मंगळवार, ३ ऑगस्ट, २०१०

मृगजळ भाग- १


"सगळ्यात वाईट तेव्हा वाटतं जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट चांगल्या हेतूने करू पाहता आणि तुमच्या त्या हेतूबद्दलच शंका घेतली जाते.." सोहम विचार करत होता.. "शंभर वेळा माझं म्हणणं पटवून द्यायचा प्रयत्न केला मी, पण माझ्या प्रत्येक वाक्यातून तिने वेगळाच अर्थ काढला.."

सोहमची आणि आकांक्षा ची मैत्री तशी अलीकडचीच.. पण सुरुवातीपासूनच त्यात कुठेतरी पाणी मुरत होतं.
अपघातानेच भेटले ते दोघेजण. अंकिता ही सोहमची ज्युनिअर आणि जानी दोस्त. अंकिताची लहानपणापासूनची बेस्ट फ्रेंड नयना. तिची मोठी बहीण आकांक्षा.. सोहमच्याच वयाची. असं हे सगळ त्रांगड होतं.
"कोण कुठली आकांक्षा? कशी आली आपल्या आयुष्यात? आणि का हे सगळं घडलं?" विचार करून सोहम थकला.. गेल्या काही महिन्यातला चित्रपट सरसर त्याच्या डोळ्यासमोरून सरकू लागला..

"ही माझी बहीण आकांक्षा!" नयना सांगत होती "आणि दीदी, हा सोहम, अंकीचा जे डी.."
"हाय!" -आकांक्षा " हलो " सोहम चा रिप्लाय! एकदम फॉर्मल..
" माहितीये का? आधी "सर" म्हणायचे मी त्याला.. सिनिअर ना?" अंकिता म्हणाली.. सगळेजण हसू लागले
सोहमही त्या हसण्यात सामील झाला.. नजरेच्या कोनातून तो आकांक्षाला न्याहाळत होता. नीट नेटकी राहणी.. प्रॉपर मेक-अप वगैरे... स्कर्ट कि असलंच काहीतरी घातलं होतं तिनं.. गो-या रंगामुळे त्या आउट-फिट्स चीच शोभा वाढली होती खरंतर..
"तू काय करतोस?" आकांक्षा च्या प्रश्नानं तो भानावर आला.. " अं .. मी तसं काहीच नाही करत.. संध्याकाळी फिरतो वगैरे.. रात्री जेवण, मग पीसीवर एखादा पिक्चर, झोपतो मस्त दहा-एक तास आणि मग सकाळी सगळे जण बिझी असतात त्यामुळे मीसुद्धा वेळ घालवायला जातो नोकरीवर! पण तिथेही काही नाही करत! " पुन्हा सगळेजण हसू लागले.. सोहमला स्वत:चीच कीव आली.. याच टाईपच्या जोक्सवर आधी अंकिता मग नयना आणि आता आकांक्षा किती जणांकडून हुकमी हशे वसूल करणार??
" ए टाटा मोटर्स मध्ये इंजीनिअर आहे गं तो.. सगळ्यांना असंच काहीतरी सांगतो.." पुन्हा एकदा हशा..
"आणि तू?" सोहमने विचारलं.. "नयना म्हणत होती कि तू डॉक्टर वगैरे आहेस म्हणून.. "
"डॉक्टर ‘वगैरे’ नाही.. डॉक्टरच आहे मी.. बीडीएस केलंय मी. बघू तुझे दात?" सोहम ने आपसूक "ई..ss " केलं! " यु कॅन बी माय पेशंट! " आकांक्षा म्हणाली.. पुन्हा एकदा हास्यसागर उसळला..
" मुंबईला होती अरे ही इतके दिवस.. घरी जायच्या आधी इथे हॉल्ट घेतलाय २ दिवस. परवा जाणारे परत"
"हो का.. अच्छा अच्छा.. तू बोलली होतीस मागे एकदा"
" हो.. ए चल.. आम्हाला जायचंय.. माझं पिल्लू वाट बघत असेल.." नयना म्हणाली..
"माझा पण "हाय" सांग ग प्रणीलला"
"बाय" " बाय बाय" "पुन्हा भेटू" वगैरे शब्दांची देवाण घेवाण झाल्यावर दोघी जणी स्कूटी वरून निघून गेल्या..
" हा प्रणील नयनाचा बॉय फ्रेंड आहे की तिचं बाळ आहे तेच कळत नाही कधी कधी! " सोहम म्हणाला..
"गप रे.. ते प्रेम आहे.. तुझा आणि त्या गोष्टीचा दूर -दूर पर्यंत संबंध नाहीये!"
"तसं नव्हे गं.. पण प्रणीलला सुद्धा नाही आवडत त्याला पिल्लू-बिल्लू म्हटलेलं.. मला बोलला पण तो! आणि जेव्हा मी तिला एकटा भेटलोय तेव्हा तिला हे सांगितलंय पण.. की त्याला असलं काहीतरी म्हणत नको जाऊ चार-चौघात.. बर नाही वाटत ऐकायला..." अंकिताची डीओ वळवून त्याने तिला नजरेनेच बसायला सांगितलं.
"जाऊ दे रे.. आकांक्षा कशी वाटली?"
"बरी आहे..पण तिला वाटल असणार की काय अटीट्यूड आहे या पोराकडे उगीच.. मी भाव नाही दिला ना जास्त.."
"चल रे.. तुझ्या भाव देण्या न देण्याला विचारतंय कोण? मी सोडून?" अंकिता म्हणाली.. " हे असलं नाटक असतं न तुझं म्हणून मी म्हटलेलं मागे.. वी कॅन जस्ट बी फ्रेंड्स नॉट पार्टनर्स! "
" हो हो माहितीये.. आणि मी सोडून तुला कोण विचारतं?"
"ए हलो!! किती तरी प्रपोजल्स ठोकरली आहेत मी ठीके??"
"जाऊ दे गं, किती चिडशील?" सोहमने विषय थांबवायला म्हटलं.. थ्रोटल दिल्यावर गाडी सुसाट निघाली "दुर्गा"कडे...

दुस-या दिवशी रविवार होता. नयनाचा फोन आला. "सोहम,केळकर म्युझिअम ला चाललो आहोत मी आणि दीदी.. येणारेस?'
सोहम चा दुपारपर्यंत काहीच प्लान नव्हता.दुपारी एका पार्टीला जायचं होतं "येतो, पण दुपारी मला जेवायला जायचं आहे. अंकीला बोलावलं आहेस का?"
"का, तुला करमत नाही तुझ्या "अंकी"शिवाय?" सोहमला फोन मधून दोघींच्या खुद्खुदण्याचा स्पष्ट आवाज आला.
"माझी-बिझी चा प्रश्न नाहीये.. तुझीच मैत्रीण आहे ती.. म्हणून विचारलं."
"हो रे.. आम्हाला सुद्धा वेळ नाही मिळाला बोलायला हल्ली. ती पण येतेय.."
"बरं.."
सगळं आवरून पोचायला त्याला हार्डली ३५ मिनिट्स लागली.. म्हणजे आवरायला २८ आणि पोचायला ७! सदाशिव पेठ ते बाजीराव रोड ३ आणि चुकीचं बोळ, शोधाशोध,राँग साइड इत्यादीला पुढची ४! पल्सर २२० सीसी म्हणजे अफलातून मशीन आहे..झूम आणि तुम्ही इथून तिथे!
पुण्यात ८ पूर्ण वर्ष आणि काही महिने काढून पठ्ठ्याला "केळकर म्युझिअम" कुठे आहे ते माहित नव्हतं म्हणजे आत जायचे २० रुपये वगैरे लागतात हे माहित असण्याचा तर प्रश्नच उद्भवत नव्हता.. रविवारच्या सकाळी ५०० रुपयांचे सुट्टे शोधणे ते देखील पुण्यात हे "एमटीव्ही रोडीज" मधलं टास्क असू शकतं! आणि असलं टास्क करण्याचा सोहम चा मुळातच स्वभाव नव्हता.. त्यानं सरळ अंकिताला फोन लावला.
"कुठेयस?"
"केळकर म्युझिअम"
"पोचलीस पण?"
"हो.. तू बोल पटकन. इथला सिक्युरीटी गार्ड बघतोय माझ्याकडे. फोनला कॅमेरा आहे त्यामुळे" अंकिता कुजबुजली.
"खाली ये. माझ्याकडे पैसे नाहीयेत सुट्टे. २० रुपये आण"
अंकिताकडून तिकीट काउंटरपासून होणारा पाणउतारा ऐकून घेत सोहम वर गेला.. "आकांक्षा पण आलीये?"
"तू तिच्यासाठी आलास? मला वाटलं माझ्यासाठी.."
"मी प्रश्न काय विचारला,उत्तर काय देतेस?तू वायवा मध्ये नापास व्हायचीस का ग नेहमी? म्हणजे अशी उत्तरं एक्स्टर्नल ला दिली असशील तर तो फेल करणारच!"
"गप, पाचकळ जोक पुरे.. आलीये ती"
ही त्याची आणि तिची दुसरी भेट!
त्याने हातखंडा विषय "पी जे" यामध्ये डॉक्टरेट मिळवली असल्याने त्याला सगळ्यांना हसवण फारसं कठीण गेल नाही.. विशेषतः आकांक्षाला! ती पहिल्यांदाच असं ऐकत असल्याने तर त्याचे बाष्कळ जोक्स ऐकूनही तिची हसता हसता मुरकुंडी वळत होती..
अंकिता आणि नयना मात्र सरावलेल्या असल्याने त्यांनी त्यांच्या "गर्ल्स talks" सुरु केल्या.. आकांक्षा आणि सोहम ची ब-यापैकी गट्टी जमली. दुपारपर्यंतचा वेळ चटकन निघून गेला.. "तू येणारेस का आमच्याबरोबर जेवायला?" आकांक्षाने डायरेक्ट इन्व्हाईट केल्यावर सोहम जरासा गडबडला.. "अग माझा आधीच प्लान आहे.."
"गर्लफ्रेंड हं.. "
"नाही नाही.. ऑफिसचे कलीग्ज आहेत. ईव्हन यू कॅन जॉईन अस..."
"नको.. thanks फॉर द इन्व्हिटेशन"

हॉटेल बांबू मध्ये ए सी मध्ये बसल्यावर पेग्ज चा काउंट राहत नाही हे सोहमला माहित होतं..
"ए मला बास हं.."
"क्यूं सोहम, आज ३ पेगमेही आउट?" मिनूनं उगाच पिंक टाकली.
"ए मिनू, तेरेको पता है.. आर एस.. ४ इनटू ६०! स्टील रॉक स्टेडी.. पण आज मला जायचंय.."
"ओहो.. गर्ल फ्रेंड नंबर..?"
"मिनू अभी चूप भी रहेगी.. तेरेको कितनी बार बोला है.. वाईन ही तेरे लिये ठीक है.. ये वोडका के चक्कर में मत पडा कर! "
ऑफिसचं पब्लिक यावर जाम खुश झालं. मिनुचा चेहरा पडला..

अपेक्षेप्रमाणे अंकिता चा फोन आला.
"कुठे आहेस रे? आम्ही सगळे जापनीज गार्डन मध्ये आहोत"
"आय एम ड्रंक.. येऊ का असाच?"
"ओ के वाटत असेल तर ये.. "
"येतो"

वाटेतच त्याला एक फोन आला.. अननोन नंबर..
"येस?"
"सोहम ना?" गोड आवाज आला.
"हो. कोण?"
"मी आकांक्षा बोलतीये.. कुठे पोचलास तू?"
सोहम स्वतःला सावरत म्हणाला " मी येतोय १० मिनिटात,तुम्ही कुठे जाणार आहात का?"
"नाही, ये तू.. मी तुझीच वाट बघतीये.."
"अं?"
"आम्ही तुझीच वाट बघतोय म्हटलं..."
"हा तुझा नंबर आहे?"
"हो, नयना कडून घेतला तुझा नंबर.. काही प्रॉब्लेम आहे का?"
"नाही,त्यात प्रॉब्लेम कसला? पोचतोच मी"
सोहम अविश्वासाने फोनकडे पहात राहिला..
एक दिवसाची ओळख ती काय आणि हे असलं बोलणं? जाऊ दे फारच frank आहे ती.. कि आपल्यालाच असं ऐकू आलं? ३ पेगच तर झालेत.. एवढ्यात आपले कान वाजण शक्यच नाही.. जाऊ दे.. पोचल्यावर बघू तिथं.

गार्डन मध्ये पोरी पाण्यात पाय सोडून बसल्या होत्या.. सोहम येताच लांबूनच अंकिताने त्याला "ये ये" अस खुणावलं. " मी पिऊन आलोय अस जाणवत नाहीये ना?"
"तुला अस नेहमी का वाटत रे कि तमाम पब्लिकला तुला निरखून बघण्याशिवाय काहीच उद्योग नाहीये? "
"ए.. हा माझा डायलॉग आहे.. स्पेशली तुझ्यासाठी राखीव.."
"म्हणूनच मारला.. काही वाटत नैये..चल तू.. "
पाण्यात खिदळून झाल्यावर जवळच्याच बाकांवर चौघेही जण बसले.. नयना आणि आकांक्षा एकत्र बसल्या , अंकिता सोहमच्या शेजारी बसली..
" मला वाटल प्रणीलही आला असेल"
"तो करणारेय जॉईन.. तू हे आकांक्षा चे फोटो बघ. ऑसम आहेत."
"ती काय मॉडेलिंग वगैरे करते की काय?" अल्बम मधले फोटो बघत सोहमने विचारलं..
"आहे मला आवड.. मला अभिनय सुद्धा करायला आवडतो.." आकांक्षा तिथे येत म्हणाली..
"वा!.. सहीये! प्रॉपर पोर्टफ़ोलिओ बनवला आहेस तर!"
"या, इट्स अ पार्ट ऑफ इट! अंकी तुझी हरकत नसेल तर याला जरा घेऊन जाऊ का चालायला?" सोहम च्या हाताला धरून त्याला जवळ जवळ उठवतच तिने अंकिता ला विचारलं.
"ऑफ-कोर्स, मला काय विचारतेस?"
"चल रे... इथेच राउंड मारून येऊ.."

मग झालेल्या गप्पा, तिच्या आवडीनिवडी, छंद, ambitions, वेगवेगळ्या विषयांमधलं नॉलेज, त्याने कॉलेज मध्ये असताना नाटकातून काम केलंय हे समजताच तिच्या चेह-यावरचे बदललेले हावभाव,
तिने "कुठे ओळख असली तर दे" असं सांगून त्याच्या मोबाईलवर ट्रान्स्फर केलेले फोटो.. त्याचे काढलेले फोटो.. सोहमला सगळं सगळं आठवायला लागलं..

..तिने सांगितलेलं तिचं अफेअर.. कोणी सिंधी की मारवाडी होता.. हिने मनापासून प्रेम केलं त्याच्यावर. तोसुद्धा लग्नाला तयार होता पण त्याची अट होती की हिने लग्नानंतर घराबाहेर पडायचं नाही वगैरे.. मग हिने ते “जमणार नाही” सांगून त्याच मन वळवायचा केलेला प्रयत्न.. पण त्याच्या घरच्यांचा हिच्या या अटीला असणारा विरोध.. मग त्याने घरच्यांच्या इच्छेनुसार केलेलं लग्न.. मग हिची प्रचंड रडारड वगैरे वगैरे!!
ह्या असल्या छप्पन्न कहाण्या निरनिराळ्या व्यक्तींकडून ऐकल्या होत्या सोहमने.. आणि त्यांना कौन्सिलिंग सुद्धा केलं होतं.. त्यात आणखी एका कथेची भर इतकंच! भावनाशून्य असण्याचा हा एक फायदा असतो... दुस-यांच्या दु: खात गुंतून न पडता तटस्थपणे मार्गदर्शन करता येतं!
त्याच रात्री का? हो त्याच रात्री..
सिंहगड रोड च्या "सवाई" मध्ये जेवणं झाल्यावर प्रणीलने नयनाला तिच्या हॉस्टेल वर सोडलं आणि सोहमनं अंकिताला घरी सोडलं.. आकांक्षाला कोणीतरी न्यायला आला होता. यामाहा आर १५ घेऊन.. त्यांचा काहीतरी प्लान असावा. सोहम गाडीकडेच पहात बसला होता.. नंतर काहीतरी बिनसलं वाटतं त्या दोघांत आणि ती तशीच कुठेतरी उतरली..

रात्री ११.३० वाजता तिचा फोन
"सोहम, मी बोलतीये.."
सोहम तीन ताड उडाला.. "इतक्या उशिरा?"
"ऐक ना.. तसं काम पडलं म्हणून केला फोन.. मला न्यायला येशील?"

क्रमश:

भाग २

सोमवार, २६ जुलै, २०१०

मुंबई-पुणे-मुंबई... सिनेमास्कोप



मुंबई-पुणे-मुंबई पाहिला.. कालच! पण पहिल्यांदा नाही तर तिस-यांदा.. एकदा "इ-स्क्वेअर" मग "मंगला" आणि नंतर या दोन ठिकाणी पैसे उधळल्यामुळे आलेल्या गरिबीमुळे शेवटी "प्रभात".. आता हा लेख काही त्या पिक्चरचं परीक्षण वगैरे नाही.. पण निरीक्षण जरूर आहे.

मुंबईवरून "मुलगा बघण्या" च्या कार्यक्रमासाठी आलेली 'ती' आणि पुण्यात तिला भेटलेला 'तो'.. यांच्यातला संवाद म्हणजे हा अख्खा मुव्ही! पिक्चर मध्ये विशेष असं काही नाहीये. म्हणजे मारामारी, रोमान्स, सुंदर लोकेशन्स.... (अर्थात पुणे हे ब्याकग्राउंड निवडल्यावर "सुंदर लोकेशन" ला एक मर्यादा येणं स्वाभाविक आहे...) असं काही काही म्हणून नाहीये तरीपण काहीतरी 'खास' आहे खरं.. मनाला भावतो एकदम हा सिनेमा. मुळात भारतीय पिक्चरची गरज असणारी हिरो आणि हिरॉईन यांची सुंदर सुंदर नावं, छान छान आणि वेळोवेळी वाजणारी गाणी आणि कुटुंब कलह , वाद विवाद , व्हिलन, आदळआपट, दंगा आणि तत्सम इतर काही मसाला नसताना सुद्धा हा चित्रपट एक घट्ट पकड घेऊन ठेवतो. "ते कशामुळे?" हे शोधण्याचा मात्र हा प्रयत्न नाही.. कारण मला ते कोडं तसंच राहू देण्यात जास्त मजा वाटतेय.

मुंबईकर "ति"ला पुण्यात आल्यानंतर योगायोगाने "तो" भेटतो आणि नंतर काही "टीपीकल पुणेरी" अनुभव येतात.. ते ती त्याच्याशी शेअर करते.. त्यामुळे त्याचा पुणेरी स्वाभिमान डिवचला जातो आणि तोही तिला उलट उत्तर देतो.. एकमेकांचा पिच्छा सोडवता सोडवता परिस्थिती त्यांना एकत्र थांबायला भाग पाडते. त्याचा पुण्याविषयीचा अभिमान मोडून काढण्यासाठी ती प्रतिवाद करत जाते आणि तो तिच्यावर पर्यायाने मुंबईकरांवर कुरघोडी करायचा प्रयत्न करतो.. आयुष्यात ही व्यक्ती पुन्हा भेटण्याची सुतराम शक्यता वाटत नसल्यानेच कि काय ती त्याला आपली कथाही ऐकवते आणि मग तोही तिला आपल्या जुन्या प्रेमाबद्दल सांगून स्वतःचं मन मोकळं करून घेतो.

पुण्याचा अवास्तव अभिमान बाळगणारा तो आणि त्याला वठणीवर आणणारी ती;जुन्या पद्धतीच्या लग्नसंस्थेवर ताशेरे ओढणारी ती आणि तिला "नात्यांची मजा ती उलगडण्यात असते" असं सांगून समजावणारा तो; सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक रंगत कायम ठेवतात.. जाणूनबुजून एकात एक गुंफत नेलेले प्रसंग आणि अलगद सोडवत नेलेली ती गुंतागुंत कुठेच कृत्रिम वाटत नाही. विशिष्ट वयोगट डोळ्यासमोर ठेवून जरी हा चित्रपट बनवला नसला तरी लग्न न झालेल्या, नुकतंच बेडीत अडकलेल्या आणि लग्नाच्या बंधनात मुरून मुरून पार लोणचं झालेल्या प्रौढ वर्गाला देखील तो तितकाच आवडेल असं मला वाटतं. अर्थात चित्रपटात एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे "हे माझं मत आहे , निर्णय नाही.."

सारसबागेतल्या एका प्रसंगात त्याने तिला भेळ देऊन त्यावर "कशी वाटली आमची भेळ?" अशी प्रतिक्रिया विचारल्यावर "ठीक आहे" अशी शांत प्रतिक्रिया ती देते. त्यावर खवळून तो तिला ही भेळ त्रिभुवनात कशी आदर्श आहे वगैरे गोष्टी सांगू पाहतो, तेव्हा ती त्याला म्हणते की " भेळ, चणे हे समुद्रावर जाऊन खायचे पदार्थ आहेत !! पुण्यात अरसिकता आहे हे बरोबर आहे कारण तिथे समुद्र नाहीये ना.. “ आपली विकेट डाऊन झाल्याच त्याला कळतं पण हेका सोडेल तर तो पुणेकर कसला?? तो लगेच तिला विचारतो.. "तुमच्याकडे सगळं असेल पण तुळशीबाग आहे का?" या वाक्यावर पुण्यातल्या प्रेक्षागृहात दाद न मिळती तरच नवल!!

पुण्यातल्या मुलींचा "हिरवळ" वगैरे असा उल्लेख, तिने त्याला थेट "आर यू अ वर्जिन?" असं विचारल्यावर त्याचा गोरामोरा झालेला चेहरा अशा टाईपची थोडी वाक्यं असली तरी ती त्या त्या ठिकाणी चपखल आहेत.. कुठेही बघणा-याला ऑकवर्ड वाटत नाही. एकमेव असणार गाणं देखील त्याने केलेली कविता म्हणून ऐकवलं गेलंय.. त्यामुळे ते संपूच नये असं वाटत राहतं.. स्वप्नील जोशीने उभा केलेला नायक; नसणा-या "six pack abs" मुळे "खात्या-पित्या घरचा वाटतो.. आणि ब-याच जणांना तो आपल्यातला ही वाटतो! ( साहजिकच आहे ना! त्याच्या पोटाचा शर्टवरून दिसणारा आकार सेम आपल्यातल्या ब-याचजणांसारखा दिसतो हो! खरंच!! अगदी देवा शप्पथ!! )आणि मुक्ता बर्वे.. सुरुवातीपासून शेवटपर्यंत अतिशय गोड आणि लाघवी, पुरोगामी पण मराठमोळी "ती" उभी करण्यात ती कुठेच अवघडली नाहीये..

दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, गायक या गोष्टींकडे सहसा सामान्य प्रेक्षकाचं लक्ष जात नाही. पण या सिनेमा मध्ये ठिकठिकाणी हे लोक "वा! " म्हणायला भाग पाडतात. पुण्यातली कपल्ससाठी ('कु')प्रसिद्ध spots वापरल्यामुळे एकप्रकारची जवळीक वाटते.. पण प्रेक्षक "अरे हा जे एम रोड, हा एफ सी, हे तर वाडेश्वर.. पेठेत आली रे कुठच्यातरी.." असा खेळ खेळतात तेव्हा थोडा वैताग येतो.. अरे, काय ठिकाणं ओळखली म्हणून पिक्चरचे पैसे परत मिळणार आहेत का? मग? जाऊ दे.. विषयांतर झालं!

सिंहगडावर एकदा त्याने तिच्या जुन्या जखमेवरची खपली काढल्यामुळे (हा शब्दप्रयोग लाक्षणिक अर्थाने घ्यावा.) ती दुखावली जाते आणि रडायला लागते ते पाहून त्याची उडणारी त्रेधातिरपीट पाहण्यासारखी आहे.. त्याचवेळी तिथून जाणारा वाटसरू त्या दोघांकडे पाहत जातो आणि पुढे जाऊन मागे वळून पाहतो तेव्हा स्वप्नील जोशी आपण त्या गावचे नाहीतच असं दाखवण्याकरिता मुद्दाम दुस-या बाजूला चालत जातो.. या आणि अशा प्रसंगातून सहजता राखली गेलीय.. मुव्ही मधल्या ब-याचश्या गोष्टी या आपल्या जीवनात घडणा-या असल्यामुळे काही ठिकाणी आपण स्वतःच्या नकळत स्वतःला ठेवू पाहतो..

साहजिकच शुटींग एका दिवसात झालं नसणार.. पण पूर्ण दिवसभराचा वेळ इतक्या व्यवस्थित आणि अशा प्रकारे चित्रित केला आहे कि शंका घ्यायला वावच उरत नाही..वेगवेगळी ठिकाणं फिरून एकमेकांची मनोरंजक बौद्धिकं घेऊन झाल्यावर मुंबई-पुणे-मुंबई गाडी जेव्हा शेवटच्या वळणावर येते तेव्हा आपल्या मनात एक हुरहूर दाटून येते.. या जोडीचा सहवास आता संपणार... सुखद शेवट अपेक्षितच होता आणि तो तसाच झालाय यात वाद नाही पण तिथपर्यंत येण्यासाठीसुद्धा शेवटच्या ५ - १० मिनिटांमध्ये जी वळणावळणाची वाट निवडली आहे तीसुद्धा अप्रतिमच.. बाहेर पडताना आपण काही विशेष घेऊन निघत नाही पण एक मस्त मूड घेऊन निघतो एवढं मात्र खरं!

सोमवार, २१ जून, २०१०

पाऊस.. सोहळा झाला...




या वीकएंड ला कोल्हापूरला जाऊन आलो.. एका जवळच्या मित्राचं लग्न होतं.. पहिल्यांदा ग्रुपने जायचा प्लान होता.. पण नेहमीप्रमाणे तो शेवटच्या क्षणी फिसकटला! मग काय? सुख के सब साथी दुख में सिर्फ ST ! त्यामुळे निघालो ST नेच.. ब-याच दिवसांनी असा दिवसा उजेडी लांबचा प्रवास करायचा योग आला.. नाहीतर शक्यतो रात्रीच निघतो कुठे जायचं असलं तर.. मला तशी बसल्या बसल्या झोपही लागते आणि सकाळी उठल्यावर इच्छित स्थळी पोहोचलेलो असतो त्यामुळे प्रवासाचा शीण जाणवत नाही.. ६.३० च्या ST ने साधारण १०-१५ मिनिटात पुणे सोडलं आणि घाटात पोहोचलो.. हल्ली ST च्या सीट्स पद्धतशीर असतात पूर्वीच्या तुलनेत आणि मला सुदैवाने एकदम पुढची सीट मिळाली होती त्यामुळे समोरच्या रस्त्याचा पूर्ण व्ह्यू दिसत होता आणि विंडो सीट आणि दरवाज्याच्या काचेतून बाहेरचं दृश्यही दिसत होतं.. घाटात ST ने नेहमीच्या सवयीने आरडाओरडा करायला सुरुवात केली.. मीपण त्यावर उपाय म्हणून इअरफोन्स चढवले आणि मस्त मराठी गाण्यांची प्लेलिस्ट चालू केली.. पहाटे उठल्यामुळे डोळ्यांवर झोप आली होती..कानात छान म्युझिक आणि समोरचा रस्ता बघितल्यानंतर झोप कुठच्या कुठे पळून गेली.. अर्ध्या पाउण तासात गाडी हायवे ला आली.. नुकताच पाऊस पडून गेला होता आणि तो कॉंक्रीट चा नेहमी राखाडी दिसणार रस्ता काळाभोर दिसत होता.. पुस्तकात असल्या टाईपचं वर्णन करायचं असतं तर हमखास "नुकत्याच न्हालेल्या स्त्रीसारखं " वगैरे वगैरे टाकता आलं असतं असा एक विचारही मनाला चाटून गेला!

मग मला जाणवलं कि मी खरंच हा रस्ता अशा पद्धतीने पाहिला नाहीये.. जरी पाहिला असेल तर तो कोणत्यातरी (आणि अर्थात कोणाच्यातरी!) कार मधून पाहिलाय.. त्यामुळे ज्या टाईपचा व्ह्यू मला आता दिसत होता तसा याआधी कधी दिसला नव्हता.. एकतर कार जमिनीलगत असल्याने 'रस्ता' असा दिसत नाही.. समोर एक पट्टा दिसत असतो.. जसं जसं पुढे सरकतो तसा तसा त्या पट्ट्याचा पुढचा भाग दिसत जातो.. आपण आपली त्यावर गाडी चालवायची! पण ST मधून याच पट्ट्याचा लांबपर्यंतचा व्ह्यू दिसत होता.. एकदम एक नंबर! हे सालं सुवर्ण चतुश्कोनाचं काम मात्र भारी झालंय.. रुंद सलग रस्ता, डिव्हायडरवर झाडं- बीडं.. रस्त्याच्या मधोमध ते पांढरे पट्टे, वळण्यासाठीच्या खुणा, रस्त्याच्या साईड ला ते रिफ्लेक्टर्स,हिरवे दिशादर्शक बोर्ड्स.. गावांवरून बांधलेले फ्लायओवर्स.. तिथे रस्त्याच्या कडेला बांधलेलं रेलिंग वगैरे.. छानच झालंय सगळं! आणि आता पावसात धुऊन निघाल्यामुळे सगळंच स्वच्छ स्वच्छ वाटत होतं. गाडीचा आवाज (माझ्या कानांपर्यंत) येत नसल्यामुळे गाडी संथ लयीत जात आहे अस वाटत होतं.. कानात मिलिंद इंगळेचा घासून गुळगुळीत झालेला 'गारवा' जाणवत होता..! मधूनच संदीप खरे,सलील कुलकर्णी वगैरे मंडळी आपली अदाकारी पेश करत होती.. त्याचं आटपलं की पुन्हा सौमित्र 'पाऊस म्हणजे हे आणि पाऊस म्हणजे ते...' वगैरे सांगत होता. थोडक्यात चहाचा कप सोडून सगळ्या गोष्टी जुळून येत होत्या..

सातारा आणि कराड सोडलं तेव्हा ९.३०-१० वगैरे वाजले होते तरीपण एक आल्हाददायक वातावरण तयार झाल होतं. मी स्वतः करत काहीच नव्हतो पण राहून राहून उगीचच प्रसन्न वाटत होतं.. प्रत्येकजण आपल्या धुंदीत आहे अस वाटत होतं.. ११ वाजता कोल्हापुरात पोहचलो तेव्हा मळभ दाटून आला होता मात्र पाऊस पडला नव्हता.. ४:३० तासात जवळपास २५० किलोमीटरचं अंतर कापलं होत बसने.. कमाल आहे. हे अंतर कापायला १० वर्षापूर्वी ८ तास लागायचे.. काही मिनिट्स जास्तच पण कमी नाही.. आणि प्रवासाचा कंटाळा येण्याचा तर प्रश्नच नव्हता. सगळ आठवून मग मगाशी अर्धवट राहिलेलं चित्र माझ्या परीने पूर्ण करण्यासाठी मी 'स्थानका'समोरच्या कुठल्याश्या हॉटेल मध्ये वडासांबार आणि चहा घेतला.. मग लग्न कार्यालयात पोचलो.. रिक्षावाल्याने वैश्विक नियमानुसार अख्ख्या गावाला (इथे शहराला) प्रदक्षिणा घालून मला इच्छित स्थळी पोचवलं आणि दीडपट भाडंही घेतलं.. पण मला मूड खराब करायचा नव्हता (खरंतर तिथल्या धट्ट्याकट्ट्या रिक्षावाल्यांशी भांडायला गट्स हवेत ना? )..

लग्नसमारंभ झोकात पार पडला.. मी मस्त कुर्ता वगैरे घालून मिरवलं.. जुने मित्र वगैरे वगळता फारसं कोणी ओळखत नव्हतंच.. त्यामुळे उगीच इकडे तिकडे सूचक फिरत राहिलो.. काही 'प्रेक्षणीय' दिसतंय का पाहत.. पण भ्रमनिरास झाला.. आजकाल सुंदर मुली एकच लग्नसमारंभ अटेंड करतात असं दिसतं! त्यांचं स्वतःचंच!! त्यामुळे थोडी निराशा झाली.. थोडक्यात एवढा पेहराव फुकट गेला.. जेवणाच्या पंगती आटोपल्यावर ओळखीच्या लोकांसोबत गप्पा टप्पा झाल्या. सगळ्यांचे अर्थात परत पुण्यात यायचे प्लान्स चालू होते. आहेरच्या formalities झाल्यावर परतीच्या रस्त्याला लागलो. आलोच आहे तर जाता जाता अम्बाबाईलापण भेटून येऊ म्हणत तिथे एक pit -stop घेतला. मुख-दर्शन घेतलं. हे देखील बरं झालं.. नाहीतर आपण शिस्तीत लाईन मध्ये उभं राहून कसंबसं गाभा-यात पोचणार आणि तिथला हवालदार (की जो कोणी असतो तो) आपण भोज्ज्या केला हे समजताच पिटाळून लावणार.. त्यापेक्षा हे कितीतरी बरं! कितीही वेळ उभं राहा.. मागून छळायला कोणी नाही..! त्यामुळे जरा अजूनच बर वाटलं.. मनात म्हटलं लग्न वगळता ही ट्रीप बरीच सत्कारणी लागली..!!

परत आलो तर कोल्हापूरच्या बस स्थानकावर अलोट जनसमुदाय ! सगळी जनता पुण्याला जाणा-या गाड्यांच्या प्रतीक्षेत.. येताना ठरवलं होत की जाताना मस्त वोल्वोने जाऊ पण कसलं काय आणि फाटक्यात पाय म्हणतात न तसं झालं.. त्याचं बुकिंग सकाळीच झालं होतं आणि पुणे गाडी आली की एकतर आधीच रिझर्व्ड नाहीतर पब्लिक मस्त मुसंड्या मारून जागा अडवत होतं.. एकंदरीत निभाव लागणं मुश्कील दिसू लागलं. कोल्हापूर पुण्यापासून ४.३० तासाच्या अंतरावर आल्यामुळे वीकेंडला येणारं पब्लिक वाढलं असावं! शुक्रवारी ऑफिस सुटलं की रात्री १०:३० वाजता जेवायला कोल्हापुरातल्या घरी हजर! विशेषत: मुलींची संख्या जास्त वाढल्यामुळे वोल्वो वगैरे सारख्या सोफिस्टीकेटेड गाड्यांचं बुकिंग आधीच फुल होत असावं! म्हटलं, 'सारं काही सुरळीत घडत असताना काहीतरी खूप मोठ्ठ विपरीत घडायची तयारी चालू असते..' हा मर्फीचा नियम आता आपल्याला लागू होतो की काय? तेवढ्यात अंबाबाई पावली! एक जादा बस धावून आली.. धावून म्हणजे शब्दश: बस आमच्यावर धावून आली आणि नंतर आम्ही सगळे बसवर धावून गेलो.. आत घुसलो तर पूर्ण बस रिकामी! मागून गर्दीचा लोट येत होता.. रिस्क नको म्हणून मी शेवटून दुसरी सीट पटकावली.. विंडो-सीट.. डाव्या बाजूने उन्हं येत होती आणि मी उजवीकडे! (मला कसल्यापण गोष्टीचं कौतुक वाटतं आजकाल!) पुन्हा कोल्हापुरातून बाहेर येईपर्यंतचा त्रास वगळता सुखद प्रवास सुरु झाला.. मी डोळे मिटून सकाळचं दृश्य आठवत होतो.. साथीला इअरफोन आणि मोबाईल होताच! अर्ध्या एक तासात मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा ५.३०-६.०० लाच पावसाने काळोख केला होता आणि लांबवरच्या डोंगरांमध्ये कोसळणारा पाऊस दिसतही होता.. मात्र आमचा रस्ता कोरडा! कानात साधना सरगम "ढग दाटुनी येतात.." असं आळवत होती.. याला योगायोग म्हणायचं की आणखी काही? थोड्याच वेळात पावसाची रिपरिप चालू झाली... एका मोठ्या सरीतून बस पास झाली.. आणि वाटून गेलं खरंच आता तो वाफाळता चहा घेऊन कुठेतरी घुटके घेत बसलो असतो तर किती मजा आली असती!! पण अंबाबाईच्या दर्शनाने कमावलेलं पुण्य खर्च होत होतं बहुधा! कारण आमची बस एका 'अतीत' नावाच्या ठिकाणी थांबली! थोड्याच वेळात... वरून मध्ये मध्ये पावसाचे थेंब पडत होते आणि मी तसाच उभं राहून चहाचा आस्वाद घेत होतो! सकाळ पासून मनात रंगवलेलं चित्र फायनली पूर्ण झालं!

रात्री दहा-एक वाजता घरी पोहोचलो तेव्हा ५०० किलोमीटर वगैरे पार करून आल्यासारखं अजिबात वाटलं नाही उलट मनातून जरा जास्तच फ्रेश झाल्यासारखा वाटत होतं! आणि मी गुणगुणत होतो.. "पाऊस.. सोहळा झाला... कोसळत्या आठवणींचा.. कधी उधाणता तर केव्हा थेंबांच्या संथ लयींचा... "

सोमवार, ५ एप्रिल, २०१०

विखुरलेल्या आठवणी..



रात्रीचे ११:३०.. मी पीएमटीतून शिवाजीनगरला उतरलो आणि चालायला लागलो.. "साहेब नाशिक का? औरंगाबाद डायरेक्ट गाडी आहे.. चला कुठे परभणी का ? शनी शिंगणापूर...शनी शिंगणापूर..." मी "नाही नाही" म्हणत रस्ता काटत होतो.. अगदीच एखादा "कुठे जायचं ते तरी सांगा.. व्यवस्था करतो.." असा मागे लागला तर "मी इथलाच आहे, घरी चाललोय " अशा बिनधास्त थापा ठोकत मी निघालो होतो.. मनात विचारचक्र सुरु झालं.. अगदीच नाही तर या नरकयातनांतून सुटका होणार तर.. आज माझा शेवटचा पुणे-नाशिक प्रवास! शेवटचा म्हणजे जबरदस्तीने आणि माझ्या इच्छेविरुद्ध करावा लागणारा शेवटचा पुणे-नाशिक प्रवास..

आठ महिन्यांपूर्वी एका शुक्रवारच्या प्रसन्न संध्याकाळी साहेबाने विचारलं नाशिकला जायला तयार आहेस का? मी विचारलं “किती ड्युरेशनसाठी ?” “जास्तीत जास्त ३ महिने! नवीन ब-याच गोष्टी मिळतील शिकायला” वगैरे टीपिकल डिस्कशन झाल्यावर मी तयारी दर्शवली.. मेल आलं "सोमवारी तुला तिकडे जायचंय" या अर्थाचं..! धक्काच बसला.. हे इतकं फास्ट होणार होतं? मला कल्पनाच नव्हती.. शनिवारी मी छोटी मोठी खरेदी केली आणि रविवारी नाशिकला प्रस्थान.. तो पहिला रविवार.. नंतर त्या तीनाचे आठ महिने कसे आणि कधी झाले ते आमच्या कंपनीलाच माहीत!

पहिल्या इम्प्रेशनमधेच मला नाशिक आवडलं नाही! का कोण जाणे.. म्हणजे शहर सुंदर आहे.. रेखीव.. ठिकठिकाणी बागा..सजवलेले चौक वगैरे.. पण मला गेस्ट हाउस मिळालं होतं पार एका टोकाला आणि मला जावं लागायचं MIDC एरिया मध्ये.. थोडक्यात बराच लांब! आठवडाभर जायचे १०० आणि यायचे १०० वगैरे देऊन नाशिकच्या मदमस्त रिक्षावाल्यांवर बरेच उपकार केल्यानंतर मला ते गेस्ट हाउस सोडणं भागच पडलं!

सुदैवाने मला तिथे रघू भेटला.. हा पुण्याचाच! माझ्या पुण्याच्या ऑफिसमध्ये माझ्या ओळखीचा झाला होता.. फार नाही पण ४-५ वेळा बोललो असू आम्ही काहीतरी.. त्यानंतर त्याने कंपनी सोडली होती. पण त्या अगदीच अनोळख्या वातावरणात मला त्याचा प्रचंड आधार वाटला! तो पण २ महिन्यांपूर्वीच आला होता तिथे.. काही काळासाठी.. पण तो काही काळ कधी संपेल हे मात्र त्याच्या कंपनीने त्याला सांगितले नव्हते.. नशीब! कोणीतरी ओळखीचं मिळालं! पण त्याने माझी फार मदत केली.जणू काही आमची फार जुनी ओळख होती.. मला राहायची जागा मिळवून दिली.. मला ऑफिसमध्ये जायला यायला कंपनी दिली.. आणि महत्वाचे म्हणजे पुण्याला परत परत यायचा उत्साह टिकवून ठेवला.. संधी मिळाली की आम्ही पुण्याला निघत असू....

...हॉर्नच्या कर्णकर्कश्श आवाजाने माझी तंद्री भंग पावली. मी भुयारी मार्गात पोहोचलो होतो. तिथे कोणी बारीकसा आवाज काढला तरी घुमतो. लोक कशासाठी तिथे हॉर्न वाजवतात कोण जाणे! तेवढ्यात "अवी" चा फोन आला.

"कुठे आहेस तू? पोचलास का?"
"पोचतोय ५-१० मिनिटात" असं सांगून मी फोन ठेवला..
हा 'अविनाश' .. "हीना travals" चा माझा सिंगल पॉइंट ऑफ़ contact .. फोन केला की सीट ठेवायचा राखून.. अगदी जायच्या रात्री १० ला केला तरी! सहा महिन्यात कधी वाढीव भाडं घेतलं नाही त्यानं.. रघूचीच कृपा हीपण!

... पहिल्या आठवड्यातच एकदा चहा पिताना सिगारेटचा धूर हवेत सोडत त्यानं सांगितलं "आपला बसवाला आहे एक.. स्वस्तात सोडतो!" मी मान हलवत "ठीकेय" म्हटलं.. तोच हा अवी! हळूहळू मी नाशिकच्या वातावरणात मी रुळत होतो पण मन पुण्यातून बाहेर यायला तयार नव्हतं.. मला साधा निरोप सुद्धा घेता आला नव्हता कोणाचा.. त्यात हे ऑफिस.. शहरापासून बरंच दूर.. तिथपर्यंत यायचं म्हणजे तिथपर्यंत येणारं कोणीतरी शोधलं पाहिजे.. नसेल तर शेअर रिक्षाचा जीवघेणा प्रकार!

पुण्यातल्या ऑटोवाल्यांसारखा "नाशिकचे ऑटोवाले" हा सुद्धा स्वतंत्र शोध निबंधाचा विषय होऊ शकतो.. मला त्याचं महत्त्व फारसं वाढवायचं नाहीये म्हणून मी त्यावर काहीच लिहिणार नाही अस ठरवलं होतं तरीपण फुटकळपणे सांगायचं झालं तर ३ सीटर रिक्षामध्ये रिक्षावाल्यासकट ९ जण आणि पिआजिओ आपे सारख्या ६ सीटर रिक्षामध्ये १५ जण "बसवण्याची" करामत नाशिकचे रिक्षावालेच करू जाणे ! शेअर ऑटो हा नाशकाच्या श्रमिक जीवनाचा अविभक्त भाग. कारण जिथे जायचे शेअर ऑटोवाले घेतात १० रुपये तिथेच जायचे "स्पेशल" ऑटो घेणार ६० रुपये! "स्पेशल" ऑटो हा सुद्धा त्यांचाच स्पेशल शब्द. त्याचा अर्थ मागच्या सीट वर ज्याने "स्पेशल" रिक्षा केली आहे त्याच्याव्यतिरिक्त इतर कोणी बसणार नाही.. रिक्षाड्रायव्हर च्या बाजूला बसू शकतात! ते लोक आपण जातो तेव्हढंच अंतर त्याच रिक्षातून जाणार आणि १० रुपये देणार..आपण मात्र स्पेशल रिक्षा केलेली असल्यामुळे ६० रुपये द्यायचे!! यातून होणारा मानसिक त्रास वाचवण्यासाठी एकाच पर्याय.. मी सुद्धा शेअर ऑटोने जायला सुरुवात केली.

सकाळी ह्या कसरती करत ऑफिसला पोहोचायचं. दिवसभर प्रचंड काम आणि रात्री परत याच्या त्याच्या विनवण्या करत एमआयडीसीच्या बाहेर यायचं.. ब-याचदा माझा प्रेमळ बॉस मला अर्ध्या रस्त्यात किंवा सोयीस्कर ठिकाणी सोडायचा पण अन्यथा ससेहोलपट ही होतीच! सकाळी १.५ किमी चालून शेअर रिक्षा जातात त्या ठिकाणी पोहोचायचं; रात्री तसंच एक किमी चालत तसलाच स्पॉट गाठायचा.. हा रस्ता मात्र अंधारा.. कारण तिथे कोणत्या कंपनीचं ऑफिस नव्हतं.. एफ एम वरच्या गाण्यांचीच काय ती सोबत.. अनोळखी ठिकाणी असल्या वातावरणात अजूनच एकटं एकटं वाटायला लागतं..

...मोबाईलच्या रिंगने मी त्या दु:स्वप्नातून बाहेर आलो… 'अवी' च होता. 'येतोय रे बाबा.. मी काय पळून नाही चाललो' मनातल्या मनात पुटपुटत मी फोन उचलला.

"कुठे आहेस रे?"
"अंडरग्राउंड रोड ने बाहेर पडतोय.. पोचेन एक ५ मिनिटात.."
"ठीक आहे लवकर ये, काउंटर ला येणारेस कि डायरेक्ट बसमध्ये?"
"डायरेक्ट बसमध्ये" म्हणून मी फोन ठेवला.. अवीचा हा दरवेळचा प्रश्न मला कधीच कळला नाही.. पण दोन पर्यायांमधला दुसरा पर्याय मला निदान कळायचा तरी म्हणून मी तोच निवडायचो!

हायवे वरून थोडसं अंतर चाललं की "हीना" उभी असलेली दिसू लागायची.. माझी वाट बघत! क्लीनर आतासा काचेवर फडका मारत होता.. ह्या 'अवी'ला ना भलतीच घाई! मी मनातल्या मनात त्याच्यावर चरफडत नकळत वाढवलेला चालण्याचा स्पीड कमी केला.. ११:४५ तर झालेत.. १२ शिवाय हे लोक बस चालू पण करणार नाहीत.. आणि उगीच "पोचला का,पोचला का" चा धोशा.. पुण्यातल्या रिक्षावाल्यांनी दिवसाचा धंदा गुंडाळून मागच्या सीटवर पथारी पसरायची तयारी चालू केली होती.. पुन्हा रिक्षावाले.. चेंज द सब्जेक्ट.. काहीजण विरंगुळा म्हणून पत्ते खेळत होते.. हि काय वेळ आहे? चेंज द सब्जेक्ट.. ओके.. विरंगुळा..

कॉलेज रोड हे आमचं मुख्यत्वे विरंगुळ्याच ठिकाण.. लोक इथे आपापल्या ‘विरंगुळ्या’सोबत अथवा विरंगुळा शोधण्यासाठी येत.. ज्या वीकेंडला पुण्याला जाता येत नसे अथवा आठवड्याच्या मधेच चुकून एखादी सुट्टी आली तर हे आमचं ठरलेलं ठिकाण! रोड वर भटकून दमलो की मी "सिनेम्याक्स" चा आधार घेत असे.. सर्वात जवळच्या अंतरावर असणारं मल्टीप्लेक्स. वीकेंड असला कि त्यांचे भाव डायरेक्ट २०-२५ रुपयांनी वाढत! पण अडला हरी म्हणतात ना.. आणि असे बरेच "अडले हरी" लाईनमध्ये उभे असत.. दरम्यान च्या काळातले अगदी टूकार मूव्हीज सुद्धा मी पाहिले.. नाईलाज म्हणून! नाहीतर आणखी काय करणार?

हॉटेल्स मात्र बरीच फिरलो आम्ही तिथे.. ब-याचदा जेवायला कोणत्या ना कोणत्यातरी हॉटेलात जायचो.. कारण जिथे मेस लावायची ठरवत होतो त्याने काही दिवसातच मला माझा विचार बदलायला भाग पाडलं! पातोळ्या, शेव असल्या निर्जीव पदार्थांना तेलाचा तवंग असणा-या रश्श्यात मिक्स करून जो पदार्थ बनत असे त्यालादेखील तो मूळ पदार्थाची भाजी म्हणत असे! जस कि 'शेवभाजी' इ. इ. मी तोपर्यंत शेव हा प्रकार चहाबरोबर किंवा फावल्या वेळात तोंडात टाकायला वगैरे म्हणून खाल्ला होता.. पण जेवणाबरोबर?? तोसुद्धा आठवड्यातून दोनदा आणि कम्पल्सरी? मग हॉटेल्सचा आसरा घेण्याशिवाय गत्यंतर नव्हतं! इथे तुम्हाला "ताटात काय येणार" याच गेस वर्क तरी नाही करावं लागत! कुसुमाग्रजांच्या घराजवळ एक छान हॉटेल आहे. "वैदेही" नावाचं. खरच सुंदर.. आमच्या नेहमीच्या जाण्यामुळे तिथला कॅप्टन आम्हाला मेनू कार्ड मध्ये नसलेले पदार्थ स्वतःहून सांगत असे.. आणि ते छानही असत.

..बसजवळ पोचताच माझी नजर भिरभिरू लागली.. विनोद आणि इतर नेहमीचे वारकरी दिसले.. मी त्यांच्याजवळ गेलो.. काय केलं दोन दिवस? किती नंबर सीट? वगैरे जुजबी आणि निरर्थक प्रश्नावली संपल्यावर काही वेळाने आम्ही बस मध्ये चढलो.. निरर्थक यासाठी कि ब-याचदा विशेष काही केलेलंच नसे वीकेंडला.. याच बसने शुक्रवारी मध्यरात्री नाशिकहून निघून शनिवारी पहाटे पुण्यात पोचल्यामुळे सकाळी उशिरापर्यंत उठणं होत नसे.. आळसावलेल्या अवस्थेत काय प्लान करणार? त्यामुळे शनिवार वायाच जायचा आणि रविवारी रात्री निघायाचच असल्याकारणाने काही मेजर प्लान करणं शक्यच नसायचं.. उगीच याला भेट, त्याला बोलाव, असल्याच गोष्टी व्हायच्या.. अन्यथा पिक्चरचा प्लान. येऊन जाऊन प्रत्येकजण तेच करायचा.. ज्यांचं घरच पुण्यात होतं ते लोक तर तंगड्या ताणून झोपण्याव्यतिरिक्त इतर काही उद्योग करत नसत. त्यामुळे या "काय केलं ?' वगैरे प्रश्नांना फारसा अर्थ नसायचा. उगीच बोलायला काहीतरी सुरुवात व्हावी म्हणून! आणि झोपणा-या माणसाला सीट नंबर विचारून काय फायदा? तरी पण आम्ही विचारत असू..

…१२ वाजून पण गेले..बघायला गेलं तर सोमवार सुरु झाला! मी सीट मागे ढकलली आणि रेलून खिडकीतून बाहेर बघत राहिलो.. खरंच आपले हाल झाले नाशिकला कि आपणच एन्जॉय नाही करू शकलो? एवढी "सिटी ऑफ पिल्ग्रिम्स" म्हणतात पण आपण त्र्यंबकेश्वर वगळता कुठेच नाही गेलो.. अगदी पंचवटीसुद्धा. मुळात पुण्यातून ज्या पद्धतीने जावं लागलं त्यामुळे असावं कदाचित.. लोक तर गाड्या करून वगैरे जातात नाशिकला वणीच्या देवीकडे, दिंडोरीला आणि आपण? तरीपण काही कमी मजा नाही केली.. ऑफिसच्या मुलांबरोबर गेस्ट हाउस ला केलेली धमाल.. आय-पी-एल च्या निमित्ताने घातलेला धिंगाणा.. सुला विनेयार्ड (कि वाईनयार्ड?) ला झालेलं गेट-टुगेदर.. सीसीडीची बेचव कॉफी.. 'बंजारा' मधला साईट स्क्रीन आणि वेताच्या खुर्च्या.. दादासाहेब फाळके स्टेडीयम मधला रॉक-शो.. लोकांच्या 'मकालू' मधल्या सेंड-ऑफ आणि बर्थ-डे पार्ट्या.. ब-याच चांगल्या आठवणीसुद्धा आहेत की!

.. अवि आला..
"तुझी विंडो सीट आहे.."
"मला नकोय विंडो"
"का?"
"थंडी वाजते रात्री"
"बरं.. बस इथेच. किती आहे नंबर? ७ का? ठीकेय"

स्वत:च प्रश्न विचारून स्वत:च उत्तर देत अवीने तिकीट दिलं.. याला सांगावं का? मी नसणारेय यापुढे म्हणून! पण त्याला काय फरक पडणार आहे? मी ज्या रविवारी नसायचो तेव्हा त्याने कधी नाही विचारलं तर कशाला सांगायचं? जाऊ दे.. सगळ्यांचीच साथ सुटणार आता.. हा नाशिक-पुणे-नाशिक वाला वारकरी संप्रदाय.. नाशिक मधले ऑफिसचे लोक.. कॉलेज रोड, सिटी सेंटर मॉल... बंजारा मधला डी जे.. 'वैदेही'चा कॅप्टन... हॉस्टेलवरचं पब्लिक.. गेस्ट हाउस...अवी आणि हीना सुद्धा!

मध्यरात्रीचे १२:३० …बस चालू झाली आणि एक एक करत पुण्यातली ठिकाणं मागे पडायला लागली.. मी येणारेय परत.. पण यावेळेला परत जाण्यासाठी नाही.. मी मनातल्या मनात म्हणालो.. रात्रीच्या शांततेत इंजिनाचा आवाज घुमत होता.. आणि हीना तटस्थपणे आपल्या मार्गावर मार्गक्रमणा करत होती....

बुधवार, १५ जुलै, २००९

आपली शिक्षणपद्धती!

आपली शिक्षणपद्धती! आहे एकदम सुरेख. म्हणजे जो शैक्षणिक अभ्यासक्रम आहे तो योग्य आहे पण मुल्यमापनाची पद्धत मात्र एकदम चुकीची आहे.
एक एक मार्कासाठी मुलं लढताहेत.. ’बालपणीचा काळ सुखाचा’ हे केवळ कागदावरच राहिलंय.!

नववीचा इतिहास वाचल्यानंतर कधीही असं मनापासून वाटत नाही की भारतानं स्वातंत्र्य मिळवलंय. वाटतं की ते तर असंच मिळालंय.. जणू इंग्रजांनी भीक म्हणून दिलंय.ज्या पद्धतीचं वर्णन अभ्यासक्रमात आहे त्यात काहितरी कमी आहे हे नक्की!
[यावरून ही गोष्ट आठवते.. ]
भारताचा स्वातंत्र्यलढा पुस्तकातून दिसतच नाही.. शालेय अभ्यासक्रमातला इतिहास अडलाय तो स्वातंत्र्यापर्यंतच! जास्तीत जास्त पुढे येतो तो गोव मु्क्तिसंग्रामापर्यंत.. त्यापुढे नाही. (अरे... पूर्वीच्या नेत्यांची आश्वासनं त्यांचे वायदे.. यांची पूर्तता होऊन ते इतिहास जमा होणारेत कि नाही? ) तेच तेच तेच.. पण कितीवेळा? अन त्यावरचे प्रश्न म्हणजे तर मूर्खपणाची हद्द! घटना कालानुक्रमे लिहा, एखाद्या तहाची कलमं लिहा- ४ मार्क्स असतील तर ८ च ६ मार्क्ससाठी मात्र १२! काय हे? या प्रश्नांमुळे इतिहासातली रंजकताच जाते.. पण लक्षात कोण घेतो?

तसाच भूगोल.. सुदान गवताळ प्रदेश कि काय ते.. तैगा , टुंड्रा प्रदेश, निरनिराळे देश यांच्या स्थानांचा ढोबळ अंदाज असावा हे मी समजू शकतो.. पण म्हणून प्रश्नपत्रिकेत एखाद्या प्रदेशाचा अक्षवृत्तीय - रेखावृत्तीय विस्तार अगदी अंश आणि मिनिटांसहित विचारायचा का? तोदेखील ’रिकाम्या जागा भरा ’ असल्या प्रश्नांमध्ये?

त्यामुळे हल्ली मुलं एक्झाम ओरिएंटेड विचार करतात.. नॉलेज बेस्ड नाही.. यामध्ये ज्याचं पाठांतर जास्त तोच जिंकतो.’पुलं’नी त्यांच्या एका लेखात म्हटलंय की ’ आमच्या काळात जास्तीत जास्त निरुपयोगी माहिती असणा-याला ’हुशार’ म्हटले जाई..’ दुर्दैवाने हे विधान आजही तसंच्या तसं लागू होतं!

त्यापेक्षा क्षमताधिष्ठीत चाचण्या ब-या.. व्यक्तिमत्व विकासाच्याही दृष्टीने.शिक्षण असं हवं की ज्याचा सार्वजनिक जीवनात - ज्याला आपण डे-टू-डे लाईफ म्हणतो - उपयोग व्हावा. सर्वांगिण शिक्षण देण्याच्या अट्टाहासापायी निरर्थक शिक्षण देण्याचा फायदा काय? आपल्याकडे किमान दहावी व्हावं अशी समजूत आहे. कित्येक जण दहावीनंतर शिकू शकत नाहीत. पण मुळात अशा लोकांना त्या ज्ञानाचा कितपत फायदा होतो? बेरीज-वजाबाकी तर चौथी शिकलेलाही करू शकतो..पण प्राण्यांचे , वनस्पतींचे वर्गीकरण, कीपचे उपकरण यांचा त्यांना उपयोग काय? गावागावातल्या शाळांमध्ये प्रयोगही फळ्यावरच शिकवले जातात! प्रात्यक्षिक हे जर प्रत्यक्ष नसेल तर त्याला अर्थच काय? तसंच व्यवहारातले उपयोग माहिती नसतील तर कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन्सनी सामान्य विद्यार्थ्याचं डोकं का शिणवायचं? त्यामुळे ही मुलं गणितात नापास होतात आणि दरवर्षी हे प्रमाण वाढतच आहे! केवळ हेच विषय नव्हे तर भाषेबद्दलही तेच!

कादंब-यामधले उतारे आउट ऑफ द कन्टेक्स्ट छापून त्यातल्या एखाद्या वाक्याचं संदर्भासहीत स्पष्टीकरण मागायचं, याला काय म्हणावं? उदाहरणार्थ..
’कोसला’ कादंबरीमधून घेतलेला काही भाग आम्हाला ’आणि बुद्ध हसला’ या नावाने धडा म्हणून होता.. तो वाचून मला ही कादंबरी नेमाड्यांचे प्रवासवर्णन असावं असं वाटत असे!अगदी हल्ली हल्ली ही कादंबरी वाचेपर्यंत!त्या भागातून ना नेमाड्यांचा परिचय झाला होता, ना त्यांच्या कादंबरीचा, ना त्यांच्या लेखनशैलीचा!! असो!

मला तरी असं वाटतं की ज्यांना पुढे शिकायच आहे त्यांना आठवीपासून गणित आणि विज्ञान इंग्लिशमधूनच शिकवावं. कारण या विषयांमधली बरिचशी पुस्तक त्या भाषेतूनच आहेत..मात्र इतर विषय मातृभाषेतच शिकले पाहिजेत तरच ते समजतील. कारण तानाजीची ’आधी लगीन कोंडाण्याचं नि मग माज्या रायबाचं’ ही घोषणा ’फर्स्ट मॅरेज इज ऑफ कोंडाणा ऍण्ड आफ्टर्वर्डज माय रायबाज!’ अशी ऐकायला कशी वाटते? तसाच सुर्याजीचा आवेश ’भ्याडांनो.. तुमचा बाप इथे मरुन पडलाय आणि तुम्ही पळताय काय? मागे फिरा.. परतीचे दोर मी केव्हाच कापून टाकलेत..’ इंग्लिश मध्ये कसा व्यक्त होईल?

हल्ली मात्र मुलांना इंग्लिश शाळात पाठवण्याचं फॅडच आलंय. अगदी गावोगावी सुद्धा.. असो.. कालाय तस्मै नमः!