिंगी फ्रेंड्स आता निव्वळ मैत्रीपुरते राहत नाहीत आणि स्थळ म्हणजे 'जागा' आणि कर्तव्य म्हणजे 'काम'  एवढेच माहित असणा-या आपल्या कानावर  हे शब्द निदान त्यांचे निराळे अर्थ तरी माहित असावेत या हेतूने घातले जातात!!

पंचविशी!! आयुष्याचा रौप्यमहोत्सव तो.. तब्बल पंचवीस वर्ष. त्यातली पहिली ५ वगळता आपण कसे घडत गेलो याच्या खुणा आणि ओरखडेसुद्धा आपल्याच मनावर हलकेच उमटलेले असतात. आता आपल्याला कोणी छडी मारून शिक्षा करणार नसतं, कान पिळून वर्गाबाहेर उभं करणार नसतं, 'उलट उत्तर करायची नाहीत' असा दम भरणार नसतं, 'आता तरी सुधार' असा सल्ला देणार नसत. सुधारायचं वय निघून गेलेलं असतं आणि आतापर्यंत आपण जो मुखवटा चेह-यावर चढवलेला असतो तो घेऊन आपल्याला पुढे वाटचाल करायची असते!

कालाय तस्मैः नमः!