सोमवार, १८ ऑक्टोबर, २०१०

मुन्नी बदनाम हुई: एका खंडकाव्याचे रसग्रहण

भारतीय सांगीतिक इतिहासात उलथापालथ घडवून आणण्याची ताकद असणा-या "मुन्नी बदनाम हुई" या खंडकाव्यावर भारतातील आघाडीच्या वर्तमानपत्रांमध्ये अग्रलेख येणं तर सोडाच पण या काव्याची साहित्यविश्वाने साधी दखलही घेऊ नये याचं आम्हांस फार वैषम्य वाटलं म्हणूनच या काव्याला (ज्याला सामान्य लोकांनी 'गाणं गाणं' म्हणून हिणवलं) सदर मीमांसा अर्पण!
या कवितेतील वाक्य-वाक्यात दडलेल्या परिपूर्ण प्रतिभेचा रसास्वाद घ्यायचा आम्ही एक क्षीण प्रयत्न करणार आहोत. सुरुवातीपासून स्टार्ट  करू!

मुन्नी बदनाम हुई, डार लिंग तेरे लिये..

मुन्नी म्हणतेय कि हे प्रियतम, फक्त तुझ्यासाठी ही मुलगी जिला सगळे लाडाने मुन्नी म्हणत असावेत,तिची बदनामी झाली.. ती कशी झाली याचं उत्तर गाण्यात सापडतं का ते आपण पाहूया. येथे डार लिंग हा शब्द डार्लिंग या इंग्रजी शब्दाचा अपभ्रंश असावा. त्यावरून मी 'प्रियतम' हा सर्वांना समजेल असा सुटसुटीत शब्द योजला आहे. या पहिल्या वाक्याचं समर्थन करताना ती पुढे म्हणते,

मुन्नीके गाल गुलाबी,नैन शराबी,चाल नवाबी रे....
..मुन्नीने नेहमीप्रमाणे मेकअप केला आहे त्यामुळे तिच्या गालावर त्याची गुलाबी छटा पसरली आहे, तसेच ती बहुधा जरा जास्तच व्होडका पिऊन आली असावी,ज्या पद्धतीने मलायका अरोरा या गाण्यात नाचली आहे त्यावरून कोणी आमच्या विधानाला हरकत घेईल असे वाटत नाही. आणि पुढे पहा.. अल्कोहोल चा ओव्हरडोस झाल्यावर पावलं राजेशाही थाटात पडणं साहजिकच आहे नाही का? तो थाट वर्णन करताना तिनं म्हटलंय कि माझं चालणं असं आहे कि जणू नवाब लोकांचा थाटच ! ती पुढे म्हणते..

ले झंडू बाम हुई, डार लिंग तेरे लिये..
म्हणून हे प्रियतम, तुझ्यासाठी मी 'झंडू बाम' झाले. म्हणजे अर्थातच तुझ्या सगळ्या दुखण्यावरचा उपाय झाले. फक्त एवढाच मर्यादित अर्थ नाहीये या ओळीचा;तर मतितार्थ लक्षात घ्या. बाम ही वस्तू डोकेदुखी दूर करण्यासाठी वापरली जाते, तसेच 'कमर मे मोच,पीठदर्द,घुटनों में दर्द' साठी प्रभावी उपचार म्हणून याचा प्राथमिक वापर होतो. माझं गाणं ऐकून होणारी डोकेदुखी, किंवा माझ्यासारखं नाचताना लचक आली तर त्यापासून सुटका कशी करायची? तर या ओळीतून मुन्नीने सर्वांसाठी इलाज सुचवला आहे.
पुढच्या नवरात्रात किंवा गणपतीत हे गाणं जेव्हा जोरजोरानं वाजेल तेव्हा म्हाता-या लोकांना डोकेदुखी हमखास सुरु होणारच. या वर्गाला होणारा स्मृतीभ्रन्शाचा विकार विचारात घेता सुनेला जेव्हा ते हाक मारतील तेव्हा त्यांना सोयीस्कर जावं यासाठी मुन्नी त्यांना ब्रांड देखील सुचवते. गाणं ऐकताच ते म्हणू शकतील "सुनबाई, जरा झंडू बामची बाटली आण गं!"
हेच या गाण्याचं धृवपद आहे. केवढी मोठी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून हे गाणं लिहिलं गेलं आहे याची कल्पना ऐरागैरा करूच शकणार नाही!

शिल्पासा फिगर बेबो सी अदा , बेबो सी अदा...
ती म्हणते माझा बांधा शिल्पा (ही शेट्टयांची असावी, कारण शिरोडकरांचा बांधा जाहीर उल्लेख करण्यासारखा राहिला नाहीये!) सारखा कमनीय आहे. वा! वा ! शब्दा-शब्दातून सौंदर्याचे नवीन मापदंड कसे उभे केले आहेत ते पहा.. माझ्या अदा म्हणजे नटणं मुरडणं हे कपूरांच्या करीनासारखं आहे. बहुधा सध्याच्या काळात तिची दखल घेण्याजोगी ही एकच गोष्ट असावी. तिची फिगर मुन्नीच्या नजरेतून कशी सुटली हा मात्र संशोधनाचा विषय होऊ शकतो.असो! तर मुन्नी म्हणते..

है मेरे झटके में फ़िल्मी मज़ा रे फ़िल्मी मज़ा...
मुळात 'फ़िल्मी मज़ा' हा काय प्रकार असतो हे माहित नसल्यास या वाक्यातून काही अर्थबोध होणार नाही. आम्ही संशोधनाअंती असा निष्कर्ष काढला कि भारतीय भाषेत फिल्मी म्हणजे 'आभासी'! त्यामुळे प्रत्येकाच्या कल्पनेमध्ये 'मजा' या शब्दाचा जो 'अर्थ' ऐकणा-याला अभिप्रेत आहे, तो त्याने घेतला कि या वाक्यातली मजा कळेल! (आधी हे वाक्य कळलं का बघा!) मुन्नीने अंगाला दिलेल्या प्रत्येक झटक्याबरोबर तुम्हाला 'ती मजा' घ्यायची असेल तर कल्पनाशक्तीला जेव्हढा वाव देता येईल तेवढा चांगलं! पण हे समजणारे फार थोडे लोक असतात आणि याची मुन्नीलादेखील जाणीव आहे बरं का? म्हणूनच ती पुढे म्हणते..

हाय तू न जाने मेरे नखरे पे..... हाय तू न जाने मेरे नखरे पे लाखों रुपैया उड़ा..
ज्याना ही उपरोल्लेखित 'मजेची जाण' आहे त्या सुजाण लोकांनी लक्षावधी रुपये या मुलीवर उधळले आहेत अशी कबुली ती स्वतःच देते. यावरून तिच्या व्यवसायाची साधारण कल्पना येते.

वे मैं टकसाल हुई , डार लिंग तेरे लिये..

म्हणजे पहा.. नुसत्या नख-यावर खो-याने पैसा ओढणारी ही (बार)बाला स्वतःला टांकसाळीची समर्पक उपमा देते. यावरून प्रियकर म्हणून तिचा रोख साधारण बारमालकाकडे अथवा तो फारच वयस्कर असल्यास त्याच्या मुलाकडे असावा असे वाटते. इथे मुन्नीच्या प्रतिभेला दाद द्यावी तितकी थोडी! पुढे मुन्नी म्हणते..

सिने माहॉल हुई , डार लिंग तेरे लिये..
म्हणजे संधीविग्रह केल्यानंतर हे वाक्य "सिनेमा हॉल हुई" असं असावं. मल्टीप्लेक्स मध्ये एंटरटेनमेंट ट्याक्सच्या नावाखाली ओढला जाणारा प्रचंड पैसा लक्षात घेता ते पैसा छापण्याच मशीन बनलं आहे यात शंका नाही. नेमका हाच मुद्दा उचलून मुन्नीने स्वतःच स्वतःला ती उपमा दिली आहे. 'मी नाचगाण्यातून  किती पैसा मिळवते आहे ते पहा, आणि ही गोष्ट विचारात घेता तू इकडे आकर्षित व्हायला काहीच हरकत नसावी' असे मुन्नीला येथे म्हणायचे असावे!

पुढील कडव्याला स्पर्श करण्याआधी थोडी पार्श्वभूमी सांगणे आवश्यक वाटते!
वास्तवात मुलींशी साधे बोलायचे देखील गट्स नसणारा एखादा नवखा खेळाडू, सोशल नेट्वर्किंग साईटवर मुलींचे प्रोफ़ाईल्स चाळून त्यांना इम्प्रेस करण्यासाठी फोटोजवर "u look cool " "nic snap dear ! " "beutiful dear.. " "gorgius " अश्या (अशुद्ध लेखन असणा-या) कमेंट्स देऊन नंतर "माझ्यशी मैत्री कर्नर क ?" किंवा "wana b my frend?" वगैरे विचारतो. इथे खुल्ली ऑफर देणा-या मुन्नीने तिच्याबद्दल एवढ सांगितल्यानंतर तिथे असणा-या एखाद्याला तिच्याबद्दल अभिलाषा निर्माण झाली नाही तरच नवल! असाच एक जण लगेच आपल्या भावना व्यक्त करताना म्हणतो..
ओ मुन्नी रे, ओ मुन्नी रे..
तेरा गली गली में चर्चा रे...

कॉलेजात एखादी नवीन मुलगी आली तर ती गेटमधून बिल्डींगमध्ये पोहोचेपर्यंत तिची चर्चा वर्गावर्गात सुरु झालेली असते तर इथे स्वतः मुन्नीने घसा फोडून सांगितल्यानंतर तिची चर्चा कुठे होणार नाही हे शक्य आहे का? तेच इथे सांगितलं जातंय.. मुन्नीला वस्तुस्थितीची जाणीव करून दिली जातेय कि गल्ली गल्ली मध्ये तुझ्या नावाची चर्चा चालू आहे. याच भावना पूर्वी शम्मी कपूरने "आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे" या गाण्यातून व्यक्त केल्या होत्या.पुढे हा आशिक म्हणतो..

है जमा इश्क दा इश्क दा परचा रे जमा इश्क दा इश्क दा परचा रे ...
ओ मुन्नी रे !!

या ओळींवर (खालची मुन्नीला दिलेली हाळी वगळता ) आमचे अजूनही संशोधन चालू आहे.. काव्य प्रकाशित झाल्यानंतरदेखील हा लेख प्रकाशित करायला एवढा वेळ झाला या मागचं मुख्य कारण ह्या दोन ओळीच आहेत. भान हरपल्यानंतर मनुष्य काहीबाही बरळत सुटतो त्यापैकी हा प्रकार असावा असे आमचे प्रथमदर्शनी मत आहे. यातून खरेच काही अर्थबोध होत असल्यास त्यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा अशी आमची विनंती आहे!

असे कितीतरीजण फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असतात म्हणून मुन्नीने काय सगळ्यांनाच फ्रेंड लिस्ट मध्ये add करायचं की काय? छे छे.. अश्या लोकांशी कस वागायचं हे मुन्नीला चांगलंच ठाऊक आहे! म्हणून ती लगेच म्हणते..
कैसे अनाडी से पाला पड़ा जी पाला पड़ा.......हो कैसे अनाडी से पाला पड़ा जी पाला पड़ा...
या कडव्यात मुन्नीला एक गहन प्रश्न पडला आहे कि या कसल्या निर्बुद्ध माणसाशी आपली गाठ पडली आहे? तिला तो बेअक्कल का वाटावा? तर त्याचं उत्तर तिनं लगोलग देऊन टाकलं आहे.
बिना रुपैये के आके खड़ा मेरे पीछे पड़ा...
एखाद्या बारबालेच्या मागे लागणं तेदेखील हातात/खिशात एकही छदाम नसताना? हे निर्बुद्धपणाचेच लक्षण नव्हे काय? मुन्नीने ते बरोबर जोखले आहे म्हणून त्या मूर्खाचा पोपट असा उल्लेख करून ती म्हणते..
पोपट न जाने मेरे पीछे वो सैफू...
एखाद्याला हातोहात मूर्ख बनवला, किंवा त्याला वेड्यात काढला कि त्याचा 'पोपट' केला असं म्हणतात. तोच अर्थ मुन्नीला घ्यायचा असावा. आंबटशौकीन श्रोत्यांच्या डोक्यात जर चटकन कोणताही दुसरा अर्थ आला असेल तर त्यांनी तो लगेच काढून टाकावा ही विनंती आहे. ती म्हणते माझ्यापाठी सैफु लागलाय... सैफु म्हणजे सैफ अली खान, बरं का? तो तिच्या मागे आहे; तर या सगळ्या बिन पैसेवाल्या भिकारी लोकांनी त्यांच्या हद्दीत राहावं असा तिचा स्पष्ट सल्ला आहे! आता पहिल्या कडव्यात करीनाचा उल्लेख केल्यावर सैफ अली खानला अनुल्लेखाने टाळणे म्हणजे त्याचा घोर अपमान! याचं पातक डोक्यावर घ्यायचं मुन्नीनं खुबीनं टाळलंय. तिची ही शिताफी लक्षात येताच कोणालातरी दाद दिल्याशिवाय राहवत नाही..दबक्या आवाजात तो ओरडतो
हाय हाय मारही डालोगी क्या..
पण त्याला न जुमानता मुन्नी त्यालाही त्याची औकात (मराठीत..लायकी) दाखवून देते..
पोपट न जाने मेरे पीछे सैफू से लेके लम्बू खड़ा...
म्हणजे नुसता सैफच नव्हे तर लंबूही तिच्या मागे आहे. लंबू म्हणजे अमिताभ बच्चनच असावा यात डाउट नाही. बॉलीवूडच्या शहेनशाहचा 'लंबू' असा अपमानास्पद उल्लेख करण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालू आहे. इतिहासाची पाने चाळल्यास गोविंदानेदेखील आपल्या नायिकेला भुलवण्यासाठी 'जो तू होती जया भादुरी.. हम भी तो लंबू होते... गोरी तेरे नैनो में हम बस जाते!' असं म्हणून अमिताभला लंबू म्हटले आहे. आता अमिताभची उंची आहे जरा जास्त म्हणून काय त्याचा सारखा सारखा असा उल्लेख करून त्याला पदोपदी हिणवायचं? आपल्याला नाही बुवा आवडलं! पण हे आमचं वैयक्तिक मत आहे. जाऊ दे.. विषय भरकटला.. तर मुन्नी म्हणते कि सैफ अमिताभ सारख्या थोरामोठ्यांची नजर तिच्यावर असताना देखील..

आयटम यह आम हुई , डार लिंग तेरे लिये..
आयटम यह आम हुई , डार लिंग तेरे लिये..

आयटम म्हणजे आजच्या तरुणाईच्या भाषेत 'अनेकात एखादी'. 'आयटम' या शब्दाच्या प्रत्येकाच्या संज्ञा वेगवेगळ्या असू शकतात! जश्या कि 'लाखात एखादी' 'हजारात एखादी' इत्यादी इत्यादी.
तर ढोबळमानाने असणारा 'चारचौघात लक्ष वेधून घेणारी' हा अर्थ आपण घेऊ तर तो मुन्नीवर अन्याय होईल. 'सैफ' वगैरे म्हणजे जरा जास्तच पातळी आहे त्यामुळे इथे 'त्या' लेव्हलची बाला 'आम' झाली.. आता बघा.. इथे भाषेतला शब्द कोणत्या अर्थाने वापरला गेलाय त्याला महत्व आहे. हा 'आम' खायचा नाही.. आय मीन..हा 'आम' खायचा 'आम' नाही. आम म्हणजे अतिसामान्य.. 'आम जनता' मध्ये असलेला अर्थ. या भाषेची हीच तर खासियत आहे! ही देखणी, लावण्यवती (असताना ती ) अतिसामान्य झाली.. आता आधीच्या वाक्याचा संदर्भ घेतला तर मुन्नी म्हणते कि सैफ अमिताभ सारख्या थोरामोठ्यांची नजर तिच्यावर असताना देखील.. ही खास आयटम जनसामान्यांसाठी उपलब्ध झाली (श्रोत्यांनी आणि वाचकांनी इथे आपल्या कल्पनाशक्तीला थोडासा लगाम घालावा..) कारण, हे प्रियतम फक्त तू आणि तुझ्यासाठी! बघा बघा.. अपूर्व त्यागाचं मूर्तिमंत उदाहरण घालून दिलेलं आहे मुन्नीने! याला म्हणत असावेत खरखुर आकर्षण! आणि त्यामुळेच ती पुन्हा आठवण करून देते कि बाबा खरंच...
मुन्नी बदनाम हुई, डार लिंग तेरे लिये..

एवढं सगळं म्हटल्यानंतर (तेदेखील एका सुस्वरूप मुलीने !) कोणाच हृदय द्रवलं नाही तरच नवल!
है तुझमें पूरी बोतल का नशा,बोतल का नशा ..है तुझमें पूरी बोतल का नशा,बोतल का नशा...
इथे मुन्न्याची एन्ट्री झालेली आहे.. आम्ही पहिल्यांदा केलेल्या 'मुन्नी बहुधा जरा जास्तच व्होडका पिऊन आली असावी' या विधानाला पुष्टी देणारी वाक्य तो स्वतः इथे फेकत आहे पहा.. 'तुझ्यामध्ये पूर्ण बाटली पिल्यानंतर जेवढी नशा चढते तेवढीच नशा आहे' असा या वाक्याचा जरी वरवरचा अर्थ असला तरी छुप्या अर्थाकडे कोणाचं लक्ष जाणार नाही म्हणून स्पष्ट करत आहे.. 'एका बाटलीमुळे जेवढी नशा चढते तेवढी नशा तुला चढली आहे..झेपत नाही तर कशाला प्यायची एवढी' अशी मुन्नाला तिच्याबद्दल वाटणारी काळजी त्यातून व्यक्त होते.

कर दे बुढापे को कर दे जवाँ रे कर दे जवाँ...
आता तरणीताठी पोरगी बेधुंद होऊन जर बेफाम नाचायला लागली तर त्यापासून स्फूर्ती घेऊन म्हाता-याकोता-यांनादेखील नाचावेसे वाटेल यात शंका नाही. याच अर्थाने मुन्नाने, मुन्नीच्या नशेची महती वर्णन करण्यासाठी एक दाखला म्हणून हे वाक्य उच्चारले असावे! तुझी नशा एवढी आहे कि म्हातारपणालासुद्धा तरुणाईत बदलायची असीम ताकद आहे त्यात! केवढ हे कौतुक.. केवढी ही स्तुती आणि उतू जाणारं प्रेम! यापुढे मुन्ना आणि मुन्नीची प्रेमकहाणी फक्त या एका काव्यामुळे लैला-मजनू, हीर-रांझा, सोनी-महिवाल अगदी आताच्या काळातले राधे-निर्झरा, वीर-झारा यांच्या बरोबरीने अजरामर होणार ही काळ्या दगडावरची (खडूने मारलेली पांढरी) रेघ आहे!!
पुढे मुन्ना फॉर्मात येऊन म्हणतो..
होंठों पे गाली तेरी आँखें दुलाली, हाये..
वा वा! ओठांवर शिव्या तुझ्या डोळ्यात दोन रंग.. बहुधा दारूमुळे लालपिवळे झालेले तिचे डोळे मुन्नाने अचूक हेरले असावेत.. आणि शिव्या हा अल्कोहोलचा काऊन्टर इफेक्ट आहे हे जाणकार श्रोत्यांना कळले असेलच! म्हणजे हे गाणं ऐकताना नुसते कान नव्हेत तर भानही हवे. तो पुढे म्हणतो कसा..
होंठों पे गाली तेरी आँखें दुलाली रे दे है जिया...
तू आयटम बॉम्ब हुई, डार लिंग मेरे लिए...
इथे आयटम हा शब्द atom या अर्थी योजला आहे.. एकाच शब्दाचा उपयोग दोन वेगवेगळ्या अर्थांनी करायची किमया इंग्रजी भाषेनंतर बॉलीवूडच्या गीतकारांनी साधली आहे यावर कोणाचेच दुमत नसेल! तू माझ्यासाठी जणू अणुबॉम्ब झालीस! प्रतिभा पहा.. 'बॉम्ब' हा शब्द तरुण मुलं कोणत्या अर्थाने वापरतात हे त्यांना तर सांगायला नको पण लेडीज वाचकांवर अन्याय नको म्हणून मी जरा सोज्वळ शब्दात हे संकल्पना सांगतो.. एखाद्या व्यक्तीकडे पाहिल्यावर जर पाहणा-याच्या मनामध्ये संमिश्र भावनांचा (म्हणजे सर्व भावना एकाचवेळी एकत्र! ) कल्लोळ माजला (जसा बॉम्ब फुटल्यावर माजतो) तर ती व्यक्ती 'बॉम्ब' आहे असं म्हणायला हरकत नाही!सहसा या विशेषणाचा वापर मुलींकरिताच केला जातो असा समज आहे. नुसता बॉम्ब म्हटलं तर एवढा कल्लोळ तर 'आयटम बॉम्ब' म्हणजे काय असेल याची तर कल्पनाच न केलेली बरी! मुन्नाने हे विशेषण मुन्नीला देऊन तिच्या नटण्या मुरडण्याचा, मेकपचा, नाचाचा, दारू पिऊन घातलेल्या धिन्गाण्याचा, थोडक्यात तिच्या ओव्हरऑल कार्याचा यथायोग्य सन्मान केलेला आहे असे आम्हास प्रामाणिकपणे वाटते.

मुन्नी बदनाम हुई,
मुन्ना आणि मुन्नी यांचा एक दुर्मिळ फोटो!
डार लिंग मेरे लिये..
मुन्नीके गाल गुलाबी,
नैन शराबी,चाल नवाबी रे....
ले झंडू बाम हुई,
डार लिंग तेरे  लिये..
मुन्नी बदनाम हुई,
डार लिंग तेरे लिये..

या ओळींचा अर्थ आधी दिलेलाच आहे.. तसेच यातील धृवपद आधीच स्पष्ट करून सांगितले आहे.. सामाजिक जाणिवेच भान वगैरे वगैरे!

बात ये आम हुई, डार लिंग तेरे लिये..
इतकावेळ "मुन्नी बदनाम हुई, मुन्नी बदनाम हुई" ओरडून सांगितल्यानंतर 'रोज मरे त्याला कोण रडे' या उक्तीप्रमाणे तिच्याभोवती फुकटात नाचणा-या पब्लिक ला त्याचं कौतुक वाटेनासं होतं त्यामुळे ते तशी स्पष्ट कबुली देऊन टाकतात. यासाठी सुद्धा धैर्य लागतं बरं!! ते म्हणतात 'मुन्नी बदनाम हुई' हि आता सामान्य गोष्ट झालीये आम्हाला काहीतरी नवीन हवंय.. चलाख मुन्नीला याचा सुगावा लागताच प्रसंगावधान राखून ती म्हणते..
बे-हिंदुस्तान हुई, डार लिंग तेरे लिये..
दुर्दैवाने या वाक्याचासुद्धा आम्हास अर्थ लागला नाही! येथे 'बे' हा शब्द दोन या अर्थी आहे कि बे-घर होणे या अर्थी आहे हे कळायला पुरेसा वाव नाही. दुसरा अर्थ जरी थोडासा अर्थपूर्ण वाटतो पण तो अर्थ घेतल्यास असंबद्धपणा जरा जास्तच वाढतो त्यामुळे हे वाक्यसुद्धा सध्यातरी ऑप्शन ला टाकल्याचे आम्ही जाहीर करत आहोत. जरी ते चुकीचे वाटत असले तरीपण इथे मुन्नीने प्रसंगावधान राखून तोच तोच पणा टाळल्याबद्दल तिचे कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे

अमिया से आम हुई,डार लिंग मेरे लिये..
इथे 'आम' हा शब्द आधी सर्व ठिकाणी उपयोजल्याप्रमाणे 'सामान्य' या अर्थी नसून आंबा या अर्थी असावा.. कारण कैरीपासून जसा आंबा होतो तसा अमिया पासून आम होत असावा. मुन्नीला अभिप्रेत असणा-या विचारापर्यंत आम्हाला पोचता आले नाही याबद्दल आम्ही खेद व्यक्त करीत आहोत.
ले झंडू बाम हुई, डार लिंग मेरे लिये..
सिने माहॉल हुई , तेरे तेरे तेरे लिए..

ओळींचा अर्थ आधी दिलेला आहे.. (म्हणजे परत परत सांगितला जाणार नाही!) धृवपदही स्पष्ट करून सांगितले आहे.. सामाजिक जाणिवेच भान, पैश्याची खाण वगैरे वगैरे!

आ ले बदनाम हुई हांजी हाँ तेरे लिए..
ले सरेआम हुई, डार लिंग तेरे लिये..डार लिंग तेरे लिये..

शेवटची ओळ पुन्हा एकदा ऑप्शनला! (इंजिनियरिंगची सवय! सुंभ जळला तरी पीळ जात नाही! काय करणार?)


तर आम्ही आमच्या परीने या अफलातून गाण्या(जनसामान्यांचा शब्द)चे रसग्रहण करण्याचा प्रयत्न केला आहे. हिंदीचा अपुरा व्यासंग आणि भाषेची व्याप्ती या दोन गोष्टींमुळे काही ठिकाणी बंधने आली आहेत. तरीदेखील इतरांनी दुर्लक्षिलेल्या गोष्टीचा अभ्यास करणं (आणि करायचा त्यांचा न करणं) याची सुरुवातीपासूनच आवड असल्याने आम्ही हे संशोधन केले आहे. या संबंधात काढलेली टाचणं, टिपणं, संदर्भग्रंथ आमच्या अभ्यासिकेत उपलब्ध आहेत. अभ्यासूंनी वैयक्तिकरित्या संपर्क केल्यास ती त्यांच्यासाठी उपलब्धही करून दिली जातील.


सरतेशेवटी सांगायचे झालेच तर..आंतरराष्ट्रीय संगीत क्षेत्रात या गाण्याने एका नवा मैलाचा दगड उभा केला आहे यात तिळमात्र शंका नाही आणि याबाबत कोणताही वाद असण्याचा प्रश्नच नाही!

मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०१०

जिम पोरी जिम.. कपाळाची जिम!

 इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षाला आमच्या रूमवर व्यायाम करण्याचं फॅड आलं.. अरर्र.. प्रस्तावना राहिली!

मुलं वयात यायला लागली कि त्यांच्यात काय काय बदल होतात हे बायोलॉजीच्या पुस्तकांमधून आणि पेपरांमधून (बायोलॉजीच्या नव्हे,, नेहमी वाचायच्या!) आपल्याला माहितीच आहे.. जसे कि 'तारुण्यसुलभ' सारखे अतिनाजूक किंवा 'पौगंडावस्था' वगैरेसारखे भारी भारी शब्द असणारे लेख..त्या मुलामुलींनी काय करायचं, त्यांच्यासाठी पालकांनी कसं वागायचं याचे सल्ले इत्यादी इत्यादी.. मला 'पौगंड' म्हणजे कित्येक दिवस कमीपणाचा शब्द वाटायचा.. त्याच्या 'न्यूनगंड' या शब्दाशी असणा-या साधर्म्यामुळे! तर माझ्या चष्म्यातून (ख-या नव्हे.. जीवनाकडे पहायच्या) पाहिले असता वयात आल्यानंतर मुलं ही स्वतःच्या दिसण्याला,बाह्य सौंदर्याला जास्त महत्व देतात.. याचाच कॉन्सिक्वेंस म्हणून मुली वळतात आरसा, मेकअप बॉक्स आणि इतर सौंदर्य प्रसाधनांकडे आणि मुलगे वळतात.... अर्थात मुलींकडे! आता ही बिचारी मुलं (मुलगे या अर्थी!!) मेकप तर करू शकत नाहीत मग आणखी काय करणार? बोलबच्चन लोकांना तोंड उघडलं कि मुली वश होतात पण जनसामान्यांचं काय? त्यासाठी मग खूळ निघतं बॉडी बिल्ड करायचं! वय वर्ष १८ गाठलं कि बरीचशी मुलं या वेडाने पछाडली जातात.. सलमान खान, संजय दत्त किंवा अगदीच आताच्या काळात सोनू सूद,शाहीद कपूर वगैरे त्यांचे हिरो बनतात. पण ही 'बरीचशी' मुलं वगळता इतर त्यांच्याहून 'बरीचशी' मुलं मात्र स्थितप्रज्ञ असतात. त्यांना 'आमीर खान अभिनय चांगला करतो' किंवा 'हृतिक रोशन हॉलीवूड स्टार सारखा दिसतो' इत्यादी साध्या आणि फालतू कारणासाठी आवडत असतात. त्यांना शाहरुखने पोटाला सहा बिस्कीटं आणली तरी फरक नाही पडत आणि आमीरने आठ आणली तरीही नाही! सिक्स नाही,एट नाही यांचा आपला वन प्याक आणि असलाच तर जास्तीत जास्त बनपाव! मी अर्थातच दुस-या क्याटेगरितला!

तर सांगत काय होतो.. इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षाला आमच्या रूमवर हे फॅड आलं.. रूमही मस्त होती. मोठीच्या मोठी आणि प्रशस्त खोली,त्यात पुन्हा दोन खिडक्या, एक बाल्कनी आणि खोलीएवढाच मोठा ओपन टेरेस! मालकाने ज्या भाड्यात आम्हाला ती खोली राहायला दिली होती ते पाहता तो लॉसमध्ये जात असला पाहिजे यात शंका नाही. कारण आधीच्या वर्षाला त्या ओपन टेरेसच्या भागाचा वापर कपडे वाळत घालण्याव्यतिरिक्त अंडरआर्म क्रिकेट खेळण्यासाठीही आम्ही करत असू,एवढा तो मोठा होता! वरून तेवढ्या मोठ्या खोलीत फक्त ३ जण. ते सुद्धा आम्ही दोघंच जण राहणार होतो पण तिसरा आमचा मित्रच.. साला 'मी पण येतो,मी पण येतो' करत जबरदस्तीने घुसला! असो.. मित्र म्हटल्यावर व्हायचंच असं.. तिघांच्या कॉट्स तीन भिंतीना चिकटून ठेवल्या कि खोलीत बरीच मोकळी जागा उरायची.

शिवाय सर्वांना अभ्यासाची आवड इतकी प्रचंड होती कि एकच टेबल तिघांना पुरत असे. तिघे तीन वेगवेगळ्या शाखांचे असून सगळ्यांची पुस्तकं त्या टेबलावरच असायची. (तरीही टेबलवरही मोकळी जागा उरायची! आता बोला!!) तर या मधल्या मोकळ्या जागेत (अर्थात जमिनीवरच्या!) धूळ फार साठते असा एकदा रिकाम्यावेळी चाललेल्या चर्चासत्रातून अहवाल निघाला. राहायला आल्यानंतर तब्बल एक ते दीड वर्षांनी या सत्याची आम्हाला जाणीव झाली! रोजचा कचरा काढणं तर होत नाही तर हि जागा वापरात आल्याशिवाय धूळ साठणं कमी होणार नाही या तात्पर्यापर्यंत आम्ही तिघेही पोहोचलो. एवढ्याश्या जागेत कबड्डी तर खेळता येणार नाही मग काय करणार बुवा? 'अभ्यासाला तिथे बसू' हा पर्याय एकमताने ठोकरला गेल्यानंतर (कारण अभ्यासाला बसण्याची फ्रिक्वेन्सी विचारात घेतली तर धूळ साठण कमी न होता वाढलंच असतं) तिथे पत्ते खेळू, इस्त्री करू, पेपर वाचायला तिथे बसू यापलीकडे कोणाला काही सुचेना.. तेवढ्यात आमच्यापैकी एकाच्या सुपीक डोक्यात एक विचार आला तो असा.. " जर इथे सूर्यनमस्कार घातले तर अंग जमिनीला चिकटत जाईल (धूळ अंगाला चिकटेल हा गर्भितार्थ!). रोजचे कपडे तर आपण धुतोच; त्यामुळे जागाही स्वच्छ राहील आणि आपला व्यायामही होईल. हा ठराव मात्र २ विरुद्ध १ या फरकाने आणि चढ्या आवाजी मतदानाने संमत झाला. अर्थात एकमेव विरोधी मत माझं होतं हे वेगळं सांगायला नकोच!

दुस-या दिवशीपासून जी रणधुमाळी उडाली ती काय विचारता? दोघेजण वॉर्म अप वगैरे करून जोर मारणे, बैठका काढणे वगैरे प्रकार त्या मोकळ्या जागेत करू लागले. दोन-चार दिवसांमध्येच मला फरक दिसू लागला! त्या जागेवर धूळ वगैरेचं नामोनिशाण राहिलं नाही!! दोघांनी सकाळी उठून जोरजोरात श्वास बाहेर सोडत व्यायामाला सुरुवात केली कि मी पांघरुणातून डोळे किलकिले करून पहात असे आणि अंगावरची चादर डोक्यावर घेऊन पुन्हा झोपी जात असे.. एखादा जर जास्तच जोश मध्ये आला तर उगीच मला येऊन पार्श्वभागावर लाथ घालून,किंवा कॉट गदागदा हलवून शक्तीप्रदर्शन करत असे, जणू काही याची बॉडी आर्नोल्ड श्वाझनेगरला लाजवेल अशीच झालीये! पण माझ्यावर शष्प फरक पडला नाही. एक मात्र झालं, दोन-तीन आठवड्यातच टेबलावरच्या मोकळ्या जागेत श्रीयुत हनुमंतरावांचा फोटो आला (त्यामुळे टेबलही स्वच्छ झालं) आणि रूमवर दुधाचा रतीबही सुरु झाला. मग मला जराशी भुरळ पडली. दुधातला थोडा वाटा मला मिळावा यासाठी मी त्यांच्या मिन्नतवा-या सुरु केल्या पण दोघांनीही 'व्यायाम न करणा-याला थेंबभरही दूध मिळणार नाही' असे एकमताने जाहीर केले. माझ्यासारखा मुलुखाचा आळशी माणूस काही स्वतः जाऊन दुध आणणार नाही याची त्या दोन्ही तथाकथित पैलवानांना पूर्ण शाश्वती होती त्यामुळे हा क्रूरपणा! मग नाईलाज म्हणून मीही व्यायामाला सुरुवात केली.

माझ्या एन्ट्री नंतर दोघांचा उत्साह दुणावला. माझा पहिलाच प्रयत्न असल्याने जो तो मला कशा पद्धतीने एक्सरसाईज करायची ते समजवू लागला. मीही 'ऐकावे जनाचे करावे मनाचे' या उक्तीप्रमाणे आचरण सुरु ठेवले! त्यात एक रेग्युलरली जिमला जाणारा आमचा एक चौथा मित्र रूमवर आला आणि आमच्या व्यायामाचा सुगावा लागताच 'मशीन नाही तर काही फरक पडणार नाही, डम्बेल-बिम्बेल तरी मारा' असा अनाहूत सल्ला देऊन गेला.. झालं! "तिघेही करतोच आहोत तर अमक्याकडे डम्बेल्स नुसत्या पडून आहेत.. तमक्याकडे ५ पौंडाच्या प्लेट्स आणि बार गंजत पडलाय.." अशा कुठून कुठून बातम्या आणून त्या वस्तूंची रवानगी आमच्या जागेत करण्यात ते दोघेही यशस्वी ठरले. त्या वस्तूंच्या मालकांनी 'किती दिवस करताय पाहू' असं म्हणून त्यांच्या उत्साहाला आवर घालायचा प्रयत्न केला पण हे पठ्ठे बधले नाहीत.मग सुरु झाली मशीन एक्सरसाईज! उपकरणं : प्रत्येकी साडेसात पौंडाच्या दोन डंब-बेल्स, एक बार, दोन -५ पौंडाच्या आणि दोन -अडीच पौंडाच्या प्लेट्स, आंब्याच्या रिकाम्या पेट्या (अर्थात मीच नेलेले आंबे!) रद्दी पेपर्स वगैरे.. आंब्याच्या रिकाम्या पेट्या रुंदींच्या बाजूने एकमेकांना जोडून त्यावर रद्दी पेपर्स ठेवून बेंच तयार केला गेला आणि त्यावर उताणं झोपून बार खालीवर करायचा असा तो प्रकार होता. याला बेंच प्रेस असे नाव असते हे माझ्या गावीही नव्हते! हा सरंजाम मात्र कॉलेज संपेपर्यंत टिकला.. म्हणजे त्या दोघांनी टिकवला पण माझा उत्साह ३-४ महिन्यात--सॉरी आठवड्यातच ओसरला! 'ह्या दुधात पाणी जास्त असतं' असलं तद्दन भिकार कारण देऊन मी झोपून राहायला लागलो..

जॉब सुरु झाला तेव्हा खोली सोडून मी ब्लॉक संस्कृती स्वीकारली.. आणि माझ्या दुर्दैवाने माझ्या रूममेट्सनी सुद्धा! दुर्दैवाचा आणखी मोठा घाला म्हणजे आमच्या जिमवाल्या मित्राने आम्हाला जॉईन व्हायचं ठरवलं.. आमच्या कॉलेजने आम्हा चौघांनाही 'ब-या' म्हणता येतील अशा नोक-या मिळवून दिल्याने काहीजणांच्या नशिबात पहिली नोकरी मिळेपर्यंतचा जो मुबलक वेळ असतो तो आमच्या पदरात पडला नाही! पहिल्या जॉबच्या उत्साहात आणि आपल्याला इतरांपेक्षा जास्त काम कसं असतं हे पटवून देण्याच्या भानगडीत नवखं पब्लिक जास्त वेळ ऑफिस मध्ये घालवतं. आमच्याही बाबतीत काहीसं तसंच झालं होतं. एकमेकांशी ऑफिस (आणि तिथल्या सुंदर मुली) सोडून इतर गोष्टींवर बोलायला सुद्धा वेळ मिळत नव्हता! यथावकाश सगळं स्थिरस्थावर होवू लागलं आणि काही काळानंतर आम्ही चौघेहीजण पुन्हा ‘माणसात’ आलो. त्याला कारणही तसंच होतं! आमच्या समोरच्या सदनिकेत काही मुली राहायला आल्या. सुंदर असाव्यात. असाव्यात यासाठी म्हटलं की आमच्यापैकी सगळेच इंजिनियर! त्यामुळे जनरली मुलगी दिसली की ती सुंदर असणे-नसणे अशा दुय्यम गोष्टीना आमच्या जीवनात स्थान नव्हते! ज्या दिवशी त्या मुली चौकशी करून गेल्या त्या दिवशीपासून कोणी न कोणी ऑफिस मधून लवकर येऊन कानोसा घेऊन लागला आणि एका रविवारच्या प्रसन्न सकाळी ४ मुलींचा ग्रुप त्या घरात डेरेदाखल झाला!

आम्ही चौघे, त्याही बरोब्बर चौघी! वास्तविक एखाद्या सिनेमात अशी सिच्युएशन आली की सिनेमाच्या नायकाला सर्वात सुंदर आणि त्याच्या मित्रांना मग उरलेल्यांपैकी (अर्थात त्याही सुंदरच असतात) एक एक अशी विभागणी होते. पण वास्तवात तसलं काही होत नाही याची जाणीव त्या रविवारी प्रकर्षाने झाली! आम्हा चौघांनाही त्यांच्यापैकी एकच मुलगी आवडली! बाकीच्याही चांगल्या होत्या पण ती सुहास्यवदना इतरांपेक्षा सरस आहे यावर कधी नव्हे ते सगळ्यांचं एकमत झालं.सगळेचजण स्वतःला सिनेमाचा नायक समजत असल्यामुळे असेल कदाचित! त्या सोमवारपासून सगळ्यांचे पाय सहाच्या ठोक्याला घरात पडू लागले. जणू काही ती आमच्यासाठी चहाच बनवून ठेवत होती!

तिला इम्प्रेस कसं करावं यावर खल सुरु झाले..पण काही मार्ग सुचेना.सरळ जावून बोलायची तर कोणाचीच छाती होईना.. आणि हाय रे कर्मा! त्या तिघांपैकी कोणाच्या तरी डोक्यातून कल्पना आली कि 'जिम लावूया'.. 'आपण जिमला जाताना किंवा तिकडून येताना ती बघेल आणि आपल्या फिजीकवर इम्प्रेस होईल' अस सरळ साधं गणित त्यांनी मांडलं.. बरं..वेळही सत्कारणी लागेल हे आणिक वरून! पुन्हा बहुमताने निर्णय! त्यामुळे मी एकटा पडलो.
बॉडी बिल्डींगचे लोकांचे हेतू काय काय आणि किती सकारात्मक असतात.. चांगली पर्सन्यालीटी,निरोगी जीवन, वाढलेला आत्मविश्वास वगैरे वगैरे.. आणि आमचे हेतू काय? तर जमीन साफ करणे, मुलीवर (त्यापण एकाच!) इम्प्रेशन मारणे, वेळ घालवणे इत्यादी! असं असल्यावर कोण तयार होईल? मी नकार कळवला. (जिमला जाण्यासाठी). पण मी एकटा राहून तिला पटवेन कि काय या भीतीने माझा नकार ग्राह्य धरला गेला नाही आणि जिमला येण्याची बळजबरी केली गेली. जर नकार कायम राहिला तर असहकार चळवळ पुकारली जाईल अशी जाहीर धमकीही देण्यात आली. दुस-या दिवशीपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली.सायलेंट ट्रीटमेंट मिळण्याच्या भीतीने मी या धमकीला बळी पडलो आणि पुन्हा एकदा नाइलाजाने माझ्या व्यायामाचा दुसरा स्पेल सुरु झाला!

पहिल्या स्पेलपेक्षा हा जरा मोठा आणि नाही म्हणायला प्रॉडक्टीव होता.. ग्लोव्हज, स्पोर्ट्स गियर वगैरेची खरेदी झाली. आठवडाभरातच वॉर्म-अप एक्सरसाईजेस वरून मेनस्ट्रीम एक्सरसाईजेसवर गाडी सरकली! त्या तिघांचा इंस्ट्रक्टर वेगळा. कारण त्यांची जराशी बिल्ड आधीच होती. राहुल हा माझा ट्रेनर..
"जिम केलीय का आधी?" मेनस्ट्रीमच्या पहिल्याच दिवशी त्याने प्रश्न केला.
"अं.. नाही.. म्हणजे हो... म्हणजे.." मी चाचरत म्हणालो.मला वाटलं कि आयुष्यात कधी जिम केली नाही असं सांगितलं कि हा माझ्यावर हसणार!
"हो-नाही काय? इथल्या इंस्ट्रूमेंट्स ची नावं माहित आहेत का? उद्या 'पेक डेक' मार जा म्हटलं तर जाशील का?" राहुलने विचारलं
"नाही.." मी ओशाळून म्हटलं,
“ठीकाय.. थ्री-बॉडी करू उद्यापासून..” मी प्रश्नार्थक चेहरा करत मान हलवली.
माझा व्यायाम आटपल्यावर मी आमच्या त्रिकुटापैकी कोणी दिसतंय का पाहायला लागलो तर हे लोक सापडेनात. थोडावेळ इकडे तिकडे बघतो तर हे लोक ट्रेडमिल च्या मागे नंबर लावून उभे!
"साल्यांनो.. तीन तीन ट्रेडमिल्स असताना एकाच ठिकाणी का नंबर लावला आहात?"
"शू sss " तिघांनी एकदम आवाज केला!जरा निरखून बघतो तर हे तिघेही जण तिथल्या खिडकीतून बाहेर बघताहेत! आणि बाहेर..? ..बाहेर एक अतिशय सुंदर ललना मानेला हलकेच झटके देत वॉर्म-अप करत होती!

आता आमची जिम जोरदार सुरु झाली.. जिमला जाण्यासाठी जीमबाहेरही कारण होतं आणि जिममध्येही! अर्थात त्यापैकी वैध एकही नव्हतं हा भाग अलाहिदा!
डम्बेल्स आणि बारबेल्स च्या बरोबरीने बेंचप्रेस, पेकडेक, लेगप्रेस इत्यादी शब्द तोंडात रुळले..
‘जोर’ च्या ऐवजी डिप्स म्हटलं जाऊ लागलं.. ‘बैठका मारणं’ डाऊन मार्केट वाटायला लागलं त्याऐवजी मी ‘सीटअप्स’ मारू लागलो.
स्कॉट्स,ल्याटरल/ व्हर्टिकल पूल डाऊन, कार्डीओ,क्रन्चेस असले भयंकर उच्चार करताना जीभ अजिबात अडखळेनाशी झाली.
बायसेप्स,ट्रायसेप्सच्या जोडीला रिस्ट्स, back ,शोल्डर, चेस्ट,थाईज वगैरे अवयवांनाही पुरेसा मान द्यायला शिकलो. 'ह्यामस्ट्रिंग' का काहीतरी आपल्या (आणि इतरांच्याही) अंगात असतं हे मला तिकडे जायला लागल्यावर कळलं! (तोपर्यंत अंगात फक्त 'माज' असतो यावरच माझा विश्वास होता!)
"सपोर्ट दे रे,ट्वेंटी-फ़ाईव्ह च्या प्लेट्स आहेत" किंवा "विंग्सवर जाम प्रेशर आलं रे आज" वगैरे वाक्य आम्ही जरा जोशात फेकायला लागलो.. विशेषतः ती ललना जवळ असल्यावर..!
शनिवारी शक्तीची देवता हनुमंताची प्रार्थना करताना तिच्या बाजूला (म्हणजे ललनेच्या; देवतेच्या नव्हे !) जागा मिळावी यासाठी धक्काबुक्की व्हायची आणि व्यायामानंतरच्या स्ट्रेचच्या सेशनसाठी तर जास्तच! कुशन म्याटवर आडव पडून क्रंचेस आणि abs झाल्यानंतर हात पसरून वेस्ट आणि लेग स्ट्रेचेस असत. ललना नेहमी सावध असायची पण तरीही चुकून तिच्या बोटांचा ओझरता स्पर्श शेजारच्या व्यक्तीच्या बोटांना होतच असे. आता शेजारच्या व्यक्तीने स्वतःचे हात जर्रा जास्तच ताणले तर हे होणं साहजिकच आहे नाही का? असो! अर्थात शेजारच्या व्यक्ती या ब-याचदा आम्हा चौघांपैकी दोघे असत हे वेगळे सांगणे न लगे!

इकडे आम्ही घरी परतताना आमची सुहास्यवदना आणि कधी कधी तिच्या मैत्रिणी खिडकीत बसलेल्या असत. जिन्यावरून पहिलं तिच्यासमोर कोण येणार यावरून कॉम्पीटीशन लागत असे. तीदेखील चेहरा हसरा ठेवून कोणाशी न कोणाशीतरी फोनवर बोलत बसलेली असायची. 'ती आज कोणाकडे बघून हसली' यावर आमच्यात डिस्कशन रंगायच. तिच्या ते खिजगणतीत तरी होतं कि नाही कोण जाणे!
"आपले बायसेप्स बघितलेस का? बघत अश्णारच ती! " एकाच कॉन्फीडन्सयुक्त बोलणं.
"बायसेप्स आधी दिसतात कि चेस्ट?" दुस-याचा युक्तिवाद..
"बॉडी फिटिंग टी-शर्टस घालत चला माझ्यासारखे मग फक्त चेस्ट किंवा फक्त बायसेप्स दाखवावे लागणार नाहीत!!" तिसरा या दोघांना क्रॉस करत असे..
मी मात्र सुरुवातीला शांतपणे हा वाद ऐकत बसायचो. माझे ना बायसेप्स तयार झाले होते, ना चेस्ट .आतासं माझ्या शरीराला कुठे वळण लागत होतं!साधारण दोन-अडीच महिने होताच मीपण असल्या वादांमध्ये उडी घ्यायला लागलो!

"च्यायला, आमचं अंग म्हणजे आधी पोतं होतं, आता कुठे शेप यायला लागलाय आणि ती इथे आली तेव्हापासून तिचे सगळे कर्व्ज एकदम कोरल्यासारखे, असं कसं काय?" मी एकदा वैतागून त्या मुलीकडे निर्देश करून राहुलला विचारलं होतं..
"अरे ती तुझ्यासारखी म्हातारपणी जागी नाही झाली! आधी ती एन्ड्यूरन्सची मेंबर होती,मेंबरशिप संपली म्हणून ही जिम ट्राय करायला म्हणून लावलीये. पण तीन महिने कम्प्लीट झाल्यावर फक्त एका महिन्याचीच रिन्युअल घेतलीये तिने ."
"म्हणजे? हा महिना संपला कि ती जाणार?"
"बहुतेक.. पण तुला काय करायचंय? तिच्यासाठी आलास कि स्वतःसाठी?"
राहुलला खर सांगण्यात काही अर्थ नव्हता नाहीतर माझं सभासदत्व धोक्यात आलं असतं!
एके दिवशी मला जिमला जायला जमलं नाही.. ऑफिस मधून अर्धा-पाउण तास उशिरा घरी आलो तर सगळे निघून गेले होते. जायचा प्रचंड कंटाळा आला. साडेतीन महिन्यांच्या व्रतामधला पहिला खंड.. काय कन्सिस्टन्सी होती! वा! पण जाऊ दे.. तसाच सोफ्यावर रेलून बसलो. पेपर उघडता उघडता खिडकीतून बाहेर पाहिलं तर समोरच्या घरात काहीतरी हालचाल दिसली. एक शर्ट दिसत होता.. असेल.. मी नजर पेपरमध्ये वळवली.. आणि चमकलो! शर्ट? तो सुद्धा समोरच्या घरात? म्हणजे कोणी पुरुष आलाय का? मी पडद्याआड उभा राहून हेरगिरी सुरु केली. कोणी दोघेजण बोलत होते.. घरात बहुधा इतर कोणी नसावं. त्यांची खिडकी, आमच्या घरातून वगळता इतर कुठूनही दिसत नसे. पेठेतल्या घरांची संरचनाच अशी असते. आमच्याही घरात यावेळी जनरली कुणी नसतं त्यामुळे बहुधा खिडकी पूर्णपणे बंद करायची तसदी त्या मुलींनी घेतली नव्हती. किंवा एक कवाड कदाचित वा- यामुळे उघडलंही असेल. पण आतमध्ये ती सुहास्यवदना आणि एक मुलगा! आईशप्पथ... मुलगा? मी सतर्क झालो..

भाऊ असेल.. मी मनाची समजूत घातली. पण असला तरी असा खेटून बसणार नाही.. कोणीतरी असेल ओळखीचा.. नुसता मित्र. पण म्हणून काय झालं. दरवाजा बंद करून बसायचं? काही जनरीतीचं भान वगैरे? आणि चक्क हातात तिचा हात? भविष्य वगैरे सांगत असेल पण मग दुसरा हात कुठेय त्याचा? तिच्या कमरेभोवती बोटं आहेत ती कोणाची? आयला.. प्रकरण वेगळंच होतं.. वेगळं कसलं नेहमीचंच होतं पण आमच्यासाठी वेगळं! मी पडद्या आडून त्यांच्या हालचाली निरखून बघू लागलो.. कुठे हातातच हात घे;कुठे तिच्या कपाळावरची बटच नीट कर असे प्रेमी युगुलांचे चाळे करत बराच वेळ गुलुगुलू गप्पागोष्टी केल्यावर तो जायला उठला. तीही उभी राहिली आणि खाली वाकून त्याने तिच्या गालावर...

...मी मटकन खालीच बसलो! आम्ही प्रत्येकाने स्वप्नात उभारलेले इमले कोसळले होते. दोनच मिनिटात तो बाहेर पडला. किडकिडीत बांधा. अंगावर जणू शर्ट वाळत घातलाय कि काय असं वाटत होतं. रूपही जेमतेम. तो गेल्यावर ती खिडकीत येऊन बसली आणि तिने त्याला फोन केला. त्यालाच! कारण त्याच्या फोनची रिंग मला ऐकू येत होती. ती नेहमीसारखीच त्याच्याशी बोलत खिडकीत बसली...!

मी सोफ्यावर अंग झोकून दिलं होतं.दरवाजा उघडल्याच्या आवाजाने माझी तंद्री भंग पावली. जिमवरून पार्टनर्स परतले होते.
'माझ्याचकडे बघत होती रे ती.." आमच्या घरातले एक भागीदार..
"हाड.. तू काय शाहीद कपूर समजतोस कि काय? आपल्याकडे सोडून ती बाकी कोणाकडे नजर पण टाकत नाही" दुसरे मित्रवर्य
"तुम्ही नुसत्या गोष्टीच बोलत बसा.. ती माझ्या बाईकच्या मागे बसेल ना तेव्हा कळेल तुम्हाला" तिसरे सहकारी..
"कोणाबद्दल बोलताय?" मी विचारलं.
"तुझ्या वहिनीबद्दल" तिघेही एकदम म्हणाले..
"वहिनी? कुठली?" माझा सवाल.
"अरे क्या येडा बनके पेडा खाता है यार... ही समोरची.. तेरी भाभी! मला फुल न्याहाळत होती; माहितीये?" एकजण म्हणाला..
"आता ती एकच होप आहे यार" दुसरे साहेब उद्गारले!
"का? काय झालं? आपली जिमवाली ललना?" मी गडबडून विचारलं.
"आपली? आपली कधीपासून झाली ती? आमची होती ती.."
"तीच.. ती आहे ना? मग एकच होप काय?" मी सावरून म्हटलं.
"नाय ना.. तिला बॉय फ्रेंड आहे.."
"क्काय?" मी पुन्हा चमकलो " तुम्हाला कसं कळलं?"
"आला होता ना साला आज.. तिला सोडायला. कार घेऊन. काडीपैलवान आहे नुसता! त्याच्यात तिने काय बघितलन कोण जाणे! "
"अरे सोडायला आला म्हणून काय बॉयफ्रेंड होतो? भाऊ असेल..नायतर कोणीतरी असेल ओळखीचा.. नुसता मित्र बित्र" मी माझं मघासचंच लॉजिक अप्लाय करायचा प्रयत्न केला.
"तसा असला तर सोडून जाईल ना लगेच.. ती गाडीमध्ये झुकून त्याच्या ओठांवर... श्या.. मला बोलवत नाही. .तू सांग रे.."
माझ्या अंगातून त्राण गेल्यासारखं वाटलं!
"काही सांगू नका कोणी" मी ओरडलो.
"काय रे? एवढं अपसेट व्हायला काय झालं? अजून एक ऑप्शन आहे ना आपल्याला. उलट बरंच झालं. आता फक्त एकीवरच जास्त कॉन्सन्ट्रेट करता येईल"
"काही उपयोग नाही! या ऑप्शनवरही कुणीतरी आधीच काट मारलीये!" मी सांगितलं.
मी सगळा प्रकार सांगताच पहिल्यांदा सर्रकन तिघांचेही चेहरे उतरले आणि पाठोपाठ मानेवरून जिमचं भूतही!!

त्यादिवशीनंतर ऑफिसमधला वर्कलोड कसा कोण जाणे पण अचानकच वाढला.. तोही सगळ्यांचा एकदम!! बहुतेक रात्री लगोलग जागतिक बाजारपेठेतून रीसेशन हटलं असावं! कारण 'आज काम आहे रे ऑफिसमध्ये' या कारणाखाली सगळ्यांना घरी यायला रात्र होऊ लागली. त्यामुळे जिम तर बंदच झाली! जिन्यावरून येताना सुद्धा आजकाल सगळे माना खाली घालून येतात. सुहास्यवदना मात्र तशीच बसलेली असते.. सुंदर हास्य चेह-यावर विलसत ठेवून. पण ती कोणाकडे बघून हसली यावर हल्ली डिस्कशन्स मात्र रंगत नाहीत. रविवारची कामवाली बाई येवून साफ सफाई करून जाते त्यामुळे तसा कचराही होत नाही.

अरे हो.. कालच राहुलचा फोन आला होता. कुणी एका नव्या सौंदर्यवतीने जॉईन केलीये म्हणे जिम. 'सहा महिन्याची मेंबरशिप घेतली आहे' अशी अतिरिक्त माहिती सुद्धा पुरवलीये त्याने.. पार्टनर्सना सांगायलाच विसरलो. मी म्हणतो, तिसरा स्पेल चालू करायला काय हरकत आहे?

गुरुवार, ३० सप्टेंबर, २०१०

अनावस्था प्रसंग!

गोरेगावच्या रेल्वेस्थानका वरून पश्चिमेला बाहेर पडून रिक्षाने साधारण सरळ त्याच दिशेला गेलं की अंदाजे १०-१२ मिनीटांनंतर बांगूरनगर नावाचं "उप-उपनगर" लागतं. गजबजलेल्या मुंबापुरीत अशा शांत निवासी भागात गेलं की फार बरं वाटतं. उन्ह उतरायला लागली की त्या भागातले बरेचसे लोक फेरफटका मारायला बाहेर पडतात. तिथून मालाडच्या बाजूला चालत दहा मिनिटांच्या अंतरावर एकेकाळचा "सर्वात मोठा" अशी बिरुदं मिरवलेला 'इन-ऑर्बिट" मॉल आहे.मालाड आणि गोरेगावच्या सीमेवर. दस-याला इथले लोक हटकून या मॉलमध्ये जात असावेत जेणेकरून खरेदी आणि सीमोल्लंघन अशी दोन्ही पुण्यकर्मे पार पाडता येतील असं मला उगीचच वाटायचं!

मुंबईला गेलं की गोरेगावच्या काकांकडे मुक्काम आणि मुंबईतल्या मित्रमंडळींना जमवून थोडा टाईमपास असं माझं गणित असायचं. अशाच एका शनिवारच्या संध्याकाळी आम्ही सर्वांनी भेटायचं ठरवलं. बोरीवली कांदिवली ठाणे वगैरे भागातून तीन मित्र आणि त्यातल्या दोघांच्या 'मैत्रिणी' असे सगळे येणार होते. ‘इनॉर्बीट’ टाईमपाससाठी सुद्धा सुयोग्य ठिकाण आहे त्यामुळे सगळ्यांनी तिथेच यायचं असा प्लान झाला. मला तर बरंच झालं. तिघांपैकी एक-दोघे जण पोचले की घरातून बाहेर पडायचं असा विचार करून मी काकांकडे टीव्ही पाहत राहिलो.

स्टेशन वर पोचल्यावर एकाने फोन केला त्याबरोबर मी तयारी केली आणि बाहेर पडलो. इतरांना फोन करून त्यांचं स्टेटस अपडेट घेत मी चालू लागलो. ३-४ मिनिटात मी बांगूरनगरच्या अंतर्गत रस्त्यावरून मुख्य रस्त्याला टच झालो आणि फोन वर बोलत बोलतच मी इनॉर्बीट च्या दिशेला वळलो.
"मॉल दिसतोय रे बाबा मला. पोर्चमधून जरा डोळे ताणून बघितलंस तर तुलापण मी दिसेन .." मी तिथे पोचलेल्या माझ्या एका मित्राला मी किती जवळ आहे ते पटवून देत होतो..
तेवढ्यात माझ्या खांद्यावर एक हात पडला..

"भाय..एक मिनिट रुक.."
एक मवाली दिसणारा तरुण मला थांबवत होता. "मी ठेवतो रे फोन" म्हणत मी फोन ठेवला आणि त्या व्यक्तीकडे वळलो.
"बोला..काय झालं?"
"तूने वो पीछे के कॉर्नर पे जो लडकी खडी है उसको कुछ बोला क्या?"
मी लांबवर नजर टाकली. मुंबईच ती ! नजरेच्या पट्ट्यात साहजिकच खूप सारी माणसं आली. जिथून मी वळलो होतो त्या कॉर्नरवर एक बाई हातात पिशवी घेऊन उभी होती. पण कोणी मुलगी दिसेना.
"कौन लडकी?, मुझे तो कोई दिख नही रहा है"

तेवढ्यात आणखी एक; आधीच्यापेक्षा जरा बरासा दिसणारा इसम आमच्या रोखाने येऊ लागला.
"काय बोलतोय रे तो? बोलला काय तिला हा?" तो इसम म्हणाला.
"नाय म्हन्तो तो.." मवाली तरुण.
'आयला.. म्हणजे मराठीच आहेत तर.. मी उगीच हिंदीत बोलत होतो..' मी मनातच म्हणालो.
"नाय म्हणतो? पण वर्नन तर हेच केल होत..पांढरा टी शर्ट,निळी जीन् प्यांट ,डाव्या कानात बाली.. बॉस तुने बोला क्या किसीको?"
"नाही बुवा.. मी नाही कोणाला काही बोललो.."
"मराठीच आहेस का? मी पन.. आपन इम्रान कोकनी..." त्या माणसाने आपली ओळख दिली. "काय हाय म्हायताय का? इथे आपला सलीम भाई आहे ना त्याच्या भैनीला रोज कोणतरी छेडतं.. आमी फुल प्लानिंग केला होता आज त्याला पकडायचा.. ही सगळी आपली पोरं हायेत पेरून ठेवलेली.. तुझं वर्नन दिलं म्हणून तुला हटकला. तू नव्हता ना नक्की?"
"छे छे.. मी तर आपला गुपचूप मोबाईल वर बोलत चाललो होतो. छेड काढणं तर सोडाच चुकून कोणाला धक्का लागल्याचंसुद्धा आठवत नाहीये."
"ठीक है.. जरा साईडला ये. उसको जरा थोबडा दिखाकार आयेंगे.. कन्फम होईल ना तू तो नाय्ये म्हणून.."
"मी कशाला? जाऊन सांगू शकता ना तुम्ही लोक?" मी त्रासिक चेहरा करत म्हणालो. आधीच उशीर झाला होता. ठाण्याचा मित्र तिकडून इकडे पोचला होता आणि १० मिनिटांच्या अंतरावरून यायचं असून मी मात्र अजून रस्त्यातच होतो..
"सून मेरे भाय.. सलीम भाय को जाके ऐसा बोला ना तो हमारा थोबडा आउट कर देगा वो.. तु आके जा ना दो मिनट मे. तेरेको किधर जाना है क्या?"
हे तर भारीच! जाणा-या माणसाला थांबवून "तेरेको किधर जाना है क्या?"
'च्यायला मी जणू काही इथेच बसायला आलो होतो. २-४ पोरींनापण छेडीन म्हणतो जाता जाता..' मी बोललो पण सगळं मनातल्या मनात!!
"जाना तो है.. मित्र वाट बघतायत इनऑर्बिटला " मी त्यांना म्हणालो.
"किती?" मला मागून यायचा इशारा करत तो रस्ता क्रॉस करायला लागला.
'तुला काय करायच्यात रे चांभारचौकश्या?' हे अर्थात स्वगत.. "आहेत ८-१० जण" मी ठोकून दिलं! होते ३ जणच पण म्हटलं आपली अर्जन्सी कळेल यांना. एका माणसासाठी इतके लोक खोळंबलेत म्हटल्यावर लवकर आटपतील.
मी गपगुमान त्यांच्या मागे जायला लागलो.पण माझी वाट बघणारे एक मित्रवर्य काही दम धरेनात.. पुन्हा फोन वाजला.
"येतोय रे बाबा.. जरा एक missunderstanding झालंय काहीतरी. आलो निस्तरून."
तिकडून लगेच "आम्ही येऊ का?" ची विचारणा झाली."सध्यातरी नको" म्हणून मी फोन ठेवला..
"फोन उचलू नको हा आता.. बंद करून ठेव तो" इति इम्रान कोकनी!
"काय?" मी आश्चर्यचकित! तो परत काही बोलला नाही.

रस्ता क्रॉस करून एका अरुंद बोळात ते शिरायला लागल्यावर मी गोंधळलो.
"बॉस , कुठे चाललोय आपण? मला जायचं आहे. जास्त वेळ नाहीये माझ्याकडे"
दोघेही थांबून माझ्याकडे वळले. मुख्य रस्त्यापासून हे ठिकाण पन्नास एक मीटरच्या अंतरावर होतं.दोन बाजूला दुकानाच्या बिल्डिंग्ज. पैकी एक दुकान दुपारची वेळ असल्याने बंद! नक्की मराठी दुकानदार असावा!! कारण आजूबाजूची दुकानं चालू होती असं येता येता माझ्या नजरेला पडलं होतं. मी बंद दुकानाची पाटी वाचली.. 'लकी फर्निचर मार्ट-प्रोप्रा. अशोक पवार' वाटलंच! तर थोडक्यात त्यावेळी तरी ती सुनसान जागा होती. उगाच थांबवलं यांना अस मला वाटून गेलं.
'जरा वस्तीच्या ठिकाणी गेलो असतो तर बर झालं असतं.' माझं मन मला सूचना देत होतं..
"सुन.. तेरेको जल्दी है तो तू इधरीच रुक. तेरा फोन दिखाके आता मै.."
'साल्या ह्या लोकांच्या भाषेत क्रियापदं नसतात कि काय?' मी गुपचूप उभा राहिलो.
"उसका कोनसा फोन बोला रे?" कोकण्याचा त्याच्या सहका-याला प्रश्न..
"एन सेवंटी" तत्पर सहकारी उत्तरला.
'सुटलो तिच्यामायला...' मी मनातल्या मनात सुटकेचा निश्वास टाकला..
"माझा नाहीये तो.." मी माझा फोन काढून त्याच्यासमोर नाचवत म्हटलं.
"दे इकडे.. मै दिखाके आता.."
"असा कसा देऊ? तुम लोग लेके गये और वापीस नही आये तो?"
माझ्या या प्रश्नाने कोकणी जरासा गांगरला पण सावरून त्याने आपला फोन बाहेर काढला. नोकियाने कच-यासारखी मॉडेल्स लॉंन्च केल्यामुळे तो नेमका कोणता फोन होता याचा मला अंदाज आला नाही.
"ठीक हे? ए खालिद तू पन दे रे तुजा फोन"
'खालिद नाव काय या प्राण्याचं ?' इम्रान भायची ऑर्डर आल्यावर त्याने आपला पण फोन दिला.
दोन्ही फोन्स माझ्या हातात टेकवून त्यानं विचारलं..
"इस्से तो मेहंगा नही ना तेरा फोन?"
खरं तर असावा पण या प्रश्नामागच्या भावना 'आमचे फोन तुझ्या हातात असताना आम्ही तुला ठकवून कुठे जाणार नाही' अश्या असाव्या म्हणून मी नकारार्थी मान हलवली.
"ये खालिद रुकेगा इधरीच. मै जाके आता.. यूँ गया और यूँ आया.."

इम्रान कोकणी शेजारच्याच बिल्डिंगच्या मागे गेला.. काही क्षण शांततेत गेले. आता या खालीदमियांशी काय बोलणार?
"किधर गये वो भाईसाब?" मी काहीतरी बोलायचं म्हणून बोललो.
"सलीमभाई के घरपे. उन्को दिखाके आयेंगे तुमारा मोबाईल. उनकी भेन घरपेही रहेगी. वो पेचान लेगी"
'आयचा घो याच्या!! नुसता बोलला तरी शिव्या घालतोय कि काय असं वाटतं!'
"पर वो एन सेवंटी था ना. माझा तो नाहीये. कितना दूर है उनका घर?"
"पासहीच है. तेरा फोन नही भी रहेगा तो भी वो ना बोलना मंगती!!"
आता काय करायचं? शांतता भंग करणं कठीण जाऊ लागलं.. टिपिकल रापलेला चेहरा, रंगवलेले केस, गळ्यात कसल्या कसल्या साखळ्या स्टील,अल्युमिनियम वगैरेच्या असाव्यात.. रस्त्यावर विकत मिळतात
तसल्याच.. झोपडपट्टीला साजेशी पर्सन्यालिटी!

'यांचा काही प्लान तर नसावा? फोन घेऊन पळून जायचा? नाहीतरी हे हातात दिलेले फोन त्यांचेच आहेत कशावरून? हे कलटी देतील नि आपण लटकायचो . मागे एकदा मित्राच्या बाबतीत घडलेला किस्सा मला आठवू लागला. तो रस्त्याने चालत असताना दोन हेल्मेटधारी बाईकर्स त्याच्या शेजारी आले आणि त्याला म्हणाले कि त्यांना एक अर्जंट फोन करायचा आहे पण त्यांच्या फोन ची battery संपली आहे. त्याने औदार्य दाखवून नंबर विचारला डायल करण्यासाठी तर ते लोक म्हणाले कि 'माझ्या कॉल साठी तुम्ही तुमचे पैसे वाया घालवू नका. माझ सीम कार्ड तुमच्या फोन मध्ये घालून मी कॉल करतो..' माझा मित्र बिचारा भोळा.. मदत करण्यासाठी त्याने आपलं सीमकार्ड काढून फोन त्यांच्या हातात दिला..आणि त्या दोघांनी त्याच्या डोळ्यासमोर त्याचा फोन घेऊन पोबारा केला!! असलं काहीतरी आत्ता झालं तर? नाही. यांच्याशी सबुरीने वागून फायदा नाही'

मी काही बोलणार एवढ्यात 'इम्रानभाय' परतला.. माझ्या फोनसकट! मी सुस्कारा सोडला.
"ये फोन नही है बोलती वो"
'सुटलो बुवा' त्यांचे फोन देऊन मी माझा फोन परत घेत आणि चेक करत मी विचारलं "मग मी जाऊ का?" सुदैवाने फोन वनपीस आणि ऑपरेशनल होता.
"रुक.. वो फोन ये नही बोला उसने. आदमी नही.. फोन काय कोनपन बदलू शकतं"
"....."
"उसके हात मे अंगुठी है बोला और गले मे गनपतीका पेंडल है ऐसा बोला उसने.."
एव्हाना मला काहीतरी गडबड असल्याचा वास येऊ लागला होता.. सगळ्या खुणा माझ्या "दागिन्यांच्या" रिलेटेडच कशा काय?
"मेरा तो थंब रिंग है. अंगुठी नही."
त्याने सरळ माझ्या गळयाजवळ हात नेऊन चेन चाचपायला सुरुवात केली. मी मागे सरकलो.
"क्या कर रहे हो? उसमे कोई पेंडन्ट नही है.."
चैनमधला गणपती बोटात धरून दाखवत तो म्हणाला "नही है?तो ये क्या है? XXX समझा क्या मेरे को?"
"वो लॉकेट है. पेंडन्ट नही! " मी सांगितलं
" वो मेरेको पता नहीं. जो भी है ..ये उनको दिखाना पडेगा .."
"मैं आके उनको दिखता हूँ.."
"मस्जिद है उधर. समझा ना? मस्जिद! मस्जिद में सोने के जेवर अलाउड नहीं रहते.. और उधर अपने बच्चे भी है. खालीपीली झगडा हो जायेगा. निकालके दे दे.. में दिखाके लाता हूँ"
"निकालके कैसे दे दूँ? जिनको दिखाना है उनको यहाँ लेके आओ.." काहीतरी मोठा लोचा होता खरा..
"क्या रे..? तेरे से सीधा बात किया तो तुम हमको आडा ही लेने लगा.. बोला ना तेरेको? निकालके दे दे.. चल अंगूठी निकाल.. ”
मी टरकलो.. तरी पण अवसान राखून मी बोललो.. "ये बात नाही है.. लेकिन ऐसे कैसे दे दूँ? वैसे भी वो निकलती नहीं.."
"अरे? उंगली में डाल सकता है तो निकाल नहीं सकता?"
"ना.. निकाल के देखो चाहिए तो..बचपन में पहेनी थी.." विशिष्ट पद्धतीने काढल्याशिवाय ती थम्ब रिंग निघत नाही हे मला माहित होतं.त्यामुळे मी माझा अंगठा त्याच्यासमोर केला ..त्याने जराशी झटापट करून पाहिली पण माझ्या थम्ब रिंगने जाम दाद लागू दिली नाही!

खालिद कडे बघत त्याने माघार घेतली.
'हुश्श.. वाचवली बुवा' आमचे मनाचे श्लोक! "मैने बोला था.. वो नही निकलती"
"हां.. ठीके ठीके.. ज्यादा बात मत कर..चेन निकाल फिर.."
"क्काय?" साला आगीतून सुटून फोफाट्यात पडलो होतो मी!
"सिधेसे निकाल के देता या मै निकालू?" त्याने डायरेक्ट गळ्याच्या चेनलाच हात घातला!!
मी मनात म्हटलं गंडलो आता.. मी चटकन त्याचा हात धरला आणि चेन त्याच्या हातातून सोडवून घेतली. त्याला हा प्रतिकार अनपेक्षित असावा.
"समझता नही क्या तेरेको? क्या रे खालिद? समझाने का क्या अपने तरीकेसे?"
"सुनता नही तो समझाना हि पडेगा!" खालिदने री ओढली..
कोणाला धमकावायचं असेल तर बम्बय्या हिंदीसारखी भाषा नसावी. काय लहेजा आहे...वा! पण ही भाषेचं कौतुक करायची वेळ नव्हती.
त्या दोघांनी येऊन माझ्या गळ्याशी झटापट सुरु केल्यावर मला चेन काढून द्यावीच लागली नाहीतर त्यांनी ती तोडून काढली असती..

'सर सलामत तो पगड़ी पचास' असंच म्हणतात ना आपल्या जिवावर बेतत असेल तर? आणि काय प्रसंग गुदरला होता! माझी सोन्याची चेन त्यांच्या हातात आणि ती सुद्धा मीच काढून दिलेली! तेवढ्यात माझा फोन खणखणला. मला कुणाच्यातरी आधाराची गरज होती. मी उचलणार इतक्यात…
"तेरेको बंद करनेको बोला था ना? दिमाग में घुसती नही क्या तेरे बात..?" इम्रान गरजला..
मी घाबरून फोन कट केला..
"रहेता किधर है तू ?"
मी क्षणभर विचार केला आणि बोललो "इधर ही..बांगुरनगर मे. 'सरगम' बिल्डींग मे"
मी बिनदिक्कत खोटं बोलायला सुरुवात केली! काकांच्या बिल्डिंगचं नाव मी सांगून टाकलं. इथलाच माणूस आहे म्हटल्यावर कदाचित यांचा विचार बदलेल असा माझा होरा होता.
"क्या? इधर का ही है क्या तू? तो दिखता कैसे नही? तुम्हे घुमते हुये तो कभी नही देखा हम लोगोने" साल्यांनी माझ्यावर वॉच ठेवून सापळा रचला होता तर!!
"हालही मे आया हूँ इधर" माझी पण कमाल आहे! खोटं तेपण एकदम सुसंगत!!!
"तो पहले किधर रहता था?"
"वेस्ट में.. आरे कॉलोनी में.." ए.. दे धमाल.. तेवढ्यातल्या तेवढ्यात मी स्वतः वरच खुश झालो.
"तो इधर कब आया..?" प्रश्नावली काही संपायचं नाव घेत नव्हती.
"पिछले सन्डे को ही शिफ्ट हुए हम लोग..हफ्तेभर ऑफिस में रहूँगा तो बाहर कैसे दिखूंगा?" वा! काय लॉजिक सुचलं!!

त्यांनी आपापसात काहीतरी डिस्कशन सुरु केलं.. एकदम खालच्या आवाजात..आणि त्यानंतर इम्रान बोलता झाला.
"चल.. तू इधर ही रुक.. चेन भाई को दिखाके वापिस दे देता.."
"मैं आता हूँ आपके साथ..इतनी मेहेंगी चीज आपके हात में देके मै इधर रुक नाही सकता" मी कासावीस झालो होतो..
"साला.. XXXX तेरेको सौ बार समझाया फिर भी वही बात..बोला ना मस्जिद में जेवर अलाउड नहीं है..." खालिदकडे वळत तो म्हणाला.."ये ऐसे नहीं मानेगा.क्या बोलता खालिद ?"
खालिद ने ज्या पद्धतीने मान हलवली ती सहमतीची खूण असावी कारण इम्रान पुढे सरसावला..मी दोन पावलं मागे हटलो.. अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. परिस्थिती चिघळत चालली होती.
"तेरेको इतना मारेंगे ना.. हात पाँव तोडके रख देंगे. घरपे चलके जानेके काबील नहीं रहेगा.."
माझ्या शरीराला घाम फुटू लागला होता.भीतीनं हातपाय थरथरू लागले. मी काही बॉलीवूड किंवा दाक्षिणात्य सिनेमातला हिरो नव्हतो.. जर असतो तर नक्कीच बाह्या सरसावून,नुसते दोन गुद्दे लगावून दोघांना हवेत उंच उडवून दिलं असतं आणि तेदेखील आज्ञाधारक मुलासारखे हवेत गोल गोल फिरत किंवा उडत छतावर जाऊन कळवळत पडले असते!!
मला तर काय बोलावं सुधरेना.. घशाला कोरड पडली.. मी आवंढा गिळला..

तोपर्यंत मागं वळून ते दोघंही त्या बिल्डींगच्या मागे जाऊ लागले होते. मघाशी इम्रान कोकणी गेला त्याच. मी त्यांच्या मागे मागे जाऊ लागलो आणि पाहतो तर काय.. मागे मोकळी जागा. जराशी पुढे बैठी चाळ. बहुतेक तिथल्या लोकांना कुठल्यातरी बिल्डरनं रीलोकेट केलं असावं, कारण सर्व दारं बंद होती! थोड्या वेळापूर्वी इम्रान कोकण्या फोन दाखवून जेवढ्या वेळात मागे परतला होता त्यावेळात तो त्या मोकळ्या मैदानातून धावत जाऊन त्या बैठ्या घरापर्यंत पोचणंदेखील मुश्कील होतं. सलीम भाईला भेटणं तर लांबच! म्हणजे फसवणूक...निव्वळ फसवणूक चालू होती तर!! मघाशी याचा अंदाज होता; आता तर कन्फर्म झालं! धमक्या आणि दादागिरी माझी चेन लांबवण्यासाठी होती. माझ्या मनावर फसवणूकीच दुःख दाटत चाललं. अंगातला क्षत्रिय-मराठा जागा झाला!

मला कोणीतरी लुटलं आणि ते सुद्धा ते निशःस्त्र असताना? नुसत्या धमक्यांच्या जोरावर? आणि तू साधा विरोध नाही करू शकलास? 'सर सलामत तो पगड़ी पचास' असं म्हणतात ते आपल्या जिवावर बेतत असताना नव्हे तर स्वतःचा पराभव लपवत असताना!
मला अचानक साक्षात्कार झाला. 
मारलं तर मारलं...गुपचूप स्वतःची वस्तू देऊन टाकण्यापेक्षा खाऊ थोडा मार! हातपाय मोडतील म्हणतात ना? माझे पण हात काय केळी खायला नाही गेलेले! दोघांपैकी एकाला तर लोळवेनच.. जरी नाही लोळवला तर त्यांच्या लक्षात तर येईल कि इतक्या सहजासहजी मिळत नाहीत गोष्टी! हातपाय मोडले तर सरळ करायला येणारा खर्च हा चेनच्या किमतीच्या निम्मा सुद्धा नसेल! लढलो तर साला पश्चाताप तरी होणार नाही. प्रतिकार केल्याचं समाधान तरी लाभेल.. कोणीतरी येऊन तुला लुटतो आणि तू मुकाटपणे लुटू देतो.. माफ करशील का स्वतःला?' माझ्यातला स्वाभिमान जागृत झाला... 'हरहर महादेव.. जय भवानी जय शिवाजी ..' माझ्या मनातल्या श्लोकात या ओवीचीसुद्धा भर पडली!

"रुक" मी मागून पळत जाऊन हात इम्रानच्या खांद्यावर टाकला.
"क्या बे अभीतक पीछे पीछे आ रहा है? और सीधा कंधे पे हाथ? औकात भूल गया क्या?" रस्त्यावरचा छपरी मनुष्य माझी लायकी काढत होता!
"देखो भाई..आप मेरा चेन वापस दे दो.."
"तेरेको बताया ना.. सलीमभाई..."
"जो भी भाई हो मै खुद जा के दिखा दुंगा.. मुझे रास्ता दिखा दो.. "
इम्रान कोकणी खालिदकडे बघत हसला.. "साले वो उधर फेंक दुंगा तेरा चेन फिर ढूंढते बैठेगा.." लांबवर बोट करत तो बोलला..
"मेरा चेन वापिस कर दो" मी पुन्हा अवसान आणत बोललो.
"हिम्मत है तो लेके जा" हात पसरवत कोकण्याने challenge केलं.
मी सरळ जाऊन चेन उचलली आणि मुठीत घेतली. त्याने माझा हात धरला मी जोराचा हिसडा मारून तो सोडवून घेतला. मघासपासूनच्या युद्धातला पहिला विजय! मी मनोमन खुश झालो!
"अपने लड्कोंको बुला रे.. साल्याला राडा व्ह्यायला पायजे वाटतं इथे.."  इम्रानने खालिदला म्हटलं
लगेच फोन बाहेर काढून मी एका मित्राचा नंबर डायल करत म्हटलं "बोलावच!! राडा तर राडा.. वन टू वन होऊन जाऊ देत काय ते.. पण अशी तशी चेन द्यायचो नाही मी..समजलं?"
'ऑल द रुट्स टू धिस लाईन आर बिझी' फोनवरची बाई मंजुळ आवाजात मला सांगू लागली... मी चेह-यावरचे भाव अजिबात बदलू न देता बोललो "अरे..मी इकडे अडकलोय.. कोण आहेत माहित नाहीये.. अशोक पवारच्या फर्निचर च्या दुकानाच्या शेजारच्या गल्लीतून आत ये.. लकी फर्निचर मार्ट आणि हो जमलेल्या सगळ्या पोरांना घेऊन ये. कितीजण आहेत? मग आठजणच या! बाकीच्यांना थांबू देत तिकडेच."
माझा उभा जन्म मारामाऱ्या करण्यात गेला असल्याच्या आविर्भावात मी तावातावाने बोलत होतो.. आणि फोनवरची प्रीरेकोर्डेड मंजुळाबाई हिंदीतली सूचना पूर्ण करून मराठीत बोलत होती .."या मार्गावरील सर्व लाईन्स व्यस्त आहेत.. कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा.."वगैरे वगैरे..! मी फोन ठेवला.. "बुलाया क्या तुम्हारे बंदोको?' गुर्मीत मी विचारलं..

मी दिलेलं ओपन challenge आणि माझा बदललेला आवेश बघताच त्यांचा नूर पालटला.. खालिद तर गुपचूप सटकायच्याच मार्गावर होता.. इम्रान कोकणीने मात्र दम द्यायचा सोडलं नाही..
"ए चल! निकल इधरसे!! सिधा वो पतली गली पकड़के इधरसे वटनेका अभी..और दुबारा इधर नजर आया ना तो याद रखना..समझा ना?"
हातात अलगद पडलेलं सावज निसटून चालल्याचं दुःख मात्र त्याला चेह-यावरून लपवता येत नव्हतं.. मी तोच आवेश ठेवून त्यांच्याकडे वळून बघत बघत, सावकाश चालत त्या गल्ली पर्यंत आलो. ते दिसेनासे होताच उसनं जमवलेलं अवसान आता क्षणार्धात गळून पडलं. चेन आणि फोन खिशात कोंबून मी सगळ्या शक्तीनिशी पळत सुटलो. न थांबता... अगदी इनॉर्बीट मॉल येईपर्यंत!!

गुरुवार, ९ सप्टेंबर, २०१०

फॉर्म १६ आणि अनामिका

फॉर्म १६ नुसार "सरल" भरून रिटर्न्स फाईल करणं हे नोकरदार वर्गाला नव्याने सांगायला नको. जुलै आला कि लोकांची धावपळ सुरु होते..
"आपल्या ओळखीचा आहे एक.. त्याने भरून दिला फुकट.."
"काय नाय रे.. सोप्पं असतं.. फॉर्म १६ बघायचा आणि कॉलम भरत जायचे..."
"तुझा इकडे नाय सबमिट होणार.. प्रभात रोड च्या ऑफिस ला जावं लागेल.. आपला झाला. माझा मित्र आहे त्याची वट आहे.त्याने परस्पर पाठवला.."
"ऑफिस मध्ये येतो ना तो अकौंटंट.. सोडायचे २०० रुपये.. डोक्याला ताप नाही.."
इत्यादी संवाद हमखास कानावर पडतातच..
नोकरीचं पहिलं वर्ष सरेपर्यंत आपला ह्या भानगडींशी काही संबंध नसतो.  अचानक आलेल्या या गोष्टी दुर्बोध वाटायला लागतात आणि त्यामुळेच ‘ती’ माझ्या आयुष्यात आली.
तसं बघायला गेलं तर अपघातानेच आणि खरंतर "इन्कमट्याक्स" वाल्यांच्या कृपेने!

"रिटर्न्स फाईल करने थे ना.. त्याच्यामुळे उशीर झाला" तिची ही मिश्र भाषा ऐकून पहिल्यांदा मी तिच्याकडे पाहिलं. कॉन्फीडन्ट चेहरा, सावळी त्वचा,लक्षवेधक बांधा, ओव्हरऑल आकर्षक बाह्यरूप आणि कंपोज्ड व्यक्तिमत्व असं तिचं थोडक्यात वर्णन! 'तिलक' (अर्थात सदाशिवेतल प्रसिद्ध नाश्ता सेंटर, उच्चारी टिळक!) वर ती फोनवर कोणाशीतरी बोलत होती. 'रिटर्न्स', 'फाईल' वगैरे शब्द कानावर पडल्यावर मी वड़ापाव खाता खाता जरा सावध झालो.
"हाय! तू रिटर्न फाईल करतेस का? माझेपण करायचेत" मी तिरमिरित जाऊन बोललो.. माणूस परिस्थितीने गांजलेला असला कि इतर कसला उदाहरणार्थ लाज,लज्जा,भावना यांचा विचार करत नाही. मीपण त्यातलाच!!
माझ्या कडे विचित्र नजरेने पाहत ती जरा बाजूला झाली..
"सॉरी..पहचान न होने पर भी बात कर रहां हूँ  पर मुझेभी आय टी रिटर्न्स भरने थे.. आप कि फीस बता दिजीयेगा..लेकीन मुझे करवाने ही है.." मी भानावर येत आजुबाजुला पाहत विचारलं. न जाणो हिच्या आजुबाजुला एखादा सांड चहा आणायला गेलेला असायचा आणि त्याचा गैरसमज व्हायचा!
"कर दुंगी ना..बट आय चार्ज १०० रुपीज पर फॉर्म!" ती म्हणाली.
"अम्म्म... मेरे औरभी कलीग्ज है .उनके भी करने थे.." ती एकटीच आहे याचा एव्हाना मला अंदाज आला होता त्यामुळे मघाशी एकवटलेलं धैर्य वापरून मी पुन्हा तोंड उघडलं.
"ठीकाय, करते मी. पाचसहा असतील तर आय वोन्ट चार्ज फॉर यू ..आय मीन योर्स विल बी फ्री ऑफ कॉस्ट " डायरेक्ट बिझनेस ऑफर? तीपण मराठीत? मीपण चाट पडलो!
"तुला मराठी येतं?"
"मराठीच आहे अरे मी.. कामानिमित्त हिंदी इंग्लिश बोलावं लागतं.."
"कुठे काम करतेस?"
"राठी and असोसीएट्स"
"आणि तुझं नाव ?"
"अरे,किती प्रश्न विचारशील? सांस भी लेने दोगे या नही?"
आमची पहिली ओळख ही अशी.. नाव विचारलं ते मोबाईल नंबर एक्स्चेंज करतानाच.

त्यानंतर या ना त्या निमित्ताने तिचा contact होतच राहिला आणि मग तो तसा होणं हा दिवसाचा अविभाज्य भाग बनला.
"फक्त काम असतानाच फोन नाही करत मी.." अस मला म्हणून बोलायला सुरुवात करायची ही तिची सवय! पण "तुझ्याकडे कुठला नवीन पिक्चर आहे का?" अश्या विचारणेपासून "मला तुझा पेन ड्राईव्ह हवा आहे रे... दोन चार दिन के लिये" अशा अधिकारवाणीच्या बोलण्यापर्यंतचा तिचा प्रवास अगदी एखाद्या महिन्यातच झाला.. एखादी मैत्रीण आपल्या मैत्रिणीसाठी जे काही करू शकते ते सर्व आपल्या मित्रासाठी करू शकते का? या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी देण्याइतकी जाणीव तिने करून दिली.

"अरे बच्चा.. तुझी टोटल इन्व्हेस्टमेंट आणि बाकीचं कॅल्क्युलेशन बघता तुझे फक्त ६००५ रुपये ईअर्ली taxable आहेत, उतना ही कर इन्व्हेस्ट" म्हणून तिने माझा एलआयसी चा कमीत कमी प्रीमिअम किती असावा हा मला बरेच दिवसांपासून पडलेला प्रश्न चुटकीसरशी सोडवून दिला होता. (आणि जेव्हा नंतर tax कॅल्क्युलेशन ची शीट आली तेव्हा तो आकडा अचूक होता यावर शिक्कामोर्तब ही झाल!) ती बी कॉम करत होती आणि जॉबही. पण सांभाळायची दोन्ही! अर्थात कॉलेज ला दांडी मारणं जास्त फ्रीक्वेंट असायचं.
"मला आवडतं हे tax वगैरेचं काम करायला. यू गेट टू अप्लाय योर नॉलेज इन लाईफ एन यू अर्न मनी अल्सो!" ती जस्टीफीकेशन द्यायची. मला खरतर कशावरही ऑब्जेक्शन नव्हतं आणि का असावं? माझा देखील फायदाच होत होता त्यात. तिने माझा विनाकारण कट झालेला tax मिळवून दिला होता, माझं जराजीर्ण झालेलं pancard रिन्यू करून दिलं होतं आणि बरंच काही!

"हलो"
"हाय बच्चा!"  कायपण नाव ठेवलं होतं माझं! बच्चा!
"काय करतेयस गं?"
"कुछ नही..लंच के बाद सोयी थी..अभी नींद खुल गयी थोडी देर पहले.. तू बता.."
"रिसेप्शन ला चाललो होतो कात्रज च्या जैन मंदिरात.... एका मित्राचं लग्न झालंय. तुमच्यातलाच आहे...मारवाडी. येणारेस?" मी आपलं विचारायचं म्हणून विचारलं..
"ए मी मारवाडी नाहीये हां.. जैन आहे. आणि तो पण जैनच असणार.. आणि तू मला न्यायला येशील?"
मी अवाक! "म्हणजे तू येणारेस?"
"येते ना.. आय लाईक सच फंक्शंस .."
मी गुपचूप तिला आणायला गेलो.. ही बया सजून धजून तयार!!
"अग ए.. लग्न माझ्या मित्राचं झालंय!! तुझं नाही.."
" जैन आहे म्हणालास ना? तिथे असचं जाव लागतं. and व्हॉट इज धिस?.. जीन्स? यू गॉन mad ऑs व्हॉट? चेंज कर पहिलं.."
" ए तू नको येऊ हव तर पण मी असाच जाणार आहे"
"गपचूप बाईक ने तुझ्या flat कडे आणि चेंज करून ये. मी खाली वाट बघते."
इलाज नव्हता! स्वतःच्या पायावर मी कु-हाड मारून घेतली होती!!
...रिसेप्शन नंतर मित्राने स्वतः फोन करून मी नक्की लग्न वगैरे केलं नाहीये ना त्याची खातरजमा करून घेतली!!

ती माझी tax कन्सलटन्ट झाली,इन्व्हेस्टमेंट advisor झाली,माझी fashion डिझायनर झाली, मी गाडीमुळे प्रॉब्लेममध्ये असताना माझी ड्रायव्हर सुद्धा झाली.. "मैत्री" हा शब्द अपुरा वाटायचा आमच्या नात्याला. तिला बॉयफ्रेंडही होता. अगदी प्रेमळ -म्हणजे तिच्यासाठी! माझ्याशी पण बोलायचा तिच्या फोनवरून. मी त्याला निरुपद्रवी वाटत असेन कदाचित! आम्ही कित्येकदा भेटायचं ठरवलंही होतं पण तो योग जुळून आला नाही. आमचा संपर्क असायचा तो तिच्याच थ्रू. त्याला अगदी बित्तंबातमी असायची; कुठे काय खरेदी केली इथून कोणता पिक्चर पाहिला आणि तो कसा आहे  इथपर्यंत. "सगळं सांगते मी त्याला.. आयेम गोन्ना बी हिज बेट्ट हाफ" हे वरून!! पण नंतर मला त्याची सवय झाली होती. मीही तिच्या जीवनात काही भूमिका निभावल्या पण त्या तेवढ्याश्या कृशुअल नव्हत्या. तिचं सगळं व्याख्यान ऐकून घ्यायचं. सल्ले द्यायचे, तिची गुपितं ऐकून ती विसरून जायची," मिटवलंच पाहिजे नाहीतर ही ब्याद माझ्या गळ्यात पडायची" असं जाहीर करून बॉयफ्रेंडशी भांडण झालं की मिटवायचं.अमका कसा हिच्याशी फ्लर्ट करतो, तमकी कशी हिच्याबद्दल जेलस फील करते वगैरे तिच्या न पाहिलेल्या इतर मित्र-मैत्रिणीविषयीच्या कागाळ्या ऐकायच्या इत्यादी इत्यादी.

कमला नेहरू पार्क हे तिचं आवडतं ठिकाण. कॉलेज, ऑफिस आणि हॉस्टेल यापैकी कुठे ती नसेल तर मोस्ट ऑफ द टाईम्स ती तिथे असायची.
"के एन पी पे हूँ.. आ रहा है क्या चाय पिलाने??" तिचा फोन यायचा.
मुलीने दिलेलं आमंत्रण कोणी टाळतं का? "आलोच.." हे माझं उत्तर असायचं आणि कृतीही! उभ्या उभ्या तिथला बासुंदीयुक्त मसाला चहा पीत मी तिच्या गोष्टी ऐकत राहायचो आणि तिला उगीच सल्ले देणं, तिच्या बोलण्याला उगीचच response देणं वगैरे गोष्टी करायचो. कमला नेहरू पार्क ला गेल्यावर आपल्या बरोबर असणा-याच मुलीकडे सोडून इतरत्र नजर न वळवणा-या मुलाने फार फार कठोर तपश्चर्या वगैरे केलेली असली पाहिजे असं माझं (वैयक्तिक असलं तरी) ठाम मत आहे!! तिच्या हे लक्षात यायला फार वेळ लागायचा नाही.हातावर चापटी बसली की ग्लास हिंदकळायचा.
"थांब गं!चहा सांडेल ना!!"
"लक्ष कुठेय तुझं ?"
"तुझ्याकडेच आहे.. काय म्हणालीस ते सांगू का ?"
"कान असतात माझ्या बोलण्याकडे.. डोळे कुठे भिरभिरतायत ते विचारत्येय.."
मी लाचार हास्य चेह - यावर आणायचो.. दुसरं काय करणार??
"आटप पटकन,या दत्त मंदिरात जाऊन येऊ.. चांगले विचार तरी येतील तुझ्या मनात!" तिचं हे भाबडं मत होतं आणि "सब लडके एक जैसे होते है" हे पालुपद! मी तिच्यामते कोणतही "गैरकृत्य" केलं उदाहरणार्थ मुलींकडे पाहणे,त्यांच्या सौंदर्याची तारीफ करणे, एखादी कमेंट (अर्थात त्या मुलीला ऐकू जाणार नाही अशा बेताने! कारण तेवढ आमच धैर्य कुठल?!) करणे वगैरे वगैरे कि हे पालुपद ती आळवायची. "चूप कर.. हे भगवान.. सब लडके एक जैसे होते है!" इत्यादी इत्यादी. आता जिथे इंद्र,मदन हे देव आमच्या "भगवान" लोकांमध्ये येतात तिथे 'भगवान'कडे तक्रार करून भागणार नाही हे या जैन मुलीला कोण समजावणार ? मी आपला तिच्या समाधानासाठी शेजारच्या दत्त मंदिरात जायचो..

माझ्या मित्रांच्या ग्रुपशी मी तिची कधी ओळख करून दिली नाही,ना तिने कधी आपल्या मैत्रिणींची इंट्रो करून दिली. तशी गरजही पडली नाही. त्यामुळे फ्रेन्डशिप डे ला वगैरे आमचे नेहमीच्या मित्रांसोबतचे कार्यक्रम आटपले की रात्री ९.३०/१० वाजता आम्ही भेटायचो. के एन पी च्या शेजारी किंवा करिष्मा गार्डन च्या इथे कॅड बी खाता खाता दिवसभरात काय केलं याचा हालहवाल एकमेकांना दिला घेतला जायचा.

ओळख जुनी होत गेली की 'अतिपरिचयात अवज्ञा' होते. 'टेकन as ग्रांटेड' अर्थात गृहीत धरलं जाणं होत जातं. यथावकाश आमचंही नातं जुनं होत गेलं. बारीकसारीक गोष्टींवरून खटके उडणे..वाद विवाद होणे या गोष्टी नवरा-बायकोत,बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड मध्येही होतच असतात.. आमच्या नात्याला तर नावच नव्हतं. तिथे तर हे होणं आलंच! शॉपिंग ला जायचं म्हटल्यावर एका पायावर तयार असणारी ती "कंटाळा आला" चं कारण पुढे करू लागली. "पिक करायला ये" म्हटल्यावर मीही "आज रिक्षा ने ये ना.. मी आताच चेंज केलंय"वगैरे सांगू लागलो. सदाशिव पेठ ते के एन पी हे अंतर मला अचानक लांब वाटू लागायचं तर रात्री ९.४५ म्हणजे तिला फार्र फार्र उशीर वाटू लागायचा. काही भांडण झालंच तर कोणा एखाद्याने माघार घेऊन समजावणीचा सूर आळवणे हे सुरुवातीसुरुवातीला व्हायचं पण त्यातली inconsistency वाढत गेली.. "मी का करू..?तुझी चूक आहे" वगैरे वगैरे

मग फायनली एका वर्षी पुन्हा फॉर्म १६ भरायची वेळ आली.तिला फोन करून नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे मी आणि माझ्या कलीग्ज चे फॉर्म्स तिला नेऊन दिले.
"पुढच्या आठवड्यात देते करून. पैसे तुझ्याचकडे ठेव. रिसीट्स दुंगी तब दे देना"
"ठीकाय, पण झाले की कळव हां नक्की! यावेळेला २० फॉर्म्स आहेत."
"हो रे.. कित्ती घाई?"
"नाही अगं. मला नाहीये.ज्यांनी दिलेत त्यांना आहे!"
"देते मग.."

आठवडा गेला.. २ आठवडे झाले.. तिचा काही रिप्लाय नाही.
"ए मुली.. कधी देणारेस?" माझा तिला कॉल!
"देते रे.. झालंच आहे.. फक्त आय टी ऑफिस ला सबमिट करायचे आहेत.दो मिनट का काम है.. करेगा क्या? "
"नको बुवा.. कर तूच..!"

होता होता महिना लोटला.. फॉर्म दिलेल्यांनी तगादा लावला..
"काय? करणार आहे ना काम नक्की तुझी ती 'मैत्रीण'? ख्या ख्या ख्या"
"आमचे व्हिसा रिजेक्ट होतील हां तिच्या नादात"
"अरे हे काम आधी कर, बाकीची नंतर"
" माझा फॉर्म परत दे.. मी दुसरीकडून घेतो करून.."
"तुझ कमिशन किती यात? ही ही ही..." अश्या कमेंट्स ऐकल्यावर माझंही डोकं गरम व्हायला लागलं.

"नाही नाही ते ऐकून घ्यावं लागतं तुझ्यामुळे. कधी देणार आहेस ?" माझा पुन्हा कॉल..
"अरे फक्त सबमिटच करायचे आहेत आय टी ऑफिस ला. मला पण वेळ नाहीये. आणून देते. कर तू.."
"म्हणजे काय? पैसे घेतेस ना वाजवून प्रत्येक फॉर्म मागे की उपकार खात्यात करून घेतोय.... फुकट मध्ये? महिना झाला तरी 'सबमिटच करायचेत..सबमिटच करायचेत..' " मी तिला वेडावत म्हणालो..
"हे बघ मला वेळ नाही.." तिचा आवाज हळू हळू चढायला लागला होता.
"महिनाभर वाया घालवून आता सांगत्येस तुला वेळ नाही? याचा अर्थ हाच ना की तुला गरज नाहीये आता आणि तुला... " मी पट्टी तिच्यापेक्षा वर नेली.
"तुला काढायचा तो अर्थ काढ.. आएम नॉट योर मेड टू लिसन योर ऑर्डर्स .. वन मोर थिंग..."
मी फोन कट केला .. मला त्या वन मोर थिंग मध्ये अजिबात स्वारस्य नव्हत.. माझी कामं आता ऑर्डर्स वाटायला लागली काय हिला? गेली उडत!

आठवड्याभरात माझ्या नावाचं कुरियर ऑफिसच्या पत्त्यावर आलं. सगळ्यांचे 'सरळ' भरलेले 'सरळ' फॉर्म होते त्यात.. माझ्याव्यतिरिक्त!! माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. चेह-यावर पाण्याचा हबकारा मारून मी शांत झालो. इतरांचा पाहून मी माझाही फॉर्म भरला. आय टी ऑफिस ला सबमिट करायला त्यांच्यातलाच एक 'गरजू' गेला. त्याचा व्हिसा इंटरव्यू होता २ दिवसांनी! काय करतो बिचारा! तो पावत्या घेऊन आल्यावर मी त्याला काय काय केलं ते विचारलं. "काहीच नाही' हे त्याच उत्तर ऐकून मी मनातल्या मनात पुन्हा तिला आणि मग स्वतःलाच शिव्यांची लाखोली वाहिली.

त्यानंतर तिचा संग सुटला तो कायमचाच. नंतर तिची खबरबातही राहिली/मिळाली नाही, मीही पेठेतून दुसरीकडे राहायला गेलो. एकही कॉमन फ्रेंड नसल्यामुळे संपर्क पूर्णपणे तुटला.

फॉर्म १६ मुळे सुरु झालेलं नातं फॉर्म १६ मुळेच संपलं!! पण आजही जेव्हा आय टी रिटर्न्स फाईल करायची वेळ येते तेव्हा तिची राहून राहून आठवण येते आणि वाटतं एखाद्या संध्याकाळी तिचा मेसेज येईल .." गुड इविनिंग बच्चा... मै के एन पी पे हूँ.. कॅन वी मीट? व्हॉट इज योर डीनर का प्लान?"

मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०१०

आज्जी..


"रे असो काय करतं? वायच ह्यो निवळ घे नि मग जा खंय तो.." मी शाळेतून घरी आल्यानंतर लगेच कुठे बाहेर पडायला लागलो कि आजीचा डायलॉग ठरलेला. दुपारचं जेवण करायच्याआधी साधारण ११.३०-१२ वाजता तांदळाची पेज पिणे हा शिरस्ता होता. ती स्किप करता उपयोगाची नाही. या पेजेतला तांदळाचा भात वगळता वरचं पाणी म्हणजे "निवळ". पेज नको म्हटली तर "निवळ" तरी घ्यावा हा आजीचा आग्रह. त्या पाण्यात सगळी पोषक तत्व आलेली असतात असं तिचं म्हणणं असे. " नको.. माका जावचा हा आता सायकल मारीत.. निवळ घेतलंय तर पोटात डूचमाळता..." माझं तिचा आग्रह मोडण्यासाठीचं ठरलेलं उत्तर. " हळू चलव हां रे सायकल.. नि लवकर ये.. गरम करून ठेवतंय पेज"

माझी आज्जी.. बाबांची आई.लहानपणी माझं विश्व होतं ते.. लहानपणापासून मी तिच्याबरोबरच असायचो आणि ती माझ्या बरोबर. तिच्या ख-या नावाने हाक मारणारं कोणीच हयात नव्हतं. आजोबा सुद्धा. मी साधारण पहिली दुसरीत होतो जेव्हा आजोबा गेले. ते काकांकडे राहायचे. आजीला कळलं तेव्हा ती धाय मोकलून रडत होती आणि तिला तसं पाहून मी हसत होतो. त्याआधी तिला रडताना कधी पाहिलंच नव्हत मी. मग मात्र ती थांबेचना म्हटल्यावर मीही रडायला सुरुवात केली असं धूसर धूसर आठवतंय..

मी "अहो आज्जी" असं संबोधन वापरायचो तिच्याशी बोलताना. पण इतरांशी बोलताना तिचा एकेरी उल्लेखच असे. आता करतोय तसा.

जाम लाड करायची माझे.. आणि फक्त माझेच हां. दादाचे नाही. नाही म्हणजे माझ्याइतके तरी नाही.माझे मात्र तिला शक्य होतील ते सगळे हट्ट पण पुरवायची. "आज्जी,माका चिटक्यांची उसळ व्हयी वाटाणे घालून.. तुमी करतास तशी.." असं नुसतं म्हटल्यावर "करतंय हां माजे बाय.." म्हणत ती नऊवारी साडीचा पदर खोचून गवार मोडायला घ्यायची त्याचवेळी काळे वाटाणे भिजत घातले जायचे. दुपारी आई ऑफिसमधून आली कि वैतागायची..
"काय आई, कशाला करता सगळं? मी आल्यावर करेन ना..!"
"गो.. गप -हंव हां, तुज्यासाठी नाय करुक हां.. हेका खावशी वाटली म्हणान करतंय.."
आई माझ्याकडे खाऊ कि गिळू नजरेने बघत स्वत:चं आणि बाबांचं ताट वाढून घ्यायची.. माझं आणि दादाचं ताट आजीच वाढायची आणि मग मला भरवायचीसुद्धा अगदी चौथीपर्यंत.. भुकेपेक्षा दोन घास कमी खावे हा सिद्धांत आजीला कधीच पटला नाही .. पोटाच्या क्षमतेपेक्षा दोन घास जास्तच खावे हे तिचं समीकरण. "वाढत्या आंगाची पोरा तुमी.. कसली कसली थेरा काढतास" म्हणत ती 'डाएट' वर टीका करत असे. तिने केलेलं केळ्याच शिकरण तर मला प्रचंड आवडत असे.. शाळेतून आलो की आठवड्यातून दोन तीनदा तरी माझा हा शौक मी आजीकडून पूर्ण करून घेत असे.

पाचवीपासून मी दुपारच्या शाळेत जायला लागलो तेव्हा सकाळी आजीची कोण लगबग असे. अगदी देवासाठी कंपाउंडमधल्या फुलझाडांची फुलं आणण्यापासून ते बंबासाठी जळण आणण्यापर्यंत! आईबाबांनी ऑफिससाठी ९:३० ला घर सोडलं कि आज्जी पूर्ण ताबा घेत असे. मग माझ्यासाठी दादासाठी आणि स्वत:साठी आंघोळीच पाणी तापवणे, चहापाण्याची छोटी भांडी आणि कप धुऊन टाकणे वगैरे छोटी मोठी कामं ती अगदी तन्मयतेने करत असे. मी आणि दादा तिला फुलझाडांच्या उंच वाढलेल्या फांद्या काठीने खाली वाकवून देणे, बंबात किंवा चुलीत सारखी काठी ढोसून निखा-यांवरची राख झटकून टाकणे, तिच्यासाठी गरम पाण्याची बादली बाथरूमपर्यंत नेऊन देणे अशी कमी कष्टाची आणि निरुपद्रवी कामं करत असू! दादाची शाळा जवळच होती त्यामुळे तो सायकल घेऊन जायचा पण मी स्कूलबसच कंटिन्यू केली होती. संध्याकाळी आलो की आजी दरवाज्यावर बसलेली असे माझी वाट पहात. मग पुन्हा चहा,आईने लपवून ठेवलेलं फरसाण आणि हव्या असतील तर गरम केलेल्या चपात्या असा दणकून नाश्ता व्हायचा. मग मी खेळायला जायला मोकळा!

घरात सगळ्यात जास्त काळ आम्हीच एकत्र असायचो. मोकळ्या वेळात आम्ही दोघेजण खूप गप्पा मारत असू. ती प्रौढ साक्षरता वर्गातून थोडंफार शिकली होती. मी शाळेतल्या गमतीजमती तिला सांगायचो आणि तीदेखील त्यात रस घेऊन ते सगळं ऐकायची. बाबा लहानपणी कसे होते,काका काय मजा करायचे शाळेत, वगैरे गोष्टी सांगायला लागायची..त्याचवेळी बाबा आले की मग अजूनच धमाल.
"एकदा आईने जेवण बनवलं होतं. मला इतकं आवडलं की मी पूर्ण फन्ना उडवला.. दोघाजणांचं जेवण फस्त केलं.." बाबा सांगायचे..
"मग आजी, तुमी काय केलास?" माझी उत्सुकता.
"काय करतलंय, सगळा सरताहा बघल्यावर परातीत पीठ भिजौक घेतलंय.. ह्येका एकदम येवढा खावसा वाटात ह्या माका कसा समाजतला?"
"कायव सांगू नुको हां.. तू तेवा कमीच बनवलंलंस. माशे असतनासुदा मी कधी येवडो जेवलंलंय नाय.." बाबांचा बचाव.
"गप -हंव! माशे असले काय तिप्पट ढकलीस ता इसारलंस? स-स चपात्ये एकटो खाय.. अशे जेवनारे तिघे.. हात मोडान येय लाटतना!!"
आजी जेवणाची मापं काढायला लागली की बाबा माघार घेत.. आणि त्याचं भांडण जुंपल की मी आणि दादा मनमुराद मजा लुटायचो.. आईपण सैंपाकघरातून बेडरूमच्या दरवाज्यात येवून कमरेवर हात ठेवून या लटक्या भांडणाची मजा घ्यायची.
"काय गो.. काय ठेवलंहं ग्यासवर?"
"चपाती करत्येय" माझ्या आईला मालवणी बोलता येत नसे
"करपात ती.. जा जवळ -हंव"
"परतून आलेय मी.." असं म्हणेपर्यंत जळल्याचा वास नाकापर्यंत पोचलेला असायचा... आई लगबगीने ओट्याजवळ धावायची..
" शिरा पडली! सांगतंय तरी ऐकना नाय... बघलं? " असं मला म्हणत आज्जी मोठ्याने ओरडायची.. " गोsss माका वाढ हां ती चपातीss"

दादाने जिम जॉईन केल्यावर त्याच्या instructor ने दादाच्या भात खाण्यावर लगाम घालायचा ठरवलं. कोकणातलं घर आणि भाताला नकार?? आजीचं पित्त न खवळतं तरच नवल!!
"काय होणा नाय २ मुद भात खालस म्हणान... अरे भाताचो पिंड आपलो नि भाताकच नाय म्हणतं? कोण हा तो सांगनारो? फटकी रे येवंदे तेच्या तोंडार..." आजीने पट्टा सुरु केला की दादा गुपचूप भात घेत असे. खरतर त्याला भात आवडायचाच पण त्याला कारण हव असे instructor ला सांगायला.. "आज्जी सांगते त्यामुळे खावा लागतो भात!"
आजी सुद्धा भाताचा छोटासा ढीग रचत असे स्वत:च्या ताटात.. मी त्याला डोंगर म्हणायचो आणि तिने वरती थोडासा खळगा करून वरण ओतलं की मी "ज्वालामुखी फुटला..ज्वालामुखी फुटला.." असं आरडाओरडा करायचो आणि आजीचा ओरडा खायचो.. "जेवूक तरी दी सुखान..." म्हणत ती जेवायला लागायची.

मे महिन्याच्या सुट्टीत तिची काकांच्या गावाला ट्रीप ठरलेली.. महिनाभर काकांकडे राहायची. तिथे माझ्या चुलत भावावर प्रेमाचा वर्षाव करायची. जून आला की आमची शाळा सुरु व्हायच्या वेळी ती पुन्हा घरी डेरेदाखल! माझ्याविना तिला करमत नसे हेच खरं. पण तेव्हा मला या गोष्टी कळत नसत.
दहावीनंतर मी पुण्याला जायचा निर्णय घेतला.. तेव्हा आजी काकांकडे होती. ती परत आल्यावर मी तिला हे सांगितलं. तिला धक्का बसला असावा. काही बोलली नाही पण तिच्या जीवाची घालमेल जाणवत होती मला. २ दिवसानंतर मी एकटा बसलेलो असताना ती आली.
"रे.. जावकच व्हया काय भायर?"
"होय ओ.. थय माका इलेक्ट्रोनिक्स घेवक मिळताहा.. हंयसर तो ऑप्शन नाय हा.."
तिला फारसे काही कळले नसावे.. पण माझा काहीतरी प्रॉब्लेम आहे एवढे मात्र कळले..
"तुजो बापूस म्हणत होतो की हयसुदा इंजिनयर होऊचा कालेज आसा.." ती बाबांकडून चौकशी करून आली होती..

"माजे बाय... तो फुड्चो प्रश्न हा.. मी आता अकरावी बारावी करुक चल्लहंय पुण्यात.." ती त्यावर गप्प राहिली.. मी जाणारच आहे हे मात्र तिला कळलं..

मी पुण्यात निघताना तिचे डोळे पाण्याने भरले... "आज्जी.. मी येतलय महिन्या दोन महिन्यान.. तवसर कळ काढा.. " मी समजूत घालत होतो पण माझ्या मनातही भावनांचे कढ येत होते. आजीची इतक्या वर्षाची सोबत सोडून जायचे म्हणजे काय... पण माझे मित्रसुद्धा गाव सोडून जात होते. मी एकटा काय करणार होतो? आणि कधी ना कधी.. निदान २ वर्षांनी तर जावे लागणारच होते. नाहीतरी गावातलं इंजिनियरिंग कॉलेज तेव्हढंसं रेप्यूटेड नव्हतं.

पहिले काही दिवस तिच्याशिवाय काढायचे म्हणजे प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास झाला.. आंघोळीला टॉवेल नेण्यापासून, घालायचा शर्ट निवडण्यापासून ते अगदी सर्दी झाल्यावर नाकाला विक्स चोळण्यापर्यंतची प्रत्येक गोष्ट आजीची आठवण करून देऊ लागली,एवढा डीपेंडन्ट होतो का मी? कधी जाणवलच नव्हत आतापर्यंत!! आठवड्यातून एकदा मी घरी फोन करायचो बूथवरून तेव्हा आजीची न चुकता चौकशी करायचो आणि तिच्याशी बोलायचो पण... घरी गेलो की तिचा आनंद गगनात मावत नसे. मी पण तिला पुण्यातल्या गमतीजमती सांगायचो. तिची चेष्टा मस्करी करायचो आणि सूचनांची मोठी यादी ऐकून परत पुण्याला जायचो. पुण्यात आजारी पडलो की तिचा कांद्याचा काढा आठवायचा आणि त्यातून सुटका झाली याचा आनंदही व्हायचा!

तरुणपणी जसजसं आपण एखाद्यापासून दूर होत जातो तसतसं आपण त्याच्याविना जगायची सवय होते.. त्या व्यक्तीबद्दलच्या तीव्र भावना हळूहळू बोथट होत जातात. वर्ष दोन वर्षात मीही आजीशिवाय इतरत्र रमायला शिकलो.. पण जुनं हाड वळवावं तसं वाकत नाही. आजीला माझ्याशिवाय मुळीच करमत नसे. त्यात दादाही शिकायला म्हणून रत्नागिरीला गेला.. त्यामुळे ती अजूनच एकटी पडली.. झाडांना पाणी घालणे ,कचरा काढणे वगैरे कामं करून ती दिवसाचा वेळ काढायची. साधारण ८० वर्ष पूर्ण केली असतील तिने.. तिला तिचं जन्मवर्ष वगैरे माहित नव्हतं पण अंदाजाने तिचं वय तेव्हढ असावं..

एकदा मी न कळवता अचानक घरी गेलो.. सरप्राईज द्यायला.. सगळे खुश झाले..
बाबा आजीला म्हणायला लागले.. "इलो बघ.. शोधीत हुतस न काल.."
"मग मी सांगत होतंय ना.. तो कालच इलोहा.. होय ना रे झिला?" आजी म्हणत होती.
मला भानगड कळेना. मग आईने खुलासा केला. काल तिला स्वप्न पडलं किंवा भास झाला की मी आलोय आणि तिला हाक मारून कुठेतरी लपून बसलोय.. मला शोधून दमली;आई बाबांना सांगून थकली. कोणीच ऐकेना. आणि नेमका दुस-या दिवशी मी आलो होतो! इंट्यूशन म्हणतात ते हेच का? तेव्हा मोबाईल हा प्रकार ही नव्हता; लगेच मला फोन करून कन्फर्म करायला वगैरे. लहानपणी मी असाच तिला हाक मारून लपून बसायचो. तिच्यासाठी मी तेवढाच लहान होतो अजूनपण!

१-२ वर्ष झर्रकन गेली. मी इंजिनीरिंग सुद्धा पुण्यातच करणार हे तिला समजलं होतं. तिनं दोन महिनेच नव्हे तर तब्बल दोन वर्ष कळ सोसूनही मी तिला दिलेला शब्द पाळला नव्हता... तिचं वार्धक्य आता प्रकर्षाने जाणवू लागलं होतं. नाव विसरणं, काळ विसरणं वगैरे वार्धक्याच्या खुणा स्पष्ट दिसून येत होत्या. २ महिन्यांनी वगैरे गेल्यावर तिच्यातला बदल ठळकपणे जाणवायचा..

"खानास नाय कित्या?" मी विचारायचो
"हाडां हत नुसती.. तेंका कितीसा व्हया खाउक?" म्हणत ती विषय हसण्यावारी न्यायची.. तिच्या लहानपणाच्या गोष्टी सांगायची. तिच्या अर्थात आमच्याही नातेवाईकांनी हिच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन केलेल्या गोष्टी सांगायची..
"कामाक व्हये म्हणून मागल्यान रे तेनी ते कागद.. परस्पर जमीन तेंच्या नावावर करून घेतल्यानी.. माका वाचूक येयात असता तर?तेच्यानंतर जाऊन मोठ्यांच्या शाळेत बसाक लागलंय. पण काय उपयोग.. जमीन तुमच्या चुलत चुलत्यांच्या नावावर झाली ती झालीच.. माजीच चूक झाली.." म्हणत स्वतःच्या कर्माला दोष द्यायची..
वस्तुत: या गोष्टीचा मला काय उपयोग होणार ते तिचं तिलाच माहित.. पण तिला बहुतेक कुठल्याच बंधनात म्हणा,आरोपात म्हणा अडकायचं नव्हतं.

इंजिनीरिंगला असताना एकदा काहीतरी भयानक स्वप्न पडून मी जागा झालो. दुपारी बूथ वर जाऊन घरी फोन केला. आईने उचलला..
"हलो.. तू कशी काय घरी?"
"काही नाही.. रजा काढली होती आज. अचानक कसा काय केलास फोन?"
"असंच.. कसे आहेत सगळे? आजी?"
"बरे आहेत.."
एवढ त्रोटक उत्तर? काहीतरी चुकत होतं खास..!! २ दिवसांनी मी पुन्हा फोन केला.. "आई एक्स्पायर झाल्या रे काल.. " आई मुसमुसत होती..
काळजात धस्स झालं.. मला वाटलंच होतं. पुन्हा एकदा इंट्यूशन मिळूनही...श्या!!  "मी निघू का लगेच? परवा केला फोन तेव्हाच कि काय ?"
"तेव्हा नाही. तेव्हा सिरिअस होत्या..कालच गेल्या सगळे इथेच होते काका वगैरे. त्यामुळे फ्युनरल केलं कालच. तू आता कार्याला ये.. " आईने तसाच फोन ठेवला. आजी आता या जगात नव्हती.. माझे डोळे ओलावले.. जुने दिवस आठवून अश्रूंना बांध घालण कठीण होऊ लागलं. 'ती तिकडे आहे असंच समज' मन माझी समजूत घालत होतं पण ते तेव्हढ सोपं असतं का?

दहाव्याला मी गेलो.
"काही त्रास दिला नाही.. त्यादिवशी मला सांगीतलन रजा घ्यायला. दुपारी बोलावलं जवळ आणि मांडीवर डोकं ठेवून प्राण सोडले.. तुझी आठवण काढत होती पण तुला मध्येच यायला कसं सांगणार ? " बाबा सांगत होते. मी सुन्नपणे ऐकत होतो. वर्षानुवर्षाचं दुखण -खुपण नाही.. कोणाकडून सेवा करून घेणं नाही कि कोणाला कसला त्रास देण नाही.. आजी निघून गेली होती.. माझी वाट बघून पण मला न सांगताच..

"पिंडाला कावळा शिवत नाहीये.." भटजी सांगत आला.
"थांबा.मी येतो." मी म्हणालो. नदीच्या काठाकाठाने चालत मी पिंडदानाच कार्य चाललं होतो तिथे पोहोचलो.
"इलो हा गेsss तुझो लाडको नातूsss" बाबा आकाशात बघत ओरडले आणि झाडावरच्या कावळ्यांनी "काव काव" करत पिंडाभोवती गर्दी करायला सुरुवात केली...