मंगळवार, ७ जून, २०११

फंडू

फंडू हे त्याचं नाव त्याच्या लहानपणीच्या कोणी दोस्तांनी ठेवलेलं आणि फंड्या,फंडेश,फंडेश्वर, फंडा-मेंटल ही त्याची मी केलेली अपरूपं!! त्याचं नाव काय होतं बरं?? जाऊ दे नाही आठवत.. पण हे नाव त्याला सूट व्हायचं. त्याला फंडू म्हणण्यामागे त्याचं अंतरंग कारणीभूत होतं. स्वभाव एकदम फन + डू स्टाईल आणि बोलणं जीवनाचे विविध फंडे उलगडून सांगणारं.. म्हणूनच हे सुटसुटीत नाव!

मला तो भेटला बाईकच्या एका सर्विसिंग सेंटरला. काळे हात,ऑईल आणि ग्रीसने माखलेले कपडे अश्या अवतारात.बाईक खड्ड्यातून गेली की कसला तरी आवाज यायचा . मी तिथे सांगितलं तर तिथले mechanics आपापला अंदाज सांगायला लागले, फोर्क अलाईन करावा लागणार, चेन sprocket चा लोचा आहे, फेंडर रिप्लेस करावं लागेल वगैरे वगैरे. माझं डोकं गरगरायला लागलं. मी 'काय झक मारायचीय ती मारा' म्हणून त्या कसायांच्या तावडीत माझी दुचाकी देणार तेवढ्यात हे महाशय अवतरले. एकदम आश्वासक चेहरा घेऊन! मला उगीचच आधार वाटला.
"काय झालंय?"
मी सांगितलं. तर म्हणे "चल, चहा मारून येवू.." मला रागच आला. एकतर उपाय सांगितला नाही वरून हे! हे mechanic लोक पण ना विनाकारण जवळीक साधायचा प्रयत्न करतात. पण म्हटलं ना,काहीजण आश्वासक वाटतातच! तो मागे बसला. मी जवळच्याच टपरीवर त्याला घेऊन गेलो.
"खड्ड्यातून घालून दाखवू का ?"मी विचारलं..
"नको.."
टपरीवर मी दोन कटिंग सांगितल्या. तोपर्यंत साहेब गायब! मी ग्लास घेवून बावळटासारखा उभा होतो आणि तेवढ्यात गाडीमागे बसलेला फंड्या उभा राहिला. "गाडी ओके झालीये तुझी." पोपट-पाना apron च्या खिशात ठेवत फंडू म्हणाला.
"क्काय?" मी चकित! "काय झाल होतं?"
"काय नाय रे.. हे सेन्ट्रलाईज्ड शॉकअब्सोर्बर चं सेटिंग असतं. हाय्येस्ट लेवल ला ठेवलं. २-३ सेंटीमीटर उंच वाटेल गाडी पण काय प्रॉब्लेम नाय येणार आणि आवाजपण नाय येणार.."
"बर्र.. नाव काय तुझ?"
"मी फंडू.. म्हंजे खर नाव हे नाय काय.. पोरं अशी म्हणतात..आपल्याला ना असे किडे करायला जाम आवडतं त्याच्यामुळे फ्रेंडसर्कल अस बोलतं. "
"मस्त आहे नाव.. घे चहा घे.. कधीपासून आहेस इथे?" संभाषण कंटिन्यू करावं म्हणून मी म्हटलं.
"मी इथला mechanic बिक्यानिक नाय्ये हां..उगीच तुला वाटायचं कायतरी. असाच येतो मी इथे टाईमपास म्हणून..सकाळी कॉलेज करतो, दुपारी आडवा होतो संध्याकाळी इथे येतो नंतर बाकीचा टाईमपास. हे mechanic कायपण सांगून लोकांना चूXX बनवतात. मी त्या लोकांचा मसीहा आहे! " आता माझी आश्चर्यचकित व्हायची पाळी होती. हीच ती वेळ, हाच तो क्षण (खुपते तिथे गुप्ते स्टाईल) जेव्हा फंडू माझ्या लाईफमध्ये प्रवेश करता झाला!

फंडूचं आय टी आय झाल होतं. इंग्लिश मिडीयम मधून शिकून आय टी आय करणारा माझ्या बघण्यातला हा पहिला आणि एकमेव पोरगा! मला भेटला तेव्हा डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनियरिंगचा 'प्रयत्न' करत होता.. या प्रयत्नात पाठोपाठ दोन वर्ष वाईट मार खाऊनदेखील पठ्ठ्याने सपशेल शरणागती पत्करली नव्हती. पहिल्या वर्षी १० पैकी नऊ विषय डाऊन आणि नंतरच्या वर्षात सात! पण शाळेच्या 'संस्कारा' मुळे इंग्लिश भारी बोलायचा आणि पोरींना इम्प्रेस करायचा. पहिल्या भेटीत सांगितलेला 'बाकीचा टाईमपास' म्हणजे 'पोरी फिरवणे' हे मला लवकरच कळलं! वडील उच्च मध्यमवर्गीय पण नोकरदार आणि तशीच स्वप्न बघणारे म्हणजे 'पोरगा शिकून मोठा होऊन नोकरी करेल' आणि आई गृहिणी. घरी भाऊ. तो 'अभ्यासात हुशार' वगैरे वर्गात मोडणारा! पण मला माहिती ती एवढीच! ती सुद्धा त्याने एकदाच कधीतरी सांगितलेली.
"छोटू आहे अभ्यासात हुशार.. बुद्धी पण आहे आणि हार्डवर्कर पण आहे. पण बघू पुढे काय होतं ते.."
"मग काय व्हायचंय? चांगलंच तर होईल! हार्ड वर्किंग असेल तर खूप पुढे जाणार तो.." मी माझ तत्वज्ञान पाजळलं!
"वेडा आहेस तू.. नशीब नावाचा शब्द ऐकला आहेस कधी?" मी मान डोलावली.. "त्याच्यावर असतं सगळं.."
"हड.. आयला.. तुझ्यासारखा माणूस हे बोलतो म्हणजे कमाल आहे.. हार्डवर्क असेल तर यश झक मारत येत. नशीब बिशिब काही नाही लागत..म्हणजे असं म्हणतात बुवा! " -अस्मादिक
"अरे येXXव्या ..." म्हणजे फंडू आता छोटेखानी लेक्चर झाडणार! प्रेमात आणि रागात दोन्ही ठिकाणी साहेब शिव्यांनी सुरुवात करत असत.. त्यांचा मूड आणि आवाजाचा टोन बघून ते प्रेम आहे कि राग हे ठरत असे..
"नशीब नाही तर काही नाही.. हातातोंडाशी आलेला सक्सेस हां हां म्हणता दिसेनासा होतो.. कॉलेजात जातोस ना? तिथे काही चूXX,चूXX लोक प्रोफेसर म्हणवून घेत असतात स्वतःला...हो कि नाही? तुमचं आणि त्याचं नशीब असतं तसं! ऑफिसात गेलास की तसेच साहेब लोक भेटणार बघ तुला.. सगळेच काही स्वकर्तृत्वावर नाही येत पुढे.. आता मी नापास झालो म्हणजे मी ढ आहे अस नसतं. या वेळी नशीब नव्हतं बरोबर.. पहिल्या सेम ला अप्लाईड सायन्स क्लीअर होता माझा माहित्ये ना? 'देवदास' आणि 'साथिया' च्या गाण्यांनी ४० मार्क दिले होते मला मिळवून! आता बोल.. दोन एकसारखेच हुशार लोक दुनियेत असतील तर ज्याच नशीब असतं तो पुढे जातो आणि नसतं तो गटांगळ्या खात राहतो.. जिवावरच्या संकटातून,अपघातातून माणसं वाचतात ती कशाने? त्यांच्या आयुष्यभराच्या हार्डवर्कमुळे? फक्त आपल्याला समजलं पाहिजे नशीब आपल्या बरोबर आहे कि नाही ते.. असेल तर मस्तच नसेल तर मग 'कर्मण्येवाधिकारस्ते म फलेषु कदाचन' कि काय आहे ना तसं वागायचं.."
"थोडक्यात नशीब माणसाचा प्रवास ठरवतं! हो ना?" मी विचारलं.. "देअर यू गो.." फंड्या हसत म्हणाला..

पुढे खरंच त्याने डिप्लोमा पूर्ण केला मग कुठल्यातरी कॉलेजला इन्जिनीअरिन्ग डिग्रीला सेकंड ईयरला प्रवेश घेतला आणि तेसुद्धा पूर्ण केलं..!! अनबिलीव्हेबल ना? अगदी कित्येकांना तसंच वाटलं होतं.. त्याच्या बाबांना सुद्धा! पैसे फुकट जाणार म्हणून त्याला ते पुढचं शिक्षण द्यायला टाळाटाळ करत होते.. पण याने करून दाखवलंच! वरून कॅम्पस प्लेसमेंट.. कधी आम्ही त्याच्या स्ट्रगल करणा-या मित्रांबरोबर असलो आणि त्याच्या कॉलेजला शिव्या घालणारी ती पोरं बघितली कि हा शांत राहत असे...मी एकदा हटकलं तर म्हणाला.. "या कॉलेज ने मला आयडेन्टीटी दिली..नोकरी दिली,इतके मित्र दिले...." "आणि मैत्रिणीपण!" मी हळूच पुटपुटलो! "असू दे.. तर एवढं सगळं देणा-या कॉलेज ला मी नावं ठेवू?"
"तुला नोकरी मिळाली म्हणून तू म्हणतोयस.. नसती तर तूसुद्धा..."
"मुळीच नाही.. शाळा,कॉलेज ज्यांच्या बळावर मी घडलो,उभा राहिलो त्यांना नाव ठेवायची गां@गिरी मी मुळीच करणार नाही.. ऐपत नसणा-या आईबापानी आर्थिक परिस्थितीमुळे मुलांना काही गोष्टी नाही घेऊन दिल्या तर ते वाईट ठरतात का? अरे बाकी काय काय केल ते बघा ना त्यांनी तुमच्यासाठी..इथे राहून तुमची लायकी तुम्ही वाढवून घ्यायची संधी होती त्यावेळी चू##पंती करत हिंडले.. मी पण होतो त्याच्यात.. पण तुला सांगितलं ना... नशीब!! that matters बाबा Luck matters !!" मी मान हलवायचो!

आई-बापाबद्दल जाम रिस्पेक्ट.. पण त्यांच्या पुढ्यात दाखवायचा नाही.. सारखी उलट उत्तरं द्यायचा. नाही म्हणायला त्याच्या आईला माहित होतं कि थोडाफार मानतो हा आपल्याला वगैरे..बाप मात्र ओळखून नव्हता.. तो तोंडावर म्हणायचा.."हा वृद्धाश्रमात पाठवणार आम्हाला.."
"तुमचे पिताश्री तुमच्याबद्दल काय विचार करतात ते माहित आहे ना?"
"असू देत रे.. पण तुला माहित्ये ना? मी तसलं काय नाय करणार ते? ते म्हणेनात का? नंतर जेव्हा टाकणार नाही तेव्हा त्यांना जो आनंद होईल तो बघ.. आता काय बोलायचं ते बोलू दे.. अरे, त्यांचेच संस्कार आहेत माझ्यावर. आजी-आजोबांचं कित्ती केलंय त्यांनी ते मी पाहिलंय ना.."
"आणि तुमच्यासाठी पण केलंय त्यांनी.."मी बोललो
"ते असू दे.. आमच्यासाठी केलंय म्हणून मी काही करणार नाही..मला ते पटत नाही.. तू बागबान पाह्यलाय का रे पिक्चर?"
"हो,बघ ना त्याच्यात पोरांसाठी ते आईबाप इतक करतात आणि पोरं त्यांना असं वागवतात." मी चेह-यावर दु:खी भाव वगैरे आणून बोलत होतो.. तितक्यात "चूक.." मला तोडत तो म्हणाला.."पोरांची काहीच चुकी नाही.. अमिताभ आणि हेमाने त्यांच्या आई-बाबांसाठी काही केल्याचं दाखवलंय का मुव्हीत?"
"अरे ते आधीच गेले असतील ना.."
"म्हणून एक फोटो पण नाही? च्यायला..तुम्ही तुमच्या पोरांसाठी केलंत सगळं मग आता तुमची पोरं त्यांच्या पोरांसाठी मर-मर करतायेत तर त्यात वावगं काय? पेरलं तसं उगवणारच ना?"
"बरोबर आहे रे.. साला मी हा विचार कधी केलाच नव्हता.." मी शरणागती पत्करली..

त्याला राडे करायचं अतिशय वेड..मारामारी करायची म्हटली कि साहेब एका पायावर तयार.. अंगावर बरेच व्रण आणि वणसुद्धा बाळगले होते त्यांनी.. नन्तर आपण बसून वर्णनं ऐकायची! मारामारीचं (क्षुल्लक असणारं) कारण आणि वर्णन सांगून झालं कि..
"असा धुतला आणि सुजवून ठेवलाय भ$ला कि आता आठ दिवस उठत नाही.." या वाक्याने शेवट!
हा असं काही सांगायला लागला कि मी सुरुवाती सुरुवातीला उगीच घाबरून जायचो.. "अरे पोलीस केस झाली तर?"
"झाली तर झाली.. आपण काय हाप मर्डर नाय केलाय. नुसता मुका मार दिलाय.." हाफ लेदर ग्लोव्हज घातलेल्या हातातल्या चार बोटात पितळी फायटर सरकवत तो सांगायचा.. "ये है अपना हतियार! अंदर तक जाये; मुका मार दिलाये!" त्यामुळे मी पण नंतर नंतर सरावलो..
"इथे सुद्धा टेक्निक असतं.. आपल्याला सांगतात कि आपण कधी स्वतः हून हात नाय उचलायचा वगैरे.. पण माझं म्हणणं असतं कि पहिला वार तुम्ही करायचा आणि तो सुद्धा असा कि समोरच्याला संधीच मिळता नये..!! हिट फस्ट and हिट हार्ड इज व्हॉट आय बिलिव इन!" अजून एक फंडा! न पटवून घेवून मी सांगतोय कुणाला?

बाईक आणि मुलगी यांच्यावर त्याचं प्रचंड प्रेम!
"तुझ्यासारखी माणसं आवडतात आपल्याला.."जो दिल मे आया कर लिया" स्टाईल ची!" मी माझी बाईक फर्स्ट लॉट मधून घेतली म्हटल्यावर फंड्या ची ही प्रतिक्रिया होती.. "साडेतेरा बी एच पी ची पॉवर आणि एकशे एकोणपन्नास सी सी ची डिसप्लेसमेंट.. हम्म..मजबूत आहे गाडी.. बॉडी ब्यालेंस खत्री आहे.. डबल सीट असताना इतकी टिल्ट केलीस ना तरी पडणार नाहीस!" पहिल्यांदा माझी बाईक चालवत असताना हे महाशय मला डबलसीट घेवून छातीत धडकी भरवणारे स्टन्ट लाईव्ह करून दाखवत होते. पुणे बंगलोर हायवे वर तर एकदा "..आता वाकून बघ पुढे..१०६ टच केला आहे आपण!! म्हणजे १०० क्रॉस! केला होतास याआधी कधी? " ...भन्नाट स्पीड मध्ये तो मला ओरडून ओरडून सांगत होता आणि एखाद्या लहाने बाळाने पकडून बसावं तसा मी त्याला बिलगलो होतो.. थ्रील पेक्षा भीतीची भावना जास्त होती माझ्या मनात.. ती माझी आणि त्याची दुसरी तिसरी भेट असावी कदाचित. "मस्त आहे मशीन तुझं.. साला नाहीतर उगीच रिव्यू,मायलेज अश्या गोष्टी बघून 'ही घेवू' कि 'ती घेवू' म्हणत कीस पाडत बसण्यापेक्षा हे बरं.. आवडली म्हणून घेतली.." अशा पद्धतीने गाडी घेवून आपण किती मस्त काम केलं आहे याची जाणीव मला त्याने करून दिली नाहीतर मी त्यावर विचार नसता केला. त्यानंतर काही दिवस माझी बाईक चालवताना उगीचच माझी छाती अभिमानाने एखाद इंच अधिक फुगत असे! मला टेक्निकल डीटेल्सपेक्षा फंडू चं बोलणं जास्त आठवत असे त्यावेळी..

त्यानंतर मात्र पोरी हा त्याच्या विशेष आवडीचा विषय.. जेव्हा त्याच्याकडे रिकामा वेळ असायचा तेव्हा तो कुठल्या न कुठल्या मुलीबरोबर असायचा आणि vice versa .अर्थात तो जरा एखाद्या मुलीबरोबर असेल तर त्याक्षणी तो (रिकाम्या वेळासकट) फ्री आहे! निदान माझ्याशी बोलायला तरी!
"आयला,फंड्या भाड%उ,एखाद्या पोरीबरोबर आमची तरी सेटिंग लाऊन दे.." पोरीबरोबर फिरताना त्याला पाहिलं कि त्याचे मित्र त्याला फोन करून गळ घालायचे..
"भें&*, काय खाऊ आहे? आधी बोलायला शिका. काही फंडे सांगतो.. पोरींना पोरांचं रूप लागत नाही.. बोलणं लागतं.. पूर्वी कर्तृत्व वगैरे बघायच्या पोरी पण आता फक्त बोलणं ऐकतात.. मस्त बोलायला शिका कि पोरगी फिदा! पण साल्यानो तुमचं तोंड म्हणजे गटार! उघडलं की शिव्या बाहेर पडतात..सगळे साले एकजात मा@#$द!!"
"आयची ***, तू म्हणजे सोज्वळच नाही का.. साल्या,वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटर ने करतात तशी तू शिवीने करतोस आणि फुल stop देऊन वाक्य संपवतात तसं तू शिवीने संपवतोस आणि तू आम्हाला शिकवतोस?" म्हणत मित्र त्याच्यावरच त्रागा करायचे!
" मग गेलात बा@#त.. लेकाहो,चांगलं कायतरी सांगतो तर माझ्यावरच &ढा!!" फंडेश्वर शांतपणे फोन ठेवायचा!

मी मात्र त्याच्या जवळच्या मोजक्या लोकांमधला सगळ्यात जास्त विश्वासू होतो!
"काय करतोयस रे? सीसीडी ला येतोस का? एका मस्त पोरीची ओळख करून देतो.." खुसपुसत तो फोन वर बोलायचा..मीपण जायचो.वयाचा दोष आणि मुलींचं आकर्षण हि दोन मुख्य कारणं!
"हि श्वेता.. आणि श्वेता, हा आपला जिग्गी..
"हाSSSSSSSSSSSSय" इति श्वेता..
"हलो" आम्ही स्वतः..
"तुला नेहमी सांगत असतो ना याच्या बद्दल? तोच हा गां.... गांधीवादी.. गांधीवादी आहे हा.. !" -फंडेशची सारवासारव..
"ओह आय सी.. हाच का तो? खूप ऐकलंय रे तुझ्याबद्दल.. मी याला नेहमी विचारते की मी तुझी गर्लफ्रेंड आहे की तो? तू गांधीवादी आहेस? हे आज नव्यानेच कळलं.. " खिदळत श्वेता म्हणाली..
"मला पण! कारण आत्ताच फंड्याने गां वरून गांधीवादी केलंय मला!" अस स्वगत बोलल्यावर मी मोठ्याने म्हणायचो.. "हो अगं.. मी पण ऐकलय..तुझ्याबद्दल." वास्तविक फंडामेंटलने भेट घालून दिलेली ही तिसरी श्वेता!! आणखी एका श्वेतेला मी भेटायच्या आधीच फंडूचं बारगळल होतं! त्यामुळे exactly तिच्याबद्दलच नसलं,तरी "श्वेता" बद्दल ऐकणं साहजिकच होतं..
तिथे तास -दोन तास मोडले की आमच्या दोघांच्या एंटरटेनमेंट वर खुश होऊन मुलगी बिल स्वतःच अदा करायची!!

"फंडामेंटला.. कित्ती पोरी पटवणार आहेस रे उगाचच्या उगाच? कितीजणींचे तळतळाट घेणार आहेस विनाकारण?" माझी आपली उगीचच काळजी..
"हे बघ भावा..मी काही कोणाला फसवत नाही! उगीच 'तुझ्याशी लग्न करतो' म्हणून त्यांना आशा दाखवत नाही.. पोरींना मी आवडतो तर मी काय करू? आतापर्यंत च्या एकापण पोरीला विचार की इफ एनिथिंग आह्याव डन अगेन्स्ट देयर विश.. बट आय डीन्ट फाईंड एनीबडी ऑफ माय टाईप टू बी लॉयल विद हर.. मी काही त्यांना फितवत नाही कि फूस लावत नाही.. it just happens .. "
"शी.. अरे किती चीप वाटतं हे सगळं.. पण सपोज तुला बहिण असती आणि असं कोणी तिच्याशी वागलं असतं तर?" मी त्याच्या भावनेला हात घालायचा प्रयत्न केला..
"खर सांगायचं झालं तर मी तो निर्णय तिच्या हातात दिला असता.. आणि तू म्हणतोस तसं आता या मुलींच्या भावांना मी थांबवलंय? याव न त्यांनी पण.. मी बोलेन त्यांच्याशी काय बोलायचं ते.. त्यांनी काय आयुष्यात पोरी पटवायचे प्रयत्न केलेले नसतील की काय.. बहिण असली म्हणून काय झालं? तिचं लाईफ आहे. लहानपणी ठीक आहे पण आता स्वतःचा निर्णय स्वतः घेण्याइतक्या मोठ्या झाल्या आहेत न या मुली? आणि हे बघ.. कुठल्या गोष्टीना निषिद्ध म्हणायचं आणि कुठल्या गोष्टीना नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि ज्याने त्याने तसाच तो सोडवायचा आहे.. आता तुला गर्लफ्रेंड आहे त्यामुळे तुला लॉयलटी वगैरेची पडलीये.. कित्येक मुलं, ज्यांना माझं हे वागणं आवडत नाही, त्याच कारण त्यांना कधी पोरी पटल्याच नाहीत! बाहेरून ते भले म्हणत असतील "आम्ही असला प्रकार करणार नाही.." पण यापैकी कित्येकजणांनी "पोरींशी नुसतं बोलण तरी स्टार्ट करवून दे" अशी गळ घातलीये मला, माहितीये? आणि हे 'भाऊ' वगैरे म्हणत असशील तर एक लक्षात ठेव, कुठल्याच मुलाला आपल्या बहिणीने इतर कुठल्या मुलाशी गप्पा मारलेल्या आवडत नाहीत मात्र तो स्वतः मात्र बिनधास्तपणे इतर कुठल्यातरी मुलाच्या बहिणीशी गप्पा मारत असतो!! त्यामुळे युअर स्टेटमेंट इज वोईड!"
"एक सांगू फंडेश्वरा? शुद्ध मराठीत याला व्यभिचार म्हणतात!" मी माझं म्हणणं रोखठोकपणे मांडलं..
"कोण ? कोण म्हणतं? ज्यांना जमत नाही ते म्हणत असतील! पोरांना मी चांगला ओळखून आहे रे! मुलं मुलं जमली की काय टॉपिक चालतात ते मला माहित नाही का? कस असतं माहितीये का... यांनी, भो$#@नी केले, तर ते चमत्कार.. आणि आम्ही केले तर बला"--
---"असू दे, असू दे..चल सोड तो विषय.." त्याला मध्येच तोडत मी विषय थांबवला! उगाच कानांवर अत्याचार करवून घेण्यापेक्षा हे बरं!!
कधी कधी 'मला तो लॉयर झाला असता तर जास्त बरं झालं असतं' असं वाटायचं..

'फोर व्हीलर चा रिवर्स मारताना ज्या बाजूला स्टीअरिंग वळवतो त्याच बाजूला मागच्या बाजूला गाडी वळते' इथपासून 'सुंदर मुलीपेक्षा ज्या मुलीशी बोलायला कधी बोअर होत नाही तिच्याशीच लग्न कराव' इथपर्यंत भिन्न टोकाचे फंडे तो येताजाता आणि बोलताबोलता देत असे.. जे लक्ष देऊन ऐकत त्यांना नक्कीच फायदा होत असे.. आणि नाही ऐकत त्यांचे नुकसानही होत नसावे!

असो..फंडेश्वर चाकोरीतलं जीवन कधीच जगला नाही.. मुळात तो त्याचा पिंडच नव्हता.. नोकरी सोडून गावाला परतण्याचा निर्णयसुद्धा सर्वस्वी त्याचाच.. केवळ आईबाबांसाठी. त्याने तिकडे गावाकडे सर्विसिंग सेंटर उघडलं आहे.चांगलं चालतं असं दिसतंय एकंदरीत. कारण अधून मधून फोन करतो.. "मुलींवर मनसोक्त प्रेम करून झालं,अगदी दोघांचाही मन विटेपर्यंत! आता फक्त गाड्यांवर प्रेम! कस आहे ना? I had been a bad boy in every aspect पण ज्या त्या वयात जी ती गोष्ट करत गेलं ना कि बरं असतं.. हे सूत्र लक्षात ठेव.. " तसं गावातल्या लोकांनाही बरंच झालं ना. गाडी दुरुस्तीबरोबर जीवनाबद्दलचे चार तत्वज्ञानाचे शब्द कुठल्या अधिक फीशिवाय मिळत असतील तर कोणाला नको असतील? थोड्या शिव्या खाव्या लागत असतील त्यांना; पण एकदा अंगवळणी पडल्यावर त्या शिव्यांकडे दुर्लक्ष करून नेमकं बोलणं ऐकता येतं.. अहो खरंच! अनुभवातून शिकलोय मी हा फंडा!!

शुक्रवार, १५ एप्रिल, २०११

इंग्रज

मुंबई-पुणे हा प्रवास वॉल्वो आणि एक्स्प्रेस वे या दोघांनी मिळून बराच सुखावह बनवलाय यात कोणाचं दुमत नसावं.. जेव्हा वॉल्वो भारतीय बाजारपेठेत आयात होत असत आणि 'नीता' वगैरेनी तो प्रकार अगदीच कॉमन केला नव्हता तेव्हा वॉल्वोने प्रवास हि चैनीची गोष्ट मानली जायची. सर्वसामान्य लोकांना त्या गाडीला लांबून बघितल्यावर देखील बुजरेपण येत असे.. गाडीत चढल्यावरची तर गोष्टच सोडा! तसा प्रवास करणा-या आणि केलेल्या काही व्यक्तींचं अनुभवकथन ऐकताना उगीच अंगावर काटा-बीटा येत असे! मीही तेव्हा सर्वसामान्य या क्याटेगरीत येत असल्यामुळे (अजूनही येतो, उगीच गैरसमज नको!) माझ्या विद्यार्थीदशेत "एकदातरी पुण्याला वॉल्वोनेच जायचं" असं खूप आधी ठरवून,त्याप्रमाणे खर्चाला फाटे देऊन, घरून मिळणारे पैसे साठवून वगैरे तो प्रवास केला होता..

गाडीत झोप येऊ नये म्हणून आदल्या दिवशी एक्स्ट्रा २-३ तास झोप काढली.. दिवसाउजेडी प्रवास करायचा म्हणून सकाळच्या बसची तिकिट्स काढायचं ठरवलं, नवीनच घेतलेले आणि सगळ्यात कमी वापरलेले कपडे घातले आणि मी ठरलेल्या वेळेच्या कितीतरी आधी दादरला पोचलो. लोकांच निरीक्षण करत बसलो आणि त्यांच्यासारखं कसं वागायचं ते ठरवू लागलो. उगीच त्यांना मी 'नवखा' वाटायला नको! तिकीटबारीवर एकदम "यो" टायपातले काही लोक, उगीच अर्ध्या चड्ड्या घालून जास्तच कम्फर्टेबल राहायचा प्रयत्न करणारे लोक, सुंदर सुंदर ड्रेस घातलेल्या (ड्रेस म्हणजे पंजाबी नाही होss !) आणि डोक्यावर (हो डोक्यावरच) गॉगल घातलेल्या मुली,बायका बघून मला अंमळ भीती वाटली. पूर्ण कपड्यातला मी एकटाच होतो बहुधा आणि त्यामुळेच त्या गो-याचीट्ट लोकांत जास्तच वेगळा वाटत होतो.. माझी बस आल्यानंतर गुपचूप तिकीट,पाण्याची (आताच्या तुलनेत मोठी) बाटली आणि पेपर घेऊन मी बसमध्ये पाऊल टाकलं. बस माझ्या वजनानेही थोडी झुकली. मौज वाटली.

माझी विंडो सीट होती पण तिथे एक वयस्कर वाटणारे गृहस्थ बसले होते आणि "वयस्कर वाटणारे गृहस्थ" म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर जे चित्र उभं राहिलं तसे ते मुळीच नव्हते!! ऑफ व्हाईट रंगाचा शर्ट, ग्लॉसी स्ट्रिप्स असणारी पतलून, टाय वगैरे अगदी टायपिनसहीत.. थोडक्यात सांगायचं तर...अं.. तुम्ही 'मोहनदास बी ए एल एल बी' बघितलंय का कधी? सोनी 'चायनल' वर लागायचं कधीकाळी.. त्यातला पंकज कपूर.. म्हणजे तशी वेशभूषा. मी तिथे पोहोचताच त्यांच्या चेह-यावर 'अवर्णनीय' असे भाव उमटले. "ती सीट माझी आहे" असं सांगतानाची अजिजी माझ्या चेह-यावर स्पष्ट दिसत असावी. "वूड यू माईंड इफ आय सीट-इन हिय?" त्यांनी विचारलं. अस्मादिकांच इंग्लिश "त्या" काळी (आणि अजूनही) यथातथाच असल्यानं त्या प्रश्नाला लगोलग काय उत्तर द्यावं मला सुचलं नाही. पण मी गांगरल्याचे भाव लपले नसावेत! त्यानी बाहेर येवून मला आत बसायला जागा दिली.

थोडा वेळ गेला.. गाडीचं टायमिंग उलटून १० मिनिटं लोटली असावीत. माझ्यासाठी अजूनही ए सी, न उघडणा-या काचा,पडदे,सीटखाली असणारे काफ रेस्ट या आणि असल्या बारीकसारीक गोष्टींचं कौतुक संपलं नव्हतं. आजोबांची चुळबुळ जरा जास्तच वाढली होती. 'ब्लडी इंडियन्स!' असे काहीतरी उद्गार काढल्याचे माझ्या कानावर आले. मी चपापलो. हा माणूस तर सर्वार्थाने भारतीय दिसत होता. मी गुपचूप खिडकीतून बाहेर बघत बसलो. पण पाचच मिनिटात आजोबांच्या संतापाचा कडेलोट झाला..
"ड्रायवss; कधी निघणार आहे तुमची गाडी? वी आ's अल्रेडी रनीन' लेट. पंधरा मिनिटं उशीर झाला आहे."
"साहेब,निघतोच आहोत.या दोन सीट्सची वाट बघत होतो. रिझर्वेशन होतं त्यांचं.." आत चढणा-या एका कपलकडे बोट दाखवत दाखवत ड्रायवरने बटन दाबून हायड्रोलिक दरवाजा बंद केला. मला नवनवीन अनुभव येत होते!
"दीज रास्कल्स, विल नेवSS und'stan दि impaw SS tans (importans या अर्थी! ) ऑफ टाईम.." म्हाता-याचं पुटपुटणं चालूच होतं!
"तुम्हाला घाई आहे का पुण्यात पोचायची?" मगाशी त्यांनी बोललेल्या चार -पाच मराठी शब्दांच्या आधारावर मी थेट मराठीत संभाषण चालू केलं.
"अं? तसं काही नाहीये.. पण टाईम फॉलो करायला नको? आय मीन वेळ पाळायला नको का? इंडियन्सच्या जीन्स मधेच नाही ते.." मान हलवत साहेब उद्गारले! मग डोक्यात सणक न जाती तर नवल! त्यात पुन्हा मी नुकता तारुण्यात पदार्पण करत होतो. म्हणजे जरा जास्तच सळसळतं रक्त.. "ओ मिस्टर.. मगासपासून ऐकतोय उठसुठ भारतीयांच्या नावाने खडे फोडताय.. तुमच्या हे लक्षात येत नाहीये का कि तुम्ही स्वतःलाच शिव्या घालताय?" मान वळवत मी हलक्या आवाजात बोललो 'यु शूड बी प्राउड टू बी इंडियन" न जाणो व्याकरणाच्या चुका असल्या तर! 'प्रीपोजिशन लावायला हव होतं.. an इंडियन म्हणतात बहुतेक..' मी चटकन करेक्शन करणार इतक्यात..
"एम नॉट an इंडियन.." शांतपणे मागे रेलून बसत तो म्हणाला! मी सर्द! "काय? "
"मी भारतीय नाहीये..अं.. जास्तीत जास्त एन आर आय आहे मी असं म्हणू शकतो, ब्रिटीश नागरिकत्व!"

तो म्हातारा जन्माने भारतीय होता. शिक्षण सुद्धा भारतातच झालं. पुढे तो इंग्लंडला गेला मग तिथलाच झाला. "आता कधीतरी चक्कर मारतो भारतात. कामानिमित्त." तो सांगत होता.
"आता तिकडे गेलाय म्हणून असं म्हणता काय तुम्ही? हे बरंय! आमचं शिक्षण,आमचं इन्फ्रास्ट्रक्चर वापरलंत आणि आता बिनदिक्कत स्वतःला इंडियन नाही म्हणवता? तेसुद्धा अभिमानाने?"
"म्हणजे ? गेलो म्हणजे काय स्वखुशीने गेलोय असं वाटतं कि काय तुला? इथेच बिझनेस सुरु करायचा होता पण इकडे पत्ती सरकवा, तिकडे वजन ठेवा, अमक्याकडे टेबलाखालून द्या, तमक्याचा खिसा गरम करा..वैतागलो आणि गेलो निघून तिकडे. थोडे कष्ट घ्यावे लागले तिकडेपण , तरी केला स्वतःचा बिझनेस सुरु; बट विथ नो करप्शन. मी गेलो त्यावेळी आताच्या तुलनेत थोडया सोप्या होत्या गोष्टी तिकडे.मग नंतर तिथलीच नॅशनॅलिटी घेतली.ऍन्ड नाउ आएम अ प्राउड ब्रिटिश सिटिझन"
"तुम्ही सारखा सारखा भारताचा अपमान करताय असं नाही वाटत?तिथे असण-या सगळ्या गोष्टी भारतात नाहीयेत का? उगीच कशाला शिव्या घालायच्या?"
"आहे की.. सगळं जरी नसेल तरी बरंचसं आहे.पण कधी विचार केलायस की या सगळ्या गोष्टी आल्या कुठून?स्वतःचं काही आहे का तुमच्याकडे?"
"म्हणजे?हे सगळं आम्ही भारतीयांनी केलं नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला?"
"मी कशाला काय म्हणायला हवं?तूच जरा तुझ्या आजुबाजुला निरखून बघ.भारतातली सगळी सरकारी कार्यालयं ब्रिटिशांनी त्यांच्या काळात बांधली होती,त्यांच्या सोयीप्रमाणे.अजुनही तीच वापरताय ना? कार्यालयंच कशाला? जवळपास सगळ्या ऍडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग्ज,तुमच्या सनदी अधिका-यांचे रेसिडेन्शियल बंगलोज,ऑफिसर्स गेस्ट हाउसेस,क्वॉर्टर्स त्यावेळेला ब्रिटीशांनी बांधले-तेपण त्यांच्यासाठी आणि अजुनही तुमचे लोक ते वापरत आहेत..मोठ्या खोल्या,बाहेर लॉन्स,बट्लर, नथिंग हॅज चेन्ज्ड!" उसासा सोडत आजोबा थांबले.
"पण आतासुद्धा होतायत की बांधकामं.."
"कोणाची समजूत घालतो आहेस? स्वतःचीच?"हसत म्हातारा म्हणाला."व्ही टी किंवा चर्चगेट स्टेशन सारखं सुबक स्टेशन बांधलंय का रे तुम्ही लोकांनी? ही बघ डि वाय पाटील युनिवर्सिटी." गाडी वाशीतून पास होत होती.."मोठ्या बिल्डिंग्ज, शो ऑफ़ वगैरे.. पुण्याच्या सीओईपी ला किंवा इथे व्हिजेटिआय ला गेला आहेस कधी? अगदीच नाही तर निदान पुणे युनिवर्सिटी तरी?" मी होकरार्थी मान हलवली.
"तिथला ,तिथल्या कॅम्पसचा फ़ील येतो का रे या युनिवर्सिटीला पाहिल्यावर?" पॉईंट होता!
"आता होतायत म्हणतोस बांधकामं मग पुढ्च्या जनरेशनसाठी माईलस्टोन ठरेल असा एखादा तरी मास्टरपिस का नाही बनला?५० वर्ष होऊन गेली ना आता स्वातंत्र्य मिळून?" माझी बांधकाम क्षेत्रातली माहिती फ़ारशी नसल्याने मी एखादं उदाहरण देउन त्यांचं तोंड बंद करु शकलो नाही याचं मला वाईट वाटलं. पण इलाज नव्हता.
"अरे छोट्या दोस्ता.. गावागावातल्या पोस्ट ऑफ़िसांपासून अगदी संसदभवनापर्यंत सगळं त्यांनी बांधून दिलंय तुम्हाला."
कुठल्या तरी रेल्वेच्या ओव्हर ब्रिज वर ट्राफिकमुळे गाडी जरा स्लो झाली.

मी विचार करायला लागलो..हि रेल्वेसुद्धा त्यानीच दिलीय की.लाईट,रस्ते,पाण्याची व्यवस्था.. आमच्या गावात दोन ब्रिटिशकालीन ब्रिजेस आहेत,मुंबई गोवा हायवेवर असण-या असंख्य पूलांपैकी दोन. तर ग्रामपंचायतीला हल्लिच्या काळात थेट इंग्लंड वरुन पत्र आली होती की "त्या पूलांचं आम्ही ठरवून दिलेलं आयुष्य आता संपलेलं आहे तर तुम्ही पर्यायी व्यवस्था करा." ग्रामपंचायतीने उपाय म्हणून पुलाच्या कठड्यांच्या दगडांची एक रांग काढून त्यांची उंची कमी केली!

मी स्वतःच्या पायावर दगड मारून घेतोय हे माहीत असुनही आजोबांना हा किस्सा सांगून टाकला! खाज.. दुसरं काय? पण मजा येत होती. कारण हा विचार मी कधी केलाच नव्हता.ते मघासारखेच हसले.
"ब्रिटिश वेअss गुड मॅनेजssस ऍन्ड दे स्टिल आss" आजोबा बोलले."नुसतं इन्फ़्रास्ट्रक्चरच नाही तर त्यानी सिस्टिमही डेव्हलप करुन दिली तुम्हाला.या ग्रामपंचायतीसारख्या स्थानिक स्वराज्य संस्था,जमिनीचे सात बारा चे उतारे,टॅक्स सिस्टिम, राज्य आणि केन्द्रातली सरकारं... यू पिपल आ'ss जस युज'ssस"

पुन्हा एक दीर्घ उसासा सोडून आजोबा म्हणाले "ते सुद्धा वापरायची अक्कल नाही काही लोकांना.. मुळात ती मानसिकताच नाही तर कुठून समजणार? बापच पोराला सांगतो कि 'टाक choclate चा raper इथेच' , आई त्याच पोराला रस्त्याच्या कडेला 'शू' साठी उभं करते.. मग मोठेपणी हि पोरं स्वतःहून उभी राहतात.." ते केवीलवाण हसत होते.. त्यांना black कॉमेडी करायची होती. थोडाफार प्रयत्न सक्सेसफुलदेखील झाला. पण ते क्षणातच गंभीर झाले.

"कशी बदलणार मानसिकता? अहो इथे मुळात लाखो लोकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे आणि तुम्ही सामाजिक जबाबदारीची जाणीव असण्याच्या गोष्टी करताय?" मी जरा मोठे मोठे शब्द वापरून इम्प्रेस करायचा प्रयत्न केला..
"ते दुष्टचक्र आहे एक.. काही लोक देशाच नाव मोठं करण्यासाठी झटतात तर काहीना 'देशाचं नुकसान करून आपण किती मूर्खपणा करत आहोत याची जाणीवच नसते! अगदी "भारत बंद"ही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करून 'साजरा' होणा-या या देशाच भविष्य काय आहे god only knows !"
"तुमच्या सारखे कर्तृत्ववान, या सगळ्या जाणीवा असणारे लोक असेच देशाबाहेर जायला लागले आणि मी एक ब्रिटीश आहे अस अभिमानाने सांगू लागले तर मग मात्र अगदीच कठीण आहे भविष्य एवढं नक्की.."
"ब्रेन ड्रेन होतंय ते इथल्या परिस्थितीमुळे..देश तर राहूदे. कोणाला स्वतःचं घर सोडून जायला आवडेल परदेशी? त्यांना तिकडे बेटSS एनवो SS मेंट मिळत असेल तर का थांबावं त्यांनी इथं? की इथे खितपत पडायला हवं होतं,केपेबल असतानासुद्धा कोणाची तरी नोकरी करत..."

"एक मिनिट.. " त्यांना मधेच तोडत मी म्हणालो.." काय शब्द वापरलात तुम्ही?खितपत? हे टाटा,बिर्ला.. अगदी हल्लीचेच नारायण मूर्ती हे लोकं खितपत पडलेयत का इथे ?" मी माझ्या दृष्टीने रोखठोक सवाल केला..
"टाटा,बिर्ला यांची खानदानं इंग्रजांच्या काळातली आहेत मित्रा..! आणि मूर्तींचं सांगत असशील तर सर्विस प्रोवायडर आहेत ते.. मी कम्पेअर करत नाहीये पण माझं स्वतःचं पेंट प्रोडक्शन आहे....प्रोडक्ट बेस्ड कंपनी.."
"असेल.. पण विषय भरकटतोय.. तुम्ही तुमच्या बोलण्यातून इंग्रजांच्या राजवटीचं समर्थन करताय का?"
"होयच मुळी!! का करू नये यासाठी मला पटणार तार्किक कारण देऊ शकतोस का ?"
"अर्थातच, इथल्या लोकांना परकीय राजवट नको होती, हे आणि एवढं मोठ्ठ कारण तार्किक दृष्ट्या पटत नाही का तुम्हाला?"
"नाही पटत.. तसं असतं तर आणि बघायला गेलं तर लोकांना आता भारतात जे काही चाललंय ते देखील नको आहे.. कारगिल घे,बोफोर्स चं प्रकरण घे, एन्रोन प्रकल्प घे.. हे सगळं हवं आहे का तुम्हा लोकांना?" आजोबांनी विचारलं
"पण निदान जे चाललंय त्याविरुद्ध बंड करण्याइतकी वेळ तरी आली नाहीये अजून.. मुळात लोकांना त्रास होत नाहीये या राजवटीचा.. कारण--" मी कारणमीमांसा करणार तेवढ्यात मला तोडत ते म्हणाले,
"--कारण तुम्ही लोक निगरगट्ट झाला आहात.. जाणीवा मेल्या आहेत तुमच्या!! भीक म्हणून दिलेली राजवट कोडग्यासारखी 'स्वातंत्र्य-स्वातंत्र्य' म्हणून मिरवताय.."
"ओ... काहीही काय बरळताय? शेकडो-हजारो लोकांचे स्वातंत्र्यलढे, बलिदानं, अटका ,प्राणाहुती, १८५७ चा उठाव, १९४२ ची चलेजाव चळवळ, १९४७ चं बंड कश्शा कश्शालाच तुमच्या लेखी महत्व नाहीये तर मग बोलणंच खुंटलं!" माझं टाळकं सटकत होतं!
"तसं काही नाहीये.. आय अडमायs देम.. " आजोबा शांत झाले.. "पण-- " तरीही अजून 'पण' होताच!
"एवढंच इतिहासात स्वारस्य आहे तुला तर मग १८५७ च्या उठावाची कारणं माहितीयेत तुला?"
"तुम्ही काय मला मार्क देणार आहात उत्तर दिलं तर?" मी मुद्दामच तिरकसपणे विचारलं..
"नाही, पण तुला मी दिलेली उत्तर पटत नाहीयेत म्हणून तुलाच विचारतो.."
"मंगल पांडेने गायीची चरबी लावलेली बंदुकीची आवरणं दातानं तोडावी लागतात म्हणून अधिका-यावर गोळी झाडली.."
"कारण तसं केल्याने त्याचं ब्राह्मण्य भ्रष्ट होत होतं.. " ते म्हणाले आणि मी चपापलो.. उगीचंच बसमधले लोक अचानक माना वळवून आमच्याकडे टकामका पाहायला लागले आहेत कि काय असा मला भास झाला!!
"अहो हळू.. तुम्ही सारखी सारखी मोठ्या आवाजात तुमची मतं प्रदर्शित करणार आहात का ? लोकांच्या भावना दुखावतात आजकाल.."
"बरं.. " आवाजाची पट्टी खाली आणून ते म्हणाले.. "हे एक कारण झालं.. बाकीची कारणं मी सांगतो..कोणतंही कारण चुकीचं वाटलं तर तू मला थांबव.. आत्ता थांबवलंस तसं!!' डोळे मिचकावत आजोबा पुढे बोलू लागले,
"केशवपन,सती,बालविवाह सारख्या अघोरी प्रथा-रूढींवर बंदी, विधवाविवाह, शिक्षण याचं प्रमोशन, संस्थान चालकाचं दत्तक विधान नामंजूर अर्थात घराणेशाहीला विरोध वगैरे वगैरे, यातलं तुझ्या मते वैध असणारं कारण कोणतं?"
मी गप्प बसलो..पर्यायच नव्हता!
"धर्मात ढवळाढवळ का हस्तक्षेप काय तो केला म्हणून पहिला लढा झाला.. त्यात भारताचं स्वातंत्र्य हा मुद्दा नव्हताच, in fact ,अखंड भारत ही संकल्पनाच आमच्या राणीनं रूढ केली!"
भयंकर देशाभिमानी माणूस! पद्धतशीर "तुम्ही-आम्ही" करत होता.. "आमची राणी" म्हणे!
"म्हणजे काय? आमची संस्कृती,धर्म परंपरा भ्रष्ट करायला निघाले होते ते तेव्हा.."
"एक सांगतो.. खोटा अभिमान बाळगू नको.. संस्कृती परंपरा सगळ्याच देशांना असतात.. त्यांना जपून पुढे जायचं असतं.. त्यांना कुरवाळत बसून मागे नसतं पडायचं.. हे कारण आहे कारण! समजलं? आणि टीव्ही वर दिसणारं सगळं सत्य नसतं.. तिथेही कुटुंब,विवाह या संस्था आहेतच की.."
"तुम्ही मूळ विषयावर या.." वय झाल्यामुळे आजोबा संदर्भ विसरताहेत असं मला राहून राहून वाटत होतं!
"बर्र,..१९४२ च्या चलेजाव चळवळीविरुद्ध मला काही भाष्य नाही करायचं.. पण १९४७ चं बंड प्रामुख्याने सैनिकांचं होतं.. आणि ते होतं त्यांना त्यांच्या मनाविरुद्ध दुस-या महायुद्धात भाग घ्यावा लागला म्हणून.. ते जर झालं नसतं तर कदाचित इंग्रजांची सत्ता गेलीच नसती.. कुणी सांगावं??" मी चकित झालो. सगळ्या गोष्टींचे निरनिराळे पैलू हा माणूस सांगत होता.. सेल्फ analysis का कायसंसं म्हणतात ना तेच करून!!

"१९४२ चा लढ्याबद्दल का बोलायचं टाळताय?" मी त्यांना पेचात पकडायचा प्रयत्न केला..
"तुला क्रिकेट आवडतं का रे?"
"विषय बदलू नका.. चलेजाव चळवळीचा उल्लेख का टाळताय?"
"विषय नाही बदलत.. पण क्रिकेट मध्ये पाहिलं आहेस का? हरत आलेल्या सामन्यात शेवटच्या षटकांमध्ये एखाद्या बोलर ने केलेल्या फटकेबाजीमुळे सामन्याचं चित्र पालटतं आणि हरणारा संघ जिंकतो मात्र त्याचं क्रेडीट जातं आधी कुणीतरी केलेल्या शतकाला.."
"त्याचा इथे काय संबंध? "
"संबंध आहे ना..
" शतक करणारा पायाभरणी करत असतोच की!"
"पण शेवटी ती झालेली फटकेबाजी जर झाली नसती.. तर आधीच्या शतकाला काय अर्थ?"
"बरं.. मग पुढे?"
"आय ऑनर द फ्रीडम फायटर्स, आय अडमायss गांधीजी.. त्यांचे सत्याग्रह.. पण मला वाटत नाही त्याने प्रबळ इंग्रजी साम्राज्यावर शष्प फरक पडला..! त्यांना फरक पडला तो महायुद्धाचा.. युनियन नेशन्स च्या दबावाचा.."
"..."
"भारताला स्वातंत्र्य देताना विन्स्टन चर्चिल काय म्हणाला माहितीये? तो म्हणाला, Power will go to the hands of rascals, rogues and freebooters. All Indian leaders will be of low calibre and men of straw त्याला वाटत नव्हतं की भारतीय स्वातंत्र्य पचवण्याइतके मच्युअss आहेत.. थोडक्यात त्याला म्हणायचं होतं की त्यांची लायकी नाहीये!!.. आणि इथे तुम्ही,मी आपण सगळेच.. आज त्यांनीच रूढ केलेल्या पद्धती वापरतोय ना? अगदी सरकारी भाषा सुद्धा ? इंग्रज गेले पण ते फिजिकली.. तुमच्या मनामनात एक इंग्रज वसलेला आहे म्हणून सगळं थोडंफार तरी सुरळीत चाललंय,, ज्याक्षणी तो इंग्रज समूळ नष्ट झाला त्याक्षणी अराजक माजेल बघ इथे!"
मी सुन्न झालो.. आजोबांचा फोन वाजायला लागला. " जी.. मैं लोनावला पहुंचा हूँ.. रुकता हूँ यहाँ पे.. पहुँच जाना.. हां ठीक है.." ते कोणाला तरी सांगत होते.

.. गाडी एव्हाना फूड मॉल ला थांबली..
"तुम्ही इथेच थांबणार आहात का?" पंधरा रुपयांची पाणचट कॉफी घेत मी त्यांना विचारलं..
"मी चाललोय पुण्याला.. महाराष्ट्रातले इमर्जिंग मराठी बिझनेसमन्स आहेत त्यांना थोडा गाईडन्स.. आपलं... मार्गदर्शन हवं आहे..मी एक समाजकार्य म्हणून ते करतो.. जमेल तसं फायनान्स पण करतो.. पण मुळात ठकवण्याची प्रवृत्तीच जास्त आहे इथे.. त्यांना वाटतं 'इतकी वर्ष तिकडे राहिलाय, याला मराठी काय समजणार?' म्हणून माझ्यासमोरच काहीतरी बोलतात आणि फसतात.. त्यांना काय माहित, माझ्या घरी जीए,हरिभाऊ,खांडेकर,पुल,वपु सगळे सगळे पुस्तक रूपाने वास्तव्य करून आहेत ते! मी कोणाला कधीच कळू देत नाही तिथे की मी मराठी बोलतो ते.. असो.. काही लोक जातात पुढे. फसवण्याचा प्रयत्न करणा-यांनाही मी योग्य पद्धतीने हाताळतो... आज सकाळी गाडी चालू होईना म्हणून बस ने निघालो. म्हटलं बरेच दिवस झाले होते बस ने फिरून.. बघू तरी.."
मी निशःब्दपणे त्यांच्याकडे पाहत होतो..

फूड मॉल वर एक काळ्या कुळकुळीत बी एम डब्लू-इ-फोर्टीसिक्स ने एन्ट्री केली.. या गाड्या सुद्धा फार रेअर्ली भारतात आयात होत असत तेव्हा.. त्यामुळे एखादी कार दिसली तरी कार्सचे शौकीन माना वळवून वळवून ती गाडी अगदी दिसेनाशी होईपर्यंत पाहत असत.. इथे तर गाडी समोरच आली होती.. ४-५ लोकांनी गर्दी करून गाडी पाहायला सुरुवात केली..

"चलो देन.. नाईस टू मीट यो.. इट वॉज अ हेल्दी डिस्कशन.." माझी तंद्री तोडत आजोबा म्हणाले..
"तुमचं नाव ? आय मीन तुमच्याबद्दल सांगायचं झालं कोणाला तर.."
"कशाला सांगायला हवं? या सगळ्या गोष्टी मी माझ्या आनंदासाठी करतो..एम अ सेल्फिश पर्सन यु नो.." ड्रायव्हर ने दरवाजा उघडून त्यांना आता बसायला विनवलं..दरवाजा लावल्यानंतर त्यांनी काच जराशी खाली घेतली..
"तरीही.. एक आयडेन्टीटी म्हणून.." मी मोठ्याने ओरडलो..
आजोबा हसले.. "इंग्रज भेटला होता म्हणावं..!!" त्या आलिशान गाडीची काच वरती करून ड्रायव्हरला त्यांनी निघण्याची खूण केली.. आणि मला त्या अर्ध्या प्रवासात न जाणवलेली एक गोष्ट दिसली.. त्यांच्या चेह-यावर विलसणारं एक सुंदर स्मितहास्य!

मंगळवार, २२ फेब्रुवारी, २०११

बाईक रायडींग स्कूल! -उत्तरार्ध



पूर्वार्ध:
माझ्याचकडून फी चे पैसे घेऊन हा माणूस मलाच "तुमची निवड झाली आहे" असं सांगतो? कमाल आहे!!
विचार करत करत वाड्याला वळसा घालून मागच्या बाजूला असलेल्या वर्गावर मी पोहोचलो. हो.. वर्गावरच! बेंचेस,फळा, प्रोजेक्टर,रोलिंग व्हाईट बोर्ड असा जामानिमा असणा-या खोलीमध्ये. माझ्यासारखे मोजके लोक वर्गात बसले होते. अगदी शाळकरी मुलं बसतात तसे. वह्या-पेन घेऊन!! मी दबकत एका मोकळ्या बेंच वर जाऊन बसलो. नोटपॅड आणि काही स्टडी मटेरियल बेंचवर ठेवण्यात आल होतं. ते चाळायला सुरुवात करायच्या आधी मी शक्य तितका कुत्सित स्वर आणून आणि नकारार्थी उत्तराची अपेक्षा ठेऊन, समोर बसलेल्या निळसर कुर्ता परिधान केलेल्या व्यक्तीला प्रश्न केला.
"इथे वर्गात शिकवणार का गाडी?"
" आमास्नी काय म्हायती नाय बा..पर आसत्याल. पुन्यातला कलास हाय ह्यो. इद्येच म्हाएरघर म्हनत्यात ह्ये.. शिकवत आस्त्याल वर्गात गाडीबी!!"
"कुठले तुम्ही?" मी निरखून त्याचे कपडे पाहिले. मगाशी निळसर वाटणारा कुर्ता मुळात पांढरा असावा. नीळ टाकून टाकून त्याने शेवटी हा रंग धारण केला असावा हे जाणवलं..
"आं"
"म्हणजे गाव कोणतं?"
"आस्स व्हय? आमी सतारकडल.. ३० -४० किलोमीटर वरती हाय गाव आमचं.."
"पुण्यापासून?"
"आवं.. सतारपासून ..तुमी कुनीकडचं म्हनायचं.."
"कोकणातला"
"बारं.. तवाच हिथ आलायसा." गडी हसत हसत म्हणाला.. "म्या बी लय ट्रायल मारून पायला हितं गाडी चालवायचा.. पर काय जमना.. आवं.. आट आट टनाचा टरक न्हेतोया मी बाजारला गेल्या धा वर्साधरनं.. पर हितं पुन्यात -हायला आल्यापासू दोन-चाकी चालवाय तरास होतु.. जरा फुडं ग्येलो कि ह्यो इकडून घुसतोय, त्येला वाचवाय ग्येलो तर त्ये बेनं तिकडून घुस्तंय.. च्या मायला इट आला सगळ्याचा.. त्येच्यात आमची बुलेट पाचशेवाली. मागं कुत्रं आलतं चाकाखाली.. आयच्यान सांगतु.. 'क्याक' कराया बी टायम नाय घावला त्येला!! हालीच ह्या कलासबद्दल कळालं तवा म्हनल मानूस चाकाखाली येयच्या आत कलास लावून शिकू तरी पुन्यात कशी काय चालवायची ती गाडी.. "

माझ्यासारखाच होता हा बहाद्दर पण! म्हणजे सगळे नॉन-पुणेकर असणार होते.तेवढ्यात तरातरा चालत वर्गात तांडवकर सरांनी एन्ट्री केली. हा मगासचाच खडूस म्हातारा.. पण त्यांनी आपली ओळख "मी तांडवकर सर" अशी करून दिली! याला झेलायचंय? पण नाविलाज को क्या इलाज?? झेललं पाहिजे!

नमस्कार चमत्कार आणि ओळखीपाळखी झाल्यावर सरांनी "पुण्यात गाडी शिकण्यासाठी मुळात तुम्हाला पुणेकर होणे गरजेचे आहे" असे सांगून बॉम्ब टाकला. वर्गात कुजबुज सुरु झाली."व्वा,क्लास हवा तर असा!","त्याच फी मध्ये हे पण ट्रेनिंग मिळतंय तर नकोय कोणाला?","हे काय आता नवीन?","असं कसं काय होणार..?"," बोललं कि होतं का?" "नको बाई!" दबक्या आवाजात अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या..

"मला माहित आहे तुम्हाला ते शक्य नाही.." बिनधास्त हसत ते म्हणाले. "पण पुणेकरांचे काही गुण तर अंगी बाणवू शकता ना? गाडी चालवण्यासाठी त्याची आपल्याला गरज पडणार आहे" असं म्हणून 'पुणेकर' या विषयावर त्यांनी एक लेक्चर घेतले. स्वाध्याय म्हणून 'पुलं' च्या 'तुम्हाला कोण व्हायचंय?मुंबईकर ,पुणेकर कि नागपूरकर?' या लेखाचे वाचन करा असे सांगितले. काळजीपूर्वक वाचून त्यातील "पुणेकर होण्यासाठी तुम्हाला कमीत कमी शब्दात समोरच्याचा अपमान करता येणे गरजेचे आहे" यांसारखी वाक्ये लक्षात ठेवण्यास सांगण्यात आले! तांडवकरांनी "मला माहित आहे तुम्हाला पुणेकर बनणे शक्य नाही.." हे सांगून सोदाहरण या वाक्याचे स्पष्टीकरणही दिले होते.

सकाळच्या सेशन मध्ये थियरी शिकवण्यात आली त्यात वेगवेगळ्या क्लृप्त्या शिकवल्या गेल्या.आम्ही महत्वाचे मुद्दे नोंदवून घेतले..
'पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या गावी शिकलेले आर टी ओ चे नियम पुण्यात लागू नाहीत.. कागदोपत्री असतील पण पुणेकर ते मानत नाहीत. त्यामुळे तुम्हालाही ते विसरावे लागतील..'
'इथे गाडी चालवताना लांबचा विचार करायचा नाही..जवळचे विचार करायचे.. स्पष्ट सांगायचं झालं तर 'घरी पोचणे' हा झाला लांबचा विचार.. आणि समोरच्या वाहनाच्या पुढे जाणे हा झाला जवळचा विचार. पुण्यातल्या रस्त्यांवर हा विचार जो करेल तो यशस्वीपणे गाडी चालवेल, जो करणार नाही तो मागे पडेल!'
'हॉर्न हे महत्वाचे साधन आहे.. गाडीला एकवेळ ब्रेक नसला तरी चालेल पण हॉर्न हवा आणि तो वाजणारा हवा.. त-हेवाईक आवाज असणं केव्हाही चांगलंच!आणि न विसरता एका ठरावीक कालावधीनंतर हॉर्न वाजवत राहावा.'
' इंडिकेटर्स,आरसे, हेल्मेट आणि लेनची शिस्त या गोष्टी नसतील तेवढ जास्त सोयीस्कर!'
"उजवीकडून केलेला ओवरटेक फाउल धरला जातो."
"गर्दीच्या वेळी डिव्हायडर नसणारा रस्ता हा जाणा-या येणा-या वाहनांसाठी अर्धा-अर्धा विभागला न जाता साधारणत: पाऊण-पाव या प्रमाणात विभागला जातो"
"सिग्नल ला जरा कौंटडाऊन असेल तर आकडा 0 होऊन सिग्नल हिरवा होण्याची वाट न पाहता आकडा 6 वरून 5 वर येवून ब्लिंक करू लागताच गाडी पुढे दामटणे श्रेयस्कर! आणि जोश असा हवा कि सगळ्यात पुढे जाणा-याला स्वतः राष्ट्रपती त्यांच्या नावाचं पदक देऊन गौरवणार आहेत.. हे विसरलात तर पुण्यात बाईक चालवणं देखील विसरा.. "
"बाईक ने कारच्या मागे थांबणं हा बाईकचासुद्धा अपमान आहे आणि पुण्याचासुद्धा! शक्यतो कारच्या डाव्या साईडला थांबावं. ती रस्त्यात कुठेही असेल तरी!!"
"दुकानात जसं गि-हाईक सर्वात दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट आहे तशीच रस्त्यांवर पादचारी.. त्याला हॉर्नने अथवा तोंडाने जोरात आवाज देऊन घाबरवण्याचा प्रयत्न करावा..यु विल बी द मोस्ट सक्सेसफुल बाईक रायडर!!"
सर एकापाठोपाठ एक फंडे देत होते आणि आम्ही अचंबित होऊन ऐकत होतो. दोन वाजता लंच ब्रेक झाला तत्पूर्वी सरांनी त्यांच्या ५१ अफलातून 'आयडीयाज आणि थिय्रीज-मेड इन पुणे' सांगून संपल्या असल्याच जाहीर केलं.

"जेवणानंतरच्या सेशनमध्ये लोकांना झोप येते त्यामुळे शंकानिरसन आणि त्या अनुषंगाने सांगता येण्यासारखे काही असले तर सांगूयात" हि सरांची कल्पना आम्ही विद्यार्थ्यांनी (इतर काही पर्याय नसल्यामुळे) मान्य केली. पहिलाच प्रश्न 'सिग्नल' संबंधी होता.
"सर,इथल्या सिग्नलच्या बाबतीत माझं नेहमी कन्फ्युजन होतं. तुम्ही 'पुण्यातले सिग्नल्स' हा विषय जरा सविस्तरपणे समजावून सांगाल का?"प्रश्नकर्त्याने जणू काही माझ्या तोंडाचा प्रश्नच पळवून नेला होता.
"नक्कीच!" सरांच्या चेह-यावर हास्य खुललं. "पण त्या आधी सिग्नलच्या रंगाचे तुम्हाला माहिती असणारे अर्थ कोणी सांगेल का?" बरेचसे हात वर गेले.
"सर, हिरवा म्हणजे जा, भगवा म्हणजे आपला स्पीड कमी करा आणि लाल म्हणजे थांबा" एका जाड भिंगाच्या चष्मेवाल्या मुलाने पुस्तकी उत्तर दिलं.
सर कीव आल्यासारखे हसले.. "हे नियम आर टी ओ च्या कार्यालयात आणि इतर शहरांमध्ये लागू होतात." सर म्हणाले.. "पुण्यात हिरवा म्हणजे जा, भगवा म्हणजे जोरात जा आणि लाल म्हणजे थांबा पहा व जा!!" वर्गात कुजबुज सुरु झाली.
"सर म्हणजे सिग्नलला थांबायचंच नाही का? "
"थांबायचं ना! पण समोर मामा असेल तर.. मामा हा शब्द ट्राफिक पोलिसाला उद्देशून असतो हे वेगळे सांगणे न लगे. कुठल्या सिग्नलला थांबायचं आणि कुठल्या नाही हे अनुभवाने तुमच्या लक्षात येईल..." सर पुढे सांगू लागले "जर एखाद्या चौकातून डावीकडे वळायचे असेल तर सिग्नलचा नियम अस्सल पुणेकरांस मान्य नाही.. त्यामुळे डावीकडे जायचे असतानादेखील तुम्ही जर सिग्नल पडण्याची वाट बघत असाल आणि मागून कोणी हॉर्न वाजवू लागले तर तो दोष सर्वस्वी तुमचा असेल. म्हणून योग्य सवय अंगी बाणावलेलीच बरी!" सर सांगत होते.."तुम्हाला जे स्टडी मटेरियल दिले गेले आहे त्यामध्ये बरेचसे चौक,मुख्य रस्ते आणि तिथे अपेक्षित असणारे तुमचे वर्तन याचा तक्ता बनवला आहे...." फडाफडा पानं परतल्याचे आवाज येवू लागले..

मी चटकन नजर टाकली..त्यावर त्या चार्ट व्यतिरिक्त
कर्वे रस्यावरून डेक्कन कॉर्नर चौक मार्गे लकडीपूल -> प्रवेश बंद -> गेल्यास अलकाच्या चौकात मामा पावती फाडतात.
कर्वे रस्यावरून डेक्कन कॉर्नर चौक मार्गे गुडलक चौक -> सिग्नल कडे दुर्लक्ष करणे.
अलका चौकातून लक्ष्मी रस्त्याला प्रवेश बंद->कुमठेकर रस्त्यावरून कुलकर्णी पेट्रोलपंपाच्या मागच्या बाजूने पोलिसांना चकवून घुसता येते.
टिळक रोड वरचे सिग्नल आणि गर्दी टाळण्यासाठी ज्ञानप्रबोधिनीच्या रस्त्याने सरळ जावून बाजीराव रोड च्या अलीकडे उजवीकडे वळणे.
लालबहादूर शास्त्री रोड वरील लोकमान्य नगरचा सिग्नल वगळता इतर सिग्नलकडे दुर्लक्ष करणे.
असल्या काही प्रबोधनात्मक टीपा होत्या.
त्याचप्रमाणे "स्त्रियांचे वाहन कौशल्य","वृद्ध पादचा-यांचे रस्त्यांवरचे वर्तन","कार आणि बसवाल्यांशी हुज्जत" या विषयाशी संबंधित काही प्रश्न विचारले गेले. त्यावर सरांनी बहुमोल मार्गदर्शन केले.

'हुज्जत' या विषयावर १५-२० मिनिटं छोटेखानी व्याख्यान दिल्यावर सरांनी आमच्याकडून"बधीर" "माजोरी कुठचा!" "आंधळ्या" ,"बहि-या" हे शब्द आणि "रस्ता काय तुझ्या बापाचा समजलास काय रे मंद, कुठून कुठून गर्दी करायला पुण्यात येतात कोण जाणे.." हे वाक्य घोटवून मुखोद्गत करून घेतलं."हे वाक्य परवलीचं असल्याने कोणत्याही भांडणाचा शेवट करताना हे वाक्य मोठ्याने उच्चारावे व चटकन निघून जावे" असा सल्ला सरांनी दिला. तो आम्ही नोट डाऊन करून घेतला. 'इतरांनी याचाच प्रयोग आपल्यावर करू नये म्हणून कानात सदैव ईअरफोन्स असणे चांगलं म्हणजे इतरांच्या शिव्या,हॉर्न्स ऐकू येत नाही आणि आपल्याला एकाग्रता साधणं सोप जातं !' असं सुचावायलाही ते विसरले नाहीत!
तोपर्यंत चहापानाचा ब्रेक झाला.

ब्रेकमधेही सर व आमच्यात या ना त्या विषयावर चर्चा रंगत गेली. "प्रवेश बंद चा फलक केवळ शो साठी असतो" हाही सल्ला त्यांनी जाता जाता दिला. "कमीत कमी पैशात ट्राफिक पोलीस पासून कशी सुटका करून घ्यायची" याच्या १०१ क्लृप्त्या सर सांगणार होते पण त्यासाठी वेगळे पैसे पडतील हे कळल्यावर सगळे पांगले.. त्या भानगडीत माझ्या हातातला चहाचा कप गार झाला! मग काय करणार? गुपचूप चहा तिथल्याच झाडाच्या कुंडीत ओतून मी वर्गात जाऊन बसलो. तांडवकरांनी यावेळी स्वतःचं शब्दांचं त्यांच्या जिभेवर चालणारं तांडवनृत्य थांबवून प्रोजेक्टरवर एक व्हीडीओ चालू केला. त्यामध्ये पुण्यातल्या दुचाकीचालकांच्या सवयी रेकॉर्ड केलेल्या होत्या.. "नीट लक्ष देऊन बघा, खूप शिकण्यासारखं आहे यात.." सर सांगत होते. आधीच चहा झाला नव्हता आणि त्यात रेकॉर्डेड व्हीडीओ... माझ्या डोळ्यांवर झोपेनं गारुड केलं नसतं तरच नवल! प्रयत्न करूनही पापण्या एकमेकांपासून विलग व्हायला तयार नव्हत्या.शेवटी वर्गात जी ट्रिक वापरून मी काही मिनिटं निद्रादेवीसाठी अर्पण करत असे तीच मी इथेही वापरायचं ठरवलं. हनुवटी डाव्या हाताच्या तळव्यावर ठेवून बोटांनी डोळ्यांना आडोसा करून मी डोळे मिटले.

टिंक टिंक...टिंक टिंक... टेबल क्लॉकचा अलार्म वाजत होता. मी हात लांब करून गजर बंद केला. ..आणि चपापलो. मी आडवा झोपलोय? खाडकन झोप उडाली.मी उठून बसलो. 'कुठेय मी?' मी माझ्याच बेडवर होतो. घड्याळात पाहिलं. सकाळचे पाच वाजले होते. "मिशन रायडींग स्कूल सर्च" डायरी लाईट ब्लिंक करत मेमो दाखवू लागली. म्हणजे ते स्वप्न होतं तर..माझं डोकं जड झाल्यासारखं वाटत होतं. मी लाईट ऑन केला.

काय सालं स्वप्न होतं! अक्षरशः जगलो मी ते.. fan बंद करताच गादीवरच पडलेल्या नोटपॅडची पानं फडफडायची थांबली. "नोटपॅड? हे तर माझं नाहीये.." मी पुटपुटत ते उचलून बघितलं.. आतमध्ये माझ्याच हस्ताक्षरातल्या नोट्स होत्या.. आश्चर्यचकित होऊन मी त्या वाचायला लागलो..

'गावी शिकलेले आर टी ओ चे नियम पुण्यात लागू नाहीत..'
'गाडी चालवताना लांबचा विचार करायचा नाही..जवळचे विचार करायचे..'
'गाडीला हॉर्न हवा आणि न विसरता एका ठरावीक कालावधीनंतर हॉर्न वाजवत राहावा.'
'चालकाकडे इंडिकेटर्स,आरसे, हेल्मेट आणि लेनची शिस्त या गोष्टी नसाव्यात!'
मी अवाक झालो! काही सुचेना.. मी पूर्ण चक्रावून गेलो.

...समोरच असलेल्या टेबलावरचा भिंतीच्या आधाराने उभा केलेला देवांचा फोटो घसरून आडवा पडला होता. मी विचार करत तो उभा केला.. पण का कोण जाणे फोटोतला श्रीकृष्ण नेहमीपेक्षा जरा जास्तच हसत असल्यासारखा वाटत होता आणि फोटोतल्या शंकरानेदेखील मांडीची घडी बदलल्यासारखी दिसत होती!!
समाप्त.
(निर्विवादपणे पूर्णतः काल्पनिक!)

बुधवार, ९ फेब्रुवारी, २०११

बाईक रायडींग स्कूल ! -पूर्वार्ध

वयाच्या बरोब्बर अठराव्या वर्षी मी 'मोटारसायकल विथ गियर'चं लायसन्स काढलं. आधी चारेक वर्ष विना लायसन्स गाडी चालवलीच होती. त्यामुळे लायसन्स काढल्यावर तर 'अख्ख्या भारतात आपण कुठेही बाईक चालवू शकतो' असा  आत्मविश्वास कम अभिमान मला वाटू लागला होता. पण लवकरच हा भ्रमाचा भोपळा फुटणार आहे हे मला कुठे माहित होतं? पुण्यात बाईक घेवून आल्यावर स्वारगेट पासून अलका थीएटर पर्यंतच्या पहिल्याच फेरीत माझा अभिमान, पोटावर आधीच ताणला गेलेल्या लेंग्याची नाडी तुटल्यावर जसा लेंगा पडावा, अगदी तस्साच पूर्णपणे गळून पडला. रों रों करत, इकडून तिकडून हव्या तश्या जाणा-या, वेगवेगळ्या आकाराच्या आणि प्रकारच्या गाड्यांनी निरनिराळ्या पद्धतीने घाबरवून सोडत मला ब्रम्हांड आठवायला भाग पाडलं!!  'घरी धडपणे पोचलो तरी पुरे' अशी माफक अपेक्षा घेवून मी गाडी कशीबशी घेवून राहण्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचलो. मुठीत धरलेला जीव सोडल्यानंतर मला माझे गाडी शिकतानाचे दिवस आठवले..

बाईक (कशीबशी) चालवायला मी साधारण सहावी-सातवीमध्ये शिकलो. पाचवीच्या मे महिन्यातल्या सुट्टीमध्ये आमच्या एमेटीची (फार पुरातन काळात बजाजचं m 80 या विचित्र नावाचं वाहन होतं ) आणि आमची स्वतःची हाडं (आधी नुसतं पडल्यामुळे आणि नंतर घरी मार पडल्यामुळे) काहीवेळा खिळखिळी झाल्यानंतर मला मोपेड चालवता यायला लागली. 'एक गाडी आली कि बाकीच्या लगेच येतात' या विधानातला फोलपणा त्या कालखंडात मला उमगला होता. उगाच भस्सकन हे शिकायचं असं न ठरवता स्टेप बाय स्टेप जायचं अशी आमच्या मामाश्रींची शिकवण (खरतर इच्छा)  असल्यामुळे मी प्रथम सायकल शिकलो. इयत्ता दुसरी मध्ये दोन चाकांची सायकल चालवणारा मी आमच्या एरियात काही काळासाठी का होईना कौतुकाचा विषय होतो. लोकांना फक्त सायकल चालवणारा मीच दिसत असे पण माझी सोललेली कोपरं आणि खरचटलेली ढोपरं दिसत नसत. तशी दिसू नयेत याची मीच पुरेपूर दक्षता घेत असे. उगीच इम्प्रेशन कशाला खराब करा? वय वर्ष ९-१० च्या दरम्यान म्हणजेच चौथीच्या मे महिन्यात मामाने कुठूनशी एक रिक्षा पैदा केली जी रात्री आमच्या (म्हणजे मामाच्या) ताब्यात असे, त्या रिक्षाने आम्हाला (आदरार्थी एकवचन! चौथीत गाडीचं ज्ञान म्हणजे आदर दिलाच पाहिजे!! ) हातातले गियर्स, क्लच, अक्सलरेटर,ब्रेक वगैरे प्राथमिक गोष्टींचं ज्ञान प्राप्त करून दिलं.  सीटवर मामा स्वतः बसत असे आणि आम्ही handle आणि सीटच्या मधल्या  मोकळ्या आणि चिंचोळ्या जागेत उभे राहत असू. पायातला ब्रेक मामा दाबणार आणि पुढचा ब्रेक आधीच डिसेबल्ड!! तरीपण अथक प्रयत्नांती मी रिक्षा शिकलो. आता सायकल येते आणि रिक्षाही येते म्हटल्यावर एमेटी आलीच पाहिजे अस साधं लॉजिक.. पण ते आमच्या अंगवळणी पडलं नाही. आधीच म्हटल्याप्रमाणे ब-याचदा धडपड केल्यानंतर ती जमायला लागली. तीच कथा बाईकची! एमेटी आली म्हणून पायातले गियर्स जमतील याची काय शाश्वती देता येत नाही (आणि माझ्या बाबतीत तर मुळीच नाही!) मात्र तुलनेने कमी कष्टात मला बाईक जमू लागली.

आता एवढे कष्ट घेवून गाडी शिकलो तर निव्वळ पुण्यातल्या इतर चालकांना घाबरून आपण गाडीच चालवणं  सोडायचं कि काय? छे छे! हा तर पळपुटेपणा होईल.. म्हणून त्यानंतरचे आठ-दहा दिवस मी पुण्याच्या रस्त्यांवरून सुरक्षितपणे दुचाकी चालवण्याचा निष्फळ प्रयत्न करून पाहिला. पण छे.. पहिले पाढे पंचावन्न!
एका चौकात सिग्नलला (लाल रंग पाहून) उभा राहिलो. तर मागून एक कारवाला पों पों असा हॉर्न वाजवायला लागला. (खरं म्हणजे असा आवाज पी एम टी च्या हॉर्नचा येतो पण मला सोयीस्कर शब्द सापडले नाहीत म्हणून पों पों!). मला समजेना. समोर तर लाल दिवा होता. मी मागे वळून पाहिलं.
"ए.. चल की.."
"लाल सिग्नल आहे म्हणून थांबलो."मी म्हणालो.
"इथे थांबायचं असतं का?" त्याने ओरडून विचारलं.
"आमच्या आर टी ओ ने दिलेल्या तक्त्यात तरी असंच सांगितलं होतं!" मी निरागसपणे म्हणालो. पण माझा हा निरागसपणा त्याला उर्मटपणा वाटला की काय कोण जाणे. तो रागारागाने गाडी माझ्या साईडने पुढे काढत "काय च्यायला त्रास आहे.. कुठून कुठून येतात कोण जाणे."  असं मला ऐकू येईल अशा बेताने म्हणत सिग्नल लाल असतानाच निघून गेला. त्याच्या पाठोपाठ आणखी काही दुचाकीस्वार गेले. यथावकाश सिग्नल हिरवा झाल्यावर मी आणि बरोबर थांबलेले तुरळक लोक निघाले.
मग मात्र मी धसका घेतला. आपण काहीतरी वेगळं करतोय याची जाणीव पावलापावलाला होऊ लागली आणि कोणीतरी हे सगळ शिकवण्याची,समजावून सांगण्याची गरज प्रकर्षाने भासू लागली.

एके दिवशी मी ठरवलं की आता बास! काही झालं तरी सकाळी लवकर उठून पुण्यात बाईक शिकवणार स्कूल शोधायचंच! मी पहाटे ५ चा अलार्म लावला. डिजिटल डायरीत "मिशन रायडींग स्कूल सर्च" असा 'मेमो विथ अलार्म' तयार करून ठेवला . लवकर उठून तयार होऊन लगेच शोधमोहीम सुरु करायची असं ठरवून मी रात्री (नेहमीपेक्षा काही मिनिटं) लवकर झोपलो.

ठरल्याप्रमाणे उठून पहाटे लवकर मी कुठे 'बाईक रायडींग इन पुणे' अशी 'इस्पेश्यल' सर्विस देणारं स्कूल सापडतंय का पाहत चालू लागलो. सदाशिव पेठेतून नारायण पेठेत गेलो. तिथून शुक्रवार पेठेच्या दिशेने बराच वेळ चालत होतो..सगळीकडे नन्नाचा पाढा वाचला जात होता.
कुठे 'बाईक शिकवली जाईल पण पूर्ण फी भरावी लागेल' अस ठेवणीतलं उत्तर तर कुठे 'स्पेशल पुण्यासाठी? काय येडे कि काय तुम्ही?" असा सुस्पष्ट अपमान झेलत मी मार्गक्रमणा करत होतो. पुढे पुढे तर तंद्रीत चालत कुठे पोहोचलो मलाच कळेना.. कुठली पेठ होती तेही धड कळत नव्हतं. शुक्रवारेतून बुधवार पेठेकडे जाणारा रस्ता धरला कि काय अशी शंका मनाला चाटून गेली. अल्मोस्ट निर्जन रस्ता.. चढणारं उन..सकाळपासून काहीच पोटात पडलं नव्हतं. माझा घसा कोरडा पडला होता.पायही दुखायला लागल्यासारखे वाटत होते. पण सगळ्या घरांचे,हाटेलांचे दरवाजे बंद!! कुठल्या गल्लीत घुसलोय काहीच समजेना.तेवढ्यात लांबून एक माणूस येताना दिसला
"हा कुठला एरिया आहे हो? मला वाटतं मी रस्ता चुकलोय." मी म्हटलं. त्याला माझी शोधक नजर कळली असावी.
"काय शोधतोयस बाळ?"
डायरेक्ट  'बाळ' ? कमालय!
"पुण्यात बाईक चालवायची कशी हे शिकवणारी एखादी शाळा!" माझ्या उत्तरावर तो छद्मी किंवा कुत्सित यापैकी कसंतरी हसला..
"एवढा मोठा झालास तरी बाईक येत नाही?" त्याने खोचक प्रश्न केला
"तशी येते ओ..पण मागच्या काही दिवसात मला बाईक चालवता येते यावर आता माझाच विश्वास बसेनासा झालाय !" मी रडवेला चेहरा करून सांगितलं. त्या माणसाचं हृदय द्रवलं असावं.
"म्हणजे तुला बाईक येते ना? मग शिकायचंय काय ?" काय शॉट आहे हा माणूस? तोंडी परीक्षा घेत होता जणू!
"गाडी चालवण्याच मला असलेलं ज्ञान इथे कसं वापरायचं हे सांगणारं कोणीतरी!!" मीही इरेला पेटलो होतो.
प्रश्नावली थांबवून तो माणूस अंतर्मुख होऊन विचार करू लागला. नंतर त्याने कोणाला तरी फोन लावला "हलो.. देव बोलतोय रे..  एक मेंबर आहे.. अं?.. त्याला पुण्यात बाईक शिकायची आहे..अं?.. हो.. अं?.. बरर्र..अं? " असं म्हणत त्यांची थोडी गहन चर्चा झाली.
"एक पत्ता सांगतो. त्या ठिकाणी जा.. इथून जवळच आहे.."
"बरं.." मी म्हणालो. परत थोडा विचार करून साहेब म्हणाले ,"चल.. मीच तुला सोडतो तिथे.." आणि थोड्या वेळाने  पेठेतल्या कुठल्याश्या वाड्याच्या दरवाज्यात आम्ही पोचलो. कुठला भाग होता समजायला काहीच मार्ग नव्हता.. ना "सदाशिव पेठ- घ. नं. अमुक अमुक ते तमुक तमुक" असले बोर्ड, ना दुकानांवर अमकी आळी तमकी गल्ली असल्या खुणा. इतक्या वर्षात हा भाग कसा बघायचा राहिला याचंच मला आश्चर्य वाटत होतं तेवढ्यात हे सद्गृहस्थ बोलले,
"आत जाऊन "मी पाठवलंय " म्हणून सांग" त्या माणसाने मला तिथे सोडलं आणि तो आल्या पावली परत चालू लागला आणि वाड्याच्या भिंतीपलीकडे उजवीकडे वळलासुद्धा.
"अहो.. अहो..कोणी पाठवलंय म्हणून सांगू? अहो.. तुमचं नाव काय?" मी त्याच्या मागे गेलो तर हा भाई गायब! "च्यायला.. म्हातारा खूपच फास्ट चालतो.. काय नाव बरं त्याचं..? आडनाव तरी 'देव' होतं!
मगाशी फोनवर बोलताना तो तेच म्हणाला होता..साला माझं नाव जाणून घ्यायचे कष्टसुद्धा न घेता हा माणूस निघून गेला.. काय च्यायला माणसं असतात एक एक!

मी कर्र कर्र करणारा दरवाजा उघडून आत शिरलो. ओसरीवर केस वाढवलेला एक म्हातारासा  माणूस आणि त्याच्या आजूबाजूच्या खुर्च्या अडवून इतर काही लोक बसले होते.मला पाहताच त्याने डोके वहीत खुपसले आणि त्याने विचारलं
"बोला, काय काम आहे?"
"बाईक शिकायची आहे"
"क्काय?" त्याने आधी चमकून माझ्याकडे पाहिलं मग इतरांकडे अर्थपूर्ण नजरेने पाहिलं आणि तो फिदीफिदी हसला. बाकीच्यांनीही त्याचं अनुकरण केलं..
"त्यात हसण्यासारख काय आहे? बाईक चालवता येते मला.. मला पुण्यात बाईक चालवायची कशी ते शिकायचं आहे" मी त्रासिक चेहरा करून म्हटलं..
त्याचा चेहरा गंभीर झाला.. इतरांना हाताने पांगायची खूण करत त्याने मान पुढे काढत विचारलं "कोणी पाठवलं?"
"देव" मी म्हणालो
"काय शिंचा त्रास आहे.. तेहतीस कोटींपैकी कोणता देव ?"
"तुम्हाला आत्ता फोन केला होता त्यांनी.."
"अच्छा,शि-याने पाठवलं होय? काय राव, आधी बोलायचं ना?" आता साठ पासष्ठीच्या माणसाचं नाव "शि-या" इतकं ताजं(तवान) असेल हे कोणाला पटेल काय?
"बसा..अहो श्रीयुत श्रीकृष्ण देव आमचे बालमित्र.. शेजारीच राहतो. असो.. मुद्द्याकडे येऊ.. आमचा crash course आहे. एका दिवसाचा..आता सुरु केल कि संध्याकाळपर्यंत शिकाल."
"इतक्या लगेच ?" आणि त्या घाई लागलेल्या म्हाता-याचं नाव "श्रीकृष्ण देव"? ख-या देवांची नावं जितकी विचित्र नसतात तेवढी माणसांची असतात.. माझ्या चेह-यावर स्मित उमटलं. पण ते पाहताच समोरच्याच्या चेह-यावर आठी उमटली..
"तुम्हाला बाईक आधीच येते.. इथे ते ज्ञान कसं वापरायचं.तेवढंच शिकायचंय ना?"
"हो"
"बरं मग हा फॉर्म भरा. या लोकांना पण शिकायची आहे गाडी. आता सुरूच करणार होतो पण तुमच्यासाठी खोळंबलो होतो." मी गुपचूप फॉर्म आणि पैसे भरले.


नाव, वय, लिंग, सध्याचा पत्ता याव्यतिरिक्त फॉर्ममधले काही इन्टरेस्टिंग कॉलम. केवळ नमुन्यादाखल:
मी जिथे गाडी शिकलो ते गाव: अ) पुणे ब) इतर क)यापैकी नाही ________
पुण्यात कोणती गाडी शिकायची आहे? (हा पर्याय वरील 'लिंग' या कॉलमनुसार व दिलेल्या पर्यायापैकीच निवडावा )
पुरुषांसाठी/मुलांसाठी: अ) स्कूटर ब)मोटारसायकल क) यापैकी नाही________
स्त्रियांसाठी/मुलींसाठी: अ)सनी, स्कूटी,स्पिरीट किंवा तत्सम ब) activa ,डीओ किंवा तत्सम क) गाडीचे नाव माहित नाही/आठवत नाही_________
मागील पानावर सूचना होत्या. त्यापैकी काही निवडक नियम येणेप्रमाणे:
१) येथे फक्त पुण्यात गाडी चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते.यासाठी आपणास पुणे वगळता इतरत्र गाडी चालवता येणे मुळात गरजेचे आहे.
२) आपले गाव पुण्याव्यतिरिक्त इतर असणे गरजेचे आहे. (पुणेकर असल्यास हे ज्ञान आधीपासून असते त्यामुळे त्यांच्यासाठी प्रवेश वर्ज्य! )
३) वर्गामध्ये शांतता राखावी. आपले वर्तन इतरांस त्रास होईल असे नसावे. वैयक्तिक सवयींवर नियंत्रण ठेवणे (उदा वायु-परीमार्जन जसे कि ढेकर,जांभया व इतर,मोठ्याने हसणे वा बोलणे,)
याव्यतिरिक्त, 'प्रवेश नाकारण्याचे अथवा घेतलेला प्रवेश रद्द करण्याचे अधिकार संचालकांकडे राखीव'; 'कोणत्याही कारणास्तव फी परत मिळणार नाही' वगैरे टिपिकल नियम होतेच!  नमनाला घडाभर तेल , नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न, चार आण्याची कोंबडी-बारा आण्याचा मसाला कि आणखी कोणती म्हण या crash course साठी सूट होईल याचा विचार मी करत असतानाच तब्बल अर्धा तास आतल्या खोलीत घालवून आलेल्या त्याच महाशयांनी माझी एखाद्या ड्रीम जॉब साठी निवड केल्याच्या आवेशात 'तुमची निवड झाली आहे' असे सांगितले. थोड्याच वेळात 'वर्ग' सुरु होणार होता..

क्रमशः

उत्तरार्ध

सोमवार, २२ नोव्हेंबर, २०१०

निरुत्तर

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडून हनुमान टेकडीकडे म्हणजे मी राहायचो तिकडे जायचं म्हणजे चालत अवघं वीस-पंचवीस मिनिटांचं अंतर.. पण संध्याकाळी मला तेही नको वाटायचं. म्हणून मी ३०१ क्रमांकाच्या बसची वाट बघत थांबायचो..रांगेतून बस मध्ये चढायचं सुख मुंबईत अनुभवता येतं... ती मजा पुण्यात नाही! मुंबईत कितीही गर्दी असली तरी लोक रांगेतूनच चढणार. बस भरली कि गुपचूप पुढच्या बसची वाट बघत उभे राहणार.. पुढची बससुद्धा आज्ञाधारक असल्याप्रमाणे कोणताही दगाफटका न करता १० मिनिटात येणार आणि पुन्हा हे चक्र चालत राहणार. मला कोण कौतुक वाटायचं या सगळ्याचं! अर्ध्या रस्त्यावर येवून थांबणारे लोक नाहीत... बस थांब्याच्या पुढे फर्लांगभर अंतरावर बस थांबवणारे उन्मत्त ड्रायव्हर्स नाहीत..गुळाच्या ढेपेला झोंबणा-या मुंगळ्यान्सारखी दरवाजाशी झटापट करणारी बेशिस्त गर्दी नाही कि कोलमडलेल वेळापत्रक नाही. सगळं कसं शिस्तबद्ध आणि सुरळीत!

मी विचारात असतानाच बस आली आणि माझा नंबरही आला..मी बसमध्ये चढणार तोच एक युवती अचानक प्रकट झाली आणि मला बाजूला ढकलत बसमध्ये चढू लागली.. आता तरुण पोरीने धक्का दिला म्हटल्यावर माझ्यासारख्याचा तोल ढळणं स्वाभाविकच  आहे नाही का? मी आधारासाठी काहीतरी धरलं.. ते काहीतरी म्हणजे तिची ओढणी होती हे माझ्या लक्षात येईपर्यंत ती वळून वस्सकन माझ्या अंगावर ओरडू लागली..
"कुछ तमीज है के नही आपको.."
सगळा प्रकार सेकंदाच्या कितव्याश्यातरी भागात घडला असेल पण मी भांबावून गेलो..तरी सावरून मी म्हटलं..
"सॉरी,पण मी मुद्दाम नाही केलं.. तुम्ही मध्ये घुसलात.. त्यामुळे माझा balance गेला.."
"ए गपे.. मी ओळखते तुमच्यासारख्या लोकांना.. हात लावायला चान्स शोधत असता. हो की नाही?" तिने रणरागिणीचा अवतार धारण केला. नसत्या बालंटमुळे मी सर्दच झालो..
तेवढ्यात माणुसकी मदतीला धावून आली. रांगेत मागे उभे असणारे लोक मोठ्याने तिला सांगू लागले..
"ए मुली.. एकतर तू लाईन तोडून घुसलीस आणि वरून त्यांना बोलतेस? गुपचूप आत हो नाहीतर खाली येवून उभी राहा.. "
याचा मला अपेक्षित होता तो परिणाम झाला.ती आत गेली..मीही बसमध्ये चढलो तर दुर्दैवाने हे बया शेजारीच उभी! मी जरा अंग चोरून उभा राहिलो..बसायला जागा मिळाल्यानंतर मी चोरून तिच्याकडे कटाक्ष टाकला तर मला जाणवलं की ती रोखून (कि खजील होऊन?) माझ्याकडे बघत होती. मी नजर वळवली आणि खिडकीतून बाहेर पाहत राहिलो. माझा शेवटचा stop होता. मी उतरताना बसमध्ये नजर टाकली तर ती नव्हती..सुटलो! म्हणत मी माझ्या मुक्कामावर पोचलो.

दुस-या दिवशीच्या संध्याकाळी मी stop वर उभा राहिलो तर ती मुलगी मला पुन्हा दिसली. यावेळी मात्र रांगेत होती.खरतर ती रोजच असायची त्या दरम्यान तिथे, पण आम्ही कधी एकमेकांना नोटीस नव्हतं केलं.. रांगेत असताना प्रत्येकजण बसचीच वाट पाहत असतो;फार क्वचित रांगेत कोण आहे ते पाहतो आणि दहा मिनटांनी बस अशी फ्रिक्वेन्सी असेल तर कधी ती आधी निघून जाणं किंवा मी आधी निघून जाणं असं होत असावं.. तिनेही मला पाहिलं. मी उभा राहताच ती आपला नंबर सोडून माझ्या मागे येवून उभी राहिली. कालच्या प्रसंगाची आठवण झाल्यामुळे मी उगाचच कॉशस झालो..
"हलो मिस्टर..  " ती माझ्याशीच बोलत होती..
"अं? "
"एम सॉरी..कालच्या इन्सीडन्सबद्दल.."
"इट्स ओके..." पोरगी स्वतःहून माफी मागतेय म्हटल्यावर माफ करायची संधी कशाला सोडा? नाहीतरी माझ्या बाबतीत असले प्रसंग वारंवार येत नाहीत..
"मी काल जरा घाईत होते.."
'म्हणून चारचौघात माझी इज्जत काढायची..?' ओठांवर आलेले शब्द मी महत्प्रयासाने रोखून धरले.. "हरकत नाही.. होतं असं कधी कधी.. पण नसतीच आफत आणली होती तुम्ही काल.." मी प्रकटपणे बोललो..
"सॉरी वन्स अगेन.. पण तुम्ही मला माफ केलंय ना?"
"हो.." वास्तविक 'चल..केलं तुला माफ' असं स्टाईलमध्ये मला म्हणायचं होतं पण ते अगदीच पुस्तकी वाटलं असतं...तिच्या प्रश्नासारखच!

तिच्याशी बोलताना मला अवघडायला झालं होतं. भूकही लागल्यासारखी वाटत होती.
"मी जरा काहीतरी खाऊन येतो.. भूक लागली आहे"  मी निमित्त काढून रांग सोडून शेजारच्याच हॉटेलात गेलो. डोश्याची ऑर्डर देऊन  सरकणा-या रांगेकडे पाहत स्वस्थ बसून राहिलो. भिरभिरत्या नजरेने तिने इकडे तिकडे पाहिलं. हॉटेल तिथून दिसत होतं आणि तिथे बसलेला मीही! परत एकदा नजरानजर होताच मी ओळखीचं हसू चेह-यावर आणलं. तिने स्माईल देत नजर वळवली आणि काहीतरी विचार करून माझ्याच दिशेने चालत यायला लागली!! माझे धाबे दणाणले.. काल काहीच केलं नव्हतं तर पब्लिकमध्ये तिने माझी बेइज्जती केली होती आज तर तिच्याशी बोललो होतो आणि आता तिला पाहून मी चक्क हसलो होतो! काय च्यायला ब्याद आहे...
'उठून पळून जावं का?' असा विचार करत मी बुड खुर्चीवरून उचललं तर वेटर डोसा आणून ठेवू लागला.. अडकित्त्यात सापडलेल्या सुपारीला जर जीव असता तर तिच्या चेह-यावर जे भाव आले असते सेम टू सेम भाव माझ्या चेह-यावर तेव्हा आले असावेत.. कारण माझी ती केविलवाणी अवस्था बघून "सर,वॉशरूम जाना है क्या?" असं वेटर आगाऊपणे विचारू लागला!
जवळ आल्यावर मोहक हास्य चेह-यावर आणत ती म्हणाली.. "मलाही अक्चुअलि कॉफी प्यावीशी वाटली होती मगाशी.. आय वॉज सर्चीन फॉर अ कंपनी.. इफ यु डोन्ट माईंड देन कॅन आय..?"खुर्ची सरकवत तिने विचारलं..
"येस..शुअर..प्लीज"  मी तिला बसण्यासाठी खाणाखुणा केल्या..
"भैया,एक कॉफी लाना..फिल्टर्ड "
मला प्रचंड भूक लागली होती.. ऑफिसमधलं जेवण खास नव्हतं त्यामुळे जास्त जेवलोही नव्हतो. पण डोश्याला हात लावायचा कसा? एकतर ती समोर बसल्यामुळे मला प्रचंड ऑकवर्ड वाटत होतं. आणि काट्याचमच्यांशी खेळत डोसा खायचा माझा खरच मूड नव्हता. पण जाऊ दे.. उगीच इम्प्रेशन डाऊन नको करायला.. मी डाव्या हातात फोर्क घेऊन चमच्याने डोश्याचे ताटलीबाहेर पसरलेले पंख आत मुडपत तिला ऑफर दिली..
"यू कॅन have धिस..इफ यू विश.."
"या.. आयल have ओन्ली वन बाईट.."  कमालय! कालचीच ओळख असूनही जुन्या मित्राशी बोलावं तशी ती बोलत होती..
"मला नाही बुवा हे काट्याचमच्याने खाणं जमत!"म्हणत तिने हातानेच घास मोडला..
"मलाही!!" फोर्क बाजूला ठेवता ठेवता सुटकेचा निःश्वास सोडत मी बोललो.. जरा कम्फर्टेबलही झालो.
मग औपचारिक ओळख झाली. कुठे काम करतो,कुठे राहतो वगैरे जुजबी माहिती विचारून झाली.. माझ्या वाटेवरच कुठेतरी ती राहत होती.
"इफ यु डोन्ट माईंड तर आपण चालतचालत जायचं का?" बाहेर पडताना तिनेच विचारलं.
"हरकत नाही.. सोबत कोणीतरी असेल तर काहीच वाटत नाही..एकट्यानं चालायचं म्हणजे जीवावर येतं बुवा"

त्यानंतर मग दर संध्याकाळी तिला अंधेरी सीप्झ वरून national पार्कपर्यंत यायला तिच्या कंपनीची बस असायची आणि त्या stop पासून तिच्या सोसायटीच्या लेनपर्यंत माझी कंपनी!

ती मूळ मुंबईची नव्हती तरी तिला इथे बरीच वर्ष झाली होती. शिक्षणासाठी म्हणून दहावीनंतर ती या मायानगरीत आली होती. आधी कोणा नातेवाईकांकडे राहायची मग रूममेट्स बरोबर राहायला लागली. जॉब करायला लागूनही काही वर्ष झाली होती. त्यामुळे तिचे 'लुक्स'ही एखाद्या अस्सल मुंबईकर मुलीइतकेच मॉड होते. बोलायला खूप आवडायचं बहुधा तिला. काय काय आवडतं, काय काय करता येतं, छंद, मित्र मैत्रिणी, नातेवाईक माती धोंडे एक ना दोन ! एकदा सुरु झाली कि सांगतच राहायची! एकवरून दुसरा दुस-यावरून तिसरा असे विषय निघायचे..पण निव्वळ गॉसिप्स नव्हे तात्विक,वैचारिक चर्चाही झडायच्या.. पण कसंही करून आर्ग्युमेंट जिंकणं तिला आवडायचं. खरं म्हणजे समोरच्याला निरुत्तर करणं तिला आवडायचं!

स्त्री-पुरुष यांच्यातली नाती हा तिचा खास जिव्हाळ्याचा विषय. विश्वातल्या सर्व महत्वाच्या गोष्टी याच्याशीच रिलेटेड असतात हा तिचा सिद्धांत होता.. रामायण सीतेमुळे, महाभारत द्रौपदीमुळे अगदी पहिलं महायुद्ध फ्रांझ फर्डिनांड च्या गर्लफ्रेंड मुळे कसं घडलं हे सांगून ती तिच्या सिद्धांताची सिद्धता मांडत असे आणि माझ्यासमोर निरुत्तर होण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय राहत नसे!

कधीतरी बोलता बोलताच आमच्या पहिल्या भेटीबद्दल उल्लेख झाला..
"तुला आठवतं ना.. तू बसमध्ये चढत असताना मी घुसले... " झालं.. मी झालेला अपमान विसरण्याचा प्रयत्न करतोय तर ही पुन्हा पुन्हा जखमेवर मीठ चोळतेय..
"मला त्या रांग तोडून मध्ये घुसण्याबद्दल काहीच नाही बोलायचं अगं.. पण 'चान्स शोधत असतोस'  असं काहीतरी बोललीस वाटतं. हे असले आरोप म्हणजे जरा.."
"सॉरी ना अरे.. पण आत्तापर्यंतचे अनुभव इतके आलेत ना मला लोकांच्या नजरांचे..लोकल, बस, हॉटेल कुठेही जा; बायका, मुली सगळ्यांकडे असे वखवखलेल्या नजरेने बघत असतात पुरुष.."
"काहीजण असतीलही पण म्हणून अख्ख्या 'पुरुष' या जमातीला एकाच तागडीत तोलायचं का?"
"का नाही.? ओल्याबरोबर सुकंही जळणारच ना?"
"२५ टक्के तरी चांगले असतीलच ना? त्यांच्यावर का अन्याय?" मी विचारलं
"२५? जास्तच बोलतोयस तू अरे! फारफारतर १० टक्के असतील.."
"एवढे कमी तर मुळीच नसतील.. माझ्या मते वाईट पुरुष वीसेक टक्के असतील.. नाहीतर छेडछाड, विनयभंग, बलात्कार यांच्या 'बातम्या' होणं बंद झालं असतं..." मी म्हटलं.
"म्हणजे?"
"आय मीन, बातम्या अश्याच गोष्टींच्या होतात ना ज्या सरसकटपणे सगळीकडेच होत नाहीत? सामान्य माणूस जगतोय ती बातमी नाही होत किंवा तो वृद्धापकाळाने मेला तरी ती बातमी नाही होत पण एखादा तेविसाव्या वर्षी हार्टफेल ने गेला, किंवा कधीतरी अपघातात गेला तर त्याची बातमी होते कारण ही घटना नेहमी नेहमी घडणारी नाही.. तसंच त्या गोष्टींचही आहे." मी स्पष्टीकरण दिलं.
"मी सांगतेय ती कॅटेगरी वेगळी आहे.. शंभरातले २० पुरुष असतील वाईट असं गृहीत धरू तुझ्या अनुमानाप्रमाणे. मी म्हणतेय ते चांगले १० टक्केही सोडू पण म्हणून बाकीचे ७० टक्के सभ्य असतातच असं नाही..कदाचित त्यांच्यात गट्स नसतात! ते संधीच्या शोधत असतात. तूच बघ ना..मगाशी म्हणालास त्याच 'बातम्या' चवीने वाचता ना तुम्ही लोक? हेडलाईन वाचल्यानंतर पूर्ण बातमी कशासाठी वाचतो आपण? त्याचे डीटेल्स मिळावे म्हणून.. इथे काय डीटेल्स अपेक्षित असतात तुम्हाला?"
मी निरुत्तर झालो.. खरं होतं तिचं म्हणणं. काय डीटेल्स हवे असतात? वर्णनच ना? शी..मला स्वतःचीच घृणा आली.पण माघार घ्याची नाही असं मी ठरवलं होतं. आता मी नुसता 'मी'च नव्हतो तर अख्ख्या पुरुषवर्गाचा प्रतिनिधी होतो!
"हं.. हेही खरंच म्हणा..मी कधी हा विचारच नव्हता केला. आपल्या इथे स्त्री-पुरुष,मुलगा-मुलगी या संबंधांना समाजाने इतकं टोकाचं निषिद्ध बनवून ठेवलंय की केवळ कुतूहल शमवायाच्या इच्छेपोटीच हे प्रकार होत असावेत अजूनही.. पण मुलीही यात मागे नसतात. त्यांनीसुद्धा कपड्यांचं, राहणीमानाचं, तारतम्य बाळगलं पाहिजे कि नको?"
"म्हणजे ? मुलींनी काय आपली आवड मारायची? हिरोईन्स घालतात तेव्हा चालतं तुम्हाला.पण तीच fashion आम्ही केली कि बोचणा-या नजरांचा सामना करावा लागतो"
"हिरोईन्सना तरी कोण चांगल्या नजरेने बघतं? फक्त पडद्यावर असतात म्हणून त्यांना त्या नजरा नाही टोचत! पण मला सांग.. पुरुषांचे कपडे कधी पाहिलेस का तू? सेमी ट्रान्सपरन्ट, गळा, पाठ दाखवणारे कपडे का नसतात त्यांचे? त्यांच्या शरीराची वळणं का दिसत नाहीत शर्ट मधून ? पिक्चरमध्ये हिरो देखील उघडे फिरतात म्हणून वास्तवात सगळे तसं करत नाहीत..मुलींना सुद्धा लक्ष वेधून घ्यायची खुमखुमी असेलच ना? आता हेच बघ,मुलींचा सलवार कुडत्यासारखा सुसभ्य पंजाबी पोशाख पण त्यातला सलवार, आता घोळ असणारा चुडीदार किंवा पटियाला  न राहता पायाचा पूर्ण आकार दाखवतो..ओढणी राहायला पाहिजे तिथे न राहता गळ्याबरोबर जाते. कमीजचे साईडला असणारे कट्स कमरेपर्यंत पोहोचलेत, या तुझ्या  top वरच बघ, या असल्या लक्षवेधक कोट्स असतात.  मग पुरुष चळले तर पूर्ण दोष त्यांनाच नाही ना देता येणार?"
"हे बघ.. आकर्षक दिसणं आम्हा मुलींना आवडतं कारण तो त्यांचा अंगभूत गुण आहे आणि मुलांना तसं वाटत नाही त्याला कोण काय करणार?"
तिच्या या विधानासरशी मी शरणागती पत्करली आणि तिच्याबरोबरच्या आधीच्या इतर असंख्य आर्ग्युमेंट्सप्रमाणे हाही वादविवाद मी हरलो! पण पुरुषवर्गाबद्दल असणारा तिचा हेटाळणीचा सूर कशाने आला असावा याचं मात्र मी उत्तर शोधत राहिलो..

तिच्याशी बोलणं म्हणजे नॉलेज शेअरिंगचं सेशन असायचं. वेगवेगळ्या संवेदनशील गोष्टी,भावभावनांचे बंध,नात्यांचे कंगोरे हळुवारपणे उलगडत जायचे. पण कधीतरी फारच कठीण काहीतरी बोलायची, जड जड शब्द वापरायची! एवढे की समजून घेताना माझ्या नाकी नाऊ येत. त्यात पुन्हा मधूनच "तुला काय वाटतं?' 'बरोबर की नाही?' 'तू तिथे असतास तर काय केलं असतंस' असले प्रश्न विचारून ती माझं मत आजमावत असे, त्यामुळे तिचं बोलणं पहिल्यापासून काळजीपूर्वक ऐकावं लागे! रूममेट्स,मालकीणबाई ज्यांना ती 'मावशी' म्हणायची आणि तिचे आई-बाबा हे तिच्यासाठी विश्व होतं.वीकडेजमधल्या २० मिनिटांच्या वॉकमध्ये होणा-या बोलण्यात त्यांच्या गमतीजमती,त्यांच्यातली भांडणं, रुसवेफुगवे,  काढलेल्या समजूती याचा उल्लेख नसेल तर मलाच चुकल्याचुकल्यासारखं  वाटायचं! आणि वीकेंडला? मुळीच काही वाटायचं नाही कारण डेली सोप मधला एखादा भाग चुकला तर आपल्याला कुठे फारसा फरक पडतो? नाही का?

एकदा चालता चालता nansy कॉलनी आली तरी ती काहीच बोलत नव्हती. माझ्या बोलण्यालाही react होत नव्हती.
"काय गं, आज अचानक एवढी अबोल का झालीस?"
"अं.. काय?" तंद्री भंग पावल्यासारखी ती बोलली..
"..बरं वाटत नाहीये का?" मी विचारलं.
"आई-बाबा लग्न करायचं म्हणताहेत.."
"परत? आणि या वयात?" मी पीजे टाकला. तेवढाच तिचा मूड ठीक होईल असं मला वाटलं.
"गप रे.. माझं लग्न म्हणतेय.."
"मग मूड ऑफ करून घेण्यासारख काय आहे त्याच्यात? चांगला जीवनसाथी मिळेल ना तुला..कि तू ऑलरेडी कोणी शोधला आहेस?" मी विचारलं.
"..."
"काय गं.. काय झालं?"
"आय had बीन इन्टू द रिलेशनशिप फॉर समटाईम.." ती म्हणाली.माझ्यासाठी नवीन गोष्ट होती ती. एवढं काय काय सांगत असायची पण कधी बोललीही नव्हती ती या विषयाबद्दल..
"मग?"
"वी ब्रोक अप टू इअर्स अगो.."
"हम्म.." मी सुस्कारा सोडून तिला सहानुभूती द्यायचा प्रयत्न केला. "प्रेमात कधी कधी होतं असं..आणि दोन वर्षांपूर्वी ना? मग आता अचानक एवढं काय वाईट वाटून घेतेयस त्याचं? " मी विचारलं.
"काय असतं रे प्रेम म्हणजे? खरंतर तसं काही असतं का याच विचारात आहे मी.. शारीरिक आकर्षण म्हणजे प्रेम वाटण्याच्या वयात आमचं नातं सुरु झालं." ती सांगायला लागली.
"त्रास होणार नसेल तर दुरावलात कशामुळे ते सांगशील?" मी विचारलं..
"तुला माहितीये का? मुली मुलांपेक्षा दोन वर्षांनी जास्त मच्युअर असतात.." ती तंद्रीत असल्यासारखं बोलायला लागली..
"काय?" नवीनच माहिती कळत होती मला.
"म्हणजे सपोज मुलगा आणि मुलगी१८ वर्षाचे आहेत तर मुलगा २० वर्षाचा असल्यावर जो विचार करू शकतो तोच विचार मुलगी १८व्या वर्षीच करत असते. तिला तेव्हाच समाजाचं,जनरीतींच भान असतं.."
"त्याचा इथे काय संबंध?" ती घालत असलेलं कोडं सोडवायचं की तिचं बोलणं ऐकायचं या दुविधेत मी अडकलो.
"अरे त्याच्यामुळेच तर नैतिकता टिकून राहते स्त्री-पुरुषांच्या नात्यांमधली.." ती सांगत होती.
"म्हणजे?" मी आणखीनच गोंधळात पडलो!
"म्हणजे कुठल्या नात्यात कुठपर्यंत जायचं त्याचं लिमिट मुलींना कळतं..निदान मला तरी कळलं होतं. म्हणूनच मी लांब जायचा निर्णय घेतला. त्याच्यासाठी तेव्हा प्रेम म्हणजे भावना नव्हत्या त्याला वाटायचं प्रेम म्हणजे नुसतं..." ती दुसरीकडे बघत चालत राहिली. बहुतेक तिच्या डोळ्यात पाणी आलं असावं. त्याक्षणी मन मागे गेलं आणि मला आमची पहिली अपघाती भेट पुन्हा आठवली. त्या सगळ्या गोष्टींचा, तिच्या reactions चा, आमच्या डिस्कशन्सचा उलगडा झाला..तिने समस्त पुरुषवर्गाबद्दलचा तिरस्कार का बाळगला होता याचं उत्तर मला अचानक गवसलं!
"शारीरिक गरजा कोणाला नसतात? अरे..मुलींनासुद्धा त्याच फीलींग्ज असतात किंबहुना मुलांपेक्षा जास्तच.. पण त्यांना सेल्फ कंट्रोल खूप चांगल्या पद्धतीने माहित असतो.." ती सावरून म्हणाली
"असेलही कदाचित. मी एक मुलगा आहे. त्यामुळे तुझ्या भावना समजून घेणं कठीण जातंय मला.
 काही क्षण शांततेत गेले..
"असो.. आता त्याच्याशी आता काही contact?" मी विचारलं.
"त्याचा फोन येतो. मी म्हणतेय त्या चुका उमगल्यात म्हणतो. सगळ्याची जाणीव झालीय त्याला असं वाटतंय एकंदरीत."
"अगं मग बरंच आहे ना? तुला लग्न पण करायचं आहे आणि यू have युअर man ऑल्सो.."
"हम्म.. पण अरे घरच्यांनीसुद्धा मुलगा बघितला आहे."
"हे बघ.. अ नोन डेव्हिल इज थाउजंड टाईम्स बेटर than द अननोन रास्कल! असा मेसेज आला होता मला.." मी म्हटलं.. ती खळखळून हसली.
"तेही खरंच.. शेवटी लग्न म्हणजे कॉम्प्रोमाईज.. एक तडजोड. नाही का?"तिने विचारलं.
"पण ते अरेंज्ड असेल तर! राईट?? " मी हसत युक्तिवाद केला. ती पहिल्यांदाच निरुत्तर झाली.

मी मुंबई सोडली त्याला काही महिने लोटले. कालांतराने तिचं लग्नही झालं.त्याच्याशीच! दहिसरला त्यांनी संसार थाटला.कामानिमित्त असाच मुंबईला गेलो तेव्हा मित्राबरोबर दहिसरच्या ठाकूर मॉल मध्ये जायचा योग आला. आणि काय योगायोग पहा. या बाईसाहेब आणि त्यांचा नवरा शॉपिंग साठी तिथे आले होते. शॉपिंग आटपली होती आणि ते बहुधा निघायच्या बेतात होते. आमचे मित्रवर्य खरेदीत गुंग होते. मी तिला हाक मारली. तिला आश्चर्याचा धक्का बसला. प्राथमिक चौकशी झाली. तिच्या नव-याला माझी आणि मला आपल्या नव-याशी ओळख करून दिल्यानंतर आम्ही जरावेळ गप्पाटप्पा केल्या. निरोप घेतल्यानंतर तिचा नवरा गाडी काढायला गेला. गेटजवळ आम्ही बोलत थांबलो.
"घरी येऊन जा ना.. आमचा संसार बघ.." ती म्हणाली.
"येईन. वेळ काढून नक्की येईन. बरं... रमलीस ना संसारात?" मी विचारलं. ती हसली आणि म्हणाली.."तू म्हणाला होतास ना की लग्न अरेंज्ड असेल तरच ते कॉम्प्रोमाईज असतं? तर ऐक... कुठलंही लग्न म्हणजे तडजोडच असते.. अरेंज्ड असेल तर ती तडजोड आपण लग्नानंतर स्वीकारतो आणि प्रेमविवाह असेल तर ती आपण आधीच स्वीकारलेली असते! राईट??"
मला पुन्हा एकदा निरुत्तर करून जाणा-या तिच्या पाठमो-या आकृतीकडे मी पाहतच राहिलो.